डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौऱ्यासाठी नेमका फेब्रुवारी महिनाच का निवडला?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
गेल्या काही दिवसांत भारत आणि अमेरिकेतल्या बहुतेक वर्तमानपत्रांत चर्चा होती ती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीची! भेटीची उत्सुकता अमेरिकेत सुद्धा तेवढीच होती. दौऱ्याची पूर्वतयारी याविषयी न्यूयॉर्क टाइम्स मधल्या एका बातमीचा परिच्छेद होता,
“काळे चष्मे घातलेल्या सुरक्षारक्षकांकडून ताज ची बारकाईने पाहणी करण्यात आली आहे. सभा, बैठकांसाठी जागा ठरवण्यात दोन्ही देशांचे अधिकारी व्यस्त आहेत. ही तयारी त्या बहुचर्चित व्यापारी करारासंदर्भांत सुद्धा आहे ज्याची दोन्ही बाजूंकडे प्रतीक्षा आहे!”
नुकतेच प्रेसिडेंट ट्रम्प आपला पहिला भारत दौरा करून गेले. अहमदाबाद मध्ये आगमन मग मोटेरा स्टेडियम उद्घाटन, ताज महाल भेट आणि मग दिल्ली मधील बैठका.
असा दोन दिवसाच्या भेटीचा व्यस्त कार्यक्रम होता.
गेल्या दोन दशकात अमेरिकेन राष्ट्राध्यक्षाने भारत दौरा करण्याची ही पाचवी वेळ! ह्या पूर्वी बराक ओबामा आपल्या ८ वर्षांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत दोन वेळा – २०१० आणि २०१५ मधे तर त्यांच्या अगोदर प्रेसिडेंट जॉर्ज बुश २००६ ला भारतात आले होते.
त्यांच्या ही अगोदर बिल क्लिंटन,अटलजी भारताचे पंतप्रधान असताना २००० ला भारतात आले होते. त्यावेळी क्लिंटन ह्यांच्या कन्येचे – चेलसिया क्लिंटन चे राजस्थानमध्ये होळी खेळतांनाचे फोटो बरेच गाजले होते.
अमेरिकन अध्यक्षाची भारत भेट हा नेहमीच चर्चेचा अन उत्सुकतेचा विषय असतोच. मग ती उत्सुकता व्यापार, संरक्षण किंवा आंतरराष्ट्रीय संबंध ह्या सारख्या कुठल्याही संदर्भात असते!
नुकत्याच झालेल्या ट्रम्प यांच्या भेटीला दोन्ही देशात राजकीय कंगोरे सुद्धा आहेत.
ट्रम्प ह्यांच्या दृष्टीने असलेले राजकीय महत्त्व
‘Once Upon a Time In Hollywood’ साठी ब्रॅड पीट ला ऑस्कर मिळालं तेव्हा आभाराच्या भाषणात पीट ने जॉन बोल्टन यांचा उल्लेख केला. बोल्टन हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते.
पीट जे म्हणाला तो ‘Trump Impeachment’ मोहिमेचा एक भाग होता. अर्थात डोनाल्ड ट्रम्प महाभियोगापासून अमेरिकन संसदेच्या सर्वोच्च असलेल्या सिनेट मधे सहीसलामत सुटले. ट्रम्प यांच्या रिपब्लीकन पक्षाला सिनेट मधे बहुमत आहे.
त्यामुळेच ह्या चौकशीवर पक्षपातीपणाचा आरोप होतो आहे. ह्याच संदर्भांत ब्रॅड ने बोल्टन यांना टोमणा मारला. बोल्टन महाभियोगासंबंधी साक्ष देऊ इच्छित होते पण सिनेट ने त्यांना बोलावलचं नाही!
अमेरिकेन मीडिया विश्वातल्या बहुतांश गटांच मत आहे की, ह्या ‘Trump Impeachment’ संबंधी चाललेल्या चर्चेपासून लक्ष विचलित करण्यासाठीच प्रेसिडेंट ट्रम्प यांनी भारत भेटीचं ‘टायमिंग’ साधलंय.
मोदींसाठी असलेलं नमस्ते ट्रम्पचं महत्त्व
दोन मोठ्या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदी सरकारची प्रतिमा नकारात्मक बनली होती.
एक म्हणजे ३७० कलम हटवल्यानंतर कश्मीर मधली अघोषित संचारबंदी आणि दुसरं म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा ज्या विरोधात देशात अजूनही बऱ्याच ठिकाणी प्रदर्शन सुरू आहे.
ह्याच पार्श्वभूमीवर होणारी ट्रम्प भेट ही आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावर सुद्धा भारत सरकारची प्रतिमा उजळवण्यासाठी या दौऱ्याचा वापर करून घेता येईल.
अमेरिकेतील गुजराती ‘छाप’
अमेरिकन कम्युनिटी सर्वे २०१७ नुसार, अमेरिकेत भारतीय वंशाचे सुमारे ४० लाख अमेरिकन नागरिक आहेत. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या १.३%!आणि त्यातील जवळपास २०% गुजराती आहेत.
गुजराती लोकं मुख्यत्वे न्यूयॉर्क, न्यूजर्सी, शिकागो, सॅनफ्रान्सिस्को, लॉसइंजिलीस, फिलाडेल्फिया भागात स्थिरावलेले आहेत. अमेरिकेतले जवळपास ४०% मोटेल्स गुजराती लोकं चालवतात.
मूळचे गुजरातचे असलेले पंतप्रधान मोदी अमेरिकेतील गुजराती समुदायात बरेच लोकप्रिय आहेत.
या वर्षाखेरीस अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका होऊ घातल्यात आणि ट्रम्पना अजून एक कार्यकाळ पूर्ण करण्याची महत्वाकांक्षा आहे.
त्यामुळे गुजराती व भारतीय- अमेरिकन मतदारांना सुखावण्याची संधी सुद्धा ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याने त्यांना आयतीच मिळाली.
जेव्हा मोदी २०१९ सप्टेंबरला युनायटेड नेशन्स च्या सत्रात सहभागी होण्यास अमेरिकेला गेले होते. यादरम्यान हॉस्टन च्या NRG स्टेडियम वर एक भव्य कार्यक्रम होता- Howdy, Modi.
ह्या कार्यक्रमात मोदी आणि ट्रम्प हातात हात घालून स्टेज वर हजर होते. दोघांनी जवळपास ५०००० भारतीय- अमेरिकन लोकांना संबोधित केलं होतं.
ह्या कार्यक्रमानंतरच ‘चाळीस लाख भारतीय वंशांच्या अमेरिकन मतांसाठी खेळलेली चाल’ अशी चर्चा सुरू झाली.
ट्रम्प ह्यांची इमिग्रेशनच्या कडक नियमावली मुळे तिथले भारतीय – अमेरिकन मतदार रिपब्लिकन पक्षापासून दुरावले आहेत. डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या इमिग्रेशन धोरणांचा फटका सिलिकॉन व्हॅली सारख्या बऱ्याच व्ययसायिक केंद्राना बसला.
कारण इथल्या कामकाजात H1B वर भारतातून येणाऱ्या कुशल तंत्रज्ञ लोकांचा फार मोठा वाटा आहे. २०१६ च्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय समुदायातील एक मोठा हिस्सा, डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांच्या बाजूने झुकला होता.
‘नमस्ते ट्रम्प’ हा त्याच भारतीय समुदायाला रिपब्लिक पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्न आहे.
चीनचं वाढतं महत्त्व
नोव्हेंबर २०१९ मध्ये पहिल्यांदाच दोन्ही राष्ट्रांनी भूमी,आकाश, समुद्रात सैनिकी अभ्यास केला. ९ दिवस ५०० अमेरिकन मरिन्स, नौसैनिक जवळपास १२०० भारतीय सैनिक, नौसैनिक, आणि वायू दलाच्या अधिकाऱ्यांसोबत एकत्र सराव-अभ्यास केला गेला.
२०१८ मध्ये दोन्ही राष्ट्रांनी एक संरक्षण विषयक करार केला होता. त्याअंतर्गत अत्याधुनिक हत्यारं आणि दूरसंचार माध्यमांची देवाण- घेवाण करण्यावर भर देण्यात आला होता.
साम्राज्यवादी चीन हाच ह्या करारामागचं मुख्य कारण होतं.
ह्या मागचं महत्वाचं कारण म्हणजे आशिया-प्रशांत भागात चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला भासलेली क्षेत्रीय मित्राची निकड!
भौगोलिक कारणांनी हिंदी महासागरावर भारताचा वरचष्मा आहे. मात्र भारताला घेरण्यासाठी चीनने बरेच outpost उभारले आहेत जस की दिबुती, श्रीलंकेजवळ हंबनटोटा बंदर.
चीनचे हे डावपेच ‘ Strings of Pearl’ या नावाने प्रसिद्ध आहेत.
असं म्हटलं जातं की चीन, हिंदी महासागरात भारताला घेरण्यासाठी आणि आपली उपस्थिती वाढवण्यासाठी या भागातील वेगवेगळ्या देशांत आपले नौसैनिक आणि नागरी अड्डे बनवतो आहे.
बांगलादेशातील चटगाव बंदर ह्याच डावपेचानुसार चीनने विकसित केलंय. चीनच्या ह्या वाढत्या प्रभावावर अंकुश ठेवण्याची अमेरिकेची सुद्धा इच्छा आहेच आणि हाच धागा अमेरिका- भारताला जोडतो.
ह्या अनुषंगाने ट्रम्पच्या भारत भेटीत नक्कीच महत्वाची खलबतं झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रक्षा सौदा
भारताचा चीन नंतर सर्वात जास्त व्यापार हा अमेरिकेसोबत चालतो. दोन्ही देशांदरम्यान व्यापारीक करार होण्याची अपेक्षा होती पण त्या साठी दोन्ही राष्ट्रांत सहमती झालेली नव्हती.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सुद्धा ह्या बाबतीत खेद प्रकट केलाय. या व्यापारीक करारासोबत अजून एक कराराची चर्चा होतीय ती म्हणजे हत्यारं यांची खरेदी.
स्टॉकहोम इंटरनैशनल पीस रिसर्च संस्थेच्या अनुसार, २०१३ ते २०१७ च्या दरम्यान भारताच्या अमेरिकेकडून शस्त्रास्त्र खरेदीत ५५७% वाढ नोंदवण्यात आली आहे.
२०१९ च्या एका डीलनुसार दोन्ही राष्ट्रात १ अब्ज किमतीच्या शस्त्रास्त्रांचा व्यवहार झालाय. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार भारताने २००७ पासून सुमारे १७०० करोड रुपयांची शस्त्रास्त्र खरेदी अमेरिकेकडून केलेली आहे.
ट्रम्प यांच्या भेटी दरम्यान जरी कुठलेही नवीन करार झाले नसले तरी अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकी नंतर बरेच करार होऊ शकतात.
ट्रम्प यांच्या भाषणातून पाकिस्तानला, दहशतवादासाठी त्यांची भूमी वापरू न देण्याची तंबी देऊन भारताने अगदी पाहुण्याच्या काठीने साप मारला जरी नसला तरी) त्याला घाबरवून सोडण्यात नक्कीच यश मिळवले आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.