अंगावर रोमांच, छत्रपती शिवरायांना मुजरा आणि तानाजीसाठी अलोट प्रेम: तान्हाजी चित्रपटाचा “हा” अनुभव वाचायलाच हवा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक – अनुप कुलकर्णी
===
या वर्षीचा मोस्ट अवेटेड सिनेमा ‘तान्हाजी’ फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. शरीराने थिएटरबाहेर आलो असलो तरी मन मात्र आतच अडकलंय. ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट नंतर जे काही असेल ते आहे तान्हाजी!
आपण सर्वांनीच शाळेत असल्यापासून सुभेदार तानाजी मालुसरे यांच्याविषयी ऐकलं, वाचलं आहे. “आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं” आणि “गड आला पण सिंह गेला” ही वाक्ये आपल्याला तोंडपाठ आहेत.
थोडक्यात सिनेमा बघायला जाण्याआधीच त्याची स्टोरी माहीत असणं हा कोणत्याही सिनेमासाठी ड्रॉबॅक ठरू शकतो.
मात्र तान्हाजी याला सणसणीत अपवाद आहे. पहिल्या सीनपासून शेवटच्या सीनपर्यंत अंगावर काटा, डोळ्यात प्राण आणून आणि श्वास रोखून बघावा असा हा सिनेमा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी तहात स्वराज्याचे 23 किल्ले गमावले त्यात कोंढाणा (सिंहगड) किल्ला सुद्धा होता. हा किल्ला परत मिळवण्यासाठी जी थरारक झुंज तानाजी मालुसरे आणि त्यांच्या साथीदारांनी दिली त्याची गाथा यात मांडली आहे.
मुघलांची दक्षिणेवर राज्य करण्याची महत्वकांक्षा आणि मातृभूमीसाठी मराठ्यांचा संघर्ष यात नेहमी मराठे बाजी मारत आले ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वामुळे आणि आई भवानीच्या आशीर्वादामुळे…
औरंगजेब शेवटपर्यंत स्वराज्य ताब्यात घेण्याची स्वप्ने बघत राहिला आणि तानाजी व असे कित्येक भगव्याचे शिलेदार त्याच्या स्वप्नांना प्राणाची बाजी देऊन सुरुंग लावत आले.
कोंढाणा किल्ल्यावर औरंगजेबाने उदयभान राठोडला किल्लेदार नेमले. याच किल्ल्यावर महाभयंकर अशी ‘नागीन’ तोफ राजधानी राजगड कडे निशाण धरून ठेवली गेली. अश्या परिस्थितीत कोंढाणा परत स्वराज्यात आणायची मोहीम ठरवण्यात आली.
मुलाचे लग्न बाजूला सारून तानाजी मालुसरे यांनी ही मोहीम फत्ते केली. सिनेमाची स्टोरी इतकीच आहे पण ज्या थरारक पद्धतीने ती मांडली गेली आहे उसका जबाब नहीं!
अजय देवगण जी भूमिका करतो त्यात जान ओततो. परफेक्ट कास्टिंग! अजय देवगण शिवाय तानाजीच्या भूमिकेला कुणी न्याय देऊ शकलं नसतं. हा माणूस फक्त डोळ्यातून बोलतो राव…
आनंद, दुःख, वेदना, सूड, संताप सगळं सगळं त्याच्या डोळ्यात उमटतं. भगवा फेटा बांधून मराठा पोशाखात अजय सामोरा येतो तेव्हा तानाजी मालुसरे नक्की असेच दिसत असणार अशी आपली खात्री होते.
सावित्रीबाईंच्या भूमिकेत काजोल पण भारी दिसलीय. एका लढवय्या पतीची पत्नी आणि निरागस मुलाच्या आईच्या मनाची कालवाकालव काय असते ते तिने छान मांडलं आहे.
आजपर्यंत जेवढे छत्रपती शिवाजी महाराज ऑनस्क्रीन बघितले त्यातले सर्वात भारी दिसणारे या सिनेमात आहेत.
शिवाजी महाराज म्हणजे कणखर, खंबीर व्यक्ती असं आपल्या मनात चित्र असतं… मात्र मित्रासाठी, आपल्या तान्यासाठी डोळ्यात अश्रू आणणारे महाराज, मित्र संकटात आहे हे लक्षात येताच स्वतःचे प्राण धोक्यात घालणारे महाराज या सिनेमात दिसतात.
शरद केळकरने छत्रपती शिवाजी महाराज असे काही उभे केलेत की पडद्यावर दर्शन होताच उभे राहून मुजरा घालण्याची तीव्र इच्छा होते.
खास कौतुक सैफ अली खानचं! महाभयानक, हिंसक, थोडाफार विकृत वाटणारा उदयभान राठोड अप्रतिम रंगवलाय त्याने. अस्सल खलनायकी भूमिकेत सैफ नेहमीच शोभतो.
बाकी सर्व कलाकारांचे काम छानच आहे. राजमाता जिजाऊ, शेलारमामा, सूर्यभान, औरंगजेब, पिसाळ आणि इतर सहकलाकार यांनी मस्त अभिनय केलाय.
या सिनेमाचा आणखी एक हिरो आहे… सिनेमॅटोग्राफर केको नाकाहारा! बापरे बाप! काय कॅमेरा फिरतो त्याचा… गाण्यांपासून ते लढाईपर्यंत, नदीच्या शॉट पासून सह्याद्रीच्या उत्तुंग कड्यांपर्यंत एक एक फ्रेम जबरा आहे.
कोंढाण्याची लढाई रात्री लढली गेली. रात्रीची लढाई चित्रित करणे सिनेमॅटोग्राफर साठी आव्हान असते, पण केको ने आव्हान लीलया पेललं आहे.
सिनेमाचा आणखी एक हिरो आहे… बॅकग्राउंड म्युझिक देणारा संदीप शिरोडकर. ते “रा रा रा रा” म्युझिक सुरू झालं की गुजबम्पस की काय म्हणतात ते येतात. बाकी गाणी ओके ओके आहेत पण डायलॉग मात्र खतरनाक आहेत. दिग्दर्शक ओम राऊतने हा एक माईलस्टोन बनवलाय.
यात सगळे प्लस पॉईंट असताना मायनस पॉईंट सांगायचे झालेच तर ते अर्थात नको ती सिनेमॅटिक लिबर्टी. पर चलता है! या लिबर्टीकडे दुर्लक्ष केलेलंच बरं… कारण मराठा काय चीज होती ते या निमित्ताने तरी सर्वांना समजतंय…
सर्वांनी आवर्जून बघावा असा हा सिनेमा… माझ्यातर्फे पाचपैकी साडेचार स्टार. अर्धा स्टार नको त्या सिनेमॅटिक लिबर्टी साठी कट केलाय.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.