डार्क चॉकलेट खाल्ल्याने बहुतेकांना हमखास सतावणारी एक आरोग्य समस्या कायमची सुटू शकते!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
डार्क चॉकलेट आवडत नाही असे फार कमी लोक असतील. त्या चॉकलेटच्या नुसत्या आठवणीनेही तोंडात पाणी सुटतं.
आता तर कळलंय की डार्क चॉकलेट हे चवीसाठी तर सगळे खातातच. परंतु हे एकच चॉकलेट असं आहे, ज्याचे शरीराला तोटे कमी आणि फायदेच जास्त आहेत.
हे कळल्यावर तर डार्क चॉकलेट खाल्लंच पाहिजे, हो ना?
काय? तुम्हाला हे अजून ठाऊक नव्हतं?
डार्क चॉकलेट हे भरपूर अँटीऑक्सिडन्ट्सनी भरलेलं असतं. त्याच्यातले हे अँटीऑक्सिडन्ट्स आपल्या शरीरातील फ्रि रॅडिकल्स काढून आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवतात.
डार्क चॉकलेट्समध्ये जीवनसत्वे आणि खनिजे देखील असतात. उदा. लोह, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि झिंक.
डार्क चॉकलेटवर केल्या गेलेल्या अभ्यासातून असे निष्कर्ष मिळालेले आहेत, की या चॉकलेटच्या खाण्यामुळे आपल्या डोळ्यांना, हृदयाला आणि आपल्या केसांना फायदा होतो.
एवढंच नव्हे तर हे चॉकलेट आपली कामवासना वाढवण्यास देखील मदत करते.
केसांसाठी उपयोगी –
अर्थात अशा बहुगुणी डार्क चॉकलेटचा उपयोग आपल्या केसांची गळती थांबवण्यासाठी देखील होऊ शकतो.
डार्क चॉकलेटमध्ये तांब्याचे प्रमाण जास्त आहे. आणि हे तांब्याचे प्रमाणच आपल्या केसांना गळण्यापासून आणि अकाली पांढरे होण्यापासून वाचवते.
मात्र त्यासाठी असेच डार्क चॉकलेट खाल्ले पाहिजे ज्यात कोकोचे प्रमाण ६५ टक्क्यांहून कमी नसेल आणि ज्यात साखर नसेल.
डार्क चॉकलेट आणि इतर चॉकलेट्स –
इतर चॉकलेटच्या मानाने डार्क चॉकलेटमध्ये कोको, कोको बटर यांचे प्रमाण अधिक असते. इतर चॉकलेटप्रमाणे यात दूध नसते. त्यामुळे इतर चॉकलेट्सपेक्षा शरीराला उपयोगी असलेल्या या चॉकलेटचा पर्याय नक्कीच चांगला आहे.
म्हणजे चॉकलेट खाण्याचे समाधानही मिळते आणि त्याचे दुष्परिणाम टाळून केवळ फायदे मिळवून देणारे हे चॉकलेट आहे. आहारात हा एक चांगला पर्याय आहे.
संशोधकांनी असा दावा केला आहे की डार्क चॉकलेट बऱ्याच शारीरिक समस्यांवर गुणकारी आहे.
विशेषतः त्वचा आणि केसांशी संबंधित समस्यांवर ते अधिक गुणकारी आहे. तुमचे केस जर गळत असतील, अकाली पांढरे होत असतील तर डार्क चॉकलेट हे तुम्हाला तारणहार ठरू शकेल.
संशोधकांचा दावा : डार्क चॉकलेट नेमके काय करते?
सर्वप्रथम तर डार्क चॉकलेट हे तुमच्या केसांना वाढविण्यात मोठ्या प्रमाणात मदत करते. यात सापडणाऱ्या काही रीच खनिजांमुळे हे घडून येते. तसेच टाळूपर्यंत रक्त प्रवाह वाढवते ज्यामुळेही केसांची वाढ चांगली होते.
डार्क चॉकलेट हे खाण्याने किंवा त्याचा आहारात समावेश करून पोटाद्वारे घेण्याने जितके फायदे मिळतात तसेच त्याचे केसांवर बाह्य उपचार करूनही त्याचे फायदे मिळतात.
डार्क चॉकलेटा शाम्पू, कोंड्यासाठी मिश्रण, हेअरमास्क इत्यादीसारखा उपयोग करूनही केसांना त्याचे फायदे मिळवून देता येतात.
चॉकलेटचे बाह्य उपयोग –
अर्थात चॉकलेट पोटात गेल्यावर जितके उपयोगी आहे तितकाच त्याचा शरीरासाठी बाह्य वापरही उपयोगी आहे. इथे तुम्हाला डार्क चॉकलेटचा बाह्य वापर, विशेषतः आपल्या केसांसाठी त्याचा वापर कसा करावा हे देत आहोत.
तुम्हाला चॉकलेटचे हे उपयोगही नक्की आवडतील. याची आम्हाला खात्री आहे. डार्क चॉकलेटमध्ये कोको पावडर भरपूर असते. आणि या कोकोमध्ये प्रोन्थोसायनिडिन आहे, जे केसांच्या वाढीस मदत करते.
जेव्हा संशोधकांच्या एका गटाने उंदरांच्या एका गटास डार्क चॉकलेट खायला दिले तेव्हा असे दिसून आले की चॉकलेटमध्ये उपस्थित असलेल्या प्रोन्थोसायनिडिन्सने त्यांच्यातील केसांच्या वाढीकरता आवश्यक असलेल्या ऍनाजेन अवस्थेला प्रेरीत केले.
ऍनाजेन हा केसांच्या मुळांच्या वाढीचा एक सक्रिय टप्पा आहे. या टप्प्यात केसांची मुळे लक्षणीय प्रमाणात वाढतात.
चॉकलेट हेअर मास्क –
निस्तेज झालेल्या केसांसाठी तुम्ही हा डार्क चॉकलेट मास्क वापरू शकता. यासाठी साखर नसलेले डार्क चॉकलेट घ्या आणि ते मध आणि दह्यात एकत्र मिसळून घ्या.
हा तयार झालेला लेप आपल्या केसांना अर्धा तास लावून ठेवा. अर्ध्या तासानंतर ते धुऊन टाका. आपल्या केसांचा मऊ आणि चमकदार पोत पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल.
डार्क चॉकलेट हेअर स्मूदी –
एक कप योगर्ट, पाव कप कोको पावडर, ३ टेबलस्पून खोबऱ्याचे तेल, तीन थेंब लव्हेन्डर ऑईल, ५ थेंब रोजहीप सीड ऑईल आणि पाव कप कोणतेही हेअर कंडीशनर. हे सर्व एकत्र करून घ्या.
त्यानंतर तुमच्या धुतलेल्या केसांवर ही स्मूदी लावून ठेवा. त्यानंतर केसांवर प्लास्टीक कॅप लावून घ्या. अर्ध्या तासानंतर केस पुन्हा धुऊन टाका.
तुमच्या केसांना उत्तम मॉयश्चरायझर मिळेल आणि त्यांची रुक्षता दूर होऊन त्यातील गुंता देखील कमी होतील.
डार्क चॉकलेट हेअर कंडिशनर –
जर तुमच्या केसांचा पोत खराब झाला असेल, आणि ते नीट बसत नसतील तर हे हेअर कंडीशनर तुम्ही वापरू शकता.
यात पाऊण कप नारळाचं क्रीम आणि एक तृतियांश कप कोको पावडर एकत्र करून घ्या. तुमच्या केसांना नेहमीचा शाम्पू केल्यानंतर हे मिश्रण लावून घ्या.
पंधरा मिनिटे ते मिश्रण केसांवर तसेच राहू द्या. त्यानंतर धुऊन टाका आणि तुमच्या नेहमीच्या स्टाईलने विंचरून घ्या. तुमचे केस अप्रतिम झालेले असतील.
केसांत कोंडा होऊन केस रुक्ष होत असतील तर पुढील उपाय करा –
कोको पावडर किंवा डार्क चॉकलेटचा चुरा घेऊन त्यात नारळाचे तेल आणि ग्रीन टी मिक्स करा. ग्रीन टी तुमच्या त्वचेला साफ करणारा उत्तम घटक आहे. हे मिश्रण केसांच्या मुळांना लावा आणि थोडावेळ ठेवून द्या. नंतर धुऊन टाका.
तर तुमच्या लक्षात आलेच असेल की अशा प्रकारे डार्क चॉकलेट हे नुसतं चविष्ट आणि खाण्यासाठी आकर्षून घेणारंच चॉकलेट नसून ते बहुगुणी असे चॉकलेट आहे.
मात्र हे डार्क चॉकलेट आणि त्यातील कोकोची मात्रा आणि साखरेची मात्रा किती असायला हवी ह्याची नीट माहिती करून घ्या. बाजारात या दोन्ही घटकांची विविध मात्रा असलेले चॉकलेट्स मिळतात.
त्यातील आपल्याला उपयोगी कोणते ते नीट माहिती करून घ्या आणि मगच त्याचा आहारात किती वापर करायचा ते ठरवा. त्याचप्रमाणे बाह्य उपचार करण्यासाठीही आधी तुम्ही तुमच्या तज्ज्ञ ब्युटीशियनचा सल्ला घेऊ शकता.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.