नाठाळ ग्राहकाला अद्दल शिकवण्याच्या नादात तयार झाला पदार्थ, ‘वेफर्स’चा चटपटीत इतिहास
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
बटाटा वेफर्स किंवा चिप्स हा खाद्यपदार्थ संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. चित्रपटाच्या मध्यंतरात, प्रवासात, छोट्या पार्टी मधे हमखास खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे बटाट्याचे वेफर्स! कुरकुरीत ,चमचमीत चिप्स खाण्याची मजाच काही और!
आपल्या भारतात तर परदेशातून आलेला बटाटा उपवासाला सुद्धा चालतो! आणि त्या पासून बनवलेले साधे चिप्स हा तर उपवासाच्या दिवशीचा हक्काचा फराळ.
तसं पाहिलं तर बटाट्याचे सर्वच पदार्थ भारतात लोकप्रिय आहेत उदा. वडा-पाव, पाव भाजी, फिंगर चिप्स, पराठे, बर्गर. बटाटा न आवडणारा सापडणं विरळचं!
==
==
बटाटा वेफर्स सुद्धा अनेक वेगळ्या ब्रँड मधे उपलब्ध आहेत. अगदी साधे- खारे ते कांदा- चीझ वैगेरे फ्लेवर मधे सुद्धा वेफर्स बाजारात आहेत.
आबालवृद्धांच्या आवडीचे चिप्स बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण या लोकप्रिय खाद्यपदार्थाचा जन्म मात्र केवळ एका अपघाताने झाला होता.
बटाट्याच्या चिप्स च्या शोधाचा अपघात!
सन १८५३ मधे न्यूयॉर्क मधील सरेटोना स्प्रिंग्स उपनगरात ‘मून लेक लॉज’ हे एक प्रशस्त आणि लोकप्रिय रिसॉर्ट होतं. जॉर्ज क्रम नावाचा आफ्रिकन- अमेरिकन शेफ इथे कामाला होता. बटाटा वापरून वेगवेगळ्या डिशेस बनवायची त्याची खासियत होती.
काही दिवसांपासून त्याला एका ठराविक ग्राहकाकडून वारंवार जेवणाविषयी तक्रार येऊ लागली. जॉर्ज ने बनवलेले ‘फ्राईड पोटॅटो’ त्याला खूप नरम आणि जाड वाटत होते!
एके दिवशी जेव्हा त्याच ग्राहकाने परत तीच तक्रार केली तेव्हा जॉर्ज ने त्याला धडा शिकवायचा निश्चय केला. त्याने मुद्दाम नुकतेच शेतातून आणलेल्या बटाट्याचं पोतं फोडलं आणि अगदी ताजे बटाटे घेतले. त्यांचे अगदी पातळ काप केले आणि ते तेलात एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळले!
ग्राहकाला देण्यापूर्वी त्यावर चिमूटभर मीठ भुरभुरलं. आश्चर्य म्हणजे त्या ग्राहकाला ही डिश प्रचंड आवडली. आणि इथेच बटाट्याच्या वेफर्स चा जन्म झाला.’सरेटोना चिप्स’ सगळ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले.
….म्हणून चिप्स चं पेटंट घेतलंच नाही
सहसा कुठल्याही गोष्टीचा शोध लावला असेल तर शोधकर्ता त्याचं पेटंट घेतो. जेणेकरून त्याच कार्य हे त्याच्याच नावाने अजरामर होईल. परंतु बटाटा चिप्स बाबत मात्र पेटंट घेतलं गेलं नाही.
चिप्स च्या शोधाने जॉर्ज क्रम ला अफाट लोकप्रियता मिळाली. अवघ्या ७ वर्षांत त्याने ‘क्रम्स हाऊस’ म्हणून स्वतःचे रेस्टॉरंट सुरू केलं. हॉटेलच्या प्रत्येक टेबलावर वेफर्सच्या बरण्या ठेवल्या.
या चारी-मुरी मुळे हॉटेलात येणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होऊ लागली आणि वेफर्स किंवा चिप्स च्या लोकप्रियतेमध्ये सुध्दा!
त्या काळात विशिष्ट रंगाच्या लोकांना त्यांच्या शोधाचं ‘पेटंट’ घेण्याची मुभा नव्हती. त्यामुळे आफ्रिकन-अमेरिकन जॉर्ज ने सुद्धा आपल्या वेफर्स च्या शोधाचे पेटंट घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही.
त्या काळात बटाटा वेफर्स मोठ्या प्रमाणात तयार करून बॅग्स मध्ये विकले जायचे! पण जॉर्ज क्रम ला मात्र कुठल्याच प्रकारचं श्रेय मिळू शकलं नाही.
==
==
टिकाऊ पिशव्यांचा शोध
सुरवातीला चिप्स मोठ्या पेटीत किंवा काचेच्या बरण्यात ठेवण्यात येत. ग्राहकांना वेफर्स विकताना ते कागदी पिशव्यांत बांधून दिले जात. याचा सर्वात मोठा तोटा हा होता की वेफर्स फार काळ टिकू शकत नव्हते.
पेटीत बुरशी लागण्याची शक्यता आणि बरण्यात सतत उघडल्याने, हवेमुळे ते चटकन नरम पडत असत. यावर उपाय पण एका चिप्स विक्रेत्यानेच शोधला.
कॅलिफोर्निया राज्यातील मोंटेरे पार्क मधे एक चिप्स चा व्ययवसाय करणाऱ्या कुटुंबातील, लॉरा स्कुडर नावाच्या महिलेला एक कल्पना सुचली.
मेणाच्या पेपर च्या पिशव्या जर बनवल्या आणि त्या हवाबंद केल्या तर वेफर्स बराच काळ सुस्थितीत राहू शकतील हे तिला प्रयोगांती समजलं. तिने या पिशव्या बनवून त्यात वेफर्स टाकले आणि ती बॅग गरम लोखंडाच्या साह्याने चिटकवून टाकली.
१९२६ च्या दरम्यान या प्रकारच्या पिशव्या मधून वेफर्स विकणं तिने सुरू केलं. या मेणाच्या पिशव्या, वेफर्स ला बराच काळपर्यंत ताजं ठेवायच्या.
वेफर्स चा ब्रँड
जॉर्ज क्रम च्या चिप्स शोधानंतर अमेरिकेत बरेच व्यापारी वेफर्स निर्मिती अन वितरण करू लागले. हर्मन ले नावाचा विक्रेता १९२० पासून अगदी देशाच्या दक्षिण भागांपर्यंत वेफर्स पोहचवण्याचे काम करत होता.
ले त्याच्या कार मधून चिप्स घेऊन जायचा. हळू हळू त्याच्या वेफर्स ना मागणी वाढत गेली आणि वितरणाच्या तगड्या सोयी मुळे वेफर्स च्या खाण्याला सबंध देशात लोकप्रियता मिळू लागली! ले चे वेफर्स हे राष्ट्रीय ब्रँड झाले!
पुढे १९६१ मधे हरमन ले ने त्याची कंपनी फ्रिटो मध्ये विलीन केली. मूळची डल्लास मधली स्नॅक्स बनवणारी ही कंपनी ले च्या विलीनीकरणाने अजून सशक्त झाली आणि लोकप्रिय सुद्धा. लेज चे वेफर्स सगळ्या जगात प्रसिद्ध आहेतच.
बार्बेक्यू फ्लेवर चे वेफर्स
आज बटाटा वेफर्स चे अनेक फ्लेवर बाजारात उपलब्ध आहेत. अगदी साध्या मिठाच्या चिप्स पासून ते चीज, कांदा, टोमॅटो,बार्बेक्यू असे अनेक प्रकारात उपलब्ध आहेत. पूर्वी वेफर्स हे साधेच म्हणजे केवळ मीठ पेरून दिले जायचे.
एक आयरिश वेफर्स बनवणारी कंपनी टायटो चा मालक जो स्पड मूर्फी ला तेच तेच साधे वेफर्स बनवून कंटाळा आला होता. त्याने वेफर्स बनवतांनाच त्यात भिन्न स्वाद टाकण्याचं तंत्रज्ञान शोधून काढलं.
त्याने बऱ्याच फ्लेवर्स चा शोध लावला जसं की चिज- ओनीयन,सॉल्ट-व्हिनेगर. आर्यलँड मध्ये हे फ्लेवर्स प्रचंड लोकप्रिय झाले. या शोधपासून प्रेरणा घेऊन मग पुढे बरेच चिप्स उत्पादक नवनवीन प्रयोग करू लागले.
१९५८ च्या सुमारास हेर नावाच्या कंपनीने बार्बेक्यू स्वादातील चिप्स अमेरिकेत विकायला सुरवात केली. आज सुद्धा हा फ्लेवर लोकांच्या पसंतीचा आहे.
भारतात बटाट्याचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्या कडे सुद्धा वेफर्स बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत बालाजी, छेडा, बुधानी. आपल्या इथे बटाटाच नाही तर केळी, फणस, कारले,टोमॅटो,रताळी यांचे सुद्धा वेफर्स बनवले जातात.
==
==
वेफर्स तळलेले असल्याने ते खाण्यासाठी फार पोषक नक्कीच नाहीत परंतु प्रवास, उपवास ,पार्टी सारख्या निमित्ताने हे वारंवार आपल्या पानात येतात. कधीतरी खायला नक्कीच रुचकर स्नॅक्स आहे हा!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.