आणि मोदींची सलग ९ तास कसून तपासणी केली गेली…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
गुजरात दंगलीला तब्बल आठ वर्षे उलटून गेल्यानंतर पहिल्यांदा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष चोकशी दलाने (एसआयटी) सलग नऊ तास कसून तपासणी केली.
२००२ साली गुजरात मध्ये उसळलेल्या धार्मिक दंगल रोखण्यासाठी पुरेसे प्रयत्न मोदींनी केले नसल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
या दंगलीमध्ये १००० लोकांचा बळी गेला होता. मोदी हे असे पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांना सामुहिक हत्याकांडाच्या आरोपाखाली चोकाशीसाठी बोलावण्यात आले आहे.
ते आणि त्यांचा प्रशासनावर दंगलीना प्रोत्साहन आणि बढावा देण्याचा आरोप लावण्यात आला होता.
दुपारी १२.०० ते संध्याकाळी ५.१५ पर्यंत सलग चोकशी झाल्यानंतर मोदी एसआयटी ऑफिस मधून बाहेर आले. ते थोड्यावेळासाठी विश्रांती घेत असून, पुन्हा संध्याकाळी ते चौकशीसाठी येणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
शनिवारीच ही सगळी प्रक्रिया त्यांना संपवायची असल्याने रात्री ९.०० वाजता मोदी पुन्हा एसआयटी ऑफिसला परतले आणि त्यानंतर चोकाशीची दुसरी फेरी सुरु झाली जी पुन्हा चार तास सुरु होती. मध्यरात्री १.१० वाजता ही दुसरी फेरी संपली.
चौकशीची दुसरी फेरी संपल्यानंतर मोदी एसआयटीच्या कार्यालयातून बाहेर आले, तेंव्हा ते म्हणाले की, चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी संपल्याचे सांगितले.
“एसआयटीने माझे काम संपले असल्याचे मला सांगितले,” मोदी म्हणाले.
यादरम्यान मोदींना जवळपास ६८ प्रश्न विचारण्यात आले. काही साक्षीदारांकडून दाखल केलेल्या प्रतिज्ञापात्रांच्या संदर्भातही काही प्रश्न विचारण्यात आले.
गुजरात दंगलीला आठ वर्षे उलटून गेल्यानंतर पहिल्यांदाच मोदींची इतकी प्रदीर्घ चौकशी करण्यात आली आहे.
“आठ वर्षात पहिल्यांदाच या प्रकरणी कुणीतरी माझ्याशी संवाद साधण्याच्या प्रयत्न केला आणि मी त्यांना उत्तरे दिली,” मोदी म्हणाले.
आपल्या टीकाकारांना उत्तर देताना ते म्हणाले,
“मी आठ वर्षात याबाबत चकार शब्दही उच्चारला नाही, म्हणणाऱ्याना देव सुबुद्धी देवो. ज्यांनी माझ्याबद्दल खोट्या बातम्या आणि चुकीची माहिती पसरवली त्यांना या आजच्या घटनेवरून चांगली समज मिळाली असेल.”
एसआयटीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देण्याचा प्रयत्न केला आहे, आठ वर्षा पूर्वी त्याकाळात ज्या काही घटना घडल्या त्यांचा घटनानुक्रम जसा आठवेल तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला.
माझी सगळी वक्तव्ये एसआयटी अधिकाऱ्यानी नोंदवून घेतली आहेत, ज्यावर मी सह्या देखील केल्या असेही ते यावेळी म्हणाले.
कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले असे विचारल्यानंतर ते म्हणाले, “ते मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण, एसआयटीला हा रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करायचा आहे.
या दंगलीसाठी गेली आठ वर्षे तुम्हाला गेली आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे, याकडे निर्देश केल्यानंतर मोदींनी यावर हसून उत्तर दिले,
“अजूनही तुम्ही मला आरोपीच्या पिंजऱ्यातच उभे केलेले आहे. भारताच्या संविधानानुसार, कायदा सर्वोच्च आहे. एक सामान्य माणूस आणि मुख्यमंत्री या नात्याने मी भारतीय संविधान आणि कायद्याशी बांधील आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा असू शकत नाही.”
झकिया जाफरी यांनी दाखल केलेल्या खटल्यांमध्ये ६३ आरोपींच्या यादीत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाचा देखील समावेश आहे.
झकिया यांनी दाखल केलेल्या तक्रारीत त्यांनी असा आरोप केला आहे की, मोडी आणि इतर ६२ जणांनी गुजरात दंगलीचे कारस्थान रचले होते. वरिष्ठ मंत्र्यांनी प्रशासनाला आणि पोलिसांना आदेश दिले होते की मदत मागणाऱ्याना कोणत्याही प्रकारे प्रतिसाद द्यायचा नाही.
त्यांनी दाखल केलेली याचिका ही फक्त गुलबर्ग दंगली पुरती मर्यादित नाही. त्यांच्या पतीच्या खुनावर आधारित ही याचिका असली तरी, मोदी हेच या कारस्थानाचे करते करवते असल्याचा आरोप त्यांनी यामध्ये केला आहे.
“मी इथे चौकशीसाठी उपस्थित आहे हेच माझ्या टीकाकारांना सणसणीत उत्तर आहे. ज्यांनी ज्यांनी माझ्या हेतूवर संशय व्यक्त केला त्यांना मी परिपूर्ण उत्तर दिले आहे. स्वार्थी हेतू ठेवून केली जाणारी अशी वक्तव्ये आता थांबतील अशी मी अशा करतो,” मोदी म्हणाले.
तुम्हाला गुलबर्ग दंगली बद्दल काही विचारण्यात आले का, असे विचारल्यानंतर ते म्हणाले,
“२७ फेब्रुवारी ते निवडणुका होईपर्यंतच्या सर्व घटनाक्रमांबाबत मला प्रश्न विचारण्यात आले आणि याबाबत मला जे काही आठवेल त्यानुसार मी उत्तरे देण्याच्या प्रयत्न केला आहे.”
एसआयटीच्या चौकशीबाबत तुम्ही समाधानी आहात का, असे विचारले असता ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचे समाधान होणे महत्वाचे आहे.”
ही एसआयटी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली असून यामध्ये एकही अधिकारी गुजरातमधील नाही हे मोदींनी वारंवार अधोरेखित केले.
एसआयटी प्रमुख आर. के. राघवन म्हणाले, यानंतर मोदींची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
थेट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मोदींवर एफआयआर दाखल करायची की नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत एखाद्या सामान्य गुन्हेगाराची चौकशी करावी त्याच पद्धतीने मोदींचीही चोकशी करण्यात आली.
कारसेवकांची माहिती मिळवण्यास गुप्तचर यंत्रणा कमी का पडल्या इथपासून ते, गोध्रा ट्रेन कशी जळाली, गोध्रा जळीतकांडानंतर उसळलेल्या दंगली, दंगली आटोक्यात ठेवण्यात प्रशासन आणि पोलीस दलाला आलेले अपयश, ते निवडणुकी दरम्यानी त्यांनी दिलेली भडकावू भाषणे या सर्व घटनांची त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली.
पोलीस प्रमुख आणि अधिकाऱ्यांना ज्यांनी असे आदेश दिल्याची वक्तव्ये केली आहेत- ट्रेन जाळल्यानंतर ज्यात ५९ हिंदू कारसेवक मारले गेले त्यानंतर हिंदुना आपला राग व्यक्त करण्याची मुभा द्या, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या का?
कारसेवकांचे मृतदेह अहमदाबादला आणण्याच्या सूचना मोदींनीच दिल्या असल्याचे पुरावे एसआयटीकडे असल्याचा दावा देखील करण्यात आला. परंतु, मोदींनी हे सर्व आरोप फेटाळून लावले.
मोदी एसआयटीच्या चौकशीसाठी हजार राहिले याबाबत झाकिया झाफरी यांनी समाधान व्यक्त केले.
“त्यांची चौकशी पूर्ण होण्यास आठ तासांचा अवधी लागला पण, निदान ते चौकशीसाठी हजर राहिले. आता त्यांनी त्यांचे काम केलेले आहे, आता आमचे वकील पुढील कामकाज सुरु करतील आणि याप्रकरणी आम्हाला न्याय मिळेल अशी अशा आहे,” त्या म्हणाल्या.
सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, ज्या दंगलीतील पिडीत लोकांच्या न्यायासाठी लढत आहेत त्या म्हणाल्या,
“कायदा आणि लोकशाहीच्या दृष्टीने हा फार महत्वाचा दिवस आहे. न्याय मिळवण्यापासून आम्हाला अडवण्यात आले तरीही चौकशी समितीला मुख्यमंत्री टाळू शकले नाहीत, त्यांना चौकशी समिती समोर हजर होणे भाग पडले.”
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.