राहीबाई, मला तुझा सार्थ अभिमान वाटतो गं! धरणीमातेचे डोळ्यांत पाणी आणणारे पत्र…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखिका: पूजा फाटे
===
प्रिय राहीबाई,
तू म्हणशील, आजवर अनेक कार्यक्रमांमध्ये विशेष अतिथी म्हणून उपस्थितीसाठी सादर निमंत्रणाची पत्रे आली, शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या सांगण्यासाठी लिहिलेली पत्रे आली, कौतुकाची पत्रे आली, सन्मानाची पत्रे आली, सोयऱ्यांची, उपेक्षितांची, आपल्यांची, परक्यांची, सुखाची, दुःखाची…अशी कितीतरी पत्रे आली…
पण हे असं हिरवं पत्र कोणी बरं पाठवलं?
तर… ज्या डोंगरमाथ्यावरील कोंभाळणे या अगदी आडवाटेवरील गावात तू लहानाची मोठी झालीस, ज्या अंगणात, ओसरीत वाढलीस, ज्या डोंगराळ भागात पन्नास-साठ वर्षांपूर्वी शाळा पोचलीही नव्हती तिथे निसर्गाच्या शाळेत खूप काही शिकलीस…
ज्या भूमीवर अन्नाचा कस टिकवण्यासाठी हायब्रीडमुक्त गावरान बियाणांची बँक सुरु केलीस…ज्या धरणीच्या उदरात पारंपरिक वाणे पेरलीस, ज्या धरणीला रासायनिक अधोगतीपासून वाचवलेस, ‘धरणीमाता’ हा शब्द सार्थ वाटावा असे कृतिशील प्रयत्न केलेस, मी ती धरणीमाता!
राहीबाई, मला तुझा सार्थ अभिमान वाटतो गं!
वडिलांच्या संस्कारात वाढलेली तू… वेळप्रसंगी पडेल ते काम केलेस, कष्ट उपसलेस, घाम गाळलास आणि त्यांनी दिलेली शिकवण ‘जुनं ते सोनं’चा अर्थ पक्का गाठीशी बांधून घेतलास. तसे म्हणायला शिक्षित नाहीस, पण भल्याभल्या शिक्षितांमध्ये तुझे नाव उठून दिसेल.
लहानपणापासून शेतीची आवड जोपासलीस. त्यातही फारसे शास्त्रीय ज्ञान होते, असेही काही नाही पण तरी फक्त आणि फक्त गावरान बियाणे जमविण्याचा छंद तुला खुणावत राहिला एक कृषी क्रांती घडविण्यासाठी…
आणि जसे की काही असामान्य करू बघणाऱ्याला लोक सुरुवातीला वेड्यात काढतात, बोलणी ऐकवतात, हसतात… तसेच तुझ्याही वाट्याला हे सगळे आलेच, पण यामुळे खचून जाणाऱ्यांपैकी तू नाहीच!
तू पारंपारिक पद्धतीनेच बी बियाणे गोळा केलेस, शेतात रुजवलेस आणि या शेतीप्रधान देशाला ‘सुजलाम सुफलाम’ बनवण्यासाठी दिवसरात्र झटलीस!
राहीबाई, मला तुझा सार्थ अभिमान वाटतो गं!
संक्रांतीच्या बचतगट हळदीकुंकू समारंभात वस्तू विकत न घेता तू करवंदाची रोपे वाण म्हणून दिलीस, त्यासाठी जंगलात जाऊन करवंदे आणलीस, बीया जमावल्यास, कुटुंबाला मदतीला घेतलेस, आणि हजारो करवंदाची रोपे जन्माला घातलीस, बायकांना वाटलीस.
तुझ्या या करामतींमुळे तू अनेकांना विस्मयीत केलेस आणि एवढेच नव्हे तर पुण्याच्या ‘बायफ’ या कृषी व सामाजिक क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थेलादेखील स्वतःच्या अचाट कल्पनाशक्तीची भुरळ घातलीस.
तुझी धडपडसुद्धा त्यांच्यासारखीच लोककल्याणासाठी आहे, हे साम्य जाणून तुम्ही संयुक्त विद्यमाने गावरान बियाणांच्या प्रसार व प्रचाराचे कार्य केले. राहीबाई, मला तुझा सार्थ अभिमान वाटतो गं!
एक आई बाळाला जसे जपते, तसेच तू अत्यंत दुर्मीळ अशा दाण्यांच्या शेकडो जातींची ‘बियाणे बँक’ उभारलीस! कितीतरी वर्षांपासून तुझे अथक परिश्रम बघून माझा ऊर भरून येतो.

गावरान वाण शोधणे, लागवड करणे, त्यांच्या बिया काढून त्या संकलित करणे, इतरांना यासाठी प्रेरणा देणे आणि त्यांच्या माध्यमातून पुन्हा बियांचे संकलन करणे… अशा पद्धतीने त्यांच्या बीजबँकेचा विस्तार करून तू ‘बीजमाता’ झालीस.
वांगी, तूर, टोमॅटो, घेवडा, वाल, उडीद, हरभरा, बाजरी, गहू, नागली, तीळ, भुईमुग, सूर्यफुल, जवस, तांदूळ, राळा, नाचणी, रायभात, वरंगल, भेंडी, पेरू, आंबा, करवंद, पालक, मेथी, वाटाणा… अशा अनेक दुर्मीळ, सुवासिक, चविष्ट, कसदार, पोषक जातींच्या बियाण्यांच्या निर्मितीचे तुझे काम अव्याहत सुरू आहे.
शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ।।….तुकोबांची वाणी शाश्वत सिद्ध करणारी तू…
राहीबाई, मला तुझा सार्थ अभिमान वाटतो गं!
तू मायेने जपलेली बियाणे महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांत आणि इतर राज्यांतही पोहोचवते आहेस, गावरान बियाणे संगोपन-संवर्धनासाठी व्याख्यान देते आहेस, मार्गदर्शन करते आहेस, नाकात साजेशी नथ घालून सेंद्रिय बियाणांच्या दागिन्यांनी भारत देशाला सौंदर्य प्राप्त करून देते आहेस…
बीबीसीच्या १०० प्रेरणादायी महिलांच्या जागतिक यादीत स्थान मिळवलेस, अतिशय गौरवाचा ‘नारीशक्ती’ पुरस्कार मिळवलास आणि आता तर तुला ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे!

कुठून आणलेस एवढे बळ? एवढी चिकाटी? एवढी मेहनत? एवढा आत्मविश्वास? महाराष्ट्राच्या पदरी पडलेलं पुण्यफळ आहेस तू…
राहीबाई, मला तुझा सार्थ अभिमान वाटतो गं!
असे म्हणतात की आपल्या पोराबाळांची स्तुती त्यांच्यादेखत करू नये, पण खरं सांगायचं झालं तर माझ्या पोटी तुझ्यासारखी शुद्ध बी रुजली, निपजली, फुलली आणि कित्येक शेतकऱ्यांसाठी ‘आनंदाचं झाड’ झालीस…
याचा मला सार्थ अभिमान वाटतो गं!
राहीबाई, मला तुझा सार्थ अभिमान वाटतो गं!
– तुझीच धरणीमाता
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.