तीन मित्रांनी डोकं चालवून बनवलेल्या या बाईकमुळे अनेक प्रश्न सहज सुटणार आहेत!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
कल्पना केलीये का तुम्ही तुमची मोटार बाईक फोल्ड करून गाडीच्या डिकीत ठेवू शकता? पण, अशी बाईक आता उपलब्ध आहे. केरळच्या या तीन इंजिनियर्सनी बनवलेल्या बाईकसाठी सर्व्हिसिंग सेंटर किंवा चार्जिंग स्टेशनची गरज नाही.
बॅटरी संपली तरी ही बाईक घरीच चार्ज करता येऊ शकते. २०१८ साली भारत हा कारनिर्मिती मध्ये जगात चौथ्या स्थानावर होता. याच वर्षात भारतात सुमारे २.१७ दशलक्ष कार्सची विक्री झाली होती.
आपण जेव्हा नवी कार खरेदी करतो तेव्हा अर्थातच घरी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. पण आपल्याला याची देखील जाणीव हवी की, या कारमुळे आपण पृथ्वीच्या वायुप्रदूषणाच्या समस्येत आणखी थोडी भर घालतोय.
वाढत्या वायूप्रदूषणामुळे दिवसेंदिवस आरोग्याच्या समस्या देखील अधिक गंभीर होत चालल्या आहेत. पृथ्वीवरील काही शहरांत अगदी स्वच्छ हवा मिळणे देखील दुरापास्त झाले आहे.
वैयक्तिक वाहनांच्या वापरत झालेली अपरिमित वाढ ही देखील वायूप्रदूषणाच्या समस्येचे एक मूळ कारण आहे.
वाहनांच्या वाढत्या संख्येने जगभरातील वायू प्रदूषणाच्या समस्येत भर घातली आहे. अगदी आपल्याच देशाच्या राजधानीतही वायू प्रदूषणाची समस्या अत्यंत तीव्र झाली आहे. लोकांना विषारी वायूंचा सामना करावा लागतोय.
याच्या बातम्या आपण वरचेवर वर्तमानपत्रातून वाचत असतोच. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-कानपूर येथे दिल्लीतील वायू प्रदूषणाचा अभ्यास केल्यानंतर असे आढळून आले की, वाहनांतून निघणारा धूर हे दिल्लीतील वायू प्रदूषणाचे दुसरे प्रमुख कारण आहे.
२०१९-२० चा अर्थसंकल्प सादर करत असताना, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अशीही एक घोषणा केली की, “नजीकच्या काळात भारत हा इलेक्ट्रॉनिक वाहने बनवणारा जगातील एक प्रमुख देश असेल.”
त्यांच्या या वक्तव्याने पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि निसर्गप्रेमी लोकांमध्ये एक आशेचा किरण पल्लवित झाल्याचे दिसते. पर्यावरण पूरक गाड्या वापरण्याकडे लोकांचा कल वाढावा, म्हणून सरकारने इलेक्ट्रॉनिक वाहनावरील जीएसटी देखील १२ वरून ५ टक्क्यांवर आणला.
तसेच इलेक्ट्रॉनिक वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना प्राप्तिकरात १.५ लाखाची सुट देखील दिली आहे. सरकारच्या या विधायक घोषणेचे मनःपुर्वक स्वागत करण्यात आले.
एकीकडे सरकार इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या वापरला अशा प्रकारे प्रोत्साहन देत असताना, देशातील नागरिक देखील या बदलाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील तरुण देखील पर्यावरणपूरक चार चाकी किंवा दोन चाकी इलेक्ट्रॉनिक वाहने बनवण्यावर भर देत आहेत.
अशाच प्रकारे पर्यावरण पूरक वाहने बनवण्यासाठी केरळ मधील कोची येथील, मिधून शंकर, अशीन अल आणि जिष्णू पी या तीन इंजिनियर्सनी स्माडो लॅब्ज, नावाची एक कंपनी स्थापन केली आहे.
या तिघांनी मिळून एका टू-व्हीलर इलेक्ट्रॉनिक बाईकचा शोध लावला आहे. भारतातील मोठ्यातमोठे इलेक्ट्रॉनिक इन्क्युबेटर सेंटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मकर गावातून त्यांनी हे स्टार्टअप सुरु केले आहे.
या तिघांचे देखील पर्यावरणपूरक उत्पादन बनवण्याचे ध्येय होते. अनेकदा इ-बाईक बनवण्याची कल्पना देखील त्यांच्या डोक्यात चमकून गेली. एकदा तिघांनीही ठरवून अशा प्रकारची इ-बाईक डिझाईन करण्यास सुरुवात केली.
तीन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि अनेकदा या प्रयत्नांत अपयशी ठरल्यानंतर या तीन मित्रांनी शेवटी ही अनोख्या पद्धतीची इ-बाईक बनवण्यात यश मिळवले.
या बाईकचे वैशिष्ट्य म्हणजे ही बाईक फोल्ड करता येते. ती हाताळण्यास सोपी आहे. मोठ्या मेट्रो स्टेशन पासून अपार्टमेंटपर्यंत कोठेही नेता-आणता येऊ शकते.
जिष्णूने मेकॅट्रॉनिक्स इंजिनियरिंग पूर्ण केले असून स्माडो येथे तो चीफ टेक्नीकल ऑफीसर म्हणून काम करतो. त्याच्या मते, लहानपणापासून प्रत्येकालाच सायकल चालवण्याची हौस असते. मोठे झाल्यावरदेखील काहींना ही हौस भागवण्याची इच्छा असू शकते.
परंतु, गरज म्हणून आपण वेगाने धावणाऱ्या मोटारबाईक्स वापरतो. यामुळे वेळ वाचत असला तरी, ही वाहने पर्यावारणासाठी कित्येकपटीने हानिकारक ठरत आहेत. पर्यावरण वाचवायचे असेल तर, आपल्या या सवयीत बदल होणे अपेक्षित आहे हे आमच्या लक्षात आले.
म्हणून कोणत्याही वयातील लोकांना वापरता येईल अशी एक सायकल बनवण्याचा आधी आम्ही विचार केला. जी सायकल वेगाने धावेल आणि त्याचा पर्यावरणावर काही अनिष्ट परिणाम होणार नाही. सध्याची परिस्थिती पाहता सायकलचा वापर वाढण्याची गरज आहे.
इलेक्ट्रिक कार्स आणि मोटारसायकलला वेळच्या वेळी सर्विसची आवश्यकता असते. यासाठी पुन्हा सर्विस स्टेशन सारख्या सोयी उभ्या राहणे गरजेचे आहे. परंतु या इंजीनियार्सनी बनवलेली गाडी घरी देखील चार्ज होऊ शकते.
त्यामुळे यांना आणखीन वेगळ्या सर्विस किंवा चार्ज स्टेशनची गरज नाही. गाडीतील बॅटरीचे चार्जिंग संपल्यावर देखील ती घराच्या घरी चार्ज करता येऊ शकते, अशी माहिती कंपनीचे सीइओ मिधून यांनी दिली.
तझेला नावाने ओळखल्या जाणाऱ्या या बाईकमध्ये सध्या दोन मॉडेल्स उपलब्ध आहेत. एक अल्फा-1 (४९,००० रु.) आणि अल्फा-1 प्रो (६९,५०० रु.) दोन्ही मोटारसायकल्स फक्त दोन तासांत चार्ज होऊ शकतात.
एका वेळी बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतर पहिले मॉडेल ५० किमीचे अॅव्हारेज देते. दुसरे मॉडेल १०० किमीचे अॅव्हारेज देते. या बाईकची बॅटरी अल्युमिनियम आणि अलॉय फ्रेमपासून बनवलेली असून ती पोर्टेबल आहे.
चार्ज करण्यासाठी गाडीतून अतिशय सोप्या पद्धतीने काढता देखील येते. बॅटरी अल्युमिनियम पासून बनवलेली असल्याने ही गाडी पावसात देखील सुरक्षितपणे वापरता येऊ शकते.
या गाडीचे सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी कोणत्याही वयोगटातील व्यक्ती वापरू शकतात. कारण या गाडीचे सीट अॅडजस्टेबल आहे.
शिवाय ही गाडी विविध प्रकारे वापरता येते. एक म्हणजे पेडल मारून सायकल प्रमाणे, यावेळी बॅटरीचा वापर करण्याची गरज नसते. असिस्ट रायडींग करायची झाल्यास सुरुवातीला पेडल मारावे लागेल नंतर सायकल स्वतः सुरु होईल. इलेक्ट्रॉनिक मोडवर सायकल मोटारसायकल प्रमाणे धावेल.
गेल्या दोन आठवड्यात या स्टार्टअपमार्फत ५० इ-बाईक्सची विक्री करण्यात आली असून सध्या दररोज शेकडो लोक यासंबधी चौकशी करत आहेत.
या नव्या प्रयोगाला मिळणारा प्रतिसाद पाहता, लोकांमध्ये चांगल्या सवयी लावून घेण्याकडे आणि पर्यावरणपूरक वागण्याकडे कल वाढत असल्याचे जाणवते.
खरेतर आपल्या पृथ्वीचे आयुष्यमान वाढण्यासाठी आणि प्रत्येकाला निरोगी जीवनाचा हक्क मिळावा म्हणून अशा पर्यावरणपूरक बाबींचा वापर वाढवणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. याची जाणीव लोकांमध्ये रुजवण्यासाठी तरुणाईचा पुढाकार विशेष महत्वाचा आहे.
अशा छोट्या=मोठ्या प्रयत्नातून आपली पृथ्वी आणखीन समृद्ध होईल अशी आशा बाळगूया.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.