देशवासियांची झोप उडवणाऱ्या ह्या ८ क्रूर हत्याकांडामागचा शोध आजवर का लागलेला नाही?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जन्म मृत्यू या नैसर्गिकच गोष्टी आहेत. माणूस जन्माला येतो तसा मृत्यूदेखील पावतो. परंतु मरण ही गोष्ट माणसाच्या जीवनातील अखेर असते आणि जी अर्थातच दुःखद असते.
नैसर्गिक मृत्यू आला तर तसं सगळ्यांना दुःख होतं. काहींच्या नशिबात नैसर्गिक मृत्यू असतो. काहीजण आत्महत्या करतात, काहींचे अपघात होतात तर काहींचा खून होतो.
एखाद्य मोहापायी किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या द्वेषापाई माणूसच माणसाचा जीव घेतो. तशी देशात न्यायव्यवस्था अस्तित्वात असल्याने गुन्हेगार पकडला जातो आणि त्याला शिक्षा होते.
तरीही देशात काही असे खून झाले आहेत की आजपर्यंत त्यांचा उलगडा झालेला नाही. त्या व्यक्तींचा खून का केला गेला आणि कोणी केला याचा कोणताही सबळ पुरावा पोलिसांना सापडला नाही.
आज असेच काही गाजलेल्या आणि न उलगडलेल्या हत्या पाहुयात!
१. अमर सिंग चमकिला :
पंजाब मधील म्युझिक इंडस्ट्रीमधील थोड्याच कालावधीत प्रसिद्ध झालेला गायक. एक उत्कृष्ट स्टेज परफॉर्मर. त्याच्या मृत्यूचे गूढ अजूनही उलगडलेलं नाही.
त्याच्या कार्यक्रमासाठी लागणारी गाणी तोच लिहायचा. ही गाणी मुख्यतः खेड्यातील जीवन, विवाहबाह्य संबंध, दारू व्यसन, ड्रग ॲडिक्ट, राग, हाणामारी यावर आधारित असायची.
तो जे लिहितो गातो ते खरं असायचं असे त्याच्या चहात्यांचं म्हणणं होतं. तर त्याच्या विरोधातील लोकांना त्याची गाणी अश्लील वाटायची.
अमर सिंग प्रसिद्धीच्या शिखरावर होता, त्यावेळेस त्याला खालिस्तानवादी दहशतवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या यायच्या.
याचं कारण म्हणजे त्याच्या गाण्यांमध्ये जे असायचं तसाच तो वागायचा. त्याने लग्न देखील अमरज्योत कौरशी केलं होतं, जी त्याच्याबरोबर शोज मध्ये सहभागी असायची.
त्याचं लग्न मान्य नसणाऱ्या लोकांना एकच कारण पुरेसं होतं, ते म्हणजे ती त्याच्या जातीची नव्हती. ८ मार्च १९८८ मध्ये मेशामपुर येथे दोघे एका कार्यक्रमासाठी आले होते.
त्याच वेळेस भर दिवसा दुपारी दोन वाजता रस्त्यावरून स्वतःच्या गाडीने जाताना मोटारसायकलीवरून आलेल्या एका टोळक्याने येऊन त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला.
अमरज्योत त्यावेळेस गर्भवती होती तिच्या छातीत गोळी लागली तर अमर सिंगला एकूण चार गोळ्या लागल्या. या दोघांबरोबरच त्यांचे दोन साथीदार देखील हल्ल्यात मृत्यू पावले.
मोटरसायकल वरून कोण आलं आणि कोणी हत्या केल्या याची काहीच माहिती अजून पर्यंत मिळालेली नाही. काहींना वाटतं की दहशतवाद्यांनी त्यांचा अंत केला.
तर काही जणांना वाटतं की पंजाब मधील अनेक गायक ज्यांच्या कार्यक्रमाची लोकप्रियता अमर सिंग मुळे कमी झाली. म्हणून मग त्यांनी मिळून अमर सिंग चमकिलाचा सुपारी देऊन खून केला.
त्यांच्या या हत्येबद्दल आजपर्यंत तरी कुणालाही अटक झालेली नाही.
२. चंद्रशेखर प्रसाद :
उदयोन्मुख राजकारणी असं ज्याचं वर्णन केलं जायचं ते चंद्रशेखर प्रसाद.
यांची हत्या ३१ मार्च १९९७ मध्ये राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मोहम्मद शहाबुद्दिन यांच्या नोकरीत असलेल्या शार्प शूटर कडून करण्यात आली.
बिहारमधील सिवानमध्ये अत्यंत गरीब घरात जन्मलेल्या चंद्रप्रकाश प्रसाद यांचं सुरुवातीचे शिक्षण सीवन मध्ये झालं. नंतर त्याने झुमरीतलैय्या मध्ये सैनिकी स्कूल मध्ये शिक्षण घेतलं.
त्यांनी (एन डी ए) नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये देखील प्रवेश घेतला होता. परंतु त्यांना भारतीय राजकारणात यायचं असल्यामुळे त्यांनी ते सोडलं आणि त्यांनी जेएनयू युनिव्हर्सिटी प्रवेश घेतला.
जे एन यु मध्ये अनेक चळवळींमध्ये त्यांचा सहभाग असायचा. विद्यार्थी संघटनेच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष पदासाठीची निवडणूक त्त्यांनी दोनदा जिंकली.
३१ मार्च १९९७ मध्ये सिवान मध्ये एका कार्यक्रमात भाषण देत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला.
देशभरात अनेक विद्यार्थी संघटनांनी या घटनेबद्दल निषेध नोंदवला. चंद्रशेखर प्रसाद यांची वाढती लोकप्रियता त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली असं म्हटलं जातं.
परंतु अजूनही त्यांची हत्या का करण्यात आली याबद्दल कोणताही ठोस पुरावा पोलिसांकडे अजूनही नाही.
३. राजीव दीक्षित :
स्वातंत्र्यानंतर स्वदेशी चळवळीचा प्रसार जर कोणी केला असेल तर तो राजीव दीक्षित यांनी. स्वदेशी गोष्टी वापरण्याबद्दलची त्यांची अनेक भाषणे प्रसिद्ध आहेत.
जागतिकीकरण, खाजगीकरण यावर ते रोखठोक बोलायचे. ‘स्वदेशी चळवळ’ आणि ‘आजादी बचाओ आंदोलन’ त्यांनी सुरू केलं होतं.
लोकांकडून घेतल्या जाणाऱ्या करांच विकेंद्रीकरण करावं असं त्यांचं म्हणणं होतं.
कारण जो कर लोक भरतात त्या पैकी ८० टक्के कर हा राजकारण्यांच्या आणि नोकरदारांच्या खिशात जातो, तर फक्त वीस टक्केच कर हा जनतेच्या कामांसाठी वापरला जातो, असं त्यांचं म्हणणं होतं.
त्यांची अनेक भाषणे ही वादग्रस्त होती. जेव्हा २००१ मध्ये अमेरिकेत ट्विन टॉवर्स पाडले गेले त्यावरही त्यांनी एक वेगळेच मत व्यक्त केलं होतं.
म्हणूनच त्यांचे अनेक शत्रू निर्माण झाले. अनेक मल्टिनॅशनल कंपन्या त्यांच्या विरोधात होत्या.
३० नोव्हेंबर २०१० या दिवशी भिलाई मध्ये भाषणासाठी निघाल्यावर त्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असं जाहीर करण्यात आलं.
मात्र त्यांचं पोस्टमार्टेम करण्यात आलं नव्हतं. ते मृत झाल्यावर त्यांचं शरीर काळंनिळं पडलं होतं. असं सांगण्यात येतं होत. म्हणजे त्यांच्यावर विषप्रयोग झाला असण्याची शक्यता वर्तवली जात होती.
परंतु मीडियाने देखील याबाबतीत मौन बाळगलं. आणि शेवटपर्यंत कळलं नाही की त्यावेळेस नक्की काय झालं होतं.
३. लाल बहादूर शास्त्री :
अत्यंत कमी कालावधीची पंतप्रधानपदाची कारकीर्द लालबहादूर शास्त्री यांची होती. तरीदेखील त्यांनी केलेल्या कामाचा ठसा दिसून येतो.
१९६६ मध्ये ताश्कंद करारानंतर लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू झाला. एका पंतप्रधानाची प्रदेशात झालेला मृत्यू ही पहिलीच घटना म्हणावी लागेल.
रशिया मध्ये गेल्यानंतर ताश्कंद करारावर लालबहादूर शास्त्री यांनी सह्या केल्या त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला असं म्हटलं जातं.
परंतु त्यांचेही शरीर काळंनिळं पडलेलं होतं. त्यांच्या मृत्यूचाही अहवाल तयार केला गेला नव्हता. म्हणूनच त्यांच्या मृत्यू विषयी देखील संशय व्यक्त करण्यात येतो.
अनेक जणांनी त्यांच्या मृत्यूच्या कारणाचा तपास करण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकारने आंतरराष्ट्रीय संबंध बिघडू नयेत म्हणून अनेक आरटीआय याचिका फेटाळून लावल्या.
असं म्हटलं जातं की भारत त्यावेळेस अणुचाचण्या करण्याच्या तयारीत होता आणि अमेरिकेला भारताचा हा स्टँड नको होता.
त्यासाठीच अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संस्थेकडून भारताचे अणूशास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा यांच्या विमानाला आल्प्स पर्वतात पाडण्यात आले आणि लालबहादूर शास्त्री यांचा खून करण्यात आला.
असं अमेरिकेतल्या एका ग्रेगरी क्राऊली लेखकाने त्याच्या ‘कन्वर्सेशन विथ द क्रो’ नावाच्या स्वतःच्या पुस्तकात म्हटले आहे.
५. सुनंदा पुष्कर :
अत्यंत हायप्रोफाईल व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू म्हणून सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू कडे पाहिलं जातं.
बिझनेस वुमन असलेल्या सुनंदा पुष्कर या भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी शशी थरूर यांच्या पत्नी होत्या.
त्या दुबईमधील बीकॉम इन्व्हेस्टमेंटच्या सेल्स मॅनेजर होत्या तर भारतातील Rendezvous sports world च्या कोओनर होत्या.
पाकिस्तानी पत्रकार मेहेर तेरर हिच्याबरोबर आपल्या नवऱ्याचे प्रेमसंबंध असल्याचा आरोप सुनंदा पुष्कर यांनी केला होता. आणि याविषयीच्या ट्विट्स देखील त्यांनी ट्विटरवरून केलेले होते.
१७ जानेवारी २०१४ या दिवशी नवी दिल्लीतील चाणक्यपुरीतील, हॉटेल लीला पॅलेस मधील रूम नंबर ३४५ मध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह आढळून आला.
पहिल्यांदा शशी थरूर यांनाच त्यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सुरुवातीला असं सांगितलं गेलं की सुनंदा पुष्कर यांनी आत्महत्या केली आहे.
पण नंतरचा रिपोर्ट मध्ये त्यांचा मृत्यू अनैसर्गिक रित्या झाला आहे असं सांगण्यात आलं. कारण त्यांच्या शरीरावर काही जखमा आढळून आल्या होत्या.
नंतर असं म्हटलं गेलं की या जखमांचा आणि मृत्यूचा काहीच संबंध नाही. त्यानंतर आणखीन एक नाट्यमय घटना एक जुलै २०१४ मध्ये घडली.
मृत्यूच्या कारणाचा रिपोर्ट तयार करणारे AIIMS चे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सांगितले की, माझ्याकडून जबरदस्तीने चुकीचा रिपोर्ट लिहून घेतला गेला.
१० ऑक्टोबर २०१४ मध्ये परत एकदा त्यांचा मृत्यू हा विषप्रयोगाने झालं आहे असं सांगण्यात आलं.
६ जानेवारी २०१५ ला दिल्ली पोलिसांनी सुनंदा पुष्कर यांचा खून झाला असून त्याबद्दल एफआयआर दाखल केला. त्यांच्या मृत्यूला अनेक कारणे असू शकतील परंतु सध्या हा खटला न्यायालयात प्रलंबित आहे.
६. आरुषी तलवार आणि हेमराज :
ही मर्डर केस गाजली ती यात ज्या मुलीचा खून झाला होता ती फक्त १४ वर्षांची मुलगी होती त्यामुळे. आरुषी ही आईवडिलांची एकुलती एक लाडकी मुलगी होती.
१६ मे २००८ या दिवशी नोएडा येथे तिचा खून घरातल्या नोकराने हेमराजने केला असा संशय व्यक्त करण्यात आला. परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशी हेमराजचा मृतदेह त्याच बिल्डिंगच्या टेरेसवर सापडला.
त्यामुळे तपासाची दिशा बदलली. यूपी पोलिसांनी आरुषी आणि तिच्या आईवडिलांना वर अनेक असंवेदनशील आणि हिणकस आरोप केले. त्यानंतर मीडियाने हे प्रकरण उचलून धरलं.
मीडिया स्वतःच ही केस हाताळत असल्यासारखं वागत होतं. त्यानंतर हा विषय लोकांसाठी संवेदनशील बनला. लोक देखील याविषयी बोलायला लागले. प्रत्येकाच्या मनातला न्यायनिवाडा व्यक्त होऊ लागला.
आरुषीच्या मृत्यूबद्दल तिच्या आई-वडिलांना दोषी धरण्यात येऊ लागले. हे ऑनर किलिंग आहे असंही म्हटलं जात होतं.
आई-वडिलांवरती आरोप ठेवून त्यांना अटक करण्यात आली त्यांची नार्को टेस्टही करण्यात आली. या तपासादरम्यान अनेक अधिकारी बदलले गेले.
तरीही शेवटी कोर्टात कोणताही भक्कम पुरावा दिल्ली पोलीस सादर करू शकले नाही. त्यामुळे कोणत्याही पुराव्याअभावी ही केस बंद करण्यात आली.
७. रिजवानूर रहमान :
सुरुवातीला याचा मृत्यू हा आत्महत्या भासवला गेला. परंतु जशी चौकशी सुरू झाली त्यातून दिसून आलं की तो एक खून होता.
रिजवानूर हा कम्प्युटर ग्रफिक ट्रेनर होता आणि तो प्रख्यात उद्योगपती अशोक तोडी यांची मुलगी प्रियांका तोडी हिच्या प्रेमात होता. दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं त्या दोघांनी लग्नही केलं.
परंतु या लग्नाला अशोक तोडी यांचा कडाडून विरोध होता. शेवटी रिजवानूरने प्रियंकाला आपल्या पित्याच्या घरी पाठवले आणि फोनही करू नकोस असं सांगितलं.
त्यानंतर २१ सप्टेंबर २००७ ला त्याचं प्रेत कलकत्त्यातील एका रेल्वे रुळावर मिळालं त्यामुळे सुरुवातीला ही आत्महत्याच वाटत होती.
परंतु मीडियामध्ये मात्र पोलिसांनी तोडीच्या दबावाखाली ही केस दाबण्याचा प्रयत्न केला आहे अशी ओरड होत होती.
शेवटी कोलकत्ता हायकोर्टाने ती आत्महत्या नसून खून आहे असं सांगून परत त्या केसचा तपास करण्याचा आदेश दिला. अजूनही या केसचा तपास सुरूच आहे.
८. जेसिका लाल :
भारतातला गाजलेला हा एक खून खटला. जेसिका ही एक मॉडेल म्हणून काम करत होती. २९ एप्रिल १९९९ या दिवशी दिल्लीतील उच्चभ्रू हॉटेलमध्ये एका बार मध्ये जेसिका बार अटेंडंट म्हणून काम करत होती.
त्यादिवशी दिल्लीतील अनेक प्रतिष्ठित मंडळी त्या पार्टीत हजर होती आणि त्याच वेळेस जेसिका वर गोळ्या झाडून तिचा खून करण्यात आला.
याचं कारण म्हणजे तिने फक्त दारू सर्व करायला नकार दिला.
मनू शर्मा या एका बड्या नेत्याच्या मुलाने जेसिकाला दारू देण्यास सांगितले आणि तिने दारू देण्यास नकार दिला म्हणून तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
पण इतक्या लोकांमध्ये हा खून झाला तरीही तो खून कोणीही पाहिला नाही. पोलिसांना कोणताही प्रबळ पुरावा मिळाला नाही.
शेवटी,’ नो वन किल्ड जेसिका ‘ असं लोक म्हणू लागले. त्यावर एक सिनेमा देखील बनला. जवळजवळ सहा वर्ष हा खटला सुरू होता. प्रबळ पुराव्याअभावी जेसिकाचे गुन्हेगार २००६ मध्ये निर्दोष सुटले.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.