शुक्र ग्रहावर स्वारी ते अवकाशात भारतीय “स्पेस स्टेशन”…! : इसरोचे ६ जबरदस्त आगामी मिशन्स!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
चंद्रयान २ मोहिमेची जगात सगळीकडे चर्चा झाली. ऑर्बिटरच्या मदतीने विक्रम लॅन्डरचा ठावठिकाणा तर लागला पण त्याच्याशी अजून संपर्क जोडणे शक्य झाले नाही. जरी विक्रम लॅन्डरचे काम ठप्प असले तरीही ऑर्बिटरचे काम सुरळीत सुरु असल्यामुळे चंद्राचा अभ्यास करणे आपल्या अवकाश संशोधकांना शक्य होणार आहे.
त्यांचे काम सुरु झालेही असेल. पण चंद्रयान २ नंतर पुढे काय असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला आहे.
प्रयोग करताना अपयश आले तरी शास्त्रज्ञ आणि संशोधक त्यांचे काम थांबवत नाहीत. ते लगेच मागच्या प्रयोगात काय चूक झाली हे शोधून काढतात आणि पुढच्या अभ्यासाला लागतात.
इसरोमध्येही चंद्रयान २ नंतर अश्या सहा मोठ्या आणि महत्वाकांक्षी मोहिमांची आखणी करणे सुरु झाले आहे आणि त्यावर अभ्यास व कामाला देखील सुरुवात झाली आहे.
चंद्राच्या अभ्यासासह इसरोने मंगळ, शुक्र व सूर्याच्या अभ्यासासाठी तसेच अवकाशाचा अधिक अभ्यास करण्यासाठी पुढील मोहीमा आखण्यास सुरुवात केली आहे. ह्या मोहीमा येत्या काही वर्षांत पूर्ण होतील.
१. आदित्य एल वन मिशन
चंद्रयान २ नंतर इसरोने आदित्य एल वन ह्या मोहिमेची आखणी केली आहे. २०१९-२०२० ह्या वर्षांत आदित्य एल वन मिशन लाँच केले जाईल. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात येणारे इसरोचे हे पहिले अवकाशयान असेल.
ह्या मोहिमेत सूर्याच्या करोना म्हणजेच प्रभामंडळाचा अभ्यास करण्यात येईल. सूर्याचे प्रभामंडळ म्हणजेच करोना हे सूर्यापासून हजारो किलोमीटर्सपर्यंत पसरलेले आहे.
येत्या वर्षात किंवा पुढच्या वर्षात हे अवकाशयान प्रक्षेपित करण्यात येण्याची शक्यता आहे. श्रीहरीकोटा हून PSLV रॉकेट वरून हे अवकाशयान अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहे. सध्या तरी ह्या रॉकेटमध्ये व्हिजिबल एमिशन लाईन कोरोनोग्राफ (VELC ) हे १ पेलोड असणार आहे.
ज्या कक्षेत हे यान सोडले जाईल त्या कक्षेत भ्रमण करताना ह्या यानावर कुठल्याही प्रकारच्या ग्रहणाचा परिणाम होणार नाही आणि त्यामुळे सूर्याच्या अभ्यासात कुठलाही खंड पडणार नाही. ह्या बरोबरच ह्या यानात सूर्याच्या अभ्यासासाठी इतर सहा पेलोड्स असतील.
ह्या यानाद्वारे आपल्याला सूर्याच्या फोटोस्फिअर, क्रोमोस्फिअर आणि करोना ह्या तीन बाबींचा अभ्यास करणे शक्य होणार आहे.
तसेच पार्टीकल पेलोड्सद्वारे सूर्यातून उत्सर्जित होणारे आणि एल वन ह्या कक्षेत पोहोचणाऱ्या पार्टीकल फ्लक्सबद्दल सुद्धा माहिती मिळेल. तसेच मॅग्नॉमीटर पेलोड मॅग्नेटिक फिल्डमध्ये होणाऱ्या चढउतारांची नोंद घेणार आहे.
सूर्याच्या प्रभामंडळाचे तापमान हे त्याच्या पृष्ठभागाच्या तापमानापेक्षा जवळजवळ एक दशलक्ष डिग्री केल्व्हिनने जास्त आहे.
सध्या नासाचे पार्कर प्रोब ह्या प्रभामंडळाचा अभ्यास करून हे शोधून काढण्याचा प्रयत्न करीत आहे की सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा प्रभामंडळाचे तापमान इतके जास्त का आहे? येत्या एक दोन वर्षांत आपले आदित्य एल वन सुद्धा ह्या अभ्यासास सुरुवात करेल.
इसरोसाठी हा खूप महत्वाचा प्रोजेक्ट आहे.
२. गगनयान मिशन
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी २०१८ साली घोषणा केली होती की आपला देश सुद्धा लवकरच अवकाशात अंतराळवीरांना पाठवणार आहे. ज्या यानातून अंतराळवीर अवकाशात जातील त्या यानाचे नाव ‘गगनयान’ असे ठेवण्यात आले होते.
हे यान २०२२ साली प्रक्षेपित केले जाईल अशी चर्चा आहे. आजवर जगातील फक्त तीन देशांना त्यांच्या यानातून अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात यश मिळाले आहे.
जर भारताचे हे मिशन यशस्वी झाले तर अवकाशात अंतराळवीर पाठवणाऱ्या देशांमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागेल. सध्या इसरोमध्ये गगनयानच्या लाईफ सपोर्ट सिस्टीम आणि एन्व्हायर्नमेंटल कण्ट्रोल सिस्टीमचे काम सुरु आहे.
ह्या यानातून तीन अंतराळवीरांची टीम एकूण सात दिवसांसाठी अवकाशात पाठवण्यात येईल. डिसेंबर २०२१ मध्ये GSLV Mk III ह्या रॉकेटद्वारे गगनयान चे प्रक्षेपण करण्यात येईल असे सध्या तरी योजलेले आहे. इसरोचे सध्याचे हे सर्वात महत्वाचे मिशन आहे.
ह्याची अनमॅनड टेस्ट डिसेंबर २०२० मध्ये घेतली जाईल आणि दुसरी टेस्ट २०२१ च्या जुलै महिन्यात घेतली जाण्याची शक्यता आहे. ह्या दोन्ही टेस्ट यशस्वी झाल्या तर डिसेंबर २०२१ मध्ये भारतीय अंतराळवीर पहिल्यांदा अवकाशात जातील.
ह्या मिशनचे बजेट दहा हजार कोटी रुपये इतके असून हे मिशन भारताचे आजवरील सर्वात मोठे मिशन असणार आहे.
३. मंगलयान २ मिशन (मॉम २)
मंगलयान २ किंवा मॉम २ हे मिशन २०२२ -२३ ह्या वर्षांत पूर्ण करण्याची इसरोची योजना आहे हे भारताचे मंगळ ग्रहावरील पाठवण्यात येणारे दुसरे मिशन असेल.
मंगलयान २ चे ऑर्बिटर एरोब्रेक्सचा वापर करून मंगळाच्या कक्षेच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे मंगळाचा अधिक जवळून अभ्यास करणे आपल्याला शक्य होणार आहे.
सुरुवातीला भारताचे इसरो आणि फ्रान्सचे CNES ह्या दोन संस्था एकत्र येऊन मॉम २ चे मोड्यूल तयार करण्याचे ठरले होते. हे मॉडेल २०२० मध्ये तयार होईल अशी योजना होती.
पण एप्रिल २०१८ पर्यंत CNES चा ह्यात सहभाग नव्हता. त्यामुळे २०१७ च्या अर्थसंकल्पात भारत सरकारनेच ह्या मिशनची आर्थिक जबाबदारी उचलण्याची घोषणा केली.
आता ह्या मिशनमध्ये यानाबरोबर ऑर्बिटर तसेच लॅन्डर आणि रोव्हर सुद्धा पाठवण्यात येईल की फक्त ऑर्बिटर आणि इतर काही अत्याधुनिक उपकरणे पाठवण्यात येतील हा निर्णय अजून पक्का झालेला नाही.
४. शुक्रयान मिशन
शुक्र हा ग्रह आपल्यापेक्षा सूर्याच्या ३० टक्के जवळ आहे. त्यामुळे शुक्रावर पृथ्वीपेक्षा अति जास्त प्रमाणात सोलर रेडिएशन आहे आणि उष्णता देखील प्रचंड आहे. त्यामुळे शुक्र ग्रहाचा अभ्यास करणे हे इसरोचे ध्येय आहे. हे मिशन २०२३-२५ दरम्यान पार पाडले जाण्याची शक्यता आहे.
इसरोचे शुक्रयान शुक्राच्या घनदाट आणि रहस्यमयी वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी पाठवले जाईल. शुक्राच्या वातावरणात इतके दाट ढग आहेत की त्याचा पृष्ठभागापर्यन्त सूर्याचा उजेड पोचणे अवघड जाते.
ह्याचाच अभ्यास करून शुक्र ग्रहाविषयी अधिक माहिती मिळवण्याचा इसरोचा उद्देश आहे. शुक्रावरील घनदाट ढग, शुक्राचा पृष्ठभाग, त्यावर सोलर रेडिएशनचा होणारा परिणाम, आणि सोलर विंड ह्या सगळ्याचा प्रोब द्वारे अभ्यास करणे हे ह्या मिशनचे मुख्य उद्दिष्टय असेल.
शुक्रयानाची संरचना आणि पेलोड्स बद्दल अद्याप निर्णय झालेला नाही.
५. चंद्रयान ३
चंद्रयान २ नंतर चंद्राच्या अभ्यासासाठी चांद्रयान ३ पाठवण्याची इसरोची योजना असल्याचे इसरोचे चेअरमन के सिवन ह्यांनी आधीच सांगितले आहे. येत्या दशकात भारताचे हे तिसरे मून मिशन लाँच करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
“करंटली सायन्स” ला दिलेल्या मुलाखतीत सिवन म्हणाले की,
“डीप स्पेस ह्युमन मिशन्स साठी चंद्र हा एक उत्तम पर्याय आहे. चंद्र हा एक उत्तम स्टेजिंग पॉईंट आहे. चांद्रयान २ द्वारे आपल्या स्पेस मिशन्ससाठी चंद्राचा कितपत उपयोग केला जाऊ शकतो हे आपल्याला कळू शकेल.”
“आम्ही सगळे प्रयत्न करीत आहोत पण सध्या तरी नजीकच्या काळात चंद्रावर माणूस पाठवण्याची योजना नाही. “
६. भारताचे स्पेस स्टेशन
सध्या अवकाशात फक्त एकच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन कार्यरत आहे. २०२३ पर्यंत भारताचे स्पेस स्टेशन अवकाशात तयार करण्याची इसरोची योजना आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन केवळ २०२८ पर्यंतच कार्यरत असेल.
भारताचे स्पेस स्टेशन हे २० टन वजनाचे असेल आणि अंतराळवीर तिथे १५-२० दिवस वास्तव्य करू शकतील असा इसरोचा प्रयत्न आहे. ह्या ठिकाणी मायक्रोग्रॅव्हिटी टेस्ट सुद्धा केल्या जाऊ शकतील. हे स्पेस स्टेशन म्हणजे गगनयान मिशनचा विस्तारित भाग असेल.
ह्या सहा महत्वाकांक्षी आणि मोठ्या मिशन्सबरोबरच इसरोमध्ये इतर अनेक इंटरप्लॅनेटरी मिशन्सवर काम सुरु आहे. पण अजून त्यांची अधिकृत घोषणा केली गेलेली नाही. इसरोसाठी चांद्रयान २ ही फक्त एक सुरुवात होती. अजून बरेच काम आणि बऱ्याच मोहीमा इसरोद्वारे आखल्या जातील आणि आपले संशोधक त्या नक्कीच यशस्वी करून दाखवतील.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.