जयभीम साबण, बहुजन मसाले आणि बहुजन डिश वॉशर: उद्योगातून दलित उत्थानाचा मार्ग!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
दलित म्हणजे हलकी जात असं पूर्वी मानलं जायचं. मनुस्मृतीत असं लिहिलं गेलं होतं की, ‘मृतदेहावरील कपडे यांनी घालावेत. तुटलेल्या भांड्यातच त्यांनी खावं, लोखंडाचेच दागिने त्यांनी घालावेत. आणि त्यांनी सतत फिरत राहावं. म्हणजे स्थलांतर करावं.’
म्हणजे इतकी बंधनं त्यांना होती. या समाजाने पूर्वी खूप हाल-अपेष्टा काढल्या, पण आता परिस्थिती बदलली आहे. आता सर्व जाती समान असा कायदाही झाला आहे आणि आधुनिक जगात जातीपाती यांना थारा नाही कारण समाज बदलला आहे.
आर्टीकल १५ नुसार सर्वांना समान हक्क आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समुदायावर होणार्या अन्यायाविरुद्ध ठोस पावले उचलून त्यांना या सर्व हाल-अपेष्टातून मुक्त केले आहे.
तरीही कधीतरी काहीतरी अशी घटना घडते की, परत दलित किंवा जातीपातीवरून वाद-विवाद, भांडणं यांचं डोकं वर येतं.
खरंतर आपण दुकानात किंवा हॉटेलात जातो तेव्हा आपण त्याची जात-पात पाहत नाही. रिक्षा, गाड्या किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हाही जातीचा विचार केला जात नाही.
सोशल मिडियावर आहे असाही एक दुकानदार आहे की, जो अभिमानाने आपली जात सांगतो, आपल्या जातीतील लोकांना आपल्या व्यवसायाबद्दल माहिती करून देत आहे.
त्यांना हाच माल खरेदी करण्यासाठी उद्युक्त करत आहे, कोण असेल हा माणूस आणि काय आहे याची योजना? पाहुया.
या माणसाचे नाव आहे चंद्रभान प्रसाद. जे दलितांसाठी काम करतात आणि लेखक पण आहेत. थोड्याच दिवसांत ते एक ई-कॉमर्स पोर्टल लाँच करणार आहेत. त्याचं नाव आहे बायदलित.कॉम. आहे ना इंटरेस्टिंग?
फक्त दलित लोकांसाठीच हे पोर्टल असणार आहे. जिथे चांदीची भांडी, टोपी आणि जाकीट पण मिळणार आहे.
हे जाकीट असं आहे की जे कधीही म्हणजे कोणत्याही ऋतूत दलित महिला वापरू शकतील असं आहे. सगळ्यात विशेष म्हणजे हे जाकीट खास महिलांसाठीच बनवलं आहे.
याच्या मागे एक हळवं कारण आहे. याद्वारे दलित महिलांना नवी दृष्टी देण्याचा कयास आहे. कारण ज्या दलित महिलांना ब्लाऊज घालण्याचा अधिकार एकेकाळी नव्हता, अशा महिला आता जॅकीट किंवा कोट घालून एक नवं पाऊल उचलतील. त्यांच्या मानमर्यादा उंचावतील.
कारण आपण कितीही म्हटलं जातिवाद हटला तरी हल्लीच म्हणजे २०१३ साली गुजरातमध्ये जीन्स आणि चामड्याच्या चप्पल घातल्या म्हणून एका दलिताला मारहाण केली गेली होती.
तर या चंद्रभान प्रसाद यांनी २०१७ मध्ये दलितांसाठी ‘जिरो प्लस’ हा कपड्यांचा ब्रँड आणला होता. तोच परत तयार करून ते ‘बायदलितस् डॉट कॉम’ वर आणण्याच्या तयारीत आहेत.
इथे आणखीही काही प्रॉडक्ट मिळतील. जसे की, आंबेडकर टी-शर्ट, धान्य, चहाचा कप, हँडबॅग, पर्स, बेल्ट. आपल्या जातीच्या लोकांसाठी ही सुविधा त्यांनी निर्माण केली आहे.
चंद्रभान प्रसाद सारखेच हरियाणातील झज्जरमध्ये ‘जय भीम’ या नावाने सात उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली. त्यात आवळा हेअर ऑईल आणि साबण ही उत्पादने आहेत.
जयभीम प्रॉडक्ट कंपनीच्या संस्थापकांमधील एक बिजेंद्रकुमार भारतीय म्हणाले की, मी यामध्ये अजून 12 प्रॉडक्ट निर्माण करणार आहे. ते एकूण ४० रिटेलर्स आणि वितरक आहेत. शिवाय ते गुजरातमध्ये हेच काम करत आहेत.
त्यांच्या साइटचं नाव आहे. जयभीमोलीनस्टोअर डॉट कॉम. आणि त्याचं चिन्ह आहे. आंबेडकर आणि बुद्ध यांची प्रतिमा.
बिजेंद्र कुमार यांनी खूपच चांगले विचार मांडले आहेत. ते म्हणतात की, झाल्या गेल्या गोष्टीवर रडून काय फायदा? आयुष्यात पुढे गेले पाहिजे. जसे की आपण म्हणतो ‘झाले गेले गंगेला मिळाले.’
ते म्हणतात, लोक असा विचार करतात की, दलित म्हणजे आरक्षण, पण आम्हाला उद्योजकता, संस्कृती याचा विकास करण्यात स्वारस्य आहे. किती छान विचार आहेत ना? प्रगती करून पुढे गेलंच पाहिजे.
या कंपनीचं मुख्य ऑफिस राजस्थान मध्ये आहे. आपल्या भारतात सर्वांत लोकप्रिय कंपनी म्हणजे पतंजली. पतंजलीचे प्रॉडक्टस् सर्वत्र लोकप्रिय आहेत कारण ते उत्तम दर्जाचे तर आहेतच, पण स्वस्तही आहेत. सर्वसामान्यांना परवडण्यासारखे आहेत.
बीजेंद्रकुमार सांगतात की, पतंजलीप्रमाणेच त्यांच्या उत्पादनाच्या किंमती आहेत. आणि त्यांच्या कंपनीची टॅग लाइन आहे, ‘स्वाभिमान की बात, जय भीम की बात.’
जय भीमचे बीजेंद्रकुमार भारतीय म्हणतात, की जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा ‘जय भीम’ नाव ठेवायचं की नाही याबद्दल मना शंका होती. पण मग आम्ही ठरवलं की, हेच नाव ठेवायचं.
‘जय भीम’ जाती-मुक्ती आंदोलनाचा नारा होता. जय भीम म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली मानवंदना आहे.
२०१५ मध्ये आर्मीने दलितांसाठी एक शाळा पण सुरू केली आहे. ते असं म्हणतात की, त्यांना नेहमीच्या शिक्षणापेक्षा वेगळं शिक्षण दिलं जातं. राज्यात अशा एक हजारहून जास्त शाळा चालवल्या जातात. बाबासाहेब, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि वाल्मीकी अशा दलित नेत्यांच्या बाबतीतलं शिक्षण इथे दिलं जातं.
आर्मीतील सदस्य टिंकू जे पतंजली मध्ये काम करत होते त्यांनी उत्तरप्रदेश मध्ये ‘भीम शक्ती’ नावाचं डिटर्जंट उत्पादित केलं.
‘बहुजनस्टोअर डॉट कॉम’ २०१५ मध्ये सुरू केलं होतं आणि ऑनलाइन रिटेलिंग वेंचर या स्वरूपात ते सुरू केलं गेलं. चंद्रभान प्रसाद म्हणतात, संशोधनाने हे सिद्ध केले आहे की, अमेरिकन आणि लॅटिन वंशाच्या व्यक्ती बँडमध्ये सांस्कृतिक कनेक्शन शोधतात. म्हणून त्यांनी संस्कृतीचा वापर केला आहे.
पण ऑनलाइन विक्री करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नाही. २०१६ मध्ये त्यांनी आंब्याचे लोणचे, हळत आणि कोथिंबीर, वाटाणे, बार्ली पीठ यासारख्या उत्पादनांनी दलीतफूडस् डॉट कॉमची सुरुवात केली.
तर असे हे ऑनलाइन बिझनेस जातीचं नाव अधोरेखित करून सुरू केले जात आहेत.
उत्तर प्रदेशच्या जौनपुरमध्ये जन्मलेला आणि मुंबईत वाढलेला एक माणूस ज्याचं नाव आहे सुधीर राजभर दोन वर्षांपूवी त्यांनी चामर फाउंडेशनची निर्मिती केली.
ते म्हणतात,
‘‘जेव्हा उच्च समाजातील लोकं या फाउंडेशनमधून बनवलेले प्रॉडक्ट घेऊन जातात, तेव्हा मला खूप छान वाटतं. मी आता दलित आहे ही भावना मागे सोडली आहे. मला चामर या शब्दाचा सन्मान करायचा आहे.’’
या ब्रांडसाठी राज्यभरातील दलितांना मुंबईत एकत्रित करणं सुरू आहे. त्यांच्याकडून छान रबरची बॅग तयार करून घेतली जाईल जिला ‘बॉम्बे ब्लॅक’ म्हटलं जाईल आणि फॅशन म्हणून ही बॅग वापरली जाईल.
दलित समाजाला यामुळे मानसन्मान मिळेल हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
तसेच चंद्रभान प्रसादने देखील महिलांसाठी जॅकीटचं काम सुरू केलं आहे. जेणेकरून दलित डॉट कॉम कंपनी जोमात सुरू होईल. फॅशन आयकॉन बनेल. आणि जात-पात न जुमानता उच्चभ्रू लोकदेखील या साइटवरून आपल्याला हव्या त्या वस्तू अगदी बिनधिक्कत विकत घेतील हाच उद्देश असावा.
आपल्या समाजातील लोकांनी याच साइटवरून सर्व खरेदी करून आपल्या समाजाच्या विकासाला हातभार लावावा. कोणत्याही कारणाने रडत न बसता त्यातून मार्ग काढणे हीच प्रगतीची लक्षणं आहेत.
जो आपल्यातील बुद्धिमत्ता जाणून त्याचं चीज करेल तो नेहमीच पुढं जाईल हे तर सर्वमान्यच आहे. तशीच प्रगती या ‘जयभीम’ प्रॉडक्टची पण होवो ही सदिच्छा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.