तब्बल ७६ दिवसांनी वुहानचा लॉकडाऊन तर संपला, पण तरीही चीन काहीतरी लपवतोय का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
चीनमधल्या वूहान मधूनच आज जगावर कोरोनाचं संकट आलेलं आहे. चीनमधल्या हुबई प्रांतातील हे एक मोठे शहर, हुबई ची राजधानी म्हणजे वूहान.
तिथे डिसेंबर मध्ये पहिला रुग्ण सापडला. असं समजलं जातं की, तिथल्या मासळीबाजारातून कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाली.
सुरुवातीला चीनने देखील त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही पण त्यातील धोका जेव्हा जाणवायला लागला त्यानंतर मात्र कोरोना व्हायरसकडे अत्यंत गंभीरपणे पाहिलं गेलं.
कोरोनाव्हायरसचा संसर्ग हा, लोकांच्या सहवासातूनच होतोय आणि काही जणांच्या बाबतीत तो जीवघेणा ठरतोय हे जेव्हा लक्षात आलं. तेव्हा तिथल्या सरकारने अनेक वेगवेगळ्या उपाययोजना केल्या.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली ती म्हणजे २३ जानेवारीला संपूर्ण हूबई प्रांतात, वूहानमध्ये लॉक डाऊन जाहीर केला.
त्यामुळे तिकडे येणारे सगळे प्रवासी मार्ग बंद करण्यात आले. स्कूल,कॉलेजेस, ऑफिस, कंपन्या बंद करण्यात आल्या. लोकांना रस्त्यावर फिरण्यास मनाई करण्यात आली.
कोरोना झालेल्या लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येऊ लागले. कोरोना पॉझिटिव रुग्णांवर उपचार करण्यात येऊ लागले. तरीही तिथे कोरोनाची लागण होण्याचा आकडा वाढत होता, आणि होणारे मृत्यू देखील वाढत होते.
पण या उपाययोजनांमुळे तिकडे हळूहळू कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. ही लॉक डाऊन ची परिस्थिती मात्र कायम होती. या लॉक डाऊन च्या काळात १० मार्चला चीनचे पंतप्रधान झि शिनपिंग यांनी वूहानला भेट दिली.
तिथे असलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर १९ मार्चला पहिल्यांदाच असं झालं की वूहानमध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही.
पुढे हळूहळू कोरोनाची लागण होण्याची संख्या कमी होऊन गेली. गेले तीन-चार दिवस तिकडे एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही.
म्हणूनच तेथील सरकारने तिथला लॉक डाऊन संपवायचं ठरवलं, आणि 8 एप्रिल लॉकडाऊन संपले असं जाहीर केले.
गेले ७६ दिवस चालू असलेलं हे लॉक डाऊन अखेर काल संपलं. त्यामुळे आता वूहानमधील लोक मोकळा श्वास घेऊ शकणार आहेत.
जेव्हा लॉक डाऊन संपला, असे जाहीर झालं तेव्हा खूप सारे लोक बाहेर आले, आणि आपला आनंद व्यक्त करू लागले. यांगताझी नदी काय किंवा गगनचुंबी इमारती काय! सगळीकडेच विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती.
नदीवरच्या ब्रिजच्या जवळ देखील लाईट शो केले जात होते. ज्यामध्ये आरोग्य कर्मचारी, पेशंट बरे करत आहेत अशा प्रतिमा होत्या. पंतप्रधान झि जिनपिंग यांच्याकडून “हीरोइक सिटी” म्हणून वूहानचा उल्लेख होत होता.
ही रोषणाई पाहण्यासाठी लोक ब्रिजजवळ गर्दी करत होते. ‘वुहान लेट्स गो’ अशा घोषणा देत होते आणि चीनचं राष्ट्रगीत रस्त्यारस्त्यावर म्हणलं जात होतं.
कोरोनाचं अंधकारमय जग आता संपलं, अशी ग्वाही जणू वूहान शहर देत होतं. ७६ दिवसांच्या लॉक डाऊन नंतर बीजिंगला जाणारी ट्रेन देखील यावेळेस पूर्ण भरली होती.
अर्थात प्रत्येक ठिकाणी सोशल डिस्टन्सइंग पाळण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. लोक तिथल्या बागांमध्ये किंवा टुरिझम पॉइंटला भेटी देत होते. रस्ते नेहमीसारखे माणसांनी फुलून गेलेले होते.
सगळ्यांच्या चेहऱ्यावर मास्क होते पण तरीही लोकांचा आनंद कळत होता. आता त्यांना वुहानच्या बाहेर बसने, ट्रेनने जाता येत होतं.
तरीही वूहान मध्ये अजून प्रत्येक व्यक्तीला आपल्या आरोग्याचा डेटा कंपल्सरी अपडेट ठेवावा लागणार आहे. जसं की ताप आणि सर्दी खोकला असल्यास बाहेर कुठेही फिरताना मास्क घालून फिरणे बंधनकारक आहे.
आपल्या मोबाईल मध्ये एक ॲप डाऊनलोड करून त्यावर हा डेटा रोज अपलोड करावा लागणार आहे. त्यामुळे सरकारला आणखीन काही पावले उचलायला लागणार असतील तर ते करणे सोपे जावे.
काहीना शहर सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मात्र शहर सोडताना त्या व्यक्तीकडे तो कोरोना पॉझिटिव नाही आणि तो कुठे चालला आहे? कशासाठी चालला आहे? आणि कधी येणार आहे?, ही माहिती असलेल्या कागदपत्रांची पूर्तता त्या व्यक्तीने केलेली असणं बंधनकारक आहे.
चीनने लॉक डाऊनचा जो निर्णय घेतला आणि तो यशस्वीरित्या अमलात आणला, यामुळे त्याचाच आदर्श आता जगातले इतर देश ही घेतील.
परंतु हे सगळं जरी असलं तरी चीन अजूनही काहीतरी लपवते असं प्रत्येक देशाला वाटते आहे. कारण काहीतरी झोलझालं चीनने केलंय असं काही घटनांवरून वाटतंय.
वूहानमध्ये एक कुटुंब कोरोना बाधित झाले, त्यातील एकाच्या म्हणण्यानुसार तिथल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स स्थानिक पातळीवरील छोट्या खेड्यातून आलेले होते.
आणि त्यांच्या देशी पद्धतींचा वापर रुग्णांना करायला सांगायचे. म्हणजे, ‘आपली नाभी शरीराच्या घड्याळाच्या दिशेने फिरवल्यास कोरोना जाईल. किंवा हाताच्या कोपरावर मारून घेतल्यास तुमची फुफ्फुसं मोकळे होतील आणि कोरोना जाईल.’
तो म्हणतो, ‘लोक वेड्यासारखे स्वतःच्या हातावर मारून घ्यायचे. गेल्या दोन महिन्यांपासून आम्हाला सांगितलं जात होतं, की सरकारची तारीफ करा. आम्हाला कधीही खरी माहिती कळू दिली जात नव्हती.
मला माझ्या मुलांना अशा देशात वाढवायचं नाही “,असं त्या माणसाने सांगितले.
दुसऱ्या एकाच्या म्हणण्यानुसार त्याला घरात क्वारांटाईन करण्यात आलं होतं मात्र अचानक घरातून बाहेर काढून हॉटेलमध्ये नेण्यात आलं आणि तिथे ठेवण्यात आलं. हॉटेलचे बिल पण ६५००० युआन इतकं केलं.
चीनमध्ये सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याच्यात एक मुस्लिम महिला म्हणते की, ‘मला सुरुवातीला हलाल जेवण मिळत नव्हतं, पण आता मिळते.’
याचा अर्थ काय घ्यायचा? कारण चीनमध्ये मुसलमानांना दाढी ठेवण्यासही परवानगी नाही. तसंच नाव देखील इस्लामिक ठेवायचं नाही. तिकडे मुस्लिमांना रोजे देखील ठेवता येत नाहीत.
अशा परिस्थितीत त्या महिलेला हलाल मटण मिळत असेल का, यावरच शंका आहे.
वूहान मधल्या एका डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार चीन सरकार खोटे आकडे दाखवत आहे. शी जिनपिंग येण्याच्या आधीपासूनच पेशंट बाबत ढिलाई दाखवली जात होती.
चीनच्या, ‘नॅशनल हेल्थ कमिशन’ च्या गाईडलाईननुसार एखाद्या कोरोना रुग्णाची दोनदा चाचणी केल्यानंतर जर दोन्ही वेळेस रिपोर्ट निगेटिव्ह आले, तर त्या पेशंटला सोडण्यात येत होते.
परंतु सरकार आपलं कौतुक करून घेण्यासाठी अशा रुग्णांना एका रिपोर्टमध्ये घरी सोडत होते. जे लोक अजूनही कोरोना पसरवू शकतात अशा लोकांना मोकळं सोडण्यात आलेले आहे.
वूहान मधल्या ‘वॉल स्ट्रीट जनरल’ या वृत्तपत्रानुसार वूहान मध्ये सात एप्रिलला पंधरा ते वीस हजार, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. पण नंतर काही वेळातच ही बातमी डिलीट करण्यात आली.
किती जणांची चाचणी करायची? किती जणांना ताप आहे? हे ओळखून कोरोना आहे समजायचं याबद्दल अनेक वेळा नियामांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
उत्तम उदाहरण म्हणजे फेब्रुवारी महिन्यात १२ तारखेला एक नवीन नियम आणला की, ‘ज्या रुग्णांच्या छातीच्या X ray मध्ये कोरोना सदृश्य लक्षणं दिसतील तो कन्फर्म कोरोनाग्रस्त असे जाहीर करायचे.
या नियमामुळे एकदम २०००० रुग्ण एका दिवसात वाढले. तोपर्यंत चीनमधील जाहीर आकडेवारी होती ५००००. लगेच या नियमांमध्ये एकोणीस तारखेला बदल करण्यात आला.
जेणेकरून रुग्णसंख्या कमी दाखवता येईल. १२ ते १९ फेब्रुवारी दरम्यान जे रुग्ण पॉझिटिव्ह म्हणून नोंदले गेले ते नंतर कमीही करण्यात आले.
युनिव्हर्सिटी ऑफ हॉंगकॉंग नुसार फेब्रुवारी महिन्यात चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या नक्कीच खूप वाढलेली असणार आहे. पण किती वाढली याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.
वुहानची लोकसंख्या एक कोटी दहा लाख असून तिथे फक्त ७७७००० टेस्ट करण्यात आल्या. चीनच्या इतर प्रांतातही फार कमी रुग्ण संख्या दिसून येत आहे.
हे केवळ असंच दाखवण्यासाठी असू शकेल की, चीनने किती कमी वेळात ह्या व्हायरस वर नियंत्रण मिळवलं. आणि चीन किती छान नियोजन करू शकतं हे जगाला दाखवून द्यायचं.
आता चीनचं म्हणणं आहे की, बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे कदाचित कोरोना पसरू शकतो. म्हणजे आता तिकडे कारोनाने जर परत डोकं वर काढलं तर त्याच खापर बाहेरून आलेल्या रुग्णांवर फोडता येईल.
सध्या एकतर अमेरिकेत कोरोनाची परिस्थिती भयंकर आहे. लोक मरत आहेत आणि अमेरिकेला अशा परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण जात आहे.
आणि त्याच वेळेस चीनमध्ये मात्र कोरोना पासून मुक्ती मिळाली असून चीन आम्ही किती चांगलं नियोजन करू शकतो हे सांगू पाहत आहे. आता महासत्तेचे केंद्र अमेरिका नसून चीन आहे हे सगळ्या जगाला दाखवून देत आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.