लॉकडाउनमध्ये गरिबांची उपासमार होऊ नये यासाठी जगभर राबवलेला हा उपाय आपणही वापरायला हवा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सर्वांना कधीही पैसे काढण्यासाठी सोपं जावं, केवळ त्यासाठी बँकांमध्ये गर्दी होऊ नये याकरिता चालू झालेली सुविधा म्हणजे बँक एटीएम.
हे एटीएम रात्रंदिवस चालू असतात आणि आपल्याला त्यातून पैसे काढता येतात हे आता सगळ्यांना माहीतच आहे. भारतामध्ये पाण्यासाठी दुष्काळ परिस्थिती असताना पाण्याचे एटीएम देखील सुरू झालं होतं.
एका वेळेस १५ लिटर पाणी त्यातून मिळायचं. काहीकाही ठिकाणी दुधाचे एटीएम देखील होतं, हे काही जणांना माहीत असेल. पण कधीही कुठल्या धान्याचं एटीएम चालू होईल असं वाटलं होत नव्हतं.
पण असे एटीएम सुरु झालं आहे, तेही तांदळाचं आणि ते ही मोफत.
सध्या जगभर कोरोनाचा कहर आहे. बऱ्याच देशांमध्ये लॉक डाऊन लागलेला आहे. अशा वेळेस सगळ्यात मोठी अडचण होते, जे रोज काम करून पैसे कमावतात अशा लोकांची.
कारण लॉकडाऊन मुळे कुठेही काम मिळत नाही. आणि सोशल डिस्टनसिंग पाळणे जरुरीचं असल्याने काम मिळणारी सगळी ठिकाणं सध्या बंद आहेत.
मग या लोकांच्या दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होतोय. अशाच लोकांसाठी सध्या व्हिएतनाम या देशामध्ये तांदळाचे एटीएम सुरू करण्यात आलं आहे, आणि गरिबांसाठी मोफत.
ही कल्पना खरंच खूप चांगली आहे, कारण कोरोना सारख्या महामारीच्या काळात या लोकांना पैसे मिळत नाही म्हणून जेवण मिळत नाही. त्यांच्यासाठी ही खूपच चांगली सोय केलेली आहे.
व्हिएतनाम मध्ये आत्तापर्यंत २६५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत,अजून पर्यंत तरी कोरोना व्हायरसमुळे व्हिएतनाम मध्ये एकही मृत्यू झालेला नाही.
याचाच अर्थ जगाच्या इतर देशांच्या तुलनेत जर पाहिलं तर इतर कोणत्याही देशापेक्षा व्हिएतनाम मध्ये कोरोना रुग्णांची संख्या तशी कमी आहे. परंतु कोरोनाचं संक्रमण वाढवू नये याकरिता या सरकारने पावले उचलून लॉकडाऊन जाहीर केला आहे.
सोशल डिस्टनसिंग पाळण्यासाठी लोकांना प्रवृत्त केलं जात आहे. लॉकडाऊन चा प्रभाव दिसावा आणि कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून छोटे छोटे उद्योगधंदे सध्या बंद केले आहेत आणि कामगारांना घरीच राहण्यासाठी सांगितलं गेलं आहे.
अचानक हातातलं काम गेल्यामुळे अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा वेळेस व्हिएतनाम देशातीलच काही बिझनेसमन पुढे आले आहेत आणि त्यांनी व्हिएतनाम मध्ये अनेक शहरांमध्ये असे तांदूळ देणारे एटीएम मशीन बसवले आहेत.
हो-ची-मिन्ह या व्हिएतनामच्या शहरात दिवसातून २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस हे तांदळाचे एटीएम सुरू आहेत. तिथली ३४ वर्षांची रहिवासी नग्यून थी ली, हिच्या नवऱ्याचं देखील काम आता सुटलेलं आहे.
घरात तीन लहान मुले आहेत, त्यामुळे तिच्या घरात सध्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. म्हणून ती म्हणते की, ‘या तांदळाच्या एटीएम मुळे आमच्या दोन वेळच्या जेवणाची चिंता सध्यातरी मिटली आहे.
रोज एक किलो तांदूळ आमच्या कुटुंबासाठी दोन्ही वेळेस पुरेसा आहे. कधीकधी शेजारी लोक आम्हाला त्यांच्या घरात राहिलेलं अन्न देतात त्यामुळे ते आणि एक किलो तांदूळ सध्या आम्हाला पुरत आहे.’
हनोई शहरात पाण्याच्या टँकर मधून तांदूळ आणला जातोय. आणि गरजू लोकांच्या दिला जातोय. दररोज सकाळी आठ ते संध्याकाळी पाच पर्यंत ही सेवा तिथल्या गरीब नागरिकांना दिली जाते आहे.
तांदूळ घेण्यासाठी जे लोक रांगेत उभे असतात त्यांनी एकमेकांमध्ये सहा फुटाचं अंतर ठेवणे गरजेचे असते. तांदूळ घेण्याआधी आपल्या हातांना सॅनिटायझर लावणे कंपल्सरी असते.
हुई या शहरात स्थानिक नागरिकांना प्रत्येकी दोन किलो ग्रॅम तांदूळ दिला जातोय.
तांदळाच्या एटीएमची कल्पना सुचली ती व्हिएतनाममधील बिझनेसमन, ‘होअंग त्वान अन्ह’ यांना.
“या कठीण काळात या गरीब लोकांना असं वाटायला नको, की त्यांना आता जेवण आणि धान्य मिळणार नाही. उलट कामकरी, कष्टकरी, गरीब लोक एकटेच नसून त्यांच्याबरोबर त्यांच्या देशातील लोक आहेत.”
आता कोरोना बरोबरच्या लढईत लोकांच्या सहकार्याची अपेक्षा ते व्यक्त करतात.
व्हिएतनाम मध्ये त्यांच्या या संकल्पनेचं फार कौतुक होत आहे. त्यांनी दुसऱ्या शहरातील लोकांना असं करायला प्रवृत्त केले आहे. व्हिएतनाम मधील आता बाकीच्या शहरांमध्ये हानोई, हुई, डनॉंग मध्ये देखील तांदळाचे एटीएम निघत आहेत.
आता त्यांची संख्या देखील वाढवली जात आहे.
कोरोना विरुद्धच्या लढाईतील हा खरा मानवी चेहरा. जो आता जागोजागी दिसत आहे. गरीब आणि कष्टकरी लोकांसाठी सर्वच देशांमधील सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे, पण सरकारच्या अशा प्रयत्नांना साथ मिळतेय ती अशा माणसांमुळे.
आलेलं संकट ओळखून लोक मदत करीत आहेत. एकमेकांना सांभाळून घेत आहेत. कारण कोरोनावर मात करायची असेल तर तुम्ही एकमेकांमधील अंतर सांभाळून एक झालं पाहिजे हे आता लोकांना समजून चुकले आहे.
कोरोना गरीब श्रीमंत, हा धर्म तो धर्म, जातपात, देश प्रदेश बघत नाहीये, तो सगळ्याकडे आनंदाने वावरतोय, आणि माणसाचा आनंद हिरावून घेत आहे.
आपल्याला आपला आनंद टिकवून ठेवायचं असेल तर समाजातील सर्व घटकांना सामावून घेत कोरोनाशी दोन हात करावे लागतील. कोरोनाने हीच शिकवण माणसाला दिली आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.