“मुंबईत जाऊ नकोस, “काहीतरी” घडणार आहे”: डेव्हिड हेडली-राहुल भटच्या गुप्त नात्याची कहाणी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा प्रत्येक भारतीयसाठी कधीही न विसरता येणारी घटना आहे. आज दहा वर्षे उलटून गेली तरीसुद्धा हा घटनेच्या आठवणी मन विषण्ण करतात. समुद्रमार्गे आलेल्या दहा दहशतवाद्यांनी मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी घडवलेला संहार हा भीषण होता.
या घटनेने अनेकांच्या मनावर घातलेला घाव अजूनही ओला आहे. २६/११ च्या पीडितांचे अनुभव ऐकून डोळ्यांच्या कडा पाणावतात.
या केवळ भयप्रद घटना नाहीत तर भारतीयांच्या, मुंबईकरांच्या एकजुटीची, धैर्याची, माणुसकीची साक्ष देणाऱ्या आठवणी आहेत.
२६/११च्या हल्ल्याबद्दल वाचताना नेहमी नवीन माहिती समोर येते. या हल्ल्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न चालू असताना अनेकांची नावं या हल्ल्याशी जोडली गेली. अशाच जोडल्या गेलेल्या नावांपैकी एक नाव म्हणजे राहुल भट. प्रख्यात चित्रपटदिग्दर्शक महेश भट यांचा मुलगा.
त्याचा या हल्ल्याशी प्रत्यक्ष संबंध नसला तरीही या हल्ल्याचा ‘मास्टर माइंड’ डेव्हिड हेडली याच्या चौकशीदरम्यान वारंवार राहुलचे नाव समोर आले.
त्यांचं नेमकं काय नातं होतं याचा मागोवा घेणारा हा लेख…!
राहुल आणि डेव्हिडची मैत्री कशी झाली ?
राहुल फिटनेस ट्रेनर आहे. मुंबईतील एका जिममध्ये त्याची आणि डेव्हिड हेडलीची भेट झाली त्यानंतर ते ई -मेलमार्फत बोलायचे. परंतु ते फार वेळा एकमेकांना भेटले नाहीत. डेव्हिड हल्ल्याच्या आखणीसाठी मुंबईत राहत असताना आठ-दहा वेळा त्यांची भेट झाली होती. राहुलचा मित्र विलास याने या दोघांची भेट घडवून आणली होती.
हेडलीसोबतच्या गप्पांचे विषय राहुलने मीडियासमोर खुलेपणाने सांगितले आहेत. हेडली आणि राहुल यांच्यात चांगले संबंध प्रस्थापित झाल्यानंतर, ते अनेक ठिकाणी फिरायला जायचे.
२००८ सालच्या सप्टेंबरमध्ये इस्लामाबाद येथी हॉटेलवर झालेला हल्ला बघून ‘असा हल्ला मुंबईवर सुद्धा होईल’ असे हेडलीने राहुलला सांगितले होते.
राहुलने कायमच हेडलीचे वर्णन देखण्या शब्दांमध्ये केले आहे.
‘मला हेडलीसोबत फिरायला खूप आवडायचे. कारण त्याच्याकडून मला खूप शिकायला मिळायचं. त्याची विनोदबुद्धी सुद्धा खूप छान होती.
सुरक्षाव्यवस्था, गुप्तहेर यंत्रणा, बंदुका अशा विषयांमध्ये त्याला विशेष रस असायचा म्हणूनच मी त्याला ‘एजंट हेडली’ अशी हाक मारायचो.’ – असं राहुलने एका मुलाखतीत सांगितलं.
खरंतर हेडलीने त्याला ‘मला अशी हाक मारू नकोस’ अशी विनंती सुद्धा केली होती. अर्थात, या मागचं कारण राहुलला फार उशिरा लक्षात आलं.
२६/११चा हल्ला होण्याआधी हेडलीने राहुलशी संपर्क साधून ‘दक्षिण मुंबईला जाऊ नकोस’ असे सांगितले होते.
हल्ल्यानंतरसुद्धा काही काळ हेडली आणि राहुल संपर्कात होते. हल्ल्यानंतर त्याने राहुल आणि त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती.
हेडली आणि राहुल यांच्या मधुर संबंध प्रस्थापित झाल्यानंतर राहुलचे आपल्या वडिलांशी फारसे पटत नाही हे त्याच्या ध्यानात आले. ‘महेश भट यांनी कधी मला त्यांच्या मुलासारखे वागवलेच नाही.’ असे स्वतः राहुलने सुद्धा एका मुलाखतीत म्हटले आहे.
म्हणूनच राहुलला प्रमुख भूमिकेत ठेऊन एक चित्रपट बनवावा अशी योजना सुद्धा हेडलीने आखली होती.
शिकागो कोर्टात हेडलीने सांगितल्यानुसार, त्याला राहुल आय.एस.आय एजंट म्हणून हवा होता. पाकिस्तानातील दुर्गम भागांमध्ये राहुलला घेऊन जाण्याचा बेत त्याने आखला होता. पण, राहुलला जीवे मारण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता.
२६/११ च्या हल्ल्यासाठी मुंबईची पाहणी करताना हेडली राहुलच्या मित्राच्या मदतीने शिवसेनाभवनात देखील जाऊन आला होता. एवढेच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी सुद्धा तो जाऊन आला होता. त्यानंतर राहुलसोबत दादरच्या सिद्धिविनायक मंदिरालाही त्याने भेट दिली होती.
तिथे जाऊन त्यांच्या प्रमुखांच्या आज्ञेनुसार त्याने काही धागे विकत घेतले होते. त्यातलाच एक धागा दहशतवादी कसाब याच्या मनगटावर बांधलेला दिसतो.
हल्ल्यानंतर जेव्हा राहुलने जेव्हा डेव्हिडचे नाव बातम्यांमध्ये ऐकले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. क्षणभर त्याचा या सगळ्या घटनांवर विश्वासच बसला नाही.
सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेला सामोरे जात त्याने पोलिसांशी संपर्क साधला आणि शक्य तेवढी सगळी माहिती पोलिसांना कळवली.
या घटनेच्या काही महिन्यांनंतर ‘चॅनेल ४’ला दिलेल्या मुलाखतीत राहुल म्हणाला की,
‘मला त्याची खरी ओळख कळल्यानंतर मी हादरून गेलो. मला खूप वाईट वाटलं. यापुढे मी लोकांवर विश्वास ठेवणंच बंद केलंय.’
हेडलीची चौकशी करताना त्याच्या मेल्समध्ये राहुलचे नाव वारंवार आढळते. त्याला आलेल्या एका मेलमध्ये असे म्हटले आहे की,
‘तुम्हाला अजून काही इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स सांगायचे आहेत.’ त्यावर हेडलीने रिप्लाय केला आहे की, ‘मला असं वाटतं की, आपण पुन्हा एकदा लास्ट लोकेशनवर जावं आणि राहुलला hi म्हणावं’
इथे ‘राहुल’ हा कोडवर्ड वापरण्यात आला आहे असे मानणे आहे.
राहुल भटने पत्रकार हुसेन झैदी यांच्यासोबत मिळून ‘हेडली अँड आय’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्याने हेडलीसंबंधीच्या अनेक गोष्टींचे रहस्य उलगडले आहे. २६/११च्या पूर्वीच्या घटनांचा क्रम या पुस्तकात दिसतो.
हे पुस्तक हेडली आणि राहुल यांच्या भेटीवर आणि त्यांच्या मैत्रीबद्दल असलं तरीसुद्धा २६/११च्या हल्ल्याचे अनेक तपशील या पुस्तकात आढळतात.
हे पुस्तक म्हणजे राहुलचं आत्मकथन आहे. त्याने अनुभवलेल्या गोष्टी मांडण्याचा केलेला प्रांजळ प्रयत्न आहे. राहुलचा हेडलीने कसा उपयोग करून घेतला हे वाचताना राहुलच्या भाबडेपणाची कीव येते आणि त्याचसोबत हेडलीच्या वागण्याचा त्रासही होतो.
गुन्ह्यांना चटावलेली माणसं त्यांच्या स्वार्थासाठी कोणत्याही ठरला जाऊ शकतात याची जाणीव होत राहते. हेडलीचा पूर्वइतिहास, त्याने चौकशीदरम्यान केलेली विधानं लेखकाने मांडली आहेत.
मात्र, हे सगळं वाचताना राहुलची भूमिका प्रामाणिक आहे का – अशी शंकेची पाल चुकचुकतेच.
२६/११च्या खोलात शिरून त्या घटनांचे धागेदोरे मिळवायचे असतील ते हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.