सध्याच्या “ई लर्निंग”च्या काळात “या” कारणांसाठी “पुन्हा हवीये शाळा”…!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक :
श्री. प्रांजल अक्कलकोटकर
मेकॅनिकल इंजिनियर, बी एड, एम ए(इतिहास)
===
लहानपण ही एक खरोखर नवलाईची गोष्ट आहे. या वयाचे अप्रूप अगदी प्रौढांना देखील अजूनही वाटत असते. आणि हे अप्रूप वाटण्याचे खरे कारण दडले आहे ते या लहान मुलांचा मनस्वीपणामध्ये.
मोठे होत जाताना पुढे नेता येत नाही तो लहानपणाचा अल्लड मनस्वीपणा. त्या वयात गोष्टी अगदी साध्या साध्या गोष्टीतही अनुभवास येणारा अतरंगीपणा, छोट्या छोट्या गोष्टीचाही खळखळून वाटणारा आनंद.
तो व्यक्त करतानाचा मोकळेपणा याच गोष्टी या वयाला एक लोभस वलय प्राप्त करून देतात.
या वयाशी आता आधुनिक काळात अभिन्न झालेलं समीकरण म्हणजे शालेय जीवन. प्रौढांच्या, पालकांच्या दृष्टीने जरी शाळा ही अभ्यासक्रम शिकवणारी, मुले घडविणारी एक रचना असली तरीही मुलांसाठी शाळा म्हणजे त्यांच्या मनस्वितेचं प्रतिबिंब असते.
ही मुले जेव्हा मित्र मैत्रिणी, शिक्षक यांच्याबारोबर शाळेतील वर्ग, प्रयोगशाळा यांमध्ये वावरतात तेव्हा या प्रत्येक घटकाशी ते त्यांचे भावविश्व ताडून बघत असतात.
जिथे जिथे त्यांच्या मनस्वी पणाच्या तारा जुळतात, तिथे तिथे त्या घटकाला ते आपलं मानतात आणि निरपेक्षपणे जीव लावतात.
काहींना मित्र मैत्रिणी जीव की प्राण वाटू लागतात, काहींना तिथल्या आस्थापानेशी स्नेह वाटू लागतो तर काहींचे आवडत्या विषयाच्या शिक्षकांशी सख्य जडते.
आज कोविद १९ च्या संसर्गाला आला घालण्यासाठी सरकारी पातळीवर वर्दळ होणारी जी अनेक सार्वजनिक ठिकाणे बंद ठेण्याचे आदेश आलेले आहेत, त्यात गेले अनेक दिवस शाळा, महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आली आहेत.
सुरुवातीचा सुट्टी मिळाल्याचा बालसुलभ आनंद आता सरला असणर आहे आणि या चिमुकल्यांना आता ओढ लावत असणार आहेत त्यांचे सवंगडी, शिक्षक आणि शाळेचे आवार.
सध्याचे इंटरनेट चे प्रस्थ बघता घरी बसून स्वत:ला अनेक उद्योगात रमवणे शक्य आहे. विविध कृति करून बघणे, माहितीपर चित्रफिती बघणे, फार बाहेर न जाता छोटे खेळ खेळणे असे पर्याय आहेत.
पण असे असताना देखील मुलांना शाळेमध्ये सामायिक स्वरुपात वातावरणातील जो उत्साह अनुभवता येतो त्या वातावरणाची ओढ लागणे स्वाभाविक आहे.
सध्याच्या शालेय रचनेला पर्याय म्हणून ‘होम स्कूलिंग’ चा एक रचना म्हणून गांभीर्याने विचार गेली काही वर्षे सुरु आहे. वेब क्लासरूम, फ्लिप्ङ क्लासरूम या पर्यायांची देखील प्रयोगिक पडताळणी चालू आहे.
सध्याच्या लॉक डाऊन मुळे काही शाळांनी अशा प्रकारे तासिका घेऊन देखील अभायसक्रम पूर्ण करून घेतला देखील. या पद्धतीच्या अनेक मर्यादा समोर आल्या आहेत.
एकूणच कॅमेरासमोर एकीकडे अध्यापक आणि समोर शिकण्यासाठी बसलेला विद्यार्थी एवढे घटक असले की शिक्षण सुरु राहील या गृहीतकात राहता येणार नाही.
किंबहुना शाळा ही रचना म्हणजे वर्ग नावाच्या खोलीमध्ये शिक्षकाकडून दिले जिथे धडे दिले जातात अशी जागा असं वाटत असेल त्यांनाही ह्या लॉक डाऊन मुळे वेगळा विचार करणे क्रमप्राप्त आहे.
मुले शाळेत जातात ती अभ्यासक्रम शिकायला नव्हे, तर अभ्याक्रम ‘ही’ शिकायला जातात हेच खरं. मुले शिक्षकाकडून एकतर्फी कधीच शिकत नसतात.
किंबहुना आडवे, उभे,तिरके असे अनेक दुवे आपले सहविद्यार्थी, विषय शिक्षक, शाळेच्या आवारातील आस्थापना,आपले पालक या सर्वांबरोबर मुले जोडत असतात आणि त्यातून त्यांचे व्यक्तिमत्वाचे पोषण होत असते.
असा जिवंतपणा असलेली, मुलांच्या उत्साहाचा खळाळता झरा जिथे प्रवाहित होतो आणि जिथे अभ्यासक्रमही शिकवला जातो अशी जागा म्हणजे शाळा हे आज प्रकर्षाने समोर येत आहे.
इंग्रजीमध्ये ज्याप्रमाणे म्हणतात, की “यु कॅन आयदर लव्ह इट, यु कॅन आयदर हेट इट,बट यु कॅनॉट बायपास इट”…
त्याच धर्तीवर या शाळेच्या रचनेबद्दल म्हणावेसे वाटते की, या रचनेबद्दल टीका होईल, या रचनेबद्दल अनेकदा पुनर्विचार होईल, पण या रचनेची आवश्यकता मात्र अबाधित राहील!!
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.