बॉलिवूडच्या ‘कोरोना मदत’ पार्श्वभूमीवर “या” कलाकाराचं रस्त्यावर उतरून “ही” कामं करणं उठून दिसतं
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारतात कोरोनाचं संकट जसं वाढत आहे तसं लोकांचे जीवनही कठीण बनलेलं आहे. आता गेली दोन महिने जवळजवळ लॉकडाऊन सुरू आहे.
आणि ह्याचा सगळ्यात जास्त फटका बसला आहे तो भारतातील मजुरांना. सरकारबरोबरच अनेक संस्था, व्यक्ती, सेलिब्रिटीज या संकट काळात उभे राहत आहेत.
आपण नेहमीच अक्षय कुमारने इतक्या कोटींची मदत केली, शाहरुख खानने, सलमान खानने अशी मदत केली अशा बातम्या वाचतो, ऐकतो.आणि सामाजिक भान हे कलाकार जपतात याचं कौतुकही करतो.
आताही या संकटकाळात या सगळ्यांनी मदत केलीच आहे पण असेही काही कलाकार आहेत, की जे मदत करत आहेत, परंतु प्रसिद्धीपासून दूर आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सोनू सूद.
लॉक डाऊन सुरू झाला आणि भारतातलं स्वातंत्र्यानंतरचं दुसरं मोठं स्थलांतर सुरू झालं. केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले हजारो, लाखो मजूर आपापल्या गावी जाण्यासाठी धडपडू लागले.
संपूर्ण भारतभर मजुरांचे स्थलांतर सुरू झालं.
लॉकडाऊन मुळे कारखाने बंद, कंपन्या बंद अशा परिस्थितीत हे मजूर राहू शकत नव्हते. कारण रोज काम केलं तरच खायला मिळेल अशी परिस्थिती.
आता राहण्यासाठी पैसे नाहीत आणि खाण्यासाठीही पैसे नाहीत अशी वेळ त्या मजुरांवर ओढवली आहे. म्हणून मग ते आपल्या बायका-मुलांसह आपापल्या गावी निघाले आहेत.
पण ते जाणं देखील इतकं सहज नव्हतं, लॉक डाउन असल्यामुळे सगळ्या रेल्वे बंद, बस बंद, सगळी वाहतूक सेवाच बंद केलेली. जिल्हा जिल्ह्यांच्या, राज्यांच्या सीमा बंद केलेल्या.
मग हे मजूर पायी पायी चालत निघाले. प्रसंगी पोलिसांचा मार खाल्ला. मग आडवाटेने, लपतछपत त्यांचा प्रवास सुरू झाला. यामध्ये कित्येक मजुरांचे प्राण गेले आहेत.
भुकेने आणि उन्हाळ्यामुळे लोकांनी जीव गमावला आहे. काहींचे अपघात देखील झाले आहेत. अक्षरश: जीवावर उदार होऊन हे मजूर प्रवास करत आहेत.
कोरोनाच संकट आणखीन किती काळ असेल, आणि त्याचा किती फटका बसेल याची काहीच कल्पना नसल्यामुळे, मजुरांचा आपल्या बायका मुलांसोबत, म्हाताऱ्या आई-वडिलांसोबत असा हा जीवघेणा प्रवास सुरू झाला.
त्याच्या अनेक कहाण्या टीव्हीवर दिसू लागल्या त्यांचं दुःख पाहवत नव्हतं म्हणूनच त्यांच्या मदतीला धावून गेला तो सिनेकलाकार सोनू सूद.
सोनू सूद ने अशा ३५० मजुरांसाठी १० बसेस केल्या आणि त्यातून त्या मजुरांना आपल्या गावी पाठवले आहे. अर्थात लॉक डाऊन च्या काळात हे करणे इतके सोपे नाही.
कारण ते मजूर कुठले आहेत ते बघणे त्या त्या राज्यांमधल्या परवानग्या घेणे त्यासाठी सगळी कागदपत्र जमा करणे त्यादी सार्या गोष्टी सोनूने केल्या.
हे मजूर कर्नाटकातील होते त्यांना महाराष्ट्रातून पाठवायचं होतं. १२ मेला या सगळ्या बसेस ठाण्यावरून निघाल्या त्या गुलबर्ग्यासाठी.
त्यांच्यासोबत त्या मजुरांना जेवणाचे पॅकेट्स आणि पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. सगळ्यांना सोनूने हात हलवून निरोप दिला.
त्यावेळेस त्या मजुरांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसत होता.
सोनू सुदने केलेल्या या कार्याची दखल घेतली ती भारतातल्या स्टार खेळाडूंनी.
त्यामध्ये सानिया मिर्झा, साइना नेहवाल यांनी सोशल मीडिया वरून सोनुने या केलेल्या कामाबद्दल सलाम केला. ‘सोनूच्या या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो’ असं सानिया म्हणते.
तर साइना म्हणते की, ‘या मजुरांसाठी सोनूने केलेलं काम पाहून त्याला सलाम करावासा वाटतो.’
या सगळ्याबद्दल सोनू स्वतः म्हणतो की,
“या कठीण काळात प्रत्येक भारतीयाला आपल्या कुटुंबाबरोबर राहण्याचा अधिकार आहे. मला त्यांचं दुःख पहावंल नाही. मी त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटलं म्हणून मी हे करायचं ठरवलं.
शिवाय मुख्यतः महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने याबाबतीत मला खूप मदत केली.” तो पुढे म्हणतो की,
“आता मजूर त्यांच्या घरी जात आहेत याचा मला आनंद झाला आहे. आणि पुढे देखील अजून जे मजूर आहेत आणि ज्यांना त्यांच्या राज्यात, त्यांच्या घरी जायचं आहे.
त्या सगळ्यांसाठीच मला जे शक्य आहे,जे काही करता येणार असेल तर ते मी करणार आहे.”
सोनूने १५०० पीपीई किट्स पंजाब मधल्या डॉक्टरांसाठी दिलेले आहेत. तर मुंबईतलं जुहुमधलं त्याचं हॉटेल त्याने डॉक्टर आणि मेडिकल स्टाफ साठी सध्या दिलेलं आहे.
सोनूची ही बातमी जेव्हा मिडियामध्ये आली तेव्हा अनेक मजुरांनी त्याला ऑनलाइन मदतीची हाक दिली आहे. लोक त्याच्याकडे मदतीची मागणी करत आहेत.
ठाण्यामध्ये अडकलेला उत्तर प्रदेश मधील एक विद्यार्थी म्हणतो की,
‘सर माझी आई गावी आजारी आहे आणि मला तिकडे जायचे आहे. मला कोणतीही मदत मिळत नाही तुम्हीच आता माझी शेवटची आशा आहात’.
त्याला सोनूने उत्तर दिले आहे की,’ काळजी करू नकोस तू लवकरच तुझ्या आईकडे जाशील.’
नालासोपारा येथे अडकलेले बिहारमधील २० मजूर हेदेखील सोनू कडे मदतीची याचना करीत आहेत. सोनूच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर सध्या मदतीची याचना करणारे अनेक पोस्ट येत आहेत.
लोक जेवणाबरोबरच रेशनची ही मागणी करत आहेत.
सध्या रमजानचा महिना आहे त्यासाठी देखील सोनुने दररोज २५००० लोकांसाठी जेवण ठेवले आहे.
याशिवाय अंधेरी, जुहू, बांद्रा, जोगेश्वरी या ठिकाणी अडकलेल्या ४५००० मजुरांना मुंबई महापालिकेबरोबर समन्वयाने सोनू कडून रोज जेवण देण्यात येत आहे.
सोनूने नेहमीच निरनिराळ्या कामांसाठी लोकांना मदत केली आहे. २०१८ मध्ये बेंगलोर मधील अपंगांसाठी त्याने व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्या.
त्याच्या आईच्या नावे असलेल्या चॅरिटीबल ट्रस्ट साठी बॉलीवुड एक्टर्सना घेऊन एक कार्यक्रम केला.
ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या मुलींसाठी स्किन डोनेशन प्रोग्राम केला आणि स्किन डोनेशनची जनजागृती लोकांमध्ये केली.
सोनू म्हणतो की सध्या २४ तास माझा फोन सतत खणखणतोय. लोकांचं हे दुःख खरोखरच पहावत नाहीये. आता हे सगळे मजूर आपापल्या घरी सुखरूप जाईपर्यंत मी त्यांना मदत करेन.
आपण नेहमीच शाहरुख-सलमान अक्षय कुमार यांचं कौतुक करतोच.
पण सोनू सारखे फारसे प्रसिद्ध नसलेले कलाकारही अशी कोणतीही मदत करण्यात मागे नाहीत, हेच यावरून सिद्ध होते. म्हणूनच अशा लोकांचे देखील कौतुक करणे जरुरीचे आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.