संतापजनक: राम गोपाल वर्मा यांचं चीड आणणारं एप्रिल फूल नाट्य
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सध्या देशात कोरोनाचं वाढतं संकट आ वासून उभे आहे. सरकार त्यांच्या परीने सर्व प्रयत्न करीत आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून अनेक उपाय योजना करीत आहे.
आणि यासाठी सरकारला समाजातील सर्वच स्तरातून सहकार्य अपेक्षित आहे. परंतु तरीही जी प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध मंडळी आहेत त्यांच्याकडून अत्यंत बेजबाबदार वर्तणूक होत आहे होताना दिसते आहे.
त्यातलंच एक नाव म्हणजे प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक राम गोपाल वर्मा.
राम गोपाल वर्मा यांनी एक एप्रिलला ट्विटरवर एक ट्विट केलं, ज्यामध्ये ते म्हणतात की, “मला कोरोना झाला आहे, असं माझ्या डॉक्टरांनी मला आत्ताच सांगितलं आहे. त्यामुळे मी आता क्वारंटाईन होत आहे.”
त्यांच्या या ट्विट नंतर ट्विटरवर त्यांचे चाहते अत्यंत काळजीत पडले. सगळेजण त्यांना, “सर लवकर बरे व्हा, काळजी घ्या” असे सांगू लागले. ही बातमी सगळीकडे वार्यासारखी पसरली.
त्यांच्या ट्विटर अकाउंटवर जेव्हा याबाबत खूप पोस्ट यायला लागल्या त्याच वेळेस त्यांनी लगेच दुसरी पोस्ट केली.
ज्यामध्ये ते म्हणतात की, “माझ्या डॉक्टरनी मला सांगितलं की हा एक एप्रिलचा जोक होता. मला काहीही झालं नसून मी व्यवस्थित आहे. यात माझी चूक नसून माझ्या डॉक्टरची चूक आहे, डॉक्टर ने मला एप्रिल फूल केले.”
त्यांच्या या ट्विट नंतर त्यांचे चाहते त्यांच्यावर खवळले आणि त्यांना ट्विटरवर ट्रोल करण्यात येऊ लागले.
त्यात त्यांच्या एका चाहत्यांनी असं म्हटलं की, “सर covid-19 हा काही जोक करण्याचा विषय नाही. हा सध्या खूप सिरीयस विषय आहे, ही एक महामारी आहे.
यामुळे लोक मरण पावत आहेत. मी प्रार्थना करतो की हा जोक तुमच्या बाबतीत खरा ठरू नये.”
एका चाहत्याने म्हटलं आहे की, “तुम्ही एक प्रसिद्ध सेलिब्रिटी असल्यामुळे हे असं वागणं तुम्हाला शोभत नाही. लोकांना विनाकारण पॅनिक करण्यात काही अर्थ नाही.
तुमच्यासारख्या लोकांविरुद्ध काहीतरी ॲक्शन घेणे गरजेचे आहे.”
एका चाहत्याने म्हटले आहे की, “तुम्हाला फॉलो करावा की नाही असा प्रश्न आता मला पडला आहे.”
त्यांच्या या असंवेदनशील कृतीला एकाने तर, “तुम्हाला जेलमध्ये टाकले पाहिजे”, असं रागाने लिहिले आहे.
एकाने म्हटले आहे की, “हा जोक तुम्ही एका व्हेंटिलेटरवर असलेल्या पेशंटला सांगा, मग त्याची रिअक्शन काय असेल पहा. ही हसण्यासारखे गोष्ट नाही.”
चाहत्यांच्या इतक्या आक्रमक प्रतिक्रिया पाहून राम गोपाल वर्मा यांनी थोड्याच वेळात अजून एक ट्विट केलं, त्यात ते म्हणतात की,
“सध्या खूप तणावाचे वातावरण असल्यामुळे त्यामध्ये थोडासा विनोद निर्माण करून हलकेपणा आणण्याचा मी प्रयत्न केला आहे. मी स्वतःवरच विनोद केला आहे.
परंतु माझ्या कृतीमुळे कुणाला वाईट वाटले असेल तर त्याबद्दल मी दिलगीर आहे. त्यांची मी क्षमा मागतो.”
त्यांच्या या ट्विट वर देखील लोकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. त्यात ते म्हणतात की, “कोणतीही कृती करण्याच्या आधी विचार करावा, नंतर अशी क्षमा मागायची वेळ येत नाही.”
एकाची प्रतिक्रिया आहे की, “या आजारावर तुम्ही जर विनोद करत असाल तर तुम्ही खरोखरच आजारी आहात. तुम्हाला झालेला व्हायरस हा तुमची अस्थिर मानसिक वृत्ती दाखवतो.”
खरंतर राम गोपाल वर्मा यांनी रंगीला, सत्या, डरना मना है, सरकार आणि कंपनी असे वेगळे सिनेमे बॉलिवूडमध्ये निर्माण केले.
त्याच दिग्दर्शकाकडून देशावर आलेल्या या संकटाबाबत इतकं असंवेदनशील वर्तन होताना दिसत असेल, तर ते या आजाराला किंवा आत्ताच्या परिस्थितीला ते किती गांभीर्याने बघतात हा प्रश्न पडतो.
देशात सध्या आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असून निदान सेलिब्रिटी लोकांकडून तरी अशा वर्तनाची अपेक्षा नसते. अत्यंत जबाबदारपणे जर हे लोक वागले तर समाजापुढे एक चांगला आदर्श ते निर्माण करू शकतात.
परंतु असं होताना फारंस दिसत नाहीये. अत्यंत बालिश वर्तन या लोकांकडून होताना दिसतं त्यामुळे सामान्यांकडून काय अपेक्षा करावी असा प्रश्न पडतो.
मध्ये ती गायिका कनिका कपूर ही लंडन वरून भारतात आली, इथे आल्यावर ती कोरोना पॉझिटिव्ह आहे हे डॉक्टरांनी सांगितलेलं होतं, तरीदेखील तिने ते सगळ्यांपासून लपवले.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश याठिकाणी अनेक पार्ट्यांमध्ये गेली. अनेक प्रतिष्ठित लोकांबरोबर फोटो काढले. सगळ्यांबरोबर वावरली.
ज्यामध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया त्यांचा मुलगा दुष्यांत सिंह यांच्यापासून अनेक प्रतिष्ठित नागरिक समाविष्ट होते.
त्यानंतर दुष्यंत सिंह त्यांच्या काही कामासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटले. त्यानंतर दोन-चार दिवसातच कनिका कपूर आजारी पडली. तिला covid-19 आहे हे जेव्हा सगळ्यांना समजले तेव्हा तिला भेटलेल्या सगळ्यांचे धाबे दणाणले.
वसुंधरा राजे आणि दुष्यंत सिंह यांनी स्वतःला अलगीकरण कक्षात ठेवले. इतर लोकांनीही स्वतःला क्वारनटाईन करून घेतले. सगळ्यांनी covid-19 च्या टेस्ट करून घेतल्या.
अगदी राष्ट्रपती कोविंद यांनीदेखील covid-19 ची टेस्ट करून घेतली.
कुणाच्याही टेस्ट पॉझिटिव्ह आल्या नाहीत ही जरी चांगली गोष्ट असली तरी, यातून किती मोठा धोका निर्माण होऊ शकला असता, याची जाणीव कनिका कपूरला असायला हवी होती. अर्धी संसद ही करोनाग्रस्त होऊ शकली असती.
निदान सेलिब्रिटीजनी तरी थोडं सामाजिक भान दाखवून जबाबदार पणे वर्तन करावे. कारण या लोकांचा आदर्श सामान्य जनता घेत असते.
जर ते लोक असे वागतात तर आम्हालाच का नावे ठेवली जातात, म्हणून देशातील सगळेच लोक जर असं वागायला लागले तर देशाचे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही.
सध्या कोरोनाचा लढा आपण लढत आहोत हे भान भारतातल्या प्रत्येक नागरिकाला यायला हवं.
अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन हे निदान अशा प्रसंगी लोकांना मदत करण्यात पुढे असतात.
अमिताभ बच्चन जाहिरातींमधून लोकांचे प्रबोधन करताना दिसतात आणि त्यांच्या एकूण ट्विट, फेसबुक पोस्ट यावरून असं दिसतं की ते या कोरोनाकडे गांभीर्याने पाहतात.
राम गोपाल वर्मा काय किंवा कनिका कपूर काय यांनी लोकांचे प्रबोधन करावे अशी अपेक्षा नाही. पण बेजबाबदार वर्तन करू नये इतकं तर नक्कीच वाटतं.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.