' १० वर्ष मुंबई पोलिसांसाठी मोस्ट वॉन्टेड गँगस्टर ते मुंबई मॅरथॉन रनर… – InMarathi

१० वर्ष मुंबई पोलिसांसाठी मोस्ट वॉन्टेड गँगस्टर ते मुंबई मॅरथॉन रनर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेली ४ वर्ष टाटा मुंबई मॅरेथॉन एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे. राहुल जाधव या व्यक्तीमुळे ही मॅरेथॉन चर्चेत आली आहे. यावर्षीची मॅराथॉन त्याने ४ तास १७ मिनिटे या वेळात पूर्ण केली.

आधीचा त्याचाच रेकॉर्ड ४ तास १ मिनिट ३० सेकंदाचा होता. कोण आहे ही राहुल जाधव ही व्यक्ती?

 

rahul jadhav inmarathi 6

 

 

राहुल जाधव म्हणजे गुन्हेगारी आणि व्यसनांच्या विळख्यात अडकलेला एक तरुण. ज्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा होता, त्याच्याच धंद्यातील गुन्हेगारही त्याच्यामागे होते.

अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत, व्यसनांना झुगारून देत मॅरेथॉन धावणारा माणूस, असं त्याचं वर्णन करता येईल.

राहुल जाधव…. त्याच्याच शब्दात सांगायचं झालं तर, गेली १९ वर्ष तो धावत आहे. त्यापैकी पहिली दहा वर्ष हे पोलिसांपासून वाचण्यासाठी तो धावत होता. उरलेली नऊ वर्ष हे जीवनाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी धावत आहे.

२०१६पासून त्याने या मॅरेथॉनमध्ये धावायला सुरुवात केली. मुंबई आणि ठाणे या शहरांमध्ये पोलिसांच्या हिटलिस्टवर याच नाव होतं.

केवळ आई वडिलांची पुण्याई आणि माझं नशीब म्हणून मी पोलिसांच्या गोळीपासून आणि गॅंगस्टरच्या हल्ल्यापासून वाचलो” असं त्याचं म्हणणं आहे.

 

rahul jadhav inmarathi 5
hindustan times

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्याचं लहानपण ठाण्यामध्ये गेलं. त्याचे वडील हे एका कंपनीत काम करायचे तर आई गृहिणी होती. भावंडांपैकी हा सगळ्यात लहान म्हणूनच कदाचित हट्टी आणि बंडखोर होता.

शाळेतही विशेष प्रगती नव्हती. बॅकबेंचर असल्यामुळे तिकडेही अभ्यासात लक्ष नसल्यामुळे अभ्यासात मागेच होता. तरीही कॉमर्समध्ये डिग्री मिळवली. पण त्या ५०%- ६०% डिग्रीमुळे चांगली नोकरी मिळणं अवघडच होतं.

त्यात घरची परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. वडिलांनी थोडेफार साठवलेले पैसेही बहिणीच्या लग्नात खर्च झाले. काय करिअर करावं हे त्याला कळत नव्हतं

आणि त्याच वेळेस आजुबाजूला पाहताना त्याच्या लक्षात आलं की, त्याचे काही मित्र हे लोकांना घाबरवून, धमकावून जबरदस्तीने त्यांच्याकडून पैसे घेत आहेत. सुपारी घेऊन अशी कामे करत आहेत.

पैसे मिळवण्याचा हा सोपा मार्ग राहुलला एकदम आकर्षक वाटला. झटपट पैसे मिळवण्याच्या आणि श्रीमंत व्हायच्या मार्गात वाईट गोष्टीच्या जाळ्यात तो अडकतोय हेही त्याच्या लक्षात आलं नाही.

 

gangster inmarathi
pictures and wallpapers

 

आणि मग डोंबिवलीतील अंडरवर्ल्डच्या जगतात त्याचा प्रवेश झाला. थोड्याच दिवसात तिथल्या बॉससाठी काम करणारा हा विश्वासू म्हणून ओळखला जाऊ लागला. खंडणी गोळा करणे, धमक्या देणे अशी कामे करू लागला.

आता त्याचाही कमरेला ९ एम एम ची पिस्तुल आली. तसंच पोलिसांचा ससेमिरा ही मागे लागला. पोलिसांच्या हिटलिस्टवर याचं नाव गेलं. गुन्हेगारी जगतात खून, मारामाऱ्या, धमकी देणं अशी कामे करताना पोलीस मागे लागले की मग पळायचं इतकं त्याला माहीत झालं.

इतकं असुरक्षित जीवन जगताना झोप कमी झाली. कारण पोलिसांची भीती कायमच मनात घर करून असल्यामुळे व्यसन करणं सुरू झालं. मग दारूचं व्यसन लागलं, हळूहळू दारू पण चढत नाहीये म्हटल्यावर मग चरस.

त्याचाही असर होत नाहीये म्हटल्यावर मग गोळ्या या व्यसनांमध्ये तो अडकत गेला.

 

alcohol inmarathi
asiaone

 

एकदा गिरगावात अशाच गुन्ह्यातून पोलिसांचा पाठलाग चुकवताना कुठे लपावं, ही जागा शोधताना गिरगाव चौपाटीवरील एका बेंचवर तो झोपून गेला. पहाटे लोकांचे खूप आवाज यायला लागले त्याला जाग आली.

त्यांने पाहिलं तर खूप सारे लोक धावत होते. ते मुंबई मॅरेथॉन साठी धावत होते. इतक्या लोकांमध्ये धावलो तर पोलिसांच्या हाती लागणार नाही म्हणून मग त्यानेही धावायला सुरुवात केली.

एकदम तो ग्रांटरोड कडून बोरिवली च्या दिशेने तो धावत गेला. सगळीकडे पोलीस होते मात्र धावणाऱ्या गर्दीचा भाग असलेल्या राहुलला त्यांनी ओळखलं नाही आणि तो तिथून निसटला.

नंतर काही वर्षांनी त्याला कळलं, की तो तेव्हा मुंबई मॅरेथॉन साठी धावला होता.

 

marathon inmarathi

 

२००७ पर्यंत राहुल जवळपास डझनभर गुन्ह्यांमध्ये अडकला होता. त्यापैकी एक तर मोका च्या अंतर्गत येणारा गंभीर गुन्हा होता. परंतु लवकरच पोलिसांनी त्याला अटक केली.

प्रसिद्ध माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांनी त्याला पकडलं. “त्यांच्या बुलेटपासून वाचलो हा चमत्कारच म्हणावा लागेल” असं राहुल म्हणतो.

पुढची तीन वर्ष त्याने आऑर्थर रोड जेलमध्येच काढली. २०१० पर्यंत त्याला जामीन मिळण्यापूर्वीच विविध न्यायालयात त्याच्या खटल्यांवर सुनावण्या झाल्या.

“दीर्घकाळ जेलमध्ये राहिल्यामुळे मला आत्मपरीक्षण करता आलं.” असं राहूल म्हणतो. “ज्या लोकांना मी पैसे द्यायला भाग पाडले अशा सगळ्यांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर रात्री यायचे.

त्यांचं रडणं, ओरडणं, त्यांच्या चेहऱ्यावरची भीती आठवून मला अस्वस्थ वाटायचं. मला पश्चाताप होत होता, पण त्याबरोबरच पुढचं भविष्य काय असेल याची पण चिंता होती. समोर सगळा अंधार होता.

पण बदलायचं असेल तर आत्ताच, आता नाही तर कधीच मला ही संधी मिळणार नाही हे मात्र मला कळून चुकलं होतं.

 

jail-inmarathi

 

 

सुधारण्याचा मार्ग तितका सोपा नव्हता जितका त्याने विचार केला होता. कारण त्याचा रक्तरंजित भूतकाळ त्याचा पिच्छा करत होता. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याने एका खाजगी कंपनीत नोकरी करायला सुरुवात केली.

आणि नेमके त्याच वेळेला प्रसिद्ध पत्रकार जे.डे यांच्या हत्येनंतर चोवीस तासांसाठी राहुलला नजरकैदेत ठेवण्यात आले. पोलिसांनी संशयित म्हणून बऱ्याच जणांना अटक केली होती त्याला तो ही अपवाद नव्हता.

परंतु त्यामुळे त्याला त्याची नोकरी गमवावी लागली. याबाबत तो म्हणतो, “मी ज्यांच्याकडे काम करायचो त्यांनी मला पोलिसांकडून NOC घेऊन यायला सांगितले, जे मला कधीच मिळाले नाही.”

“परत एकदा अस्थिर झाल्यावर मी परत व्यसनांच्या गर्तेत अडकलो. पण आयुष्य कसा असतं पहा, आयुष्य मला सुधारण्याची अजून एक संधी देत होतं. मी पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात भरती झालो.

आणि काही महिन्यांच्या प्रयत्नानंतर मी व्यसनमुक्त झालो.”

 

muktangan inmarathi

 

“दारू सोडवणे हे खरंच खूप कठीण काम होतं. कारण दारू शिवाय झोपही येत नव्हती. झोप येण्यासाठी भरपूर अंगमेहनत करणं गरजेचं होतं. मी जाणीवपूर्वक केंद्रातील १७ टॉयलेट्स धुवायचे काम घेतले, जे खरंच खूप थकवणारं होतं.

लोकांनी केलेल्या उलट्या काढणं, पुसणे अशी सगळी कामं मी मुद्दामहून करायला लागलो. पण त्यामुळे मला झोप लागायला लागली. दारूचं व्यसन सुटलं आणि केंद्रातील लोकही माझं कौतुक करू लागले.

 

rahul jadhav inmarathi 4
sakal times

 

आता केंद्रामध्ये येणारे पालक माझं उदाहरण देतात. त्यावेळेस माझा मलाच अभिमान वाटतो.”

“२०१५ मध्ये केंद्राने एकदा मॅरेथॉन ठेवली होती आणि मी त्यात सहभागी झालो होतो. मॅरेथॉनला कोण जाणार असं विचारल्यानंतर पहिल्यांदा मी हात वर केला होता. त्यात सहभागी झाल्यामुळे मला पहिल्यांदाच आयुष्यात मेडल मिळालं.

हे माझ्यासाठी खूप नवीन होतं. कारण शाळेमध्ये मी कधीच कुठल्याच खेळात,अभ्यासात चमकलो नव्हतो, पण त्या एका मेडलने माझं आयुष्य बदललं.”

केंद्रात आई वडील जेव्हा भेटायला आले त्यावेळेस मी त्यांना म्हणालो की, मला आता तिकडे यायचं आहे आणि तुमच्या बरोबर राहायचं आहे. तेव्हा ते मला म्हणाले की-

तू परत त्याच ठिकाणी येऊ नकोस, कारण तू परत त्याच वातावरणात आलास तर पुन्हा तुझ्या पहिल्या सवयी चालू होतील.

आई वडील निघून गेले. मी केंद्राच्या बाहेर आलो आणि धावायला लागलो. धावता-धावता रडत होतो मला कळत नव्हतं मी काय करतोय ते. धावत धावत मी लोणावळ्यापर्यंत गेलो जवळजवळ ५३ किलोमीटर अंतर मी धावलो होतो.

म्हणजे एक मॅरेथॉनपेक्षाही जास्त अंतर मी त्यावेळेस धावलो होतो आणि त्याच वेळेस धावणे हे माझ्या आयुष्याचे ध्येय मी ठरवलं.”

 

rahul jadhav inmarathi 3
ahemdabad mirror

 

नंतर राहुलला त्याच्याच एका व्यसनमुक्त झालेल्या मित्राने भायखळा मध्ये जॉब दिला. राहुल परत डोंबिवलीला राहायला गेला.परंतु भायखळा ते डोंबिवली, जॉब आणि रनिंग याचं टाइमिंग काही जुळेना आणि त्याचा पळण्याचा सराव होईना.

मग तो ठाण्याला उतरून डोंबिवलीला २२ किलोमीटर धावत घरी यायचा. ही गोष्ट जेव्हा कंपनीत कळली तेव्हा त्याला कंपनीने कळबादेवी येथे जॉब दिला जेणेकरून मरीन ड्राईव्ह वर त्याची प्रॅक्टिस होईल.

 

rahul jadhav inmarathi 1
evnets high

 

२०१६ मध्ये मॅरेथॉन ची प्रॅक्टिस करताना, धावताना तो सीनियर इन्स्पेक्टर वास्त यांना धडकला. इंस्पेक्टर वास्त यांना राहुलचे रेकॉर्ड माहीत होते. त्यांनी त्याला पकडून पोलीस स्टेशन वर नेलं.

तिकडे त्याने वास्त यांना आपले मेडल्स, सर्टीफिकीट दाखवले आणि मॅरेथॉनच्या तयारीविषयी सांगितलं. त्याची कहाणी ऐकून पोलीस स्टेशन मधल्या सगळ्या पोलिसांनी त्याला स्टँडिंग ओवेशन दिलं.

२०१६ मध्ये राहुलने ४ तास १ मिनिटं आणि ३० सेकंदात मुंबई मॅरेथॉन पूर्ण केली. जी त्याच्या धावण्याच्या करिअरमधील बेस्ट आहे.

 

rahul jadhav inmarathi
twitter

 

त्यानंतर त्याने कोकणातल्या त्याच्या गावी धावत जायचा ठरवलं आणि तो २२४ किलोमीटर धावत गेला. धावण्यापेक्षा गाववकर्‍यांनी त्याचं कौतुक केलं याचं त्याला खूप अप्रूप वाटतं.

कारण गँगस्टर म्हणून तो गावात माहीत झाला होता, पण आता तेच गाव त्याच्या स्वागतासाठी जमा झाला होता.

नंतर तो मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते दिल्लीतील इंडिया गेट हे १४७५ किलोमीटर इतकं अंतर ‘ड्रग्स पासून मुक्ती’ या कारणासाठी धावला. आत्तापर्यंत त्याने मुंबई, ठाणे, पुणे, बीकेसी यामधल्या सगळ्या मॅराथॉन मध्ये भाग घेतला आहे आणि त्या पूर्ण केल्या आहेत.

 

rahul jadhav inmarathi 2

 

आता त्याला बॉस्टन इथल्या मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायचा आहे अर्थात कोर्टाने जर त्याला तिकडे जायची परवानगी दिली तरं च ते शक्य होणार आहे. कारण अजूनही त्याचे तीन गुन्हे प्रलंबित आहेत.

गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये मुक्तांगण मधलीच एक नर्स त्याची जीवन साथी झाली आहे. आणि आता तो मुक्तांगण मध्येच काउंसलर म्हणून पूर्णवेळ कार्यकर्ता झाला आहे.

त्याची ही कहाणी यावर्षीच्या मुंबई मॅरेथॉन साठी महत्त्वाची ठरली आणि मुंबई मॅरेथॉनसाठी ‘प्रेरणादायी धावपटू’ म्हणून त्याची निवड करण्यात आली.

त्याच्यावर एक डॉक्युमेंट्री बनवण्यात आली आहे, या वर्षात ती रिलीज होईल ज्याचं नाव आहे” गॅंगस्टर टर्नस मॅरेथॉनर”.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?