१४ तास घरात बसून कंटाळू नका – एरवी कधीही जमत नाहीत अशा या १२ गोष्टी करा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
कोरोनामुळे जगात हाहाकार माजला आहे.
त्यामुळे सरकारने आता काही कठोर उपाययोजना सुरुवात केल्या आहेत.
त्यानुसार बरेचसे ऑफिसेस, कंपन्या, कार्यालय, दुकानं, मार्केट, मॉल्स बंद करण्यात आलेले आहेत. वाहतूक व्यवस्था देखील संथ गतीने सुरु आहे. शाळा कॉलेजेस बंद आहेत. त्यामुळे सगळेजण आता घरातच आहेत.
मुख्य म्हणजे अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचा-यांना पुढील काही दिवस वर्क फ्रॉम होम अर्थात घरी बसून काम करण्याचा सल्ला दिलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या जनतेशी संवाद साधत, आज अर्थात २२ मार्च रोजी जनता कर्फ्युची हाक दिली.
करोनाशी दोन हात करण्यासाठी त्याचा प्रादुर्भाव टाळणं गरजेचं आहे, आणि ही लढाई जिंकण्यासाठी आजच्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत भारतातील सगळ्या नागरिकांनी स्वेच्छेने घरी रहावं असं सांगण्यात आलंय.
भारतातील सेलिब्रिटी, खेळाडु, व्यापारी यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच या जनता कर्फ्युला पाठिंबा दिला आहे.
त्यामुळे आजचा संपुर्ण दिवस घरात बसून राहण्याचा तुमचाही बेत आहे ना?
मात्र आजच्या दिवसाचं नियोजन केलं का?
माणसाचं एक रुटीन ठरलेलं असतं, आणि अचानक त्या रूटीनमध्ये असा अमुलाग्र बदल झाला तर काय करावं? हे कळत नाही आणि त्यातही घरातच बसायचं, बाहेर नाही जायचं यामुळे अजूनच कंटाळा यायला लागतो.
आज दिवसभर काय करायचं? असा प्रश्न पडलाय? दिवसभर कंटाळा येण्याची भिती वाटतीय?
पण काळजी करु नका, कारण या दिवसाला कंटाळा म्हणून नव्हे तर एक संधी म्हणून बघा.
आपले अनेक छंद, आवडीनिवडी या रोजच्या रुटीनमध्ये जोपासता येत नाहीत. रोजचा प्रवास, कामाचं टेन्शन, इतर जबाबदा-या यांमुळे तुम्हालाही टेेन्शन फ्री, मनसोक्त आयुष्य जगता येत नसेल, तर मग आजचा दिवस ही सुवर्णसंधी आहे.
तर अशा काही सोप्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो आणि आपला कंटाळा घालवू शकतो.
१. वाचन
बऱ्याचदा वेळ नाही या कारणाखाली वाचन करणं बंद होत जातं. पण आता वेळ मिळाला आहे, तो दवडु नका.
अशी अनेक पुस्तके आहेत जी वाचायची राहिली आहेत ती आपण वाचू शकतो.
रोजचं वर्तमानपत्र जे फक्त वरवर वाचलं जातं ते आता त्यातील आता महत्त्वाचे लेख संपादकीय वाचता येतील.
मुलांना देखील आपल्याबरोबर वाचायला बसवायचं, पण त्यांना त्यांच्या आवडीची पुस्तक द्यायची. आणि काय वाचलं हे एकमेकांना सांगायचं. त्यामुळे वाचलेलं मुलांच्या ही लक्षात राहील.
आणि यामुळे घरातल्यांसोबतचा हा वेळ अत्यंत आनंदाचा आणि उपयोगी ठरेल.
२. टिव्ही पाहणं
टिव्ही म्हटला की लोक त्याला ‘इडियट बॉक्स’ म्हणतात पण प्रत्येक वेळेसच टीव्ही हा इडियट बॉक्स नसतो.
त्यावर देखील कधीकधी काही काही चॅनेल्स असे आहेत की जी आपल्याला नवीन आणि वेगळी माहिती पुरवतात.
उदाहरणार्थ डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफी अशा चॅनल वरचे कार्यक्रम हे हटके असतात.
टी एल सी, हिस्टरी, एपिक, एनडीटीवी गूड टाइम्स या चॅनल वरती माहितीपूर्ण आणि वेगळे कार्यक्रम पाहायला मिळतात.
रियालिटी शोज देखील कधीकधी चांगले वाटतात. बोअर होत असल्यास असे चॅनल पाहायला हरकत नाही.
याशिवाय नेटफ्लिक्स, अमोझॉन प्राईप यांवरील अप्रतिम ऑनलाईन कन्टेट पाहिला तर दिवस कसा जाईल हे कळणार नाही.
३. छंद जोपासणं
कामाच्या रगाड्यात आणि धावत्या जीवनमानामुळे आपण आपले छंद विसरून जातो, परंतु आता जर वेळ असेल तर आपले छंद जोपासायला हरकत नाही.
म्हणजे पेंटिंग करणं, सिरॅमिकच्या वस्तू बनवणं. आपण फिरायला जातो तेव्हा समुद्रावरून शंख-शिंपले आणतो, पण त्याचं काही केलेलं नसतं तर त्या पासून शोपीस बनवता येईल.
विज्ञानाची आवड असल्यास मुलांना घेऊन अरविंद गुप्ता यांच्या खेळण्यातून विज्ञान या पुस्तकातून काही वैज्ञानिक उपकरण तयार करता येतील. मुलांना देखील हे नवीन वाटेल.
याशिवाय तुम्हाला आवडणारा कोणताही छंद जोपासण्यासाठी आजच्या दिवसाच्या शांततेचा नक्की वापर करा.
४. मित्रांना फोन करणं
रोज आपण आपल्या कामाच्या गडबडीत फक्त ऑफिसचे फोन्स अटेंड करत असतो.
लहानपणापासूनची मित्रमंडळी कुठे असतात हे माहीत असतं पण त्यांच्याशी तितका संपर्क नसतो,
मग अशा गप्पांसाठी आजचा दिवसातील काही काळ वापरा ना!
या गप्पांतून आपण बालपणीच्या आठवणींना उजाळा देऊ शकतो. आपल्या नातेवाईकांना देखील आपण फोन करून बोलू शकतो.
यामुळे आपला मूड ही फ्रेश होतो.
५. निरनिराळे पदार्थ बनवणं
आजकाल सगळ्या प्रकारचे कुझिन्स आपल्याला हॉटेलमध्ये खायला मिळतात. ते कसं बनवलं जातं याच्याविषयी आपल्याला कुतूहल असतंच.
आता वेळ आहे, तर अशा पदार्थांसाठी लागणारे सामान आणून युट्युब वरून वर रेसिपी पाहून किंवा फूड चॅनल्स वरील रेसिपी पाहून आपण असे पदार्थ बनवू शकतो.
यामध्ये मुलांनाही सहभागी करून घेता येते. त्यानिमित्ताने तुमची घरात मदत होईल.
आपण केलेल्या पदार्थांचा सगळ्यांनी एकत्र बसून आस्वाद घेणं यासारखं दुसरं सुख नाही.
५. फोटोग्राफी करणं
आज-काल कशाप्रकारे फोटोग्राफी करावी याची ऑनलाईन माहिती भरपूर मिळते.
आणि आपल्याकडे कॅमेरा असेल तर त्यातल्या सगळ्या बारीक-सारीक गोष्टी आपल्याला ऑनलाईन माहिती घेऊन शिकता येतील आणि त्याचे प्रयोग आपल्या घरातल्या वस्तूंवर आणि आपल्या घरातल्या मॉडेल्स वर करता येईल.
यात तुमचा आणि मुलांचा ही वेळ हसत-खेळत निघून जाईल. मुलांना वेगवेगळे कपडे घालून त्यांना मॉडेलिंग करायला सांगता येईल.
विशेषतः यानिमित्ताने आजच्या दिवसाच्या सुंदर आठवणी फॅमिली फोटोच्या रुपात मिळतील.
६. बागकाम करणं
प्रत्येकाच्या घरात ती छोटीशी का होईना बाल्कनी असते आणि त्यात प्रत्येकजण हौसेने किमान चार-पाच फुलांच्या कुंड्या ठेवतो.
बंगला असेल तर बंगल्याभोवती झाडे लावता येतात. पण आता वेळ आहे तर आपण आपल्या घरातील कुंड्यांची अरेंजमेंट करू शकतो.
माती बदलायची असेल तर आता त्या गोष्टी करायला वेळ मिळतो.
नवीन रोपं, नवीन झाडं लावता येतात. झाडांना पाणी घालणे त्यांची देखभाल करणे अशा गोष्टी करता येतात.
७. गाणी म्हणा – डान्स करा
हा उपाय वाचून हसु आलं?
पण हा सगळ्यात उपयुक्त आणि मजेशीर उपाय आहे हे नक्की, त्यामुळे एकदा ट्राय करु बघाच.
गाणी गायची आपली आवड देखील रोजच्या धावपळीत मागेच पडलेली असते. पण आता वेळ आहे तर घरामध्ये ठरवून थोडावेळ गाणी म्हणता येतील, रियाज होईल.
सध्या कराओके सिस्टीम मुळे गाणी म्हणणे सोपे झाले आहे. त्यावर गाणी म्हणण्याचा सराव करता येईल. किंवा एखाद्याला कुठल्याही प्रकारचे वाद्य वाजवायची आवडते त्यासाठीही वेळ देता येईल.
काहीजणांना डान्स करायची देखील आवड असते पण रोजच्या गडबडीत होतच नाही पण आता वेळ असेल तर डान्सही करा त्यामुळे तुमच्या शरीराला व्यायामही होईल.
८. योगा आणि प्राणायाम करा
रोजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामासाठी वेळ नसतो आता वेळ आहे तर व्यायाम ,योगासने आणि प्राणायाम करा ज्यामुळे शरीरात चैतन्य निर्माण होईल.
९. बैठे खेळ खेळा
घरात बसून खेळता येणारे कॅरम, बुद्धिबळ, पत्ते असे खेळ घरातल्या व्यक्तींबरोबर खेळा त्यामध्ये देखील चांगला वेळ जाईल.
मोबाईलमध्ये डोकं घालून बसण्यापेक्षा कुटुंबातील सगळ्या सदस्यांना एकत्र जमविण्याचा हा पर्याय सगळ्यांना खूप आनंद देईल.
१०. पाळीव प्राण्यांबरोबर वेळ घालवा
तुमच्या घरी जर पाळीव प्राणी असतील तर त्यांच्याबरोबर वेळ घालवा, त्यांना नवीन गोष्टी शिकवा.
मात्र करोनाचा धोका लक्षात घेता, कोणत्याही भटक्या प्राण्यांच्या संपर्कात येणं टाळा. त्यासह तुमच्या घरातील पाळीव प्राणीही घराबाहेर जाणार नाही याची दक्षता घ्या,
प्राण्याच्या स्वच्छतेची काळजी घ्या, आणि त्याला हात लावल्यानंतर तातडीने हात धुवा.
११. नवीन गोष्टी शिका
सध्या किमान आठ ते दहा दिवस तरी आपल्याकडे वेळ आहे, त्याचा सदुपयोग करण्यासाठी एखादी नवीन गोष्ट शिकलीच पाहिजे.
एखाद्या नवीन भाषेची तोंडओळख तरी करून घ्या. जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल तर लिहायला सुरुवात करा.
१२. घराची स्वच्छता करा
आपल्याकडे वेळ आहे तर घरातील स्वच्छता करा. आपलं कपाट त्यातील कपडे, वस्तू या सगळ्या गोष्टी नीट आवरून ठेवा. आपल्या कपड्यांना इस्त्री करा.
घरातल्या मंडळींना मदत केलीत, तर तुमचं नक्कीच कौतुक होईल.
त्याशिवाय सध्या काहीकाही घरांमध्ये फक्त आजी आजोबा असतील तर त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करता येईल का पाहता येईल.
अशाप्रकारे समाजकार्य देखील करता येईल आणि आपल्या देशासाठी काहीतरी केलं याचं समाधान ही मिळेल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.