' सचिनच्या झंझावातामुळे प्रत्येकवेळी झाकोळला गेलेला क्रिकेटमधला खरा ‘जंटलमन’! – InMarathi

सचिनच्या झंझावातामुळे प्रत्येकवेळी झाकोळला गेलेला क्रिकेटमधला खरा ‘जंटलमन’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : सचिन मणेरिकर 

===

वटवृक्षाच्या छायेत कोणतेच झाड वाढत नाही त्याचा पूर्ण विकास होत नाही असं म्हणतात.

वटवृक्ष सावली देतो, वेलींना आधार देतो पण त्याचबरोबर त्याच्या प्रचंड आकारामुळे त्याच्या सावलीतील झाडांची वाढ होत नाही.

भारतीय क्रिकेट मधला असा वटवृक्ष म्हणजे सचिन तेंडूलकर!

 

Sachin-inmarathi
media3.bollywoodhungama.in

 

असे खूप कमी विक्रम असतील जे या महान खेळाडूच्या नावावर नसतील. २४ वर्ष “भारतीय क्रिकेट” म्हटलं की लोकांच्या तोंडात फक्त सचिनचंच नाव असायचं.

पण अशावेळी एक खेळाडू मात्र शांतपणे आपलं काम करत होता.

त्याच्या नावाचा कधी स्टेडियममध्ये जयघोष झाला नाही की कधी त्याचं नाव लोकांनी अंगावर रंगवून घेतलं नाही.

तरीही त्याने १६ वर्ष कसोटी क्रिकेटमध्ये आपले एक अढळ स्थान टिकवून ठेवले… तो खेळाडू म्हणजे राहुल द्रविड!

 

rahul-dravid-marathipizza00
sportskeeda.com

 

२० जून १९९६ हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी अविस्मरणीयच म्हणावा लागेल.

क्रिकेटच्या क्षितिजावर यानंतर बरीच वर्षे झळकत रहाणारे दोन तारे या दिवशीच आपली पहिली कसोटी खेळले. तेही क्रिकेटची पंढरी म्हटली गेलेल्या लॉर्डस मैदानावर!

त्यांची नावं होती सौरभ गांगुली आणि राहुल द्रविड!

हे दोघेही एकत्रच पदार्पण करत असले तरी त्यांची पार्श्वभूमी खूप वेगळी होती.

राजघराण्यातील गांगुलीला १९९२ साली संघात १२ वा खेळाडू म्हणून स्थान मिळालं होतं, पण काही कारणामुळे तो बाहेर फेकला गेला आणि आता परत त्याला संधी मिळत होती.

पण राहुल द्रविड मात्र देशांतर्गत क्रिकेटमधल्या दर्जेदार कामगिरीमुळे आणि भक्कम तंत्रामुळे जाणकाराच्या मनात आपलं स्थान निर्माण करून संघात आला होता.

आपल्या पहिल्याच सामन्यात त्या लॉर्डसच्या खेळपट्टीवर ९५ धावा काढून राहुलने आपल्या आगमनाची दमदार बातमी दिली. पण दुर्लक्षित केले जाण्याची सुरवातही इथूनच झाली.

 

dravid test debut inmarathi
indianexpress.com

 

याच सामन्यात सौरभ गांगुलीने तडाखेबाज १३३ धावा केल्या आणि त्यामुळे राहुलची खेळी झाकोळली गेली. आजही लॉर्डस टेस्ट म्हटली की लोकांना गांगुलीचे १३३ आठवतात पण द्रविडचे ९५ नाही आठवत.

हीच गोष्ट द्रविडच्या करिअरमध्ये वारंवार घडत राहिली.

भारताने मिळवलेला असाच एक अविस्मरणीय विजय म्हणजे कोलकाता टेस्ट! ऑस्ट्रेलियाच्या सगळ्यात तगड्या गोलंदाजी विरुद्ध द्रविडने १८० रन्स काढून भारताला फॉलोऑन नंतरही विजय मिळून देण्यात सिंहाचा वाट उचलला.

पण इथेही व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने काढलेल्या २८१ रन्स आणि हरभजनची गोलंदाजीच लोकांच्या लक्षात राहिली.

 

rahul-dravid-marathipizza01
grabhouse.com

पण राहुल द्रविडने या गोष्टींकडे कधी लक्षच दिले नाही.

“संघासाठी आपलं १०० टक्के देणं” हे एकच काम तो इमाने इतबारे करत राहिला. मग ते संघाचा समतोल राखण्यासाठी २००३ च्या विश्वचषकात यष्टिरक्षण करणं असुदे नाहीतर २०१२ च्या ऑस्ट्रेलियातील संघाच्या खराब प्रदर्शना नंतर वरिष्ठांनी निवृत्त व्हावे असा सूर निघाल्यावर सगळ्यात आधी निवृत्ती घोषित करणे असो.

राहुल द्रविडने संघाचाच विचार नेहमी पहिला केला.

सचिन तेंडूलकरचा समकालीन असल्यामुळे राहुल द्रविडचे महत्व कमी केले जाते. मात्र जर एकूणच क्रिकेटचा विचार केला, तर आकडेवारी सगळं सांगून जाते.

कसोटी क्रिकेटच्या जवळपास दीडशे वर्षांच्या मोठ्या इतिहासात राहुल द्रविडपेक्षा जास्त रन्स काढणारे फक्त ३ खेळाडू आहेत (त्यातील जॅक कॅलीस हा फक्त १ धावेने पुढे आहे ).

१६४ सामन्यात ५२.३१ च्या सरासरीने १३२८८ धावा काढून राहुल द्रविड सर्वकालीन खेळाडूंमध्ये ४थ्या क्रमांकावर आहे, तर शतकाच्या यादीत ३६ शतके झळकावून तो ५ व्या स्थानी आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कठीण समजली जाणारी आणि अनेक दिग्गजांनी आपली छाप सोडलेली तिसऱ्या क्रमांकाची जागा राहुल द्रविडने आपलीशी केली होती.

राहुल द्रविडचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा भक्कम बचाव आणि संयम! षटका मागून षटके निर्धाव खेळण्यासाठी लागणारा संयम हेच त्याचं प्रमुख शस्त्र होतं.

पण नंतर हाच राहुल द्रविड एकदिवसीय सामन्यातही आपली आक्रमक फलंदाजी दाखवू लागला.

 

dravid 2 inmarathi
cricketcountry.com

 

२२ चेंडूत अर्धशतक करून त्याने आपण सर्वप्रकारच्या खेळात प्रवीण असल्याचे दाखवून दिले. कारकीर्दीच्या शेवटी शेवटी तर २०-२० सामन्यातही द्रविडच्या फलंदाजीची जादू चालू लागली होती.

एकदिवसीय सामन्यात राहुल द्रविडने बरीच वर्ष भारताचे प्रतिनिधित्व केले. पण एकदिवसीय संघात तो स्थिरावला नाही. एक ते सात या सगळ्या स्थानांवर त्याला फलंदाजी करावी लागली.

संघासाठी काहीही करणाऱ्या राहुल द्रविडने कधीच याची तक्रार केली नाही.

सचिनला २००७ च्या विश्वचषकात जेव्हा ४ थ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरावे लागले तेव्हा त्याने आपली नाराजी सरळ व्यक्त केली होती. पण सातव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागूनही कधीच राहुल द्रविडने तक्रार केली नाही.

कर्णधार पदाचा काटेरी मुकुटही त्याने काही काळ सांभाळला. पण मितभाषी द्रविडला ते ओझं जड जाऊ लागलं. त्याचा खेळ खालावू लागला. तेव्हा त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.

 

rahul-dravid-marathipizza03
playyoursport.com

 

२०११ च्या इंग्लंड दौऱ्यात पूर्ण संघ ढेपाळत असताना एकटा राहुल द्रविड शतका मागून शतके मारत होता.

कित्येक वर्ष भारतीय संघाचा संकटमोचक म्हणून राहुल द्रविडचेच नाव घेतले जात होते.

नवीन खेळाडूंना संधी देण्यासाठी चांगलं खेळत असतानाही राहुल द्रविडने निवृत्तीची घोषणा करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

राहुल द्रविडला कधीही कोणी म्हटलं की, त्याची फलंदाजी चांगली झाली तर तो कायम दुसऱ्या कुणाचं तरी नाव घेणार आणि सांगणार की तो माझ्यापेक्षा चांगला खेळला.

असा निस्वार्थीपणा आणखी कोणत्याच खेळाडूत दिसणे शक्य नाही.

आपल्या निवृत्तीचा सोहळा होऊ नये म्हणून त्याने अचानक निवृत्ती घोषित केली. निवृत्ती नंतरही त्याचा सहकारी गांगुली राजकारणात हात पाय मारतोय, तर सचिन नवीन क्रिकेट स्पर्धा भरवतो आहे.

पण द्रविड मात्र कमी प्रसिद्धीच्या भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करतोय आणि नवे खेळाडू घडवतोय.

 

rahul-dravid-marathipizza04
youthconnect.in

 

आयुष्यभर कोणत्याच वादात न पडलेल्या या खेळाडूची, भारतीय क्रिकेटला अजूनही गरज आहे आणि तोही अशीच क्रिकेटची सेवा करत राहो हीच प्रार्थना!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?