समुद्रावरील लुटारू “पायरेट्स” डोळ्यावर पट्टी का लावतात? वाचा रंजक उत्तर!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
समुद्री चाचे किंवा लुटारू किंवा साध्या भाषेत बोलायचे तर पायरेट्स ह्यांचा वेष अगदी वेगळाच असतो. त्यांची ती विशिष्ट हॅट, ते कपडे, तोंडात एखादा सोन्याचा दात, हातात तलवार, खांद्यावर एखादा पोपट किंवा दुसरा पक्षी आणि एका डोळ्यावर पट्टी! पायरेट म्हटलं की असाच मनुष्य डोळ्यांपुढे येतो.
पायरेट्स ऑफ द कॅरिबियन येईपर्यंत पायरेट म्हणजे एखादा भयानक दिसणारा मनुष्य डोळ्यापुढे येत असे. पण जॉनी डेपने जॅक स्पॅरो अजरामर केला आणि सगळेच पायरेट्स हे दिसायला कुरूप आणि भयंकर नसून ते देखणे देखील असू शकतात ही नवी कल्पना रुजली.
अर्थात जॅक स्पॅरोच्या डोळ्यांवर पट्टी किंवा आय पॅच नव्हते, पण समुद्री लुटारु म्हटले की हातात तलवार, डोक्यावर कवटीचे चित्र असलेली हॅट, लांब कोट, स्ट्रिप्ड शर्ट, चेहेऱ्यावर जखमांचे व्रण, खांद्यावर शिव्या देणारा एखादा पोपट आणि डोळ्यावर आय पॅच असलेला मनुष्य असेच चित्र आपल्या डोळ्यांपुढे येते.
तर पायरेट्सचा ट्रेडमार्क असलेले हे आय पॅच त्यांच्या डोळ्यावर का असते? पूर्वी मोतीबिंदूचे ऑपरेशन झाल्यावर रुग्णाच्या डोळ्यांवर अशी हिरवी पट्टी असायची. मग पायरेट्सच्या डोळ्यांवर ती काळी पट्टी का असते?
समुद्री लुटारू वारंवारच युद्ध आणि लढाया लढत असत त्यामुळे ह्यांत त्यांना वारंवार जखमा होत असणारच! लढाईत डोळ्याला इजा होणे सुद्धा शक्य आहे. त्यामुळे लढाईत जर एका डोळ्याला इजा होऊन तो कायमचा निकामी झाला तर तो बंद ठेवायला म्हणून लुटारु त्यावर आय पॅच लावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
समुद्री लुटारूंचे आयुष्य म्हणजे काय सामान्य माणसासारखं साधं सरळ कधीच नव्हतं! कायम एक तर शत्रू हल्ला करेल ह्याची भीती किंवा सैनिक येऊन पकडून नेतील ही भीती! त्यांच्या डोक्यावर कायमच टांगती तलवार असायची. त्यामुळे त्यांना सतत सजग आणि युद्धासाठी, लढाईसाठी तयार राहावे लागायचे.
कधी कुठल्या शत्रूचे जहाज येईल आणि हल्ला करेल ह्याची काहीच शाश्वती नाही, त्यामुळे सततच सतर्क आणि लढाईसाठी सज्ज राहणे ह्यांवाचून त्यांच्याकडे पर्याय नसायचा. रात्र असो की दिवस,जहाज चालवण्यासाठी त्यांना सज्ज राहावं लागत असे.
तसेच त्यांचा स्वतःचा उद्योग म्हणजे लूटमार करणे ह्यासाठी सुद्धा त्यांना सतत तयार राहावे लागत असे. रात्रीच्या अंधारात सुद्धा दृष्टी चांगली तीक्ष्ण राहण्यासाठी ते डोळ्यांवर पॅच लावत असत. म्हणजेच त्यांचा एक डोळा रात्रीच्या अंधारात सुद्धा अगदी चांगल्याप्रकारे काम करत असे.
सायंटिफिक अमेरिकनच्या मते आपल्या मानवी डोळ्याला अंधारात ऍडजस्ट करण्यासाठी जास्तीत जास्त तीस मिनिटे लागू शकतात. आता भर समुद्रात रात्री उजेड कुठून येणार? पूर्वीच्या काळी तर वीज सुद्धा नव्हती.
मशाली, कंदील ह्यांचाच काय तो उजेड असणार. त्यात जर अमावास्येची रात्र असली तर भयाण गुडूप अंधारातच त्यांना युद्ध, लुटालूट किंवा लढाई करावी लागणार.
जर त्यांना रात्रीच्या अंधारात ऍडजस्ट करायला जास्त वेळ लागला तर एकतर त्यांच्या जहाजासकट ते समुद्राच्या तळाशी तरी जातील किंवा शत्रूच्या तावडीत तरी सापडतील. अशी परिस्थिती येऊ नये आणि रात्रीच्या अंधारात पटकन डोळे ऍडजस्ट व्हावेत म्हणून लुटारू डोळ्यांवर पॅच लावत असल्याचे म्हटले जाते.
अर्थात हे सिद्ध करण्यासाठी कुठेही ऐतिहासिक नोंदी सापडत नाहीत. पण लॉजिक लावून विचार केला तर त्यातल्या त्यात हेच कारण पटण्यासारखे वाटते.
रात्रीच्या अंधारात दृष्टी पटकन ऍडजस्ट होण्यासाठी लुटारू डोळ्यांवर पॅचेस लावत असावेत का ह्याचे उत्तर शोधण्यासाठी मिथबस्टर्स नावाच्या एका टीव्ही कार्यक्रमात एक प्रयोग करण्यात आला.
त्यांनी एका अंधाऱ्या खोलीत अश्या माणसांना पाठवले ज्यांचे डोळे प्रकाशाला ऍडजस्ट झाले होते. ही माणसे अंधाऱ्या खोलीत गेली तेव्हा त्यांना बघण्यास त्रास झाला. ते धडपडले. त्यांना बाहेर येण्याचा रस्ता शोधण्यास अडचणी आल्या.
त्यानंतर त्यांनी त्याच लोकांना त्याच खोलीत पाठवले आणि त्याआधी त्यांच्या डोळ्यांवर ३० मिनिटांसाठी पट्टी बांधली होती. ह्यावेळी त्या लोकांना त्या खोलीतून बाहेर पडण्यास कमी वेळ लागला.
ह्यातून असेच सिद्ध होते की डोळ्यांवर पट्टी बांधून ठेवली तर रात्रीच्या अंधारात बघण्यास त्रास होत नाही. आणि दृष्टी पटकन सरावते. पायलट लोक सुद्धा त्यांच्या नाईट व्हिजनसाठी असाच काहीसा सराव करत असल्याचे सांगितले जाते.
हे सिद्ध करण्यासाठी कुठलेही ऐतिहासिक पुरावे नाहीत. पण काही लोकांचे असेही म्हणणे आहे की हे लोक सतत जहाजावर असल्याने आणि डेकच्या खाली व डेक वर दोन्ही ठिकाणी नीट बघता यावे, कुठेही पटकन जावे लागल्यास तिथे दृष्टी पटकन ऍडजेस्ट व्हावी म्हणून हे लोक एका डोळ्यावर कायम पॅच लावून ठेवत असावेत.
त्या काळी वीज ,दिवे ह्यांची सोय नसल्यामुळे डेकच्या खाली अंधारच असणार. माणूस जेव्हा अंधारातून उजेडात जातो तेव्हा आपली दृष्टी पटकन सरावते.
पण जेव्हा आपण तीव्र प्रकाशातून अंधारात जातो तेव्हा आपल्याला बघण्यास त्रास होतो. आपली दृष्टी ऍडजस्ट होण्यास वेळ लागतो. कारण अंधारात बघता येण्यासाठी आपल्या डोळ्यात फोटो पिगमेंट तयार व्हावे लागते आणि ते तयार होण्यास थोडा वेळ लागतो.
म्हणून हे लुटारू डोके चालवून एक डोळा कायम बंद ठेवत असावेत की डेकच्या खाली अंधारात जावे लागले तर डोळ्यावरील पॅच काढून पटकन तिथे बघता यावे आणि उजेडात गेल्यावर पॅच लावून डोळा परत बंद करून टाकता यावा.
तर… काही लुटारू त्यांच्या सोयीसाठी हे करत असावेत आणि हळूहळू हे आय पॅच त्यांची एक ओळखच झाली. तो त्यांच्या वेशभूषेचा एक अविभाज्य भाग झाला.
आता पायरेट्स म्हटलं की आपल्या डोळ्यांपुढे डोळ्यावर पट्टी बांधलेला, हाताला एक हुक आणि क्वचित एक लाकडाचा पाय आणि हातात तलवार घेतलेला ट्रेझर आयलंड कादंबरीमधला लॉन्ग जॉन सिल्वर किंवा पीटर पॅन मधील कॅप्टन हुक उभा राहतो.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.