भारतातल्या ह्या मुख्य ऐतिहासिक वास्तूंचं सौंदर्य खजिना बघून तुमचे डोळे दिपतील!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारतीयांवर निसर्गाचा तर वरदहस्त आहेच.
शिवाय बुद्धिमत्तेचे देखील अनोखे वरदान आहे, त्यामुळेच येथील माणसांनी निसर्गाशी योग्य ती सांगड घालून आपल्या कल्पकतेचा, बुद्धीचा योग्य वापर करून अनेक अशा वास्तू उभारल्या आहेत ज्या जगभरात कौतुकाचा आणि आश्चर्याचा विषय आहेत.
‘युनेस्को’ ने आपल्या ह्या ऐतिहासिक वास्तू ‘जागतिक वारसा स्थळ’ मध्ये समाविष्ट केलेल्या आहेत.
भारतातल्या अनेक वास्तू मानवनिर्मित आहेत ज्यांचा जगातल्या ७ आश्चर्यांमध्ये समावेश होतो. काही नैसर्गिक आहेत, ज्याच्या मधे मनुष्याने आपल्या कलेची चुणुक दाखवून जगाला थक्क केले आहे.
तर, काही शून्यातून निर्माण केलेले अद्भूत, अप्रतिम असे वास्तू कलेचे कौशल्य आहे. ह्या वास्तूंपैकी काही मोजक्या वास्तूंची सफर आज आपण ह्या लेखातून करूया.
१. अंजिठा आणि वेरूळ लेणी, औरंगाबाद – महाराष्ट्र :
अजिंठा येथील ही बुद्ध देवांची ही लेणी स्थापत्य आणि शिल्पकलेचा अद्भूत नमुना आहे.
आणि एकाच दगडात कोरलेली ही फार मोठी लेणी खरंच सौंदर्याचा अद्भूत नमुना तर आहेतच शिवाय सगळ्यांच्या कुतुहलाचा विषय आहेत. येथीलच वेरूळची लेणी ही देखील अत्यंत नयनरम्य आहेत.
काळ्या दगडात कोरलेली ही भगवान शंकराची भव्य लेणी कैलास लेणी म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. अनेक पर्यटक येथे ह्या लेण्यांची सुंदरता बघायला येतात.
शिल्पकलेचा हा अप्रतिम नमुना खरंच आकर्षणाचा विषय आहे. येथील मूर्त्या अत्यंत बारकाईने, नजाकतीने कोरल्या आहेत. ह्या मूर्त्यांचे दागिने देखील स्पष्टपणे दिसून येतात.
ह्यांचा आखीव रेखीव आणि प्रमाणबद्ध आकार, दाग-दागिने पाहून खरंच आश्चर्य वाटतं कारण, दगडात असे बारकावे कोरणे खूपच कठिण असते.
२. ताज महाल, आग्रा – उत्तर प्रदेश :
आग्र्याचा ताज महाल सुप्रसिद्ध आहे ते तेथील कलाविष्कारामुळे! पांढर्या शुभ्र, आकर्षित अशा संगमरवरी दगडामधे केलेले नक्षीकाम भारतीयांच्या अभिमानाचा विषय आहे.
असं म्हणतात इतर वेळेला तर हा खूप शोभून दिसतोच पण पौर्णिमेच्या रात्री चंद्र प्रकाशात हा आणखीनच झळाळून निघतो, पौर्णिमेच्या रात्री ह्याचे सौंदर्य अधिक उठून दिसते.
जगातील ७ आश्चर्यांमधील एक हा ताज महाल आहे.
३. कोणार्कचे सूर्यमंदिर, ओरिसा :
भारतीय स्थापत्याचा आणखीन एक आश्चर्यकाराक नमुना म्हणजेच कोणार्कचे सूर्यमंदिर!
१३ व्याशतकात बांधलेले हे मंदिर स्थापत्यशास्त्राचे उत्कृष्ठ उदाहरण आहे आणि १२०० मजूर १२ वर्षे हे मंदिर बांधण्यासाठी अविरत मेहनत घेत होते.
सूर्याच्या रथाच्या आकारात असणारे हे मंदिर सूर्य किरणांप्रमाणेच दिनचर्या असावी हे सुचवतात.
ह्याला आठ चाके आहेत, प्रत्येक चाकाला ८ आरे आहेत, त्यावर एक एक करूनन सूर्यर्प्रकाश आणि सावली पडते आणि सूर्यकिरणांचा प्रकाश आणि सावली ह्याच्या गणितानुसार एक एक असे ८ प्रहर हे आरे दर्शवतात!
त्यानुसार सकाळची कामे, दुपारी वामकुक्षी, मग संध्याकाळी विहार करणे आणि दिवेलागणीनंतरची कामे हे येथे कोरले आहे. येथील कोरीव काम देखील बारकाईने केले आहे.
येथे कळसात मोठे लोहचुंबक आहे ज्यामुळे जहाजे इथे आपोआप आकर्षित होतात. येथील आणखीन एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे येथील ध्वज वार्याच्या दिशेच्या विरूद्ध दिशेला फडकतो.
४. घारापुरीची लेणी, मुंबई – महाराष्ट्र :
घारापुरीची लेणी एलिफंटा केव्हज् म्हणून ओळखली जातात. भारतीय शिल्पकलेचा आणखीन एक अद्भूत कलाविष्कार म्हणजे ही लेणी! शिवलिंग, भगवान शिवाच्या संदर्भातील ही लेणी मुंबई दर्शन करणारे आवर्जून बघायला जातात.
एक तर गेट वे ऑफ इंडिया पासून बोटीने जायचे हे आकर्षण आणि दुसरे म्हणजे तेथील ही अप्रतिम शिल्पकला!
मुंबईला भेट दिली तर घारापुरीचा हा शिल्पकलेचा अप्रतिम नमुना जरूर बघाच!
५. लाल किल्ला, दिल्ली :
दिल्लीचा लाल किल्ला हे आपल्याकडील वास्तूकलेचा उत्कृष्ठ नमुना आहे. संपूर्ण लाल दगडामधे बांधलेला हा भव्य-दिव्य किल्ला पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.
मोगल वास्तुकलेचा अंतिम आणि भव्य, अप्रतिम नमुना म्हणून आ लाल किल्ला ओळखला जातो.
ह्यामध्ये वस्तूसंग्रहालय, बगीचे, भव्य दरवाजे आणि चौरी बाजार, छत्ता चौक, मुमताज महल आणि दिवाण-ए-आम अशी दालने आहेत.
६. फतेहपुर सिक्री, उत्तरप्रदेश :
उत्तर प्रदेशातील आग्रा मधील फतेहपुर सिक्री हे नैसर्गिक तलवाच्या काठी वसलेले आकर्षक शहर आहे. मोघल सम्राज्याची ही राजधानी होती.
अकबराने वसवलेले हे शहर कलेचा अद्भूत नमुना आहे. येथील सलीम चिश्तीची दर्गा पर्यटकांना आकर्षित करते.
येथील दिवाणे-ए-आम, दिवाण-ए-खास, बुलंद दरवाजा, पंचमहाल, जोधाबाईचा महाल, पचीसी दरबार आणि बिरबलाचे निवास स्थान ह्या प्रमुख वास्तू पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहेत.
७. जंतर मंतर, जयपूर – राजस्थान :
महालांचं राज्य म्हणून ओळखले जाणारे राजस्थान! राजस्थानची राजधानी जयपूर येथील हवा महलच्या शेजारी असणारे हे जंतर मंतर सवाई जयसिंह ह्यांनी निर्मिलेली खगोलीय वेधशाळा आहे.
ह्यात १४ प्रमुख यंत्र आहेत जी समय मोजण्याची, ग्रहण, ग्रह-तार्यांची गती आणि स्थिती जाणून घेणे, सौर मण्डलाच्या ग्रहांचे दिक्पात इत्यादी गोष्टींची माहिती देतात.
ह्याशिवाय ह्याची स्थापत्यकला अत्युत्कृष्ट आहे. पर्यटक वेधशाळा बघायला येतातच त्याशिवाय इथलं अप्रतिम बांधकाम देखील बघायला येतात.
८. आग्रा किल्ला :
आग्रा येथील हा भुईकोट किल्ला चार भिंतींनी घेरलेली प्रासाद किंवा महाल नगरी ह्या नावाने प्रसिद्ध आहे. ताज महाल पासून अडीज कि.मी. असणारा हा किल्ला मोगलांचा सर्वात महत्त्वाचे स्थान होते.
त्यांचा राज्य कारभार इथुनच व्हायचा, त्यांचा खजिना, संपत्ती आणि टांकसाळ इथेच होती. १४ लाख ४४ हजार कामगार ८ वर्ष ही वास्तु बांधत होते.
अतिशय सुंदर अशा लाल वीटांनी बांधलेला हा किल्ला स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना आहे.
९. राणी की वाव, पाटण – गुजरात :
सरस्वती नदीच्या काठी वसलेली ही पायर्या पायर्यांची विहिर आहे. इ.स. १०६३ मधे येथे सोलंकी शासक होते. ह्यातीलच एक राजा भीमदेव ह्याने आपली राणी उदयामति हिच्या स्मृती प्रीत्यर्थ ही विहिर बांधली.
हा वास्तुकलेतील एक चमत्कार मानला जातो. ह्या भव्य विहिरीच्या भींतींवर आणि खांबांवर नक्षी, श्रीराम, वामन, महिषासुरमर्दिनी, कल्की अशी विष्णूची आणि देवीची रूपे कोरली आहेत.
हे कोरीव काम तर अप्रतिम आहेच शिवाय आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही विहिर टेक्नॉलॉजीचे उत्कृष्ट उदाहरण आहे ज्यामध्ये जल प्रबंधन करण्यात येणाऱ्या भूजल संसाधनांचा योग्य वापर केला आहे.
१०. हंपी, कर्नाटक :
कर्नाटक मधील बेल्लारी जिल्ह्यातील हंपी हे शहर ऐतिहासिक वारसा स्थळांपैकी एक आहे आणि स्थापत्य शास्त्राचा अप्रतिम नमुना आहे. विजनगर साम्राज्याची ही राजधानी होती.
तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेले हे शहर १६ व्या शतकातील विश्वातील सर्वात समृद्ध नगरांमधील एक होते.
येथे १६०० हून जास्त हिंदू देवतांची मंदिरे, महाल, किल्ले आहेत जे स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.