डिश तीच, पण स्वाद नवीन : ‘दुनियादारी’ येतोय गुजरातीमध्ये!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
संजय जाधव दिग्दर्शित दुनियादारी हा चित्रपट म्हणजे मराठी रसिकांना आणि मराठी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक गोड सोनेरी स्वप्नचं म्हणावं लागेल. या चित्रपटाने अख्या महाराष्ट्रावर प्रेमाचे गारुड केले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण या चित्रपटाच्या प्रेमात पडला. चित्रपटातील प्रत्येक गाण्याने लोकांच्या ओठांचा, स्पीकरचा, मोबाईलचा ताबा घेतला होता. जिकडे पहावं तिकडे नुसता दुनियादारीचा फिव्हर चढला होता. आज ४ वर्षानंतरही या चित्रपटाची नशा बिलकुलही कमी झालेली नाही. जगभरातील मराठी रसिकांना प्रेमाची नवी भाषा शिकवणारा हा चित्रपट आता गुजराती रसिकांना प्रेमाचे धडे द्यायला सज्ज झाला आहे. कारण आता दुनियादारी हा चित्रपट गुजरातीमध्ये प्रदर्शित होतोय.
दुनियादारी चित्रपटाला संपूर्ण जगभरातून मराठी रसिकांचा लाभलेला उदंड प्रतिसाद पाहता इतर भाषेमधील चित्रपट निर्मात्यांनी देखील या चित्रपटाचा रिमेक बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती.
सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी कादंबरीवर बेतलेलं उत्कृष्ट कथानक, खुसमुशीत आणि गोड संवाद आणि प्रत्येक पात्राला लाभलेली वेगळी छटा या गोष्टींनी चित्रपटाच्या यशामध्ये मोलाची भूमिका बजावली होती आणि याचाच आधार घेत ‘कमल आरोही पिक्चर्स’ या बॅनरने गुजरातीमध्ये ‘दुनियादारी’ चित्रपटची निर्मिती केली आहे. हा चित्रपट म्हणजे मूळ मराठी दुनियादारीचा ऑफिशियल रिमेक आहे.
हा चित्रपट अगदी मराठी दुनियादारी सारखाच आहे. श्रेयस, शिरीन आणि मिनूच्या प्रेमाचा लव ट्रँगल, डी.एस.पी. चा रावडी अंदाज, साईनाथची व्हिलनगिरी, श्री, बंटी आणि अस्क्याची अनोखी यारी या साऱ्या गोष्टींची चव गुजरातीमध्ये नव्याने चाखता येणार आहे.
नुकतंच या चित्रपटाचं ऑफिशियल ट्रेलर रिलीज झालंय. ट्रेलर पाहताना केवळ भाषा वेगळी वाटते बाकी सर्वच प्रसंग मूळ मराठी दुनियादाराची आठवण करून देतात. गुजरातीमधील दुनियादारीत अभिनय करणारे काही कलाकार नवीन आहेत तर काही कलाकार अनुभवी आहेत, पण सर्वानीच आपल्या पात्राला योग्य न्याय देत दुनियादारीचा फ्लेवर कायम ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
गुजराती दुनियादारी चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर येथे पाहू शकता
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi