देवाच्या थियेटरमधे एक गुणी अभिनेता: ओम पुरींना श्रद्धांजली
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
काही अभिनेते हे रंगरूपा पेक्षा त्यांच्या एकंदरच वकुबामुळे ओळखले जातात. शेक्सपियरच्या नंतरच्या काळात रंगभूमीवरच्या अभिनेत्याला दिग्दर्शक आणि लेखकापेक्षा जास्त मोठं स्थान मिळायला लागलं. भारतात ही परंपरा अनुराग कश्यप येईपर्यंत कायम राहिली असं म्हणता येईल. कारण तो पर्यंत सिनेमाला जाणारा प्रेक्षक अभिनेता बघण्यासाठी जात असे, त्यात “मास” दर्जा आणि स्टारडम असलेले अभिनेते होतेच. अगदी चाळीस-पन्नासच्या दशकातल्या राज-दिलीप-देव पासून ते थेट आत्ताच्या आदित्य रॉय कपूर पर्यंत ह्या उमद्या नटांची परंपरा कायम आहे.
सत्तरच्या दशकामधे एक समांतर नटांची परंपरा उदयाला आली. ओम पुरी, अमरीश पुरी आणि गिरीश कर्नाड – ही ती परंपरा (दोन्ही परंपरांच्या मधे अमोल पालेकर…!). समांतर परंपरेमधे सत्याला थेट भिडणारे व्यवस्थेत असलेल्या त्रुटी दाखवत त्यातून होरपळलेल्यांचा आक्रोश दाखवणारे सिनेमे शाम बेनेगल, गोविंद निहिलानी यांनी आणायला सुरूवात केली. या परंपरेवर नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा आणि पुण्याच्या एफ टी आय चा मोठा पगडा होता. विचाराने डावे आणि आविष्काराने सत्यस्पर्शी अशी ही समांतर चित्रपटांची परंपरा होती. याच परंपरेतील एक महामानव आपल्यातून निसटला आहे.
रूढ अर्थाने म्हटलं तर, ओम पुरी ही चित्रपटसृष्टीला विजय तेंडुलकरांची देण आहे. त्यांच्या ‘घाशीराम कोतवाल’ ह्या मराठी सिनेमातून ओम पुरींनी घाशीराम म्हणून आपली सुरूवात केली. हिंदी सिनेमांमधे ‘भूमिका’ सारखा सिनेमा असो किंवा ‘अरविंद देसाई की अजब दास्तान’ मधला साधा, मार्क्सिस्ट मनुष्य असो – ओम पुरी लक्षात राहिले.
‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है’ – सिनेमा होता सईद अख्तर मिरझा चा, पण त्यामधे अत्यंत छोट्या भूमिकेतही ओम पुरी लक्षात राहिला. ‘आक्रोश’ सिनेमाने तो पर्यंत अमिताभ बच्चनने व्यापून टाकलेल्या हिंदी चित्रपट सृष्टीला एक खरोखरी जोरदार धडक दिली. ‘आरोहण’ आणि ‘अर्धसत्य’ ह्यासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पण ‘अर्धसत्य’ मुळे त्यांना सलाम ठोकला जाऊ लागला. ‘अर्धसत्य’मधे नायकाची भूमिका डावा अँग्री यंग मॅन अशीच होती. फक्त इकडे अँग्री यंग मॅन – १२-१५ लोकांना अँब्युलन्स घेऊन जाऊन मारून काढत नाही.
‘मिर्च मसाला’ मधे शेवटच्या दहा मिनिटात नासिरुद्दीन शहाच्या अक्ख्या फौजेसमोर एकटा बंदूक घेऊन उभा रहाणारा आणि हुतात्मा होणारा अबू मिलान कायम लक्षात रहातो.
तसाच – ‘घायल’ मधे सनी देओल च्या वादळी व्यक्तिमत्वासमोर ए सी पी जो डिसोझा काळ्या जॅकेट मधे देखणा नसूनही सनी तितकाच प्रभावी वाटतो!
‘नरसिंहा’ मधला बापजी पण तितकाच भयानक. ‘रात’ सिनेमा मधे शेवटच्या ४ वाक्यांत, भूत ही संकल्पना ज्या पद्धतीने ओम पुरी मांडतात, ती नास्तिकाला पण विचार करायला लावते.
ह्याच सुमारास त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निखळ आणि निव्वळ व्यावसायिक सिनेमामध्ये कामं करायला सुरूवात केली. पूर्वी २ वर्षात एक सिनेमा करणारे ओम पुरी आता वर्षाला तीन तीन सिनेमे करू लागले. पण त्यातल्या बऱ्याच भूमिका अर्थपूर्ण होत्या, हे महत्वाचं!
‘माचीस’ मधला दहशतवादी – “परिवार था मेरा, अधे सैतालीस मी चाले गये, बचे हुए चौरासी लेके गई” – हे म्हणणारा ओम पुरी भन्नाट होता. ‘चाची ४२०’ मधे लोचट, स्त्री लंपट – आणि आलेल्या ‘गुप्त’ सिनेमामधे “सर, मै कुछ गलत रोकने जात हूं और कायदा मुझे रोकता होता है! तो बताईये गलत कौन – मै या कानून?” असं विचारणारा इन्स्पेक्टर उधम सिंग धमाल होता.
मकबूल सिनेमा करताना, नसरुद्दीन शहा बरोबर त्यांना बघून केस विचरायला सोन्याचा कंगवा घेतल्याचा फील आला. तरीही त्यात लक्षात राहिलेली भूमिका म्हणजे – ‘लक्ष’ – “पाकिस्तानी एकवार पलटके फिर आते है! अगर जीतो तो तुरंत लापरवाह ना होना” असं म्हणणारा प्रीतम सिंग, ह्या सिन साठी परत सिनेमा बघायला लावतो. तरीही, एक अत्यंत दुर्लक्षित सिनेमा म्हणजे ‘महारथी’. परेश रावल, ओम पुरी, नसरुद्दीन शहा आणि बोमन इराणी हे पडद्यावर धमाल करतात.
बाकी बिल्लू, दबंग, मालामाल वीकली किंवा ऍक्शन रिप्ले सारखे सिनेमे का केले ह्याचं उत्तर घर आणि गाडीच्या हप्त्यांमध्ये असावं. निव्वळ व्यावसायिक सिनेमे करून त्यांची आर्थिक स्थिती सुधारली. पण कुंवारा, हेराफेरी, दुलहन हम ले जायेंगे – हे सिनेमे अर्धसत्यची उंची गाठत नव्हते.
शेवटचा लोभस ओम पुरी म्हणजे जंगल बुक चा बगीरा…!
चेहऱ्यावर देवीचे व्रण, किरकोळ देहयष्टी, सामान्य व्यक्तिमत्व – असं असूनही चायना गेट सारखी भूमिका ओम पुरी करू शकले. परंतु शेवटच्या दिवसांत, त्यांचं वागणं डोक्यात हवा गेल्यासारखं झालं आणि नेमके नको ते संवाद तोंडून निघाले. त्यामुळे ए सी पी जो डिसोजा किंवा अर्धसत्य मधल्या अनंत वेलणकर वर भारत एक खोजमधला दुरोधन किंवा औरंगजेब भारी पडला की काय अशी शंका दुर्दैवाने आली. परंतु हा भाग अलाहिदा.
ओम पुरीच्या नावानं चांगभलं. वर देवाला थियेटरमधे बसून सिनेमे बघायचे असतील अजून एक चांगला अभिनेता मिळालाय, ह्याबद्दल देवाचं अभिनंदन!
ओम पुरीच्या आत्म्यास सद्गती लाभो!
—
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi