“पानिपत” चित्रपट नक्की कसा आहे? कुणी पहावा, कुणी पाहू नये? वाचा..!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सध्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित “पानिपत” या चित्रपटाची खूपच चर्चा आहे. आतापर्यंत फेसबुकवरच्या अनेक पोस्ट वाचून लोकांमध्ये या चित्रपटाबद्दल अनेक मतं तयार झाली आहेत.
पण, नक्की हा चित्रपट कसा आहे, कोणी पहावा, कोणी पाहू नये? चित्रपट बघायला जाताना नेमका कोणता विचार घेऊन जावा – या सगळ्याबद्दल लेखक अभिषेक नगरकर यांनी फेसबुकवर अतिशय खुमासदार शैलीत टिप्पणी केली आहे.
अगदी थोडक्या शब्दांत या चित्रपटाची मुद्देसूद समीक्षा त्यांनी केली आहे. वाचा, नक्की कसा आहे “पानिपत”..
पानिपत सिनेमा बघितलात? एकंदरीत हा सिनेमा “क्लास ऑडियन्स”साठी आहे. “मास ऑडियन्स”साठी हा सिनेमा नाही. फेसबुकवरचे दूषित reviews वाचून मी फार मोठी चूक केली. कारण, कारण चित्रपट बऱ्यापैकी चांगला आहे.
मध्यांतरापर्यंत चित्रपट संथ आहे. परंतु, नंतरचा चित्रपट आणि चित्रपटाचा शेवट खूप चांगला आहे. सगळ्या कलाकारांचा अभिनय “बरा” आहे. अजून चांगला होऊ शकला असता. संजय दत्तचा अभिनय लक्षात राहतो.
अनुभवी नट संजय दत्त आणि बाकीचे इतर हा फरक स्पष्ट दिसतो.
क्रिती सनन उर्फ पार्वतीबाई खूपच बारीक दिसल्या आहेत. तिला गोवारीकरांनी साजूक तुपातला शिरा खायला घालून जरा जाड केलं असतं तर बरं झालं असतं.
सिनेमा संथ वाटण्याचं कारण, गाणी आणि पार्श्वसंगीत खूप संथ आहे, ते जरा वेगवान हवं होतं. संवादलेखन चांगलं आहे.
आशुतोष गोवारीकरांचं दिग्दर्शन लाजवाब आहे. खूप मेहनत घेतलेली दिसत आहे. असा भव्य ऐतिहासिक सिनेमा गोवारीकर किंवा संजय लीला भन्साळी सोडून इतर कोणी बनवू शकेल असं वाटत नाही. इतरांच्या वकुबा बाहेरची गोष्ट आहे ही.
एक गोष्ट लक्षात ठेवा, ‘पानिपत’ सारखा अवघड विषय तीन तासाच्या सिनेमात कधीच मावू शकणार नाही.
सिनेमा कोणी पाहू नका —
१) इतिहास अभ्यासकांनी सिनेमा पाहू नका. सगळ्या गोष्टी ३ तासात दाखवणं शक्य नसल्याने काही ऐतिहासिक भाग वगळण्यात आलेला आहे.
२) बाहुबली किंवा मारधाड असलेले “भाई” चे सिनेमे आवडणाऱ्यांनी ह्या सिनेमाकडे फिरकू पण नका.
३) ज्या लोकांमध्ये पेशन्स नाही अशांनी सिनेमा बघू नका.
४) चाळीशीच्या पुढच्या वयस्कर लोकांनी हा सिनेमा बघू नका. सिनेमा खूप लांबट आहे, एवढा वेळ तुम्हाला कदाचित बसवणार नाही. The movie is bladder blasting.
५) “मी खूप हुशार आहे, मला सर्व कळतं” ही भूमिका असणाऱ्या चिकित्सक लोकांनी हा सिनेमा बघू नका.
सिनेमा कोणी पाहावा —
१) इतिहासाबद्दल कमी चिकित्सा करणाऱ्या न्यूट्रल लोकांनीच हा सिनेमा बघावा.
२) क्रिकेटमध्ये राहुल द्रविड ज्यांना आवडतो, ज्यांना शेवटपर्यंत टिकून राहता येईल अशा लोकांसाठी हा सिनेमा बेस्ट आहे. त्यांनी जरूर बघावा. तुम्हाला नक्की आवडेल.
३) आशुतोष गोवारीकरच्या फॅन्ससाठी हा सिनेमा ‘पर्वणी’ आहे.
४) ज्यांना सिनेमा बघितल्यावर नंतर त्यावर खूप वेळ विचार करायला आवडतो अशांसाठी हा सिनेमा अतियोग्य आहे.
५) इतिहासाबद्दल काहीच माहित नसणाऱ्या लोकांनी हा सिनेमा पाहणं गरजेचं आहे. काहीच माहित नसण्यापेक्षा काहीतरी थोडं समजलेलं उत्तम !
थोडक्यात हा सिनेमा ठराविक प्रेक्षकांसाठीच आहे. वैचारिक, संयमी लोकांना सिनेमा निश्चित आवडेल.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.