' स्मार्टफोन विश्वातले लोकप्रिय ब्रॅंड ‘ओप्पो’ आणि ‘वनप्लस’ यांच्यात काय कनेक्शन आहे? – InMarathi

स्मार्टफोन विश्वातले लोकप्रिय ब्रॅंड ‘ओप्पो’ आणि ‘वनप्लस’ यांच्यात काय कनेक्शन आहे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

मोबाईल किंवा स्मार्ट फोन आजकाल दैनंदीन जीवनातल्या अत्यावश्यक गरजांपैकी एक झाली आहे.

दूरसंचार क्षेत्रातील तंत्रज्ञान क्रांती नंतर जे मोबाईल युग आलं त्याने, जगाला एकमेकांच्या जवळ आणण्याचं काम केलं.

स्मार्ट फोन च्या साहाय्याने आज आपण जगाच्या दुसऱ्या टोकावर राहणाऱ्या व्यक्तीशी व्हिडीओ कॉलिंग च्या माध्यमातून संवाद साधू शकतो. आपली अनेक बिलं चुटकीसरशी भरू शकतो.

स्मार्ट फोन ने संभाषणाशिवाय अधिक उपयोगी सेवा लोकांना मिळवून दिल्या. मोबाईल मधला कॅमेरा हे अजून एक मोठं प्रस्थ.

 

modi clicks inmarathi
Mr.phone

 

दिवसेंदिवस येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाने त्यातल्या कॅमेरात सुद्धा आकर्षक बदल होत गेले.

आता हे मोबाईल कॅमेरे सुद्धा इतके सफाईदार फोटो देतात की त्यामुळे बरेच नवीन मोबाईल फोटोग्राफर उदयाला आले.

सध्या कोरोना टाळेबंदी च्या काळात स्मार्ट फोन च्या साहाय्याने डॉक्टरांचा सल्ला घरबसल्या घेता येऊ शकतो. भाज्या,किराणा,औषधें मिनिटात ऑर्डर करू शकता.

स्मार्ट फोन चे बरेच फायदे सांगता येतील.जगातल्या प्रत्येक तरुणाला आपल्याकडे अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त मोबाईल असावा अशी मनीषा असतेच.

बरेच जण वर्ष-सहा महिन्याला स्वतःचा फोन बदलत असतात! सध्या तरी मोबाईल क्षेत्रात उत्कृष्ट मोबाईल बनवणारी कंपनी म्हणून आयफोन कडे पाहिलं जातं.

त्यांच्या मोबाईल चे फिचर्स सर्वोत्तम असतात. परंतु जगात सर्वांनाच आयफोन परवडू शकत नाही. भारतासारख्या विकसनशील देशात नवीन आयफोन ची किंमत लाखाच्या जवळपास जाते!

सॅमसंग, मोटोरोला, ओप्पो, विव्हो, एलजी, गूगल, वन प्लस, नोकिया अश्या कितीतरी कंपन्यांचे स्मार्टफोन चे स्वस्त पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत.

 

smarphone brand inmarathi
qurious box

 

भारतातील म्हणाल तर, आजकाल आपल्याला गल्लो-गल्ली ओप्पो आणि व्हीवो ची दुकानं सर्रास दिसतात.

पूर्वी जिथे नोकिया – सॅमसंग च्या दुकानांची चलती होती तिथे आता ओप्पो-व्हीवो ने पूर्ण कब्जा केलेला दिसतोय. याचं महत्वाचं कारण म्हणजे अगदी स्वस्तात उपलब्ध असणारे यांचे स्मार्ट फोन्स!

ऍडव्हान्स कॅमेरा आणि बाकी आधुनिक हार्डवेअर तेही कमी किंमतीत.परंतु बऱ्याच लोकांना या स्वस्तातल्या फोन्स च्या गुणवत्तेवर शंका असते.

आयफोन नंतर ज्या ब्रँड चं नाव आवर्जून घेता येईल ते म्हणजे ‘वन प्लस’!

वन प्लस कंपनी स्थापन होऊन उणेपूरे सहा वर्षे झाली असतील. पण इतक्या कमी काळात सुद्धा कंपनी ने उत्कृष्ट गुणवत्तेचे फोन्स बाजारात आणले.

बाकी यांची किंमत मात्र ओप्पो-व्हीवो किंवा बाकी फोन्स पेक्षा बऱ्यापैकी अधिक आहे. अर्थात आयफोन एवढी महाग नक्कीच नाही!

वन प्लस ला बरेचजण ‘चायनीज’ आयफोन म्हणतात. भारतात वन प्लस चे ब्रँड अँब्यासिडर प्रत्यक्ष अमिताभ बच्चन आहेत!

वन-प्लस चे चाहते विव्हो – ओप्पो  च्या फोन कडे पाहून नाकं मुरडत असतात पण तुम्हाला माहिती नसेल की वन-प्लस सुद्धा व्हीवो – ओप्पो कंपनीचाच भाग आहे.

 

one plus parent inmarthi
tech PP

 

वन-प्लस चा जन्म :

नोव्हेंबर २०१३ च्या दरम्यान ओप्पो चे उपाध्यक्ष पेते लाउ यांनी राजीनामा देऊन नवीन कंपनी स्थापन करण्याची घोषणा केली.

लाउ यांनी त्या वेळी ओप्पो च्या एन -९ मॉडेल ला अत्याधुनिक बनवण्यात भरीव योगदान दिलं होतं.पण ओप्पो फोन च्या गुणवत्तेवर ते फारसे खुश नव्हते.

त्यांचं म्हणणं होतं की, उत्कृष्ट तंत्रज्ञान सर्वांसाठी खुलं व्हायला हवं!

लाउ नी नंतर १६ डिसेंबर २०१३ ला ‘वन- प्लस’ ची स्थापना चीन च्या शेंझेन शहरात केली. त्यांच्या कंपनीच प्रमुख ध्येय होतं की, लाउ यांचा स्वप्नातला फोन तयार करणं!

एक असा स्मार्टफोन की जो तंत्रज्ञान गुणवत्तेच्या पातळीवर उत्कृष्ट असेलच पण वापरकर्त्यांना सुद्धा वापरतांना वेगळाच अनुभव येईल, लाउ यांनी तेव्हा सांगितलं होतं की

‘आम्ही फक्त नावापुरते वेगळे फोन्स बनवणार नाही तर अत्युच्च गुणवत्तेच्या जोरावर लोकांना एक वेगळाच अनुभव फोन वापरताना येईल’

 

pete lau inmarathi
pocketnow

 

वन- प्लस ने किंमत कमी करण्याच्या मोहात अडकून हलक्या दर्जाच्या यांत्रिक घटकांचा वापर कटाक्षाने टाळला. त्या ऐवजी त्यांनी प्रत्यक्ष वितरणावर होणारा खर्च कमी करून ऑनलाइन विक्री केली.

मार्च २०१६ पर्यंत वन-प्लस ४३ देशांमध्ये पोचला होता. सुरवातीला कंपनी ने आपल्या ग्रुप कंपनी विषयी ची माहिती सांगितली नव्हती.

पण नंतर जेव्हा चीन च्या सरकारने अधिकृत कंपन्यांची यादी जाहीर केली त्यात उघड झालं की वन-प्लस ही ओप्पो ची उपकंपनी आहे!

ओप्पो-व्हीवो या कंपनीने ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच रस्त्यावर दुकाने थाटून विक्री सुरू केली तर वन-प्लस ने मात्र केवळ ऑनलाइन पद्धतीने विक्री सुरू ठेवली.

पहिल्या फोन विक्री वेळी आमंत्रण पद्धत वापरण्यात आली. जर कंपनी कडून तुम्हाला अधिकृत आमंत्रण असेल तरच तुम्ही फोन खरेदी शकता वैगेरे.

वन-प्लस च्या स्मार्टफोन्स ची विक्री ही मुख्यत्वे अमेझॉन च्या माध्यमातून चालते पण गेल्या काही वर्षात अजून दोन-तीन सहकारी वन-प्लस ने विक्री साठी नियुक्त केले.

 

invite system inmarathi
oneplus community

 

फोन मॉडेल्स आणि लोकप्रियता :

वन-प्लस चा पहिला फोन ‘वन-प्लस वन’ २३ एप्रिल२०१४ ला बाजारात आणण्यात आला. कंपनी स्थापन झाल्याच्या ४ महिन्यात त्यांनी उत्पादन विक्री साठी आणलं होतं!

१६GB आणि ६४GB चे मॉडेल अनुक्रमे २९९ व ३४९ अमेरिकन डॉलर ला उपलब्ध होते.

वन-प्लस वन साठी CynogenMod म्हणजेच ११S या अँड्रॉइड ४.४२ किटकॅट ऑपरेटिंग सिस्टिम चा वापर करण्यात आला. यात गूगल प्ले स्टोर चा ऍक्सेस देण्यात आला.

हार्डवेअर मध्ये स्नॅपड्रॅगन ८०१ चा प्रोसेसर, ३ GB ची रॅम, ३१०० maH ची बॅटरी, साडे पाच इंची १९२० ×१०८० JDI डिस्प्ले १३ MP चा कॅमेरा देण्यात आला होता.

मात्र दोन्ही प्रकारात १६GB आणि ६४ GB मध्ये मायक्रो sd कार्ड देण्यात आलं नव्हतं.

तगडी वैशिष्ट्य ,आकर्षक लुक आणि किंमत या जोरावर पहिल्या फोन चा बराच बोल – बाला झाला होता.अनेक लोकांना हा फोन विकत घेण्याची इच्छा होती.

 

oneplus 1 2 inmarathi
android authority

 

पण, फोन घ्यायचा तर तुमच्याकडे कंपनीकडून अधिकृत मेल च आमंत्रण असणं आवश्यक होतं. या प्रकारे विक्री करण्याचा हा पहिलाच प्रयोग होता!

पण यामुळे ज्यांना आमंत्रण मिळू शकलं नाही त्यांचा हिरमोड झाला. नंतर च्या फोन्स विक्रीवेळी कंपनी आमंत्रण पद्धती बऱ्यापैकी सुधारली काही देशांमध्ये तर ही पद्धत हटवून विक्री केली.

वन-प्लस वन तुफान चालला. दीड वर्षांनंतर कंपनी ने दुसरा फोन वन-प्लस टू लाँच केला ज्याला २०१६ चा ‘फ्लॅगशिप किलर’ असा उल्लेख करण्यात येतो.

चीन मध्ये मात्र हा फोन जुलै -२०१५ लाच आणण्यात आला होता. पुढे एकाच महिन्यात त्याची आंतराष्ट्रीय विक्री सुरू झाली.

२०१५ लाच कंपनी ने दावा केला की वन-प्लस टू मॉडेल इतकं उत्कृष्ट आहे की २०१६ ला लाँच होणाऱ्या कुठल्याही कंपनी च्या फोन सोबत हे स्पर्धा करू शकेल!

कंपनी ने पहिला ५ इंची फोन ‘वन-प्लस एक्स’ २९ ऑक्टोबर २०१५ ला चीनच्या बाजारात आणला.

कंपनीच्या २०१४ वार्षिक अहवालानुसार त्यांनी ३०० दशलक्ष अमेरिकन डॉलर चा एकूण महसूल ,फोन विक्री च्या माध्यमातून जमवला होता.

 

oneplus x inmarathi
androidwikihow

 

परंतु एकूण किती हॅन्डसेटस ची विक्री झाली त्याचा उल्लेख नव्हता तरी त्या वेळेस इंटरनेट वर अशी बातमी पसरली होती की एकूण १० लाख मोबाईल विक्री झाली!

२०१४ मधे सर्वाधिक विक्री ही पूर्व आशियात सुमारे ३९% आणि युरोपात ३२% झाल्याची बातमी होती.

वन – प्लस चा भारतात वावर :

आजतागायत वन-प्लस ने बरेच फोन्स लाँच केले आणि सगळेच लोकप्रिय झाले. तगड्या वैशिष्ट्याने नेहमीच्या वापरकर्त्यांसोबतच गेमर्स मध्ये ही हे फोन प्रसिद्ध झाले.

वन-प्लस ने गेल्याच वर्षी भारतात हैद्राबादला १००० करोड रुपयांची गुंतवणूक करून R&D शाखा उघडण्याची घोषणा केली.

 

oneplus hyderabad inmarathi
the news minute

 

२०१९ मध्ये कंपनीने भारतात तयार होणारे फोन्स उत्तर अमेरिकेत निर्यात करत असल्याचं जाहीर केलं होतं.

चीन- अमेरिकेचे ताणलेले संबंध लक्षात घेता वन-प्लस ने भारतात अधिक गुंतवणूक करण्यावर भर दिला आहे. भारत सरकार सुद्धा ‘मेक इन इंडिया’ च्या माध्यमातून सवलती देते आहेच.

आयफोन च्या जवळपास सगळ्या सुट्टया भागाचे उत्पादन चीन मध्ये होते आणि जुळणी अमेरिकेत.

त्या प्रमाणेच भविष्यात ‘चायनाचा आयफोन’ म्हणून ओळख असणाऱ्या वन-प्लस च उत्पादन भारतातून मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?