मराठीची ही वैशिष्ट्ये वाचून तुम्हीही म्हणाल, “गर्व आहे मला, मी मराठी असल्याचा”
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आज २७ फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन. ज्ञानपीठ विजेते कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. हाच दिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
आज दिवसभर जर तुम्ही सगळ्यांचे व्हॉटसअप, फेसबुक स्टेटस पाहिले तर असं वाटेल की, लोकांना मराठीची किती ओढ आहे, कित्ती ते कौतुक,अभिमान आहे! पण उद्या परत पाहिलं तर, ‘ये रे माझ्या मागल्या’.
आजकाल ज्याला त्याला इंग्रजीतून संभाषण करण्यात आपण खूप वेगळं काहीतरी करतो असं वाटतं किंवा ही आजच्या पिढीची सवय आहे. ते चूक की बरोबर हा आणखीन वेगळा विषय आहे.
पण मराठी ही भाषा आपल्या अभिमानाचा विषय का असावी? हे आपण पाहू…
मराठी ही लोकसंख्येनुसार बोलली जाणारी जगातली पंधरावी भाषा आहे तर भारतातील चौथी भाषा आहे. ती किती पुरातन आहे यावरती बरेच मतभेद आहेत.
प्राध्यापक हरी नरके यांनी एक सिद्धांत मांडला आहे की, मराठी ही भाषा इसवी सन पूर्व काळापासून महाराष्ट्रात राहणारे जे लोक होते त्यांची बोलीभाषा मराठी होती.
या भाषेतूनच शौरसेनी भाषा निघाली आणि पुढे त्यातूनच मागधी आणि पैशाची या भाषा निघाल्या. त्या काळातल्या एका लोकगीतामध्ये, गोदावरी नदीत नाहणाऱ्या आणि अंगाला हळद लावणाऱ्या सुंदर स्त्रीचं वर्णन आहे.
आणि हे गीत ज्याने लिहिले आहे तो त्या भाषेला ‘महाराष्ट्र देसी भाषा’ असे म्हणतो.
ज्येष्ठ साहित्यिका दुर्गा भागवत म्हणतात की, मराठी ही संस्कृत पेक्षा ही जिवंत आणि जुनी भाषा आहे.
त्याकाळी संस्कृत ही सर्वसामान्यांसाठी अवघड बोली भाषा होती म्हणून मग संस्कृतला पर्याय म्हणून प्राकृत ही भाषा अस्तित्वात आली.
याची खरंतर एक खूप गंमतशीर गोष्ट आहे.दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन काळात, एका सातवाहन राजाचं लग्न झालं, त्याच्या बायकोला संस्कृत यायचं आणि ह्याला फक्त प्राकृत.
तिने एकदा त्याची संस्कृत मधून चेष्टा केली आणि ही गोष्ट काही त्या राजाला आवडली नाही, म्हणून मग त्याने रागावून संस्कृत भाषेवर बंदी आणली. आणि त्याने सगळे ग्रंथ प्राकृत भाषेत लिहण्याची आज्ञा दिली.
ही गोष्ट कितपत खरी आहे हे माहीत नाही मात्र त्यानंतरच प्राकृत भाषा खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ लागली. मराठी भाषेचा उगम हा बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथून झाला असा एक प्रवाद आहे आणि तो बराच मान्यताप्राप्त आहे.
कारण तिकडेच आद्यकवी मुकुंदराज यांनी ‘विवेकसिंधु’ या ग्रंथाची रचना केली. सुरुवातीला म्हणजे २२१९ वर्षांपूर्वी मराठी ब्राम्ही लिपीत लिहिली जायची याचे पुरावे मिळाले आहेत.
नंतर ती मागधी, अर्धमागधी अशी होत पुढे देवनागरी मध्ये लिहिली जायला लागली. देवनागरी मराठीत लिहिलेला पहिला शिलालेख कर्नाटक मधील श्रवणबेळगोळ येथे सापडतो.
तिथल्या गोमटेश्वराच्या (बाहुबली) मूर्तीखाली, “चामुंडराय करविले, गंगराय सुत्ताले करविले” असा उल्लेख आहे. इसवी सन ९०५ मध्ये हे लिहिलं आहे असं मानलं जातं.
मराठीतले पहिले चरित्र म्हणजे लीळाचरित्र चे चक्रधर स्वामी यांच्या जीवनावर आधारित आहे. जे म्हाइंभटाने लिहिलं.
ज्ञानेश्वरांनी मराठीचं वर्णन करताना असं म्हटलं, ‘अमृतातेही पैजा जिंके’. तर संत एकनाथांनी, “संस्कृत जर देवाने निर्माण केली तर प्राकृत या चोरांनी निर्माण केली” असा प्रश्न केला.
या भाषेला पुढे नेले ते महाराष्ट्रातल्या भक्ती संप्रदायाने, वारकरी संप्रदायाने. मराठी भाषा ही सामाजिक समतेचा आधार बनली. मराठीची ही व्याप्ती पाहून आदिलशहा आणि निजामशहा यांनीदेखील त्यांचे राज्यव्यवहार मराठी मधून चालू केले.
पुढे शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला अजून प्रतिष्ठा मिळवून दिली.
भाषा म्हणजे काय?
विचार व्यक्त करण्याचे साधन. जेव्हा भाषा लिहून आपण आपले विचार व्यक्त करतो तर त्यांना लिपी किंवा अक्षर असं म्हटलं जातं. लिपी म्हणजे लिंपण तर अक्षर म्हणजे नाश न पावणारे.
आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या ध्वनींना मराठीमध्ये वर्ण असे म्हणतात. मराठीत एकूण ४८ वर्ण आहेत किंवा मूळाक्षर आहेत त्यात ‘अ’ पासून ‘औ’ पर्यंत बारा स्वर आहेत.
‘क’ पासून जी अक्षरे आहेत जी त्यांना व्यंजन असं म्हटलं जातं. त्यातही तालव्य, अाेष्ट्य असे उच्चार आहेत. मराठी भाषेत अनेक म्हणी, वाक्प्रचार प्रचलित आहेत.
कोकणी, अहिराणी, कोल्हापुरी, खानदेशी,चंदगडी ,झाडीबोली,नागपुरी, बेळगावी, मालवणी वऱ्हाडी, मराठवाडी, सोलापुरी अशा विविध भाषा मराठीच्या अंतर्गत बोलल्या जातात.
या प्रत्येक बोलीला स्वतःचे एक वैशिष्ट्य आहे. अगदी भारताच्या तमिळनाडूमध्येही ही भाषा बोलली जाते जिला दक्षिणी मराठी असं म्हटलं जातं.
शहरी मराठी आणि ग्रामीण मराठी यांच्या बोलीभाषेत एक गंमत असते. म्हणजे शहरी मराठीत जर तुम्ही एखाद्याला म्हणालात की, ‘मी संध्याकाळी येतो’.
हेच वाक्य एखादा ग्रामीण भागातील माणूस असं म्हणेल,’मी सांच्याला यिन’.
मराठी भाषा ही प्रत्येक कालखंडात बदलत गेली. ज्या सत्ता महाराष्ट्रामध्ये प्रबळ होत्या त्यांचा प्रभाव मराठीवर पडत गेला.
म्हणजे ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी पाहिली तर ती समजायला अवघड जाते पण त्यानंतर तुकारामांनी लिहिलेले अभंग पाहिले तर ते समजायला थोडे सोपे जातात.
शिवछत्रपतींच्या काळातल्या मराठी भाषेवर फारसी भाषेचा प्रभाव दिसतो तर पेशव्यांच्या काळातल्या मराठी भाषेवर संस्कृत भाषेचा प्रभाव दिसतो.
इंग्रजांनंतर आता मराठी भाषेवर इंग्रजीचा ही प्रभाव दिसतोय. बरेच इंग्रजी शब्द आज कालच्या मराठी बोलीभाषेत वापरले जातात ते इंग्रजी आहेत.
गेल्या दोन हजार वर्षांपासून मराठी भाषा ही वेगवेगळ्या बोली स्वतःवर लेवून अजूनही ताठ मानेनेच उभी आहे. भाषाशुद्धी करण्याचा प्रयत्न बऱ्याचदा झाला.
सावरकरांनी मराठी भाषेला अनेक प्रतिशब्द दिले. रेडिओला आकाशवाणी हा शब्द ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचीच देणगी.
मराठी साहित्य जर पाहिलं तर त्यात कादंबरी, कथा ,आत्मचरित्र, शेतकऱ्यांच्या कथा याबरोबरच कवितेतही, लावणी, प्रेमगीत, भावगीत, नाट्यगीत, सुगम संगीत या विविध पद्यरचना आढळतात.
वि.वा. शिरवाडकर, वि. स.खांडेकर, विंदा करंदीकर या लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. बहिणाबाईंनी त्यांच्या अहिराणी भाषेत खूप छान कविता मराठी भाषेला देणं म्हणून दिल्या.
आता मात्र मराठी भाषा दयनीय अवस्थेत आहे की, काय अशी परिस्थिती सध्याच्या महाराष्ट्रात आहे.
मराठी शाळा बंद पडत आहेत. आजकालच्या मुलांना मराठी लिहिणे तर सोडाच पण वाचणं आणि बोलणं ही अवघड जातं. अगदी कविवर्य कुसुमाग्रजांनीही हे म्हटलंय की,
“परभाषेत ही व्हा पारंगत।
ज्ञानसाधना करा तरी।।
मायमराठी मरते इकडे।
परकीचे पद चेपू नका।।”
आपण जर महाराष्ट्रात राहत असू तर आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान हा असलाचं पाहिजे. जगातल्या प्रमुख भाषांपैकी आपली एक भाषा आहे त्यामुळे आपल्या भाषेबद्दल लाज बाळगण्याचे काहीच कारण नाही.
फक्त आपण मराठीत सगळे व्यवहार करू शकतो हा आत्मविश्वास असला पाहिजे.
मराठी की इंग्रजी हा वाद न घालता संयमाने विचार करून मराठी भाषेला प्रोत्साहन कसे मिळेल हे पाहिले पाहिजे. दर्जेदार मराठी साहित्य मुलांना वाचायला, ऐकायला शिकवलं पाहिजे.
मराठी नाटक, सिनेमे त्याचबरोबर मराठीतून असलेल्या वक्तृत्व स्पर्धा किंवा भाषण ऐकण्यासाठी मुलांनाच अशा कार्यक्रमांना नेले पाहिजे.
मराठी टिकवायची असेल तर मराठीसाठी नवीन नवीन दालनं उघडी ठेवायला हवी.
इतर भाषेतील काही शब्द जरी मराठीत आले तरी त्याबद्दल फार चर्चा न उठवता ते घेऊन मराठी वृद्धिंगत कशी होईल याचा विचार व्हायला हवा.
विज्ञानातील संज्ञा, संकल्पना यांना मराठी मध्ये प्रतिशब्द तयार झाले पाहिजेत आणि ते वापरात आले पाहिजेत. इंग्रजी बरोबरच इतर भाषातील साहित्यही मराठीत आणलं तर त्याचाही फायदा होईल.
आता मराठी साहित्य संमेलनं ही शहरी भाग सोडून ग्रामीण भागात व्हायला लागली आहेत आणि तिथे जर मराठी पुस्तक विक्रीचा आकडा पाहिला तर लोकांना ज्ञानाची, वाचनाची किती आवड आहे हे दिसून येतं.
सोशल मीडियामुळे मराठीत जे काही लिहिलं जातं ते जगभर पोहोचवलं जातं त्यामुळे नवनवीन लेखक तयार होत आहेत. अगदी खेड्यापाड्यातूनही नवीन साहित्य निर्मिती करणारी नावे समोर येत आहेत.
ही खरोखरच चांगली गोष्ट आहे.
मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठीसाठी उगीचच प्रेमाचे उमाळे आणून गौरवाच्या गोष्टी न करता, भाषेच्या अस्मितेसाठी होणाऱ्या राजकारणाला न भूलता,
मराठी अधिक वृद्धिंगत कशी होईल याचा विचार होणं जरुरीचं आहे. आपण सगळ्यांनी अभिमान बाळगून फक्त एकच म्हटलं पाहिजे, “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी”.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.