' “खरी देशभक्ती” : एका अमेरिका स्थित भारतीयाचा डोळे उघडणारा अनुभव – InMarathi

“खरी देशभक्ती” : एका अमेरिका स्थित भारतीयाचा डोळे उघडणारा अनुभव

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतात “देशभक्त” असल्याचं सर्टिफिकेट वाटप सुरू आहे. सरकारच्या एखाद्या कृतीवर टीका केली तर लगेच सैनिकांच्या त्यागाचं उदाहरण देणे असो वा राष्ट्रगीतास उभं राहीलं नाही म्हणून चक्क मारझोड केली जाते – अशी टोकाची आणि अस्मितेच्या खांबावर उभी असलेली देशभक्ती सर्वत्र अनुभवायला मिळत आहे.

Amazon वर आपल्या तिरंग्याच्या डिझाईनचे पाय-पुसणे असल्याबद्दल नुकताच हलकल्लोळ मजला होता, तो सर्वांच्या लक्षात असेलच. सुषमा स्वराजजींनी हे प्रकरण तातडीने कारणी लावल्याचं देखील आपण जाणतो.

अर्थात, भारतीय समाजमन ओळखून amazon ने अश्या वस्तू विकावयास नको हे सत्य असलं तरी ती त्यांची अनावधानाने घडलेली चूक होती – मुद्दाम केलेला अपमान नव्हे – हे समजून घेण्यात अनेक भारतीय अपयशी ठरले, हेही सत्यच आहे.

 

Sushma-Swaraj indian flag sale marathipizza

 

आपण सर्व भारतीय, अश्या अस्मितादर्शक-देशभक्तीत कसे गुंतून पडलो आहोत आणि खरी देशभक्ती, खरी जबाबदारी कशी विसरलो आहोत हे फेसबुकवर एका पोस्ट मध्ये नुकतंच बघायला मिळालं.

श्री प्रवीण क्षीरसागर हे अमेरिकेत वास्तव्यास असणारे एक भारतीय. त्यांच्या खुमासदार, हल्कयफुलक्या लिखाणामुळे ते फेसबुकवर लोकप्रिय आहेत.

त्यांची ही पोस्ट – सर्वांनी मन लावून वाचायला हवी अशी आहे –

=====

काल फेसबुकवर एका पोस्टवर खालील कमेंट वाचली :

अमेरिकन लोक चड्डी वर झेंडा रंगवतात. स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यावरून कैक विनोद करतात पण देशाच हित अस्मिता स्वाभिमान कशात आहे हे त्यांना चांगल कळत. त्यासाठी ते कोणत्याही थराला जातील. आपल्या सर्व भावना फक्त प्रतिकांपुरत्याच मर्यादित आणि त्यासाठी आपणही कोणत्याही थराला जातो… सामान्य माणसांचे मुडदे पाडतो पण नेत्यांच्या चूका माफ…

ही कमेंट वाचून मनात जे विचार आले ते व्यक्त करतोय.

===

हे लिहून, प्रवीणजींनी पुढील अनुभव विषद केला…जो प्रत्येक भारतीयाला विचार करण्यास भाग पाडेल.

 

PARTHA DALAL PHOTOGRAPHY VIA GETTY IMAGES

 

===

इथल्या इतक्या वर्षांच्या वास्तव्यात कधीही एका पैशाची/सेंटची पण लाच द्यावी लागली नाही.

रात्री दोन वाजता पण ‘सुनसान सडक पे’ आजूबाजूने कोणतीही गाडी येण्याची शक्यता नसताना देखील रेड सिग्नलला थांबणारे महाभाग बघितले आहेत.

ड्रायविंग लायसेन्स मिळाल्यावर सेकण्ड हँड गाडी शोधायला सुरुवात केली. इथे नवीनच होतो त्यामुळे ‘भारतीय मानसिकता’ भरलेली होतीच. भारतीय मित्रांचा सल्ला घेत होतो, बहुतांश सर्वांनी इतर भारतीय लोकांकडूनच गाड्या घेतल्या होत्या.

मुख्य सल्ले खालीलप्रमाणे –

1. गाडीचा कार फॅक्स रिपोर्ट चेक करून घे, काही accident वगैरे असेल तर त्यात कळेल.

2. गाडीचे registration करताना सेल्लिंग price वर टॅक्स भरावा लागतो त्यामुळे विकणाऱ्याकडून फॉर्म वर कमी किंमत लावून घे.

मला एका अमेरिकन महिलेची गाडी आवडली. कार फॅक्स रिपोर्ट चेक केला त्यात accident नव्हता, बार्गेनिंग करायचा प्रयत्न करून पाहिला, काही जमले नाही.

गाडी फायनल करताना त्या महिलेने सांगितले –
दोन वर्षांपूर्वी तिच्याकडून गाडी एका खांबाला ठोकली गेली होती त्यात radiator खराब झाल्याने बदलला आहे…!

(हे काहीही सांगायची तिला गरज नव्हती…कारण मला ते कधीच कळणार नव्हते…! तरीही तिने सांगितले.)

मी फॉर्म वर selling price कमी लिहायला विचारणा केली आणि त्यामुळे टॅक्स वाचेल हेही सांगितले. त्यावर तिने माझ्याकडे ज्या नजरेने पाहिले ती खचितच काही चांगली नव्हती.

“I will never do such thing.”

बस्स… मला पुढे काहीच बोलावले नाही.

Honesty
Discipline
Respect to the Institution

— ह्यावर देश चालत असतो. फक्त प्रतिकांप्रती अती टोकाची संवेदनशीलता दाखवून नाही.

===

अमेरिकेच्या उत्कर्षास तिथली न्यायी राज्यव्यवस्था जितकी जबाबदार आहे, तितकाच तिथला प्रगल्भ समाजसुद्धा, हे वरील उदाहरणावरून दिसून येतं. पण आपल्याकडे वरील विचार सकारात्मकरित्या घेतला जाईल की नाही, शंकाच आहे. असे विचार मांडणाऱ्यांना टोकाचे भावनिक आरोप सहन करावे लागतात. वरील पोस्टवर, प्रवीणजींच्या मित्रांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत –

श्री अमित लिमये म्हणतात –

हे सगळं खरं आहे. पण सांगायला गेलं की, तू तिकडं जाऊन जास्त शहाणा झालास का? ही आणि फक्त हीच प्रतिक्रिया मिळते…

===

यावर प्रवीणजींची प्रतिक्रिया –

हो… त्यामुळे सहसा इकडचे काही बोलत नाही. ‘किती लाल करणार स्वतःची’ अशीही प्रतिक्रिया येते.

=====

अधिक काय लिहिणे?!

आपण सीमेवर लढू शकत नाही…पण एक देशभक्त म्हणून जबाबदार वर्तन करू शकतो ना?

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?