घामाची दुर्गंधी घालवण्याबरोबरच डिओचे ‘हे’ फायदे बघून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सुगंधाची आवड माणसाच्या आयुष्यात पूर्वापार चालत आलेली आहे. काही सुगंध हे नैसर्गिक आहेत. त्यांची तोड आजवर कृत्रिम सुगंध करु शकलेले नाहीत.
पहिल्या पावसाने येणारा मातीचा दरवळ, वसंत ऋतूत येणारा आंब्याच्या मोहोराचा गंध, मोगरा, निशीगंधाचा धुंद करणारा गंध मनुष्य काही तयार करु शकलेला नाही.
पण हा त्यापासून सुगंधी द्रव्ये तयार करणं ही पण कला आहे बरं..अगदी ज्या चौसष्ठ कला आहेत त्यातही सुगंधी द्रव्ये तयार करणे ही एक कला आहे.
बरं, ती सुगंधी द्रव्ये तयार केली तरी ती व्यवस्थित प्रसंगोपात वापरणं ही त्याहून मोठी कला आहे.
म्हणजे जाहिरातीत दाखवतात तसा तुम्ही परफ्यूम लावलेला कळल्यावर तुमच्याभोवती मुलींचा कळप नको जमू दे पण आसपासची माणसं तरी पळून जाऊ नयेत इतकी काळजी घेऊन जरी ते परफ्यूम वापरले तरी त्याची निर्मिती सार्थकी लागली!
पूर्वी आणि आत्ताची जर तुलना केली तर पूर्वी सेंट ही फक्त श्रीमंतांची मिरासदारी होती. सर्वसामान्य लोक अत्तरच वापरायचे. तेही फक्त सणासुदीला!
अत्तराचा फाया बनवून अत्तरदाणीत ठेवला जाई, हाताच्या मागील बाजूस अत्तरदाणीला असलेल्या चांदीच्या काडीने ते अत्तर थोडेसे लावले जाई.
राजेरजवाडे अत्तराचे दिवे लावून मैफली करायचे. थोडक्यात सांगायचं तर सुगंधी द्रव्ये ही श्रीमंत आणि अतिश्रीमंत लोकांचीच मिरासदारी होती. शौकीन लोकांचच काम होतं.
हळदी कुंकू वगळता स्त्रीयांना तर अत्तर पाहायलाही मिळत नसेल कदाचित.
पण काळ बदलला. अत्तराबरोबर थोडी महाग असणारी सेंटची बाटली हळूच मध्यमवर्गीय कुटुंबात प्रवेश करती झाली.
नंतर नंतर जसं जागतिकीकरण झालं तसे कित्येक परदेशी ब्रँड असलेल्या सेंटच्या बाटल्या दिमाखात घरोघरी विसावू लागल्या.
पूर्वी केवळ अत्तर असणाऱ्या घरात परफ्यूम्स, बाॅडी स्प्रे, डिओड्रंट असे ओळीनं येऊन थांबले.
ड्रेसिंग टेबलवर एखादीच परफ्यूमची बाटली असायची तिथं वेगवेगळ्या ब्रँडच्या सेंटनी ठाण मांडून आख्खा कप्पा व्यापला. त्यांच्या वारेमाप जाहिरातींनी तर कुचेष्टेचाही कळस गाठला!
काही काही परफ्यूम्स विशिष्ट वेळी वापरले जावेत, स्त्रीयांसाठी वेगळे परफ्यूम, पुरुषांसाठी वेगळे परफ्यूम असेही संकेत ठरले.
शरीराशी थेट संपर्क न येता केवळ कपड्यांवर मारला जाणारा परफ्यूम तो सेंट, शरीरावर मारला जाणारा बाॅडी स्प्रे..अशी वर्गवारीही त्यात झाली.
डिओड्रंट हा दुर्गंधनाशक म्हणून वापरला जातो. शरीराला येणारा घामाचा दुर्गंध नाहीसा करण्यासाठी सर्रास डिओड्रंट वापरला जातो.
कधी कधी घामामुळे, किंवा जंतूसंसर्ग होऊन शरीरातील क्रिया बिघडलेल्या तरी शरीराला दुर्गंध येऊ शकतो. उन्हाळ्यात शरीराला खूप घाम येतो. काखेत तर खूप घाम येऊन त्याचा दुर्गंध येऊ लागतो.
त्यासाठी डिओड्रंट सर्रास वापरला जातो. तुम्हाला टवटवीत ताजेपणाची अनुभूती या सुगंधाने डिओ कितीतरी तासांपर्यंत देतो.
पण याच बरोबरीने डिओड्रंट अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येतो हे माहीत आहे का तुम्हाला? आज आपण हे डिओड्रंटचे वापर बघुया..
केवळ काखेतच मारायला डीओ वापरला जातो असं नाही. शरीराच्या इतर भागांवरही हा सौम्य सेंट तुम्ही वापरु शकता. जवळपास सहा विविध प्रकारचे उपयोग डिओचे आहेत.
१. तुमचा वाॅर्डरोब सुगंधी ठेवण्यासाठी –
आपला वाॅर्डरोब आपण केवळ कपडे ठेवण्यासाठी वापरतो. पण कधीकधी कपड्यांचाही सतत बंद ठेवल्यामुळे वास येतो.
तो नाहीसा करण्यासाठी एखादी डिओची बाटली तिचं झाकण काढून कोपऱ्यात ठेवा. कपाटालाही तो मंद मंद सुगंध येऊ लागेल.
जेंव्हा कपाट उघडाल तेंव्हा त्या मंद सुगंधाने चित्तवृत्ती प्रसन्न होतील.
२. स्तनांखाली –
जसाजसा उन्हाळा वाढू लागतो, घामाच्या धारा वाहू लागतात.
सर्व शरीरभर घाम सुटतो परंतू स्त्रीयांना स्तनांना आधार देण्यासाठी ब्रेसिअर वापरताना तिच्या घट्ट आवळून घालण्यामुळे स्तनांखाली घाम येऊन घामाचा दुर्गंध येऊ लागतो.
त्याठिकाणी डिओ वापरणं हे केवळ सुगंधित करणारेच नाही तर आल्हाददायक आहे. म्हणून हा सौम्य डिओ त्या जागी अवश्य वापरा. एक सौम्य आणि प्रसन्न अनुभूती येईल.
३. गुडघ्याच्या मागे –
गुडघा हा पायाचा सांधा आहे. तिथेही घामाच्या धारांनी जागा पटकावून ठेवलेली असते. जेंव्हा तुम्ही व्यायाम करता तेंव्हा भरपूर घाम येतो.
जर तुम्ही शाॅर्ट्स वापरत असाल तर घाम निथळून खाली जाऊ शकतो पण तुम्ही ट्रॅकसूट घालून व्यायाम करत असाल तर घामाचा वास येऊ लागतो.
मग त्यासाठी डिओड्रंट हा सर्वात सोपा उपाय आहे. गुडघ्याच्या मागे डिओ वापरा. घामाचा दुर्गंध नाहीसा करा!
४. खाजेने होणारी जळजळ टाळण्यासाठी –
घामामुळे सगळ्यात जास्त त्रास होणारी ही गोष्ट. अंतर्वस्त्रे घट्ट होऊन घामामुळे अंगाला चिकटून बसतात व खाज येऊन ते फार त्रासदायक ठरते.
अंडरवेअरमुळे जांघेत, किंवा ब्रेसियरमुळे खांद्याला, छातीपाशी त्वचा हुळहुळी होते. त्यासाठी त्या जागांवर डिओ वापरणं दोन्ही गोष्टी एकाच वेळी करतं!
घामाचा दुर्गंध नाहीसा होतो आणि खाजही थांबते कारण डिओमध्ये असलेले सौम्य घटक. म्हणूनच अशा जागांवर डिओ वापरावा.
५. रेझरच्या जखमांवर –
पुरुषांना दाढी करताना घाईत गालावर रेझरने एखादी बारीकशी चीर पडू शकते, त्वचेचा टवका उडणं या सर्रास होणाऱ्या गोष्टी आहेत.
अगदी बारीकशी जखम चरचरत असेल तर डिओमुळे गार होऊन थंडावा मिळतो. फक्त त्या फार मोठ्या जखमा नसाव्यात. छोटीशी जखम गार होण्यासाठी डिओ वापरणं चांगलं आहे.
६. नेलपॉलिश चे डाग काढण्यासाठी –
कधी कधी घरातील नेलपॉलिश रिमूव्हर संपलेलं असेल आणि तुम्हाला नखांवरील अर्धवट उडालेलं नेलपॉलिश काढायचं असेल तर हा सौम्य आणि अतिशय सोपा उपाय आहे.
कारण एक दोन स्प्रेमध्ये नेलपॉलिश सहज निघून जातं.
थोडक्यात काय डिओड्रंट केवळ घामासाठी नाही तर अजूनही किरकोळ वाटणाऱ्या पण महत्त्वाच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी सहज वापरता येतो.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.