२२ वर्षांनी अखेर मातृत्वाचे सुख लाभले, पण कोरोनाला हरवण्यासाठी या माऊलीने केला अपूर्व त्याग
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आज काल सगळीकडे केवळ एकच चर्चा आहे! राजकारण, देशा देशांमधील मैत्री किंवा वैमनस्य, ग्लोबल वॉर्मिंग, गरीबी हटाओ, गुन्हेगारी, खेळ इत्यादी सगळे महत्त्वपूर्ण विषय विस्मृतीत गेले आहेत.
एकच विषय चर्चेत आहे, तो म्हणजे कोरोना व्हायरस किंवा कोविद -१९! सोशल मिडीया, न्युज चॅनल ह्यावर फक्त आणि फक्त कोरोना व्हायरस बद्दल चर्चा आणि माहिती देण्यात येत आहे.
सध्या अतिशय वाईट परिस्थितीतून संपूर्ण जग जात आहे. गेल्या कित्येक वर्षात भूकंप, पूर, त्सुनामी, दहशतवादी हल्ले इत्यादी भयंकर गोष्टींना तोंड दिले आहे माणसाने!
पण, ह्या गोष्टी फक्त देशा- देशात, राज्या- राज्यात किंवा जिल्ह्या- जिल्ह्यात, शहरा शहरा किंवा गावा गावा पुरत्या मर्यादित होत्या. पण ह्या कोरोना व्हायरसने अख्ख्या जगात थैमान घातले आहे.
जवळपास १८० देशात संक्रमण झालेल्या ह्या व्हायसने लाखोंच्या वर लोकं संसर्गग्रस्त झाली आहेत आणि जवळ जवळ तेवढीच माणसे मृत्युमुखी पडली आहेत.
नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये चीनमधील वूहान मध्ये उद्भवलेला हा व्हायरस फ़ेब्रुवारी मार्च मध्ये सर्वत्र झपाट्याने पसरला. ह्या रोगाची लक्षणे उशीरा दिसतात, त्याचे निदान १४-१५ दिवसांनी होते.
तोपर्यंत सगळ्यांपासून दूर राहायचे. कोणालाही भेटायचे नाही, एकटे रहायचे, आयसोलेशन पाळायचे. मग पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर बरं होण्याची खात्री फक्त १०%!
खूपच भयावह, गंभीर आणि चिंता कराण्यासारखी परिस्थिती अचानक उद्भवली आहे सर्वत्र.
फेब्रुवारी, मार्च मध्ये भारतातही ह्या व्हायरसचे संक्रमण होण्यास सुरुवात झाली. ह्याची भयानकता आणि गंभीरता लक्षात घेऊन सरकारने भराभर निर्णय घेतले आणि १५ मार्च पासून शाळा, महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
२२ मार्चला टोटल लॉकडाऊन जाहिर झाले, परिस्थिती जास्तच गंभीर होत चालली होती, तेव्हा सगळंच बंद करण्याचा निर्णय घेतला सरकारने!
शाळा, महाविद्यालये तर बंदच होती आता खाजगी, सरकारी वाहने (अगदी कधी नव्हे तो रेल्वे देखील) बंद, खाजगी ऑफिसेस बंद, वर्क फ्रॉम होम देण्यात आले.
थोडक्यात काय कोणीही घराच्या बाहेर पडायचे नाही. कारण हा संसर्गजन्य रोग कोणाकडूनही होऊ शकतो, म्हणून दुसऱ्या टप्प्यात ह्याला अडवायचे प्रयत्न सुरू झाले.
लोकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. जाहिरातींमधून, न्युज चॅनेल मधून, सोशल मिडिया वरून ह्या रोगाबद्दल माहिती देण्यात येत असते, तसेच ह्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी काय करायचे हे सांगण्यात येते.
सगळे व्यवहार ठप्प! आधी १४ एप्रिल पर्यंत टोटल लॉकडाऊन जाहिर झाले होते. पण, आता ते वाढवून ३ मे पर्यंत टोटल लॉकडाऊन जाहिर करण्यात आले आहे.
इतके दिवस सगळे व्यवहार बंद ठेवण्याची ही पहिलीच वेळ असेल बहुदा!
अशा परिस्थितीत चारच प्रकारचे कर्मचारी लोकांच्या कल्याणासाठी लढत आहेत. तेही नि:स्वार्थी पणे आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून! ते म्हणजे पोलिस, डॉक्टर्स्, नर्सेस् आणि सफाई कामगार!
हे सगळे इतरांचा जीव वाचवण्यासाठी आपापली कामे मन लावून आणि जाणून बुजून जीव धोक्यात घालून करत आहेत. त्याचे बरेचसे व्हिडिओज्, फोटोज् वगैरे बातम्यांमधून, सोशल मिडियावर आपल्याला बघायला मिळत आहेत.
आज आपण अशाच एका आईची गोष्ट वाचणार आहोत जी एक डॉक्टर पण आहे. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ह्या डॉक्टर आईने जे काही केले आहे त्यासाठी तिला खरोखरच सलाम!
ही गोष्ट आहे मध्य प्रदेशातील होशंगाबाद या जिल्ह्यातील. या जिल्ह्यात बाबई नावाचे एक गाव आहे. येथे शोभना चौकसे नावाची महिला सध्या चर्चेत आहे
जी व्यवसायाने ब्लॉक मेडिकल ऑफिसर (बीएमओ) आहे.
पण, खरी गोष्ट पुढे आहे. तब्बल २२ वर्षांनी ह्या आई झाल्या तेही सरोगसी च्या मदतीने! २२ वर्षांनी सरोगसीच्या मदतीने ह्यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यांची नावे अंश आणि वंश अशी ठेवण्यात आली आहेत.
२६ मार्च रोजी त्यांनी ह्या मुलांना जन्म दिला. नॉर्मल प्रेग्नंसी आणि डिलिव्हरी प्रोसेस पेक्षा सरोगसी ही प्रक्रिया जास्त मोठी आणि कठिण असते.
पण, ह्यांच्यातली डॉक्टर त्यांना स्वस्थ बसू देईना! देशभरात कोरोना व्हायरसने घतलेले थैमान आणि लोकांचे जीव जातायत, लोकं हकनाक बळी पडतायत हे त्यांच्याने बघवत नव्हते.
बीएमओ पदावर असल्याने त्यांना त्यांच्या जबबदारीची जाणीव आहे आणि समाजाचे आपण देणे लागतो, समाजासाठी काहीतरी करण्याची हीच संधी आहे हे त्यांनी लक्षात घेतले.
मग त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. आपल्या नवजात अर्भकांना, आपल्या लहान लहान बाळांना त्यांनी आपला भाऊ आणि वहिनी ह्यांच्याकडे सुपूर्त केले जे होशंगाबाद मध्ये असतात.
आता २४ तास त्या त्यांच्या मुख्यालयातच असतात, लोकांना निरंतर सेवा देतात आता त्या! २४*७ त्या फक्त लोकांच्या सेवेसाठी त्या झटत असतात.
एका न्य़ुज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, की “मुलांची आठवण तर येतच असते मला, २२ वर्षांनी मला मातृत्त्वाचं सुख मिळालं, पण लोकांची सेवा करणे हे ह्या घडीला जास्त महत्त्वाचे आहे.
एकीकडे कर्तव्य आणि दुसरीकडे कुटुंब आहे. मी कर्तव्याला जास्त महत्त्व देते. माझ्या बाळांना मी व्हिडिओ कॉल करून बघत असते. रोज फोन करून त्यांची ख्याली खुशाली विचारत असते.
माझे काम करणे हे आद्यकर्तव्य आहे.”
ह्या सगळ्यावरून असे लक्षात येते की, अशीही काही देवमाणसे ह्या जगात आहेत जे आत्ता ह्या कठिण काळात देखील समाजासाठी काम करत आहेत.
आपला वैयक्तिक आनंद, आपले कुटुंब ह्याच्या पेक्षा लोकांच्या हिताला, स्वास्थ्याला प्रधान्य देणे पसंत करतात.
अशा डॉक्टर्स्, पोलिस, नर्सेस् आणि सफाई कामगार जे स्वतःच्या जीवाची, स्वतःच्या कुटुंबाची, वैयक्तिक आनंदाची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचावेत, लोकं सुरक्षित रहावित म्हणून अहोरात्र झटत आहेत त्या सर्वांना मानाचा मुजरा!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved