कोरोनाशी लढत असताना “हे” वेगवेगळे व्हायरस भयावह संकट घेऊन येण्याची काळजी तज्ञांना वाटतेय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सध्या संपूर्ण जगच कोरोना व्हायरसची लढत आहे. युरोपातील प्रगत राष्ट्र देखील या व्हायरसच्या प्रादुर्भावाने हतबल झाली आहेत. आता भारतातही कोरोनाने बऱ्यापैकी हात पाय पसरले आहेत.
संपूर्ण देशावर त्याच सावट असून देशातले सगळे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यावरचं औषध शोधण्यासाठी शास्त्रज्ञ, डॉक्टर्स झटून प्रयत्न करत आहेत.
त्यातून काहीतरी निघेल असे वाटत वाटत असतानाच, चीनमधून परत एकदा धक्कादायक बातमी आली आहे.
चीनमध्ये आता अजून एक व्हायरस समोर आला आहे आणि हा तर इतका भयानक आहे की एका दिवसातच लागण झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
हंता व्हायरस
या व्हायरसचं नाव आहे हंता व्हायरस. चीनमधील युनान प्रांतातून हा व्हायरस आलेला आहे.
कामावरून परत येत असतानाच एका व्यक्तीचा बसमध्येच मृत्यू झाला. त्यामुळे आता बस मधील ३२ लोकांच्याही चाचण्या करण्यात आल्या. त्यांना या व्हायरसची लागण झाली का हे पाहण्यात आलं आहे.
तज्ञांच्या मते, हा हंताचा विषाणू इतका घातक आहे की जर तो माणसाच्या शरीरात गेला तर त्याचा मृत्यू अटळ आहे. म्हणजे कोरोना पेक्षाही भयानक याचे परिणाम आहेत.
आणि कोरोना इतका वेळही यासाठी लागत नाही, अत्यंत कमी वेळात माणसाचा मृत्यू होतो.
यातलं सुदैव इतकंच म्हणावं लागेल की, हा व्हायरस संसर्गातून पसरत नाही. म्हणजे एका माणसाला जर हा हंता व्हायरस झाला तर दुसऱ्याला त्याची लागण होत नाही.
मग हा व्हायरस येतो कुठून? याची लागण कशी होते?
आत्तापर्यंत केलेल्या अभ्यासानुसार हा हंता व्हायरस उंदरांपासून होतो. उंदरांमध्येच हा व्हायरस पसरतो. म्हणजे एखादा माणूस जर अशाप्रकारच्या उंदरांच्या किंवा त्याच्या मलमुत्राच्या संपर्कात आला तर त्याला हंता व्हायरस होऊ शकतो.
म्हणजे एखाद्या व्यक्तीने मेलेल्या उंदराला किंवा त्याच्या विष्ठेला हात लावला आणि तो हात आपल्या चेहऱ्याला लावला तर त्या व्यक्तीला या व्हायरसची लागण होते.
म्हणजेच ज्या ठिकाणी उंदीर खूप आहेत त्या ठिकाणी हा व्हायरस पसरण्याचा धोका अधिक आहे.
लक्षणे:
या हंता व्हायरसची लक्षणे म्हणजे अगदी कोरोना सारखीच आहेत ज्यामध्ये डोकेदुखी, ताप, उलटी ,अंगदुखी ,खोकला येतो.
जर हा विषाणू फुफ्फुसांपर्यंत गेला तर फुप्फुसांमध्ये पाणी होते आणि श्वासोश्वास करायला त्रास होतो, आणि त्यातच माणसाचा मृत्यू होतो.
ही, खरोखरच काळजी करायला लावणारी गोष्ट आहे कारण कोरोना मुळेच जगभरात आत्तापर्यंत सोळा हजार पेक्षा जास्त मृत्यु झाले आहेत. अजून त्यातून बाहेर यायच्या आधीच नवीन संकट मानवजातीवर येऊ पाहते आहे.
एवियन फ्लू
कोरोना पाठोपाठ आता आशिया खंडावर एवियन फ्लू चे संकट येऊ घातले आहे. तैवान, व्हियेतनाम, चीन, भारत या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड फ्लू दिसून येत आहेत.
तैवान आणि व्हिएतनाम मध्ये बऱ्याच कोंबड्या मृत्यू पावत आहेत.
चिकन खाल्ल्यामुळे कोरोना होतो अशी अफवा सोशल मीडियावर पसरली, त्यामुळे बऱ्याच लोकांनी चिकन खाण्याचे सोडलं. त्याचा परिणाम हा पोल्ट्री व्यवसायावर झालेला आहे.
पोल्ट्री व्यवसायाला त्यामुळे घरघर लागलेली आहे. आणि आता अजून एक भर म्हणजे बर्ड फ्लू सारखी एक वेगळीच साथ पक्ष्यांमध्ये दिसून यायला लागली आहे. झारखंडमध्ये देखील सध्या बर्ड फ्लू मुळे पक्षी मरत आहेत.
बिहार मधल्या गोपालगंज मध्ये अज्ञात कारणाने एका पोल्ट्री व्यावसायिकाच्या तीनशे कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्या व्यावसायिकाने त्या कोंबड्या न पुरता त्यांना नदीच्या पाण्यात टाकले आहे.
ज्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. कोंबड्या कशाने गेल्या याचं कारण अजून समजलेलं नाही.
आता यातील तज्ञ अशा मेलेल्या कोंबड्यांचे तपासणी करणार आहे आणि त्यांचा मृत्यू कशामुळे झाला आहे याचं कारण शोधणार आहेत.
केरळमधल्या पोल्ट्री व्यवसायावरही सध्या या एवियन फ्लूने सावट धरलं आहे. तिकडेही आता बर्ड फ्लू मुळे तिथल्या अनेक कोंबड्या मेल्या आहेत. अशा सगळ्या गोष्टींमुळे पोल्ट्री व्यवसायाचं कंबरडं मोडलं आहे.
तर उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये बगळ्यांचाही अशाच अज्ञात कारणांमुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात कावळे देखील अशाच अज्ञात कारणांमुळे मृत पावले आहेत.
सारी: सिव्हियर ॲक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन
कोरोना, हंता, बर्ड फ्लू ह्या साथीने माणसांच्या नाकात दम आणला आहे. त्यात अजून एक धक्कादायक बातमी आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातून आलेली आहे.
ती म्हणजे तिथे आता सारी (SARI — सिव्हीयर ॲक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन) या आजाराचा रुग्ण सापडला असून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
या आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे याची लक्षण ही अगदी कोरोना व्हायरस सारखीच आहेत. म्हणजे सर्दी,खोकला, ताप अशी असतात.
फरक इतकाच आहे की या रुग्णाला सर्दी आणि ताप खूप प्रमाणात येतो, प्रचंड अशक्तपणा येतो.
अक्षरश: दोन-तीन दिवसातच माणूस व्हेंटिलेटरवर जातो आणि त्याचा मृत्यू होतो. चिंतेची बाब म्हणजे औरंगाबाद मध्ये आता त्याचे दोन ते तीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून प्रत्येक नागरिकाने खूप काळजी घेतली पाहिजे असं सांगितलं जात आहे.
स्वाईन फ्लू
स्वाईन फ्लू आता धोकादायक नाही असे वाटत होते आणि त्याचे रुग्ण देखील कमी झाले होते, परंतु नाशिक मध्ये स्वाईन फ्लू चे रुग्ण आढळून आले आहेत.
म्हणजे सध्या महाराष्ट्रात कोरोना, हंता स्वाईन फ्लू, सारी असे आरोग्यविषयक संकट उभे ठाकले आहे. आणि त्यात बर्ड फ्लू जर आला तर आरोग्य यंत्रणेवर नक्कीच खूप ताण येणार आहे.
थोड्याच दिवसात जर पाऊस सुरू झाला तर मुंबईसारख्या शहरांमध्ये तिथल्या ड्रेनेजमध्ये उंदरांची संख्या वाढते, त्यामुळे हंताचाही धोका समोर दिसतोय.
पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी आता भारतात पूर्ण एकवीस दिवस म्हणजे १५ एप्रिल पर्यंत लॉक डाऊन जाहीर केले आहे.
त्यात वेगवेगळ्या साथी, नवीन प्रकारचे व्हायरस नवीन प्रकारचे आजार यांचे आव्हान प्रत्येक भारतीय माणसासमोर आहे. संकट भयानक आहे आणि त्याचा सामना शांत घरी राहूनच करता येऊ शकतो.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.