केरळमधील “त्या” हत्तीणीची ही भावना, माणसा, तू कधी समजून घेशील का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक : व्यंकटेश कल्याणकर
===
प्रिय माणसा,
ओळखलतं का मला? मी केरळची राजधानी तिरुअनंतपुरमपासून ३९२ किलोमीटरवर असलेल्या सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानातील एक अत्यंत दुर्भागी हत्तीण.
खरं तर मेल्यानंतर माणसं बोलत नाहीत, तर प्राणी कसे बोलतील? पण वनविभागाचे अधिकारी मोहन कृष्णन दादा नसते तर माझी करुणगाथा तुमच्यापर्यंत पोहोचलीही नसती.
दादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि तुमच्याशी शेवटचे दोन शब्द बोलण्यासाठी हा खटाटोप करतेय.
तसेही तुमच्यातील काही माणसं दररोज आमच्यासारख्या किती जनावरांना मारतात त्याचा हिशोब मांडताच येणारा नाही. माझ्यासारखी एखादीच गोष्ट तुम्हाला फेसबुकवर स्क्रोल करता करता दिसते.
असो, तुम्हाला उपदेश वगैरे करावा एवढी मी अजिबातच मोठी नाही. तुम्ही खूप मोठ्ठे आहात. तुम्ही चंद्रावर जाता. सूर्यावर जाता. मंगळावर जाता. जमिनीच्या आत जाता. समुद्रात जाता. सगळीकडे जाता.
पण तुम्हाला माझ्या गर्भात असलेल्या माझ्या इवल्याश्या पिल्लापर्यंत नाही पोहोचता आलं. त्याचा आवाज ऐकता नाही आला.
त्यादिवशी मी भुकेने प्रचंड व्याकूळ झाले होते. उन्हाच्या प्रचंड झळा बसत होत्या. पोटात अन्नाचा कण नव्हता. पोटातलं माझं पिल्लू `आई काही तरी दे’ म्हणून तळमळत होतं.’
त्यामुळे अन्नाच्या शोधात मी माझ्या सायलेंट व्हॅलीतून बाहेर कधी पडले माझे मलाच कळले नाही. मला फक्त पिल्लाचा आवाज येत होता, `आई काही तरी दे…’
अखेर मी एका पलक्कड आणि मल्लपुरम या दोन शहरांच्या सीमेवरील एका गावात पोहोचले. मी फक्त अन्न शोधत होते.
दुसरं काही नाही. तुम्हा माणसांना इजा पोहोचवून अन्न मिळवावं असा माझा किंचितही हेतू नव्हता. अगदी माझ्या पिल्लाला त्यादिवशी खायला काहीच मिळालं नसतं तरी चाललं असतं.
पण मी पिल्लाच्या भुकेसाठी तुम्हा माणसांना इजा पोहोचवली नसती.
अन्नाच्या शोधात असतानाच मला गावातील काही `दयाळू’ माणसांनी ठेवलेले अननस दिसले. ते अननस पाहून माझ्या डोळ्यातून अश्रूच ओघळले.
तुम्हा माणसांचा दयाळूपणावर मी मनातून कृतज्ञता व्यक्त केली. माझ्या पिल्लाला सांगितलं, ‘बघ, इथली माणसं किती दयाळू आहेत.
त्यांनी तुझा आवाज ऐकला आणि किती ताजं आणि सुंदरसं अननस खायला दिलं आहे. ‘पिल्लू आतून म्हणालं, ‘आई लवकर अननस मला दे आणि त्या माणसांना ‘थॅंक्यु’ म्हण!’
पोटात लेकरू असल्यानं समोरचे दोन पाय वाकवून मला अननस दिल्याबद्दल वाकून नमस्कार करता आला नाही. पण मनातल्या मनात मी त्या `दयाळू’ माणसांना वंदन करून अननस सोंडीतून आत घेतला.
‘आई लवकर दे’ माझं पिल्लू मला आतून म्हणत होतं.
मी अननस माझ्या तोंडात घेतला. त्याला चावू लागले. अन काय झालं कोणास ठाऊक क्षणार्धात माझ्या तोंडात जोराचा स्फोट झाला. माझ्या पोटातून कोणीतरी माझ्या तोंडात तोफ डागल्याचा भास झाला.
प्रचंड वेदना झाल्या. माणसांनो, माझ्या वेदना एवढ्या भयानक होत्या की मला रडताही येत नव्हतं, ओरडताही येत नव्हतं आणि पुढं काय करावं सुचतही नव्हतं. माझ्या तोंडात रक्त झालं.
आतल्या माझ्या पिल्लालाही जोराचा आवाज आला. ते ही भेदरून गेलं. त्यानं विचारलं `आई, काय झालं?’ नेमकं काय झालं हे त्यालाही मला अखेरपर्यंत सांगता आलं नाही.
आजूबाजूला काही माणसं माझ्याकडे बघत होती. ती हसत होती की रडत होती हे सुद्धा मला समजत नव्हतं. पण ती सगळी माणसं माझ्याकडचं बघत होती.
माझ्या तोंडातून रक्त सांडत होतं. मी सैरावैरा धावत होती. मात्र, त्या अवस्थेतही मी कोणालाही इजा पोहोचणार नाही याची काळजी घेत होते. शेवटी मी वेल्लीयार नदीजवळ पोहोचले.
मला काहीच सुचत नव्हते. तोंडातील वेदना पाण्याने शांत कराव्यात म्हणून मी नदीत उतरले. मी नदीतील पाण्यातच थांबून राहिले. सोंडेने मी पाणी तोंडात घेऊ लागले. खूप वेळ मी पाण्यातच राहिले.
आतून पिल्लू म्हणत होतं, ‘आई काय झालं?’ त्याला काहीच प्रतिसाद मिळत नव्हतं. शेवटी ते सरकत सरकत माझ्या हृदयापर्यंत पोहोचलं. त्याच्या सरकण्यानंही मला वेदना होत होत्या.
त्यानं माझ्या हृदयाला स्पर्श केला. त्यावेळी अगदी अर्धा क्षण मला किंचितसा दिलासा मिळाला. कोणीतरी आपल्या वेदनांची चौकशी करत आपल्या हृदयापर्यंत पोहोचलयं ही भावना सुखावली.
या सुखात मी सोंडेतून पाणी तोंडात नेणं सोडलं. प्रचंड वेदनेच्या आणि किंचित आनंदाच्या त्या उत्कट क्षणात मी हरखून गेले.
एक क्षण, दोन क्षण, तीन क्षण असे अनेक क्षण आले आणि निघून गेले. माझी सोंड पाण्यातच राहिली.
याच क्षणांच्या मध्ये दोन हत्ती नदीतून माझ्या दिशेने येताना मला दिसले. नदीकिनारी मोहन दादाही इशारे करत असल्याचे दिसले. पण त्यानंतरच सगळं काही मला असह्य करणारं होतं.
मी डोळे गच्च बंद करून घेतले. सोंड अजूनही पाण्यातच होती. त्यानंतर काही क्षण वेदनेत गेले. ते क्षण माझे शेवटचे क्षण ठरले. माझे डोळे पुन्हा उघडलेच नाही.
माझा प्राण निघून जात असताना ‘आई, आई’ म्हणत माझं पिल्लूही माझ्यामागे आलं. माझ्या वेदना आता नाहीशा झाल्या आहेत. मीच आता नाहीशी झाली आहे.
माझं पिल्लूही जगात येण्याआधीच जगाबाहेर पडलं आहे.
मोहन दादा, मला माफ कर. तुझ्या प्रतिसादाला मी साद नाही देऊ शकले. माझ्यासाठी ज्या ज्या डोळ्यांतून, ज्या ज्या हृदयातून अश्रू बाहेर आले त्या प्रत्येक डोळ्यांच्या आणि हृदयांच्या मी कायम ऋणात आहे.
तुमच्या अश्रूंमध्ये दगडांना आणि माझ्या मृतात्म्यालाही पाझर फोडण्याची ताकद आहे. तुमचे अश्रू तुमच्यातील सजीवपणाचं प्रमाण आहे. निर्जीवपणाच्या कुबड्या टाकून तुमचा सजीवपणा असाच जपत रहा.
आता मला समजलं मी खाल्लेला अननस फटाक्यांनी भरलेला होता. ज्या माणसांनी तो ठेवला होता. त्यांची चौकशी सुरु असल्याचंही मला समजलं.
पण, माणसांनो, त्या अननसवाल्या ‘दयाळू’ माणसांना काहीही करू नका. क्षमा करा. त्यांच्याही घरात त्यांचं ‘पिल्लू’ असेलच की!
फक्त एवढचं करा प्रत्येक माणसाला सांगा की ज्याप्रमाणे सगळीच माणसे वाईट नसतात, त्याप्रमाणेच सगळेच प्राणीही वाईट नसतात.
वाईट असते ती फक्त इतरांना स्वत:च्या सुरक्षिततेच्या भीतीने इतरांना इजा पोहोचविण्याची भावना. तेवढी फक्त नष्ट करता आली तर बघा.
थांबते!
तुमचीच
सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानातील एक अत्यंत दुर्भागी हत्तीण
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.