इंटरव्ह्यू असो वा चॅटिंग: इंग्लिश बोलताना भलेभले लोक या १० चुका हमखास करतातच!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
इंग्रज गेले पण आपल्यावर इंग्रजीचे भूत सोडून गेले. आपल्याला एकूणच इंग्रज आणि इंग्रजी ह्यांचे इतके वेड आहे की एकवेळ मातृभाषा अर्धवट आली तरी चालेल पण इंग्लिश चांगले आलेच पाहिजे असा आपला प्रयत्न असतो.
आपण मातृभाषेत बोलताना काही चुकलो तर फार कुणी मनावर घेत नाही. पण चारचौघात इंग्लिश बोलताना एखादी चूक झाली तर सगळे “काळे इंग्रज” उर्फ ग्रामर-नाझी आपली चूक सुधारण्याच्या मागे लागतात.
इंग्रजी बोलता येणे हे सुसंस्कृतपणाचे किंवा आधुनिकपणाचे किंवा सुशिक्षितपणाचे लक्षण मानले जाते. ह्यामुळेच एखाद्याला जर इंग्रजी येत नसेल तर त्याला अगदी गावंढळ किंवा अशिक्षित मानले जाते. ह्याच मुळे अनेकांना न्यूनगंड येतो.
नमक हलाल हा चित्रपट ज्यांनी बघितला आहे त्यांना अमिताभ बच्चन ह्यांचा “इंग्लिश इज व्हेरी फनी लँग्वेज” हा संवाद आठवत असेलच इंग्लिश भाषा ही कठीण नाही. फक्त तिचा सराव करत राहणे आवश्यक असते.
आपल्या मराठी, हिंदी, संस्कृत भाषेत आपण जे लिहितो तसाच त्या शब्दाचा उच्चार असतो. पण इंग्लिश आणि इतर विदेशी भाषांचे तसे नाही. ह्या भाषांमध्ये जसे स्पेलिंग असेल तसाच त्याचा उच्चार असेल असेही नाही. तसेच काही शब्दांच्या स्पेलिंगमध्ये काही अक्षरे सायलेंट असतात.
तसेच शब्दांचे उच्चार खूप भिन्न असतात. त्यामुळे आपली गडबड होते. आपण भारतीय लोक इंग्लिश भाषेत संभाषण करताना किंवा लिहिताना अनेक चुका करतो. त्या चुका लक्षात ठेवल्या आणि टाळल्या तर आपण सुद्धा अगदी सफाईदारपणे फाडफाड इंग्लिश बोलू शकू.
१. आपल्यापैकी अनेक लोक एखाद्याचा उल्लेख करताना त्या मिस्टर किंवा मिसेस असे संबोधन लावून त्या व्यक्तीचे फक्त नाव पुढे लावतात. खरं तर मिस्टर किंवा मिसेस म्हटल्यानंतर पुढे त्या व्यक्तीचे नाव आणि आडनाव घेणे अपेक्षित असते, किंवा मिस्टर किंवा मिसेस म्हटल्यानंतर पुढे फक्त आडनाव घेणे अशी पद्धत आहे.
पण आपण मात्र सर्रास चुकीचे बोलतो. उदाहरणार्थ केवळ ‘मिस्टर अमिताभ’ असे न म्हणता ‘मिस्टर अमिताभ बच्चन’ असे संपूर्ण नाव किंवा ‘मिस्टर बच्चन’ असे लिहायला किंवा बोलायला हवे.
२. अशीच दुसरी “सिली” मिस्टेक म्हणजे एखाद्याने त्याच्याबरोबर असलेल्या व्यक्तीची “धिस इज माय ब्रदर/सिस्टर” अशी ओळख करून दिली, तर अनेक लोक त्याला “इज धिस युअर रियल ब्रदर/ सिस्टर?” असा उलट प्रश्न विचारतात. भाऊ किंवा बहीण हे खरेच असतात. खोटे बहीण/ भाऊ कसे असू शकतील?
त्यामुळे “रियर ब्रदर/ सिस्टर” हा शब्दप्रयोग करणेच चुकीचे आहे. इंग्लिशमध्ये फक्त सख्ख्या भावंडांनाच “ब्रदर/ सिस्टर” असे म्हणण्याची पद्धत आहे. चुलत/ मावस/ आते/मामे /लांबचा/ मानलेला अश्या सगळ्या नात्यातील भावंडांना “कझीन” असे म्हणण्याची पद्धत आहे.
त्यामुळे तुम्हाला कुणी उद्या तुमच्या “रियल ब्रदर/ सिस्टर” बद्दल विचारले तर त्यांना उलट प्रश्न करा की “अनरियल ब्रदर/ सिस्टर” असे असतात बुवा?
३. आपण एखाद्या घडून गेलेल्या घटनेविषयी एखाद्याला सांगताना सहज म्हणून जातो की “इट हॅपन्ड फाईव्ह इयर्स बॅक! ” पण हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. हे सरळसरळ मराठी किंवा हिंदीचे शब्दश: भाषांतर केल्यासारखे वाटते. “ह्या घटनेला पाच वर्षे झाली. किंवा यह पांच साल पुरानी बात है” असे तुम्हाला म्हणायचे असेल तर “इट हॅपन्ड फाईव्ह इयर्स अगो” असा शब्दप्रयोग करणे उचित आहे.
४. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीशी एखाद्या मुद्द्यावर चर्चा करायची असेल तर आपण बिनधास्तपणे म्हणतो, “आय वॉन्ट टू डिस्कस अबाउट …..” . पण हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. टू डिस्कस म्हणजेच चर्चा करणे होय. चर्चेसाठी कुठलातरी विषय लागतोच.
म्हणूनच डिस्कस ह्या शब्दाबरोबर अबाउट हा शब्द लावणे चुकीचे आहे. उदाहरणार्थ “लेट अस डिस्कस अबाउट प्लॅन फॉर टुमॉरो” असे न म्हणता “लेट अस डिस्कस द प्लॅन फॉर टुमॉरो” असे बोलणे योग्य आहे.
५. आपल्याला एखाद्याने लग्नाला बोलावले असेल तर आपण सहज म्हणून जातो की ,”ऑफ कोर्स, वी आर गोइंग टू अटेंड युअर मॅरेज”. पण मॅरेज ह्या शब्दाचा अर्थ “दोन व्यक्तींमधील नाते” असे आहे. नवरा बायकोच्या नात्याला मॅरेज म्हणतात.
हे नाते ज्या सोहळ्यामुळे अधिकृत होते त्या सोहळ्यासाठी “वेडिंग” असा शब्द आहे. दोन व्यक्ती ह्या एकमेकांशी लग्नाच्या नात्यात म्हणजेच “मॅरेज” ने एकमेकांशी जोडल्या जातात त्या सोहळ्याला वेडिंग असे नाव आहे. त्यामुळे आपण एखाद्याच्या “मॅरेज” ला उपस्थित राहत नसून “वेडिंग” ला उपस्थित राहतो. म्हणूनच “वी आर गोइंग टू अटेंड युअर वेडिंग” असा शब्दप्रयोग उचित आहे.
कुणाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, हॅप्पी मॅरेज एनिवर्सरी , असं म्हणणं चुकीचं ठरतं, त्यावेळी हॅपी वेडिंग एनिवर्सरी असं म्हणायला हवे.
६. आपण परीक्षेसंदर्भात सुद्धा खूप मोठा घोळ करतो. आपल्या परीक्षेबद्दल सांगताना आपण सर्रास चुकीचे बोलतो. “आय गेव्ह द XYZ एक्झाम लास्ट इयर”.
आपण परीक्षा देणे ह्या वाक्याचे शब्दश: भाषांतर आय गेव्ह एक्झाम असे करतो. पण इंग्लिशमध्ये हाच वाक्यप्रयोग “आय टुक द XYZ एक्झाम लास्ट इयर” असा होतो.
७. खरेदीला जाताना आपण म्हणतो “वी आर गोइंग फॉर शॉपिंग” पण हे चूक आहे. ही तर खूप सामान्य चूक आहे जी अनेक लोक नकळतपणे करतात. खरेदीला किंवा खरेदी करण्यासाठी ह्या शब्दांचे भाषांतर फॉर शॉपिंग असे करतात. पण शॉपिंग ह्या शब्दाचा अर्थच खरेदी करणे असा आहे. म्हणूनच “वी आर गोइंग शॉपिंग” असा वाक्यप्रयोग करणे योग्य आहे.
८. आपण अनेकदा इन आणि ऍट ह्यात गल्लत करतो. माझे गणित चांगले किंवा पक्के आहे असे म्हणताना आपण “आय ऍम गुड इन मॅथ्स” असे म्हणतो. पण हा वाक्यप्रयोग चूक आहे. गुड नंतर नामाच्या आधी इन हे शब्दयोगी अव्यय (प्रेपोझिशन) न लागता ऍट हे अव्यय लावतात. म्हणूनच “आय ऍम गुड ऍट मॅथ्स” असा वाक्यप्रयोग योग्य आहे.
९. एखाद्या विषयावर चर्चा सुरु असेल आणि तो विषय बदलून आपल्याला काही वेगळे बोलायचे असेल तर आपण सहजपणे “एनीवेज” असे म्हणतो. पण इंग्रजी भाषेत एनीवेज नावाचा असा कुठला शब्दच नाहीये. त्याऐवजी एनीवे असा शब्द आहे.
ह्याचप्रमाणे अकॉर्डिंग ह्या शब्दाचा वापर प्रथमपुरुषी नाम किंवा सर्वनामासाठी करणे चुकीचे आहे. अकॉर्डिंगचा उपयोग हा कायम दुसऱ्यासाठी करणे उचित आहे. उदाहरणार्थ अकॉर्डिंग टू मी असे म्हणणे चूक आहे आणि अकॉर्डिंग टू यू, हिम किंवा हर असे म्हणायला हवे.
१०. बरेच लोक कोप-अप असा शब्दप्रयोग करतात. कोप हे एक क्रियापद आहे आणि ह्या शब्दाचा ढोबळ अर्थ एखाद्या दुर्दैवी घटनेचा किंवा व्यक्तीचा किंवा परिस्थितीचा सामना करणे असा होतो. कोप विथ ही एक फ्रेज (वाक्यांश) आहे.
पण बहुतेक लोक कोप-विथ न म्हणता कोप-अप असे म्हणतात. उदाहरणार्थ “यु हॅव टू कोप अप विथ द सिच्युएशन” हे वाक्य चुकीचे आहे. तर “यु हॅव टू कोप विथ द सिच्युएशन” हे वाक्य बरोबर आहे.
तेच रिव्हर्ट च्या बाबतीत होते. रिव्हर्टचा अर्थच परत किंवा मागे येणे असा आहे. त्यामुळे आपण रिव्हर्ट बॅक असे म्हणतो तेव्हा त्या वाक्याला काही अर्थच राहत नाही. “प्लिज रिव्हर्ट बॅक टू माय मेल” असे म्हणणे चूक असून “प्लिज रिव्हर्ट टू माय मेल” असे म्हणणे योग्य आहे.
अश्या अनेक लहान सहान चुका आपण करतो पण त्यामुळे वाक्याचा अर्थच बदलून जातो. त्यामुळे इंग्लिश काय कुठलीही भाषा बोलताना अर्थाचा अनर्थ होऊ नये म्हणून ती योग्य प्रकारे बोलली किंवा लिहिली जाण्याकडे आपला कटाक्ष असला पाहिजे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.