' शाहरूखच्या “रईस” प्रमोशनमुळे एक मृत्युमुखी : ८ महत्वाचे प्रश्न – InMarathi

शाहरूखच्या “रईस” प्रमोशनमुळे एक मृत्युमुखी : ८ महत्वाचे प्रश्न

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

नवीन चित्र येत असेल, तर दर्शक आकर्षित करण्यासाठी पूर्वी त्याच्या जाहिराती करणे – हा एकच मार्ग असायचा. नंतर गाणी आणि ट्रेलर्स चा खुबीने वापर केला जाऊ लागला. आता मात्र “प्रोमोशन” हा चित्रपटांच्या बजेटमधील फार महत्वाचा भाग होऊन गेला आहे.

साधारणतः विविध वाहिन्यांवरच्या रिअ‍ॅलिटी शोज मधे हजेरी लावून शोज मधल्या कलाकारांचे किंवा स्पर्धकांचे कौतुक करून आपल्या सिनेमाची प्रसिध्दी करायच मार्ग आपल्या चांगल्याच परिचया्चा आहे. शोजचे कलाकार किंवा स्पर्धक मर्यादा, सारासार बुध्दी सगळे वेशिवर टांगून कार्यक्रमात आलेला ताराच जणू जग उजळून टाकणार आहे असे दाखवत त्याचे कौतुक करतात. आणि साहजिकच आहे. पाहुण्याला देव मानून भजण्याची आपली परंपरा आहे. त्याला हे प्रमोशन साठी आलेले पाहुणे कसा अपवाद असणार?

कधी कधी चालाखिने एखाद्या तात्कालिक वादा मधे येणाऱ्या सिनेमातले कलाकार आपले मत जाहिरपणे व्यक्त करतात. त्यावरुन खूप चर्चा घडून येते, टिका होते, कौतुक होते. पण याच्या सोबत सिनेमाची प्रसिध्दी जरूर होते. व्यक्तिपुजक भारतीय समजात सिनेकलाकारांचे फॅन्स खूप असतात. आणि म्हणुन त्यांच्या मताला, काही करण्याला खूप प्रसिध्दी दिल्या जाते. लोकांनाही ती आवडते. तसे पाहिले तर कुठलिही सामाजिक जाण नसणारे, केवळ आपल्या कलेचे प्रदर्शन धंदेवाईकपणे करून पैसे कमावणारे बहुतांश कलाकार हे केवळ व्यापारी आहे्त. आपल्या जवळ असलेले काही विकून पोट भरणारे आहेत. पण सिनेमाच्या प्रसिध्दी साठी म्हणुन का होईना त्यांनी मत व्यक्त करताच त्यावरून जनता भक्तिभावाने चर्चा करतो. समाज माध्यमे ढवळून उठतात. थोडी बहुत सामाजिक बांधिलकी असणारे कलाकार अनेक आहेत. त्यांनी ’समाज सेवेसाठी’ केलेली छोटी कृतीही डोक्यावर घेतल्या जातेच.

याशिवाय कलाकारांचे खाजगी आयुष्यही आगमी सिनेमाच्या प्रसिध्दीसाठी वापरल्या जाते. कुणाचे लफडे, कुणाचा समुद्रकाठावरचा उघडा-नागडा फोटो, कुणाचे मेक अप, कुणाचे ब्रेक अप असे सगळे सगळे वापरल्या जाते. शेवटी सिनेमा हा हजारो करोडोंचा उद्योग आहे. अगदी किरकोळ सिनेमा १०-२० कोटींचा धंदा करतातच. ५०-१०० कोटी सुध्दा नवे नाहित. मोठ्या कलाकारांच्या सिनेमाने १००-२०० कोटींचा गल्ला गोळा करणे ही नित्याची बाब बनते आहे. यातले धंद्याचे आकडे खरे किती नी खोटे किती याची चौकशी व्हायलाच हवी कारण सिनेमाचे नाव पुढे करून काळा पैसा पांढरा करण्याचा उद्योग चालतो असा आरोप नेहमीच केल्या जातो. आणि काही विशिष्ट कलाकार, त्यांना पैसा पुरविणारे लोक आणि त्यांना पाठिंबा देणारे दावूद सारखे गुंड यांचे आपसात काय संबंध आहेत ते बाहेर यायलाच हवे.

आणि म्हणुनच की काय आपला नवा सिनेमा आधिचे सगळे विक्रम मोडून जास्त धंदा करणारा व्हायलाच हवा असा ध्यास अनेक मोठ्या कलाकारांना असतोच. प्रसिध्दीसाठी नेहमीचे मार्ग चोखाळून झाल्यावर जास्त काही मिळविण्यासाठी नवे मार्ग चोखाळले जातात. असाच एक प्रयत्न केला शाहरुख खानने. शाहरुख खानचा नवा सिनेमा येतो आहे, रईस नावाचा. आणि आजकालच्या प्रथेप्रमाणे त्याची प्रसिध्दी करायला शाहरुख बाहेर पडलाय.

“आपण रेलवे ने प्रवास करणार आहोत” अशी ट्विट त्याने केली. सोमवारी मुंबईहून दिल्लील जाणारी राजधानी एक्सप्रेस पकडली. शाहरुख सोबत काम करणारी ’पॉर्न स्टार’ सनी लिओन (लिओनी?) आणि रईस बनविणारी सगळी टिम त्याच्या सोबत होती. रात्री साडे दहाच्या दरम्यान जेंव्हा ही गाडी वडोदऱ्यात पोंचली, तिथे आधीपासुनच हजारो लोक जमलेले होते. स्टेशनच्या एका टोकाच्या प्लॅटफॉर्मवर ही गाडी आली. वडोदऱ्यात गाडीचे इंजिन बदलल्या जाते. तिथे गाडी दहा मिनिटे थांबते. गाडीच्या दारात शाहरुख आला. त्याला पहायला लोकांनी धक्काबुक्की सुरू केली. सगळ्यांनाच गाडीच्या जवळ जायचे होते. अनेकांनी गाडीच्या बाहेरच्या भागावर, खिडक्यांवर, बंद दारांवर हात मारायला सुरुवात केली. काही लोक गाडीवर चढले. सगळी कडे गोंधळ माजला.

shah-rukh-khan-promotes-raees marathipizza

स्रोत

गाडीच्या बाहेर माजलेला गोंधळ आणि गर्दी पाहून सनी लिओन घाबरून गेली म्हणे. चाहत्यांना एक-दोन मिनिटे ’दर्शन’ देवून शाहरुख पुन्हा आपल्या जागी जावून बसला. आत इर्फान आणि युसुफ पठाण त्याची भॆट घ्यायला आलेले होते. यथावकाश गाडी हलली. लोक गाडी सोबत धावायला लागले. अर्थात,गाडीच जिंकणार होती. गाडी पुढे गेली. गाडी गेल्यावर जमलेले चाहते बाहेर पडण्याच्या घाईत होते. त्या दरम्यान गोंधळ झाला. चेंगराचेंगरी झाली. फरदीन पठाण नावाचा चाहता खाली पडला. लोकांच्या पायाखाली तुडवल्यागेला आणि त्यातच त्याचा अंत झाला.

shah-rukh-khan-promotes-raees one dead marathipizza

स्रोत

दुसरा एक चाहता गंभिर असल्याचे कळते. नंतर इतर काही स्टेशन्स वर लाठीमार करावा लागल्याचे कळते. मंगळवारी सकाळी गाडी दिल्लीला पोचली. तिथेही मोठा गोंधळ झाल्याची बातमी आहे.

सिनेमाच्या प्रसिध्दीसाठी शाहरुखने जो प्रकार केला त्या संदर्भात अनेक प्रश्न उभे राहतात. ते असे :

१. राजधानी एक्स्प्रेस मधे शाहरुख खान आहे म्हणुन त्याला पहायला हजारो लोक स्टेशन्स वर येणार हे ओळखून गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी काही व्यवस्था केलेली होती का?

२. सिनेमाच्या निर्मात्यांनी रेल्वे आणि पोलिस प्रशासनाची परवानगी घेतलेली होती का?

३. चाहते आणि प्रसिध्दीचा हव्यास असलेले कलाकार यांच्या गर्दीत रेल्वेतील सामान्य प्रवाश्यांचे जे हाल झाले त्याची जबाबदारी कुणाची?

४. रेल्वे प्रवासाचा वापर सिनेमाच्या प्रसिध्दीसाठी करणाऱ्या निर्मात्यांनी रेल्वेकडे काही कराचा भरणा केला होता का? नसल्यास सरकारी मालमत्तेचा वापर विना परवाना आपल्या व्यवसायासाथी करणे योग्य आहे का?

५. फलाटावरची अनावर गर्दी आणि धावणारी रेल्वे एकत्र आल्यास कुणाच्या जिवाला धोका होवू शकतो याचीजाणीव संबंधितांना होती का?

६. एरवी माशीही शिंकली तरी लगेच ट्विटणारे तारे-तारका वडोदऱ्यात एका चाहत्याचा मृत्यू झाला तरी ही गप्प का?

७. ज्या शाहरुखच्या निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू झाला त्या शाहरुखने झाल्या प्रकाराबद्दल साधी दिलगिरीही व्यक्त केलेली नाही. हे योग्य आहे का?

८. सिनेमाचे निर्माते, कलाकार किंवा रेल्वे प्रशासन यांच्या हलगर्जीपणामुळे एका माणसाचा मृत्यू झालेला आहे. या पैकी जो दोषी असेल त्याच्या वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करण्या येवू नए?

वरील प्रश्न आपण सर्वांनी उच्चारवाने विचारणे गरजेचे आहे. योग्य-अयोग्य वर्तनाचं भान फक्त सर्वसामान्यांनी ठेवावं आणि प्रसिद्ध व्यक्तींना काहीही करण्याची सूट असावी – हे सर्वथैव अयोग्य आहे.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?