भाजपसाठी आवश्यक असलेल्या ३ गोष्टी : झारखंडचा धडा मोदी-शहा शिकणार काय?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक: डॉ निल वाघमारे
===
निवडणूक निकाल अपेक्षेप्रमाणे लागलाय. धक्का बसलाय असं वाटलं सुद्धा नाही इतका सहज पचनी पडला, पण या आधी मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, हरियाणा, छत्तीसगढ हे पराभव मात्र जबर धक्कादायक होते. त्या मानाने झारखंड हा धक्का वाटलाच नाहीये.
हिंदुत्व व राष्ट्रीयत्व हे मुद्दे झारखंड किंवा इतर राज्यात सामान्य माणसाला राज्य पातळीवर भावलेले नाहीत. लोकसभेला मिळालेला निकाल याचे विवेचन मोदीजी, शहाजी यांनी चुकीच्या पद्धतीने घेतलं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे.
याचा अर्थ असा की, हे निव्वळ तिहेरी तलाक, ३७० कलम, श्रीराम मंदिर, CAA, NRC यासाठी दिलेले नव्हते. हे विषयही अत्यंत महत्त्वाचे आहेत पण देशपातळीवर बरं राज्यपातळीवर नव्हे… !!
मोदीजी यांना जनतेने फ्री हॅन्ड दिला आहे, पण राज्यात मोदीजी यांची जादू चालली नाही कारण त्यांच्या जादूच्या पोतडीत राज्य पातळीवरील जनतेला लुभावणारा खेळ नव्हता. ३७० काय, CAA काय हे मुद्दे पार जनसंघ स्थापनेच्यापासूनचे मुद्दे आहेत.
संघाचे अजंडे मॅरेथॉन पद्धतीने मार्गी लावले याचा एक स्वयंसेवक म्हणून मला आनंद झाला, पण एक जनतेत भाजप कार्यकर्ता म्हणून मला सामान्य जनतेला भावेल असं काम काय? या प्रश्नाला उत्तर देता येत नव्हतं.
झारखंड येथील अनेक सभांमध्ये अमित शहा यांनी श्रीराम मंदिर उभारणी व CAA बाबत अनेक गोष्टी सांगितल्या पण त्याचा फायदा झालेला नाही यामुळे चाणक्य म्हणवले गेलेले शहा व मिडासटच वाले मोदीजी यांच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
वाजपेयी,अडवाणी, जोशी, स्वराज, उमा भारती, वसुंधरा राजे, पर्रीकर, महाजन, मुंडे धुमल, शिवराज, रमनसिंग अशी अनेक नावे आधीच्या पिढीत होती. आता परिस्थिती अत्यंत वाईट आहे. २ मेन आर्मी होऊन बसलाय भाजप... प्रत्येक राज्यात दुसरी फळी अत्यंत निर्णयक्षम व तगडी असायची ज्यांना निर्णय प्रक्रियेत मान असायचा.
आता???? अमित शहा यांनी संघटनेला नक्कीच पक्की घडण दिलीय पण आज त्यांच्या बद्दल दरारा कमी भीतीदायक वातावरण आहे पक्षातही व बाहेरही.. !!! त्यांनी पक्षाला निवडणूक मशीन बनवलं आहे. मशीनला भावना नसतात, पोट नसतं मन नसतं, पण मतदारांना पोट असतं, मन असतं.
रघुवर दास किंवा मनोहर खट्टर हे काय करिश्मा असलेलं किंवा संघटन तगड असलेले नेते नव्हेत, त्यांच्याकडे तेवढी ताकद देखील नाहीये ते कायम परप्रकाशीत म्हणजे मोदी शहा यांच्या प्रभावळीत मधील पर प्रकाशी ग्रहच..!!!
त्यांच्यावर दोष न येता, दोष येतो तो मोदी शहा यांच्या वरच इथे आणखी एक जबरदस्त शंका येते मोदीजी यांच्या नंतर कोण? वसुंधरा, शिवराज, पर्रीकर, देवेंद्र योगी ही नावे हळूहळू गेम करून संपवली जात आहेत का? कुणासाठी ? याचा मोदीजी यांनी पक्ष हितार्थ विचार केला पाहिजे.
AJSU, JDU ,LJP हे भाजप पासून दूर का गेले? कारण भाजपचा भस्मासुर का? त्यांना वाटा का देऊ केला नाही? तीच गोष्ट महाराष्ट्र राज्यात घडलेली आहे शिवसेना सारखे ३० सहकारी दूर गेले? चर्चेने या गोष्टी सुटल्या असत्या. शहा येथे पक्ष प्रमुख म्हणून हस्तक्षेप न करता उर्मट बनून का राहिले? लवचिकता का दाखवली नाही?
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आर्थिक व्यवस्था प्रचंड ढासळली आहे. झारखंड सारख्या अविकसित राज्यात हे प्रकर्षाने जनतेला जाणवलं असणार. रोजगाराच्या संधी आधीच तिथं मर्यादित, त्यात अर्थमंत्री आर्थिक चणचण आहे हे मानायलाच तयार नाहीत. आज खालपासून वरपर्यंत आर्थिक नियोजन बिघडले आहे हे प्रत्येकाने आपल्या मनाला विचारून बघा. बेरोजगारी ही सगळ्यात उग्र समस्या होत चालली आहे.
झारखंड ही इष्टापत्ती समजून मोदीजीसारखे Sharp व Fast Learner यावर ताबडतोब उपाययोजना करतील हा मला विश्वास आहे आणि कदाचित त्यादृष्टीने संघ व तत्सम संघटन कामालाही लागले असेल
सारांश हा, की भाजपला वर्तमान परिस्थितीतून बाहेर यायचं असेल तर संघटन पातळीवर जबाबदारी विकेंद्रीकरण, प्रशासन पातळीवर अर्थ नियोजन व NDA पातळीवर मित्रपक्ष संवाद या तिन्ही गोष्टी फार आवश्यक आहेत.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.