शांती दूताचा सन्मान…!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक: स्वप्निल श्रोत्री
===
यंदाचा, म्हणजेच २०१९चा नोबेल शांतता पुरस्कार इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना जाहीर झाला. जागतिक राजकारणात संघर्षाचे काळे ढग जमले असताना एखाद्या राष्ट्राच्या प्रमुखाला नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित केले जाणे ही त्या राष्ट्रासाठी अत्यंत गौरवास्पद बाब आहे.
इथिओपिया हे आफ्रिका खंडातील भूवेष्टित राष्ट्र (ज्याच्या सर्व बाजूंनी जमिनीने वेढल्याआहे ) असून त्याच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिमेला सुदान, दक्षिणेला केनिया तर पूर्वेला सोमालिया ही राष्ट्रे आहेत. अदिस अबाबा ही इथिओपियाची राजधानी असून इथिओपियातील सर्वात मोठे शहर आहे.
इथिओपिया हा जगातील प्राचीन देशांपैकी एक असून आफ्रिका खंडातील दुसरा सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देश आहे. इथिओपियातील लोकसंख्या ही साधारणपणे ७, ३७, ५०, ९३२ असून लोकसंख्येची घनता ९२. ७ प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे.
पाकिस्तान हा ज्याप्रमाणे स्वातंत्र्यपूर्वी भारताचा एक भाग होता त्याचप्रमाणे, इथिओपियाच्या उत्तरेला असलेला इरिट्रिया हा इथिओपियाचा भाग होता. परंतु स. न १९९१ मध्ये इरिट्रिया इथिओपिया पासून वेगळे होऊन स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आले. तेव्हापासून या दोन राष्ट्रांमध्ये सीमावादावरून संघर्ष होऊन आत्तापर्यंत लाखो बळी गेले आहेत.
संघर्ष काळात इथिओपियामध्ये आलेल्या लष्करी राजवटीने इरिट्रिया विरोधात लढण्यासाठी नागरिकांची बळजबरीने लष्करात भरती केली. सर्व राजकीय पक्ष व संघटनांवर बंदी घातली, माध्यमांवर बंधने लावली. जे लोक विरोधात जातील त्यांना एक तर बंदी बनविले किंवा त्यांची हत्या केली. ह्या काळात इथिओपियाची अर्थव्यवस्था फार मोठ्या प्रमाणात ढासळली.
अनेक नागरिकांनी देशांतर करून आफ्रिकेतील व जगातील इतर देशांचा आश्रय घेतला. अशा जुलमी व्यवस्थेने सन १९९८ ते सन २००० या काळात आपल्या स्वैराचाराचा उच्चांक गाठला. एका आंतरराष्ट्रीय अहवालानुसार सन १९९८ ते सन २००० ह्या काळात इथिओपिया मध्ये ८०, ००० नागरिकांची हत्या करण्यात आली होती.
अशा परिस्थितीत सन २०१८ मध्ये अबी अहमद इथिओपियाचे पंतप्रधान झाले. पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर अबी अहमद यांनी इरिट्रिया बरोबरील सीमावाद सोडविण्याची घोषणा करून त्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली. दोन्ही राष्ट्रांमध्ये बंद झालेले राजकीय संबंध पुन्हा एकदा सुरू केले.सीमावादावर तोडगा काढण्यासाठी इरिट्रिया बरोबर बैठका सुरू झाल्या.
अखेर सन २०१८ च्या शेवटी दोन्ही राष्ट्रांना मान्य होईल असा सर्वमान्य तोडगा काढून अबी अहमद यांनी सीमेवरील संघर्ष मिटविला आणि ह्याच कारणामुळे अबी अहमद यांना नोबेल शांततेच्या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
सीमेवरील शांततेबरोबरच अहमद यांनी देशांतर्गत शांततेवर भर दिला. हुकूमशाहीच्या काळातील वादग्रस्त निर्णय रद्द केले, नागरिकांचे जबरदस्तीने होणारे लष्करीकरण थांबविले, माध्यमांवरील बंधने उठवली, राजकीय पक्ष व संघटना यांना मान्यता दिली.
सर्व राजकीय कैद्यांची तुरुंगातून मुक्तता केली आणि हुकूमशाहीला कंटाळून जे नागरिक पूर्वी इथिओपियाला सोडून गेले होते त्यांना परत मायदेशी येण्याचे आवाहन करून त्यांच्या स्वातंत्र्याची व हक्काची ग्वाही दिली.
इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांनी गेल्या २ वर्षात केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद असून अनेकांसाठी ती प्रेरणादायी आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कधी इराण तर कधी उत्तर कोरिया तर कधी इतर कोणावरही हल्ला करण्याची धमकी देतात. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याची भाषा करतात, सौदीचे युवराज महमंद – बीन – सलमान यांच्यावर वॉशिंग्टन पोस्ट चे स्तंभलेखक जमाल खाशोगी यांच्या हत्येचा आरोप आहे. याशिवाय, जागतिक पटलावर अनेक देश संघर्षाच्या विविध पातळ्या ओलांडत असताना अबी अहमद यांनी जागतिक राजकारणाला दिशा देण्याचे काम केले आहे.
नोबेल शांतता पुरस्कारबद्दल थोडक्यात…
नोबेल शांतता पुरस्कार हा जगातील प्रतिष्ठित नोबेल पुरस्कारांमधील सर्वात प्रमुख पुरस्कार असून तो नोबेल फाउंडेशन कडून जागतिक शांततेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दिला जातो. नॉर्वेची राजधानी असलेल्या ओस्लो येथे दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो.
नोबल पुरस्कार हा स्वीडीश उद्योगपती व संशोधक सर अल्फेड नोबेल यांच्या सन्मानार्थ असून त्यांच्या स्मृतिदिनी म्हणजे १० डिसेंबर रोजी दिला जातो. मानपत्र, सन्मानचिन्ह व ९, ८६,००० अमेरिकी डॉलर ( आजच्या घडीला ६, ९८, ८०, २८५. ०० भारतीय रूपये ) असे पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार मरणोप्रांत दिला जात नाही.
नोबेल पुरस्कार विजेते भारतीय…
आत्तापर्यंत ९ भारतीयांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सन १९१३ मध्ये साहित्यासाठी रवींद्रनाथ टागोर यांना, सन १९३० मध्ये भौतिकशास्त्रासाठी सी. व्ही रमण यांना, सन १९७९ मध्ये शांततेसाठी मदर तेरेसा यांना, सन १९९८ मध्ये अर्थशास्त्रासाठी डॉ.अर्मत्य सेन यांना व सन २०१४ मध्ये पुन्हा शांततेसाठी कैलाश सत्यार्थी यांना नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
जन्माने भारतीय असून नंतर इतर देशांचे नागरिक झालेल्यांमध्ये सन १९६८ मध्ये भौतिकशास्त्रासाठी डॉ. हरगोविंद खुराना यांना, सन १९८३ मध्ये पुन्हा भौतिकशास्त्रसाठी सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना, सन २००९ मध्ये रसायनशास्त्रासाठी व्यंकटरमण् रामकृष्णन् यांना आणि सन २०१९ मध्ये अर्थशास्त्रासाठी अभिजित बॅनर्जी यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.