२०१९ संपण्याआधी या “१५” गोष्टींची काळजी घ्या आणि २०२०चं तणावमुक्त मनाने स्वागत करा..!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
या वर्षाला निरोप द्यायची वेळ जवळ येतेय. ऑफिस आणि घराची कामं उरकून थोडासा विरंगुळा कधी मिळतो याची तुम्हीही वाट पहात असालच..! “इअर एण्ड इव्ह” कशी साजरी करायची याचे काही मनसुबे मनातल्या मनात सुरु झाले असतील.
नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्याआधी चालत्या वर्षातील काही गोष्टी राहिल्या असतील, काही संकल्प अपूर्ण राहिले असतील तर या महिन्यात त्या इच्छा, संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करा पण, नव्या वर्षाला सामोरे जाताना मनात कोणताही खेद बाळगू नका.
नव्या वर्षाचे स्वागत करताना मन प्रसन्न, आनंदी आणि उल्हासित असावे. म्हणून, हे वर्ष संपण्याला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही अशा गोष्टी ज्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देताना तुमच्या मनात कसलीच हूरहूर, चिंता असणार नाही.
या काही विशिष्ट गोष्टींकडे तुम्ही आत्ता जरी लक्ष दिले तरी, २०२० चे स्वागत अगदी टेन्शन फ्री राहून करू शकाल. डिसेंबरच्या टू-डू लिस्टमध्ये या काही गोष्टी अॅड केल्यास नव्या वर्षाच्या कॅलेंडरचे नवे पान पालटताना तुम्ही तणावमुक्त असाल..!
१. आरोग्यासाठी वेळ द्या
स्वतःचे आरोग्य ही अशी बाब आहे की, सतत ती गोष्ट ‘नंतर बघू’ च्या यादीत ढकलून देतो. तर, या वर्षभरात देखील तुम्ही तुमच्या शरीराच्या अशा किरकोळ तक्रारी किंवा रेग्युलर चेकअप प्लॅन नंतर करू म्हणून ठेऊन दिले असेल तर, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वर्षभरातील ब्लड टेस्ट, डेंटिस्ट अपॉइंमेंट, मॅमोग्राम अशा ज्या काही राहून गेलेल्या गोष्टी असतील त्यांना वेळ द्या.
२. कडवटपणा दूर करा
या वर्षात काही वस्तू, गोष्टी तुम्ही गमावल्या असतील तर त्याची रुखरुख बाळगू नका. एखाद्या मित्राशी/मैत्रिणीशी/घरातील/नात्यातील व्यक्तीशी वाद झाले असतील तर त्यांच्याशी संवाद साधून झालेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा.
संवाद साधूनही ते नाते पुन्हा जुळणार नाही असे वाटत असेल तर, त्याबद्दलचा कडवटपण मनातून काढून टाका आणि कोणतेही किलमिश न ठेवता स्वच्छ मनाने नव्या वर्षाचे स्वागत करा.
३. अडगळ साफ करा
तुमच्या घरातील जुन्या झालेल्या, तुम्हाला नकोशा असणाऱ्या वस्तू, कपडे, इतर गरजू व्यक्तींना देऊ शकता. नव्या वर्षाच्या स्वागताला सज्ज होण्यासाठी यावर्षी तुम्ही स्वतःसाठी नवी स्टाईल शोधू शकता.
४. आढावा घ्या
वर्ष भर तुम्ही जे जे काही व्यवहार केलेले आहेत त्या सर्वांचा आढावा घ्या. यावर्षी तुम्ही जो संकल्प केला होता तो पूर्ण झाला का आणि नसेल तर का नाही झाला याचा आढावा घ्या. तुमच्या ज्या काही चुका झाल्या असतील त्यावर पुन्हा नजर टाका आणि पुन्हा पुढील वर्षी त्याच-त्याच चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या.
५. पुढील वर्षीसाठी काही ध्येय निश्चित करा
पुढील वर्षासाठी जो काही संकल्प करणार आहात किंवा ध्येय ठरवणार आहात ते आत्तापासून निश्चित करा. त्यासाठी नवीन वर्षाचा पहिला दिवस उजाडण्याची वेळ वाट पाहत बसू नका.
६. आर्थिक कागदपत्रांची पूर्तता
कर भरण्याची अंतिम तारीख जवळ आल्यावर धावपळ करण्यापेक्षा तुमच्या आर्थिक व्यवहाराची आणि कर विवरणासाठी लागणारी जी काही कागदपत्रे असतील ते एकत्र जमा करून ठेवा. त्यामुळे ऐनवेळी येणारा ताण वाचेल. वेळेत कर भरल्याने येणाऱ्या रिटर्न्सचा देखील नववर्षाच्या स्वागतासाठी वापर करता येईल.
७. तुमच्या जवळच्या व्यक्तींना ते तुमच्यासाठी स्पेशल असल्याची जाणीव करून द्या
तुमच्या आयुष्यातील सर्वात स्पेशल व्यक्तींना ते किती स्पेशल आहेत याची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांच्या या अनमोल नात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना खास वेळ द्या.
त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते त्या भावना शेअर करा. कदाचित ते तुमच्यासाठी किती स्पेशल आहेत याची त्यांना जाणीव आहे, हे तुमच्याही लक्षात येईल.
८. ट्रीपचे नियोजन करा
या दिवसात केलेल्या प्रवासामुळे तुमच्या मनावरील मरगळ दूर होईल. हिवाळ्याच्या दिवसात केलेल्या पर्यटनाचा शरीराला आणि मनालाही विशेष लाभ होतो. ट्रीपचे प्लॅनिंग जरी करायला घेतलात तरी तुमच्यातील उत्साह वाढेल!
९. स्वतःशीच सूर जुळवण्याचा प्रयत्न करा
तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात पण, त्यासाठी वेळ मिळत नाही किंवा देता येत नाही असे वाटत असेल तर त्यासाठी आवर्जून वेळ काढा. उदाहरणार्थ, दिवसभर बसून एखादं पुस्तक वाचणे किंवा पेंटिंग करणे, मुव्ही पाहणे किंवा तुम्हाला काही नवनवीन गोष्टी शिकायच्या असतील तर, त्यासाठी एखाद्या कोचचा सल्ला घेणे.
१०. एखादं झाड दत्तक घ्या
मुल दत्तक घेण तर माहितीच आहे. पण, ते सगळ्यांना शक्य नसतं किंवा तशी आवश्यकताही नसते. गात वर्षाला निरोप देताना, आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एखाद झाड दत्तक घ्या. झाड नुसते लावून चालत नाही, तर लहान मुलाप्रमाणे त्याची देखभाल देखील करावी लागते. म्हणून झाड दत्तक घ्या आणि त्याच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारा. ही कल्पना तुम्हाला एक मस्त आनंदाची अनुभूती देऊन जाईल.
११. स्वतःची खोली साफ करा
साफसफाई साठी सणावारांचा मुहूर्त किंवा पावसाळ्याची चाहूलच लागली पाहिजे असे काही नाही. सरत्या वर्षाच्या शेवटी, किमान स्वतःची खोली तरी साफ करायला घ्या. तुम्ही साफसफाईत रस घेतलाय हे पाहून तुमच्या आईला देखील आनंद होईल.
१२. एक दिवस सोशल मिडिया बंद
फक्त एक दिवस सोशल मिडियापासून स्वतःला डीसकनेक्ट करा आणि खऱ्याखुऱ्या भोवतालाशी कनेक्ट व्हा. यात व्हाटसपचा देखील समावेश होतोच. या दिवशी प्रयोगादाखल म्हणून काही नवीन आणि वेगळ्या गोष्टी करता येतात का पहा.
१३. चुकीच्या सवयीपासून पिच्छा सोडवा
तुमच्यात एखादी चुकीची सवय असेल, ज्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना त्रास होतो, तर ती सोडण्याचा प्रयत्न करा. वर्षाच्या शेवटी असा प्रयत्न करायला काय हरकत आहे? कदाचित नव्या वर्षाच्या मुहूर्तावर स्वतःच स्वतःला एक चांगली भेट देऊ शकाल.
१४. अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करा
या वर्षात एखाद पुस्तक वाचायला घेतलेलं पण, ते पूर्ण झालच नाही, अस असेल तर ते पुस्तक पूर्ण करा. अशीच काही हातात घेतलेली काम फक्त आळस किंवा चालढकल केल्याने अर्धवट राहिली असतील तर, ती पूर्ण करून घ्या.
१५. मित्र-मैत्रिणींना भेटा
वर्षभराच्या बीजी शेड्युल मधून आपण जुन्या मित्र-मैत्रिणींकडे जरा कमीच लक्ष देतो. पण, अशा मित्र-मैत्रिणींसाठी वेळ काढा, त्यांना भेटा. फार तर एखाद दोन दिवस सोबत राहून मनसोक्त गप्पा मारा. जुन्या नात्यांना वेळ द्या.
अजूनही काही दिवस शिल्लक आहेत त्यामुळे आता कामाला लागा आणि नवीन वर्षाचं आनंदाने स्वागत करा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.