सोशल मीडियावर वेळ ‘वाया’ घालवू नका – या १३ प्रकारे सोशल मीडियाद्वारे स्वतःचा विकास साधून घ्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सोशल मीडियाचा वापर हा आजकाल एक बहुचर्चित विषय आहे. तरुण पिढीच नाही तर शाळकरी मुलं, सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक आणि महिला सुद्धा दिवसातला बराचसा वेळ फेसबुक, WhatsApp किंवा तत्सम सोशल मीडिया वर घालवत असल्याचं दिसून येतं.
गंमत म्हणजे याच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहितीसुद्धा याच सोशल मीडियावर सहज मिळते. पण ही झाली नाण्याची एक बाजू.
आता दुसऱ्या बाजूकडे वळूया. ही सोशल मीडियाची दुनिया आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी ही भरभरून देत असते. फक्त थोडी शिस्त आणि थोडा डोळसपणा ठेवला तर त्याचा वापर आपण कित्येक चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी करू शकतो.
चला तर मग बघूया सोशल मीडिया चा प्रभावीपणे उपयोग कसा करता येईल…
१. साहित्य :
वाचनाची आवड अनेकांना असते, परंतु रोजच्या धावपळीत वाचायचं राहून जातं. आजकाल फेसबुक वर अनेक नवोदित लेखक आपले विचार मांडत आसतात.
शब्दमर्यादेमुळे हे लेख लहान असतात, त्यामुळे मोजक्या वेळात काहीतरी उत्तम वाचायला मिळू शकतं. आपला अभिप्रायही चटकन लेखकापर्यंत पोहोचवता येतो.
२. चालू घडामोडी :
ट्विटर आणि फेसबुक सारख्या माध्यमातून देशातच नव्हे तर जगात घडणाऱ्या घडामोडींविषयी जाणून घेता येतं. अगदी भारतात बसून आपण brexit सारख्या क्लिष्ट विषयावरची माहिती मिळवू शकतो, त्यावर प्रतिक्रिया देऊ शकतो.
वृत्तपत्र किंवा टीव्हीवर अवलंबून न राहता ही बातम्या कळतात. प्रवासात असताना किंवा घाईच्या वेळी पटकन आणि थोडक्यात माहिती मिळते.
एक उदाहरण म्हणजे, पुणे मुंबई एक्स्प्रेसवे वरती मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने वाहतूक वारंवार विस्कळीत होत होती, अशा वेळी अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून तिथून प्रवास करणाऱ्यांकडून ताजी माहिती मिळवत प्रवासाची जोखीम घ्यावी किंवा नाही ह्याचा निर्णय घेत होते.
३. लघु उद्योग:
विक्री किंवा कुठल्याही प्रकारची सेवा पुरवणाऱ्यासाठी हे एक अत्यंत उपयोगी माध्यम आहे. फोटो तसंच माहिती अपलोड करून कमीत कमी वेळात ग्राहकांपर्यंत पोहोचता येतं.
त्यांना तुमचे उत्पादन किंवा सेवा याविषयी माहिती देता येते, तसंच ग्राहकांना ऑर्डर ही नोंदवता येते. अत्यंत सोप्या पद्धतीने हे करता येत असल्याने तसेच तुमची सेवा तत्परता पाहून असे ग्राहक पुन्हा तुमच्याकडून खरेदी करण्याची शक्यता जास्त असते.
ज्या गृहिणींना घरच्या जबाबदाऱ्यांमुळे बाहेर पडून नोकरी व्यवसाय करणे कठीण असते, त्या अशाप्रकारे घरूनच व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतात.
४. नोकरीच्या संधी :
योग्य उमेदवार शोधणे ‘linked in’ सारख्या सोशल मीडिया साईटमुळे आता सोपे झाले आहे. कमी खर्चात तुमच्याकडे असलेले स्किल्स एकाच वेळी अनेक लोकापर्यंत तुम्ही पोहचवू शकता.
उमेदवारही नोकरी शोधण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे उपयोग करू शकतात. अनेक कंपन्यांचा कल ओळखीतून पद भरती करण्यावर असतो आणि ते आधी तिथे काम करणाऱ्यांच्या रेफरन्स मधून आलेल्या उमेदवारांना प्राधान्य देतात.
अशा नोकरीच्या संधी सोशल मीडियाद्वारे तुमच्या पर्यंत पोहचत असतात.
५. जुने मित्र मैत्रिणी शोधणे :
ज्यांच्याशी काही कारणाने जर संपर्क तुटला असेल तर त्यांना पुन्हा शोधण्यासाठी सोशल मीडियाची तुम्हाला नक्कीच मदत होईल.
जुजबी माहिती असल्यास ह्या साईटवरून त्यांच्यापर्यंत पोहोचता येऊ शकतं.
६. संवाद आणि नेटवर्किंग:
नोकरी असो वा उद्योग आजच्या काळात नेटवर्किंग खूप महत्त्वाचं मानलं जातं. नोकरी बदलताना किंवा उद्योग धंद्याच्या नवनवीन संधी शोधताना आपले जुने स्नेही किंवा सहकारी कायम उपयोगी पडतात.
सोशल मीडियाचा वापर अशा वेळी कायम संपर्कात राहण्यासाठी नक्कीच करता येऊ शकतो. शिवाय उद्योग जगतातील घडामोडी येथे कळतात.
तसंच आपल्या आवडीच्या विषयातील कार्यशाळांमध्ये आपल्याला प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन भाग घेता येतो.
७. कला कौशल्य :
तुमच्यातली कला किंवा एखादे कौशल्य फोटो, फेसबुक लाईव्ह यांद्वारे तुम्ही सादर करू शकता आणि एकाच वेळी अनेक श्रोते किंवा प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकता.
त्यावर प्रतिक्रियाही लगेच मिळतात. त्यामुळे अपेक्षित बदलही लगेच करता येतात. अशारीतीने सोशल मीडिया आपल्या कला गुणांना उत्तम व्यासपीठ होऊ शकतं.
८. नवनवीन कल्पना पाहणे, वाचणे:
घर सजावटीपासून पाककलेपर्यंत आणि ओरेगमीपासून ते फॅशनपर्यंत सगळ्याच क्षेत्रातील नवनवीन कल्पना इथे पाहायला ही मिळतात.
त्यातील आपल्याला रुचेल, पटेल अशा गोष्टींचा उपयोग प्रत्यक्ष आयुष्यात करता येऊ शकतो.
९. कम्युनिटी :
तुम्ही तुमच्या समविचारी लोकांची कम्युनिटी बनवू शकता, ज्यात विचारांची देवाण घेवाण होते. तसंच एकमेकांची मदत करता येते. ह्यातून एकूणच एक अतिशय सकारात्मक ऊर्जा मिळते.
आपण आणखी उत्साहाने आपले कार्य करू शकतो. उदाहरण म्हणजे, असे अनेक कम्युनिटी ग्रुप्स आहेत जे फिटनेस संबंधित माहिती देतात आणि प्रत्यक्ष वजन कमी करण्यासाठी ऑनलाईन मार्गदर्शनही करतात.
१०. समाजकार्य :
सोशल मीडिया वर अनेक अशा उपक्रमांची माहिती मिळते जिथे तुम्ही तुमच्या फावल्या वेळेचा सदुपयोग समाजाला मदत करण्यासाठी करू शकता.
अशा उपक्रमात भाग घेतल्याने तुमचा व्यक्तिमत्व विकास होतोच त्याशिवाय अनेक लोकांशी संपर्क होतो.
आपले ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवताना आपणही अनेक अनुभवातून समृद्ध होत असतो आणि आंतरिक समाधान मिळते.
११. ज्ञानवृद्धी:
आज कोणत्याही विषयावरची अफाट माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. ह्यातून खरोखर उपयोगी काय आहे ह्याची सखोल माहिती सोशल मीडियाद्वारे मिळू शकते.
त्या त्या विषयातील तज्ञ मंडळींचे विचार वाचता येतात आणि आपल्याला नक्की काय ज्ञान हवं आहे आणि ते कसं मिळवता येईल हे सुध्दा कळतं.
१२. खरेदी :
सोशल मीडियामुळे कोणतीही गोष्ट खरेदी करण्यासाठी असंख्य पर्याय आपल्या एका क्लिक वर उपलब्ध होतात. त्यातून वेळ वाचतोच तसंच माफक किमतीत उत्तम वस्तू किंवा सेवा मिळवता येते.
ह्यातून आपण अनेक घरगुती किंवा छोट्या प्रमाणावर विक्री करणाऱ्या महिला, विद्यार्थी यांना कळत नकळत त्यांचा उद्योग वाढवण्यासाठी मदत करतो.
१३. इव्हेंट :
आपल्या शहरात त्या त्या दिवशी कोण कोणते इव्हेंट होणार आहेत ह्याची माहिती अगदी सहज सोशल मीडियावर उपलब्ध असते. मग कुठे खाद्य महोत्सव आहे किंवा एखादा संगीताचा कार्यक्रम किंवा प्रदर्शन, कार्यशाळा आहे हे कळतं.
तिथली वेळ, फी हे सगळं समजतं आणि ह्यातून आपल्या गरजेची गोष्ट निवडून आपण तिथे जाऊ शकतो.
तर अशी आहे ही सोशल मीडियाची जादुई दुनिया. इथे आपण खरोखरच आपल्याला हवं ते शोधून त्याचा उपयोग स्वतः च्या विकासासाठी करून घेऊ शकतो. गरज आहे आपल्या वेळेचे योग्य नियोजन करण्याची आणि जागरूक राहण्याची.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.