तरुण वयात या १२ गोष्टी आवर्जून करा आणि आर्थिक सुरक्षितता मिळवा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
आर्थिक सुरक्षितता सर्वांसाठीच महत्वाची आहे. या बाबतीत ज्यांचे प्लॅनिंग अचूक असते, ते आयुष्यात लवकर स्थिरस्थावर होतात. नुकतीच नोकरी लागली असेल किंवा नवा व्यवसाय सुरु केला असेल तर, आत्तापासूनच पैसा कसा वाचवायचा आणि तो कुठे आणि कसा गुंतवायचा याचे अचूक नियोजन तुमच्याजवळ हवे.
या लेखातून आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स देणार आहोत, ज्या तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करण्यास अधिक उपयुक्त ठरतील.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षीचा आर्थिक ताळमेळ बघा, कुठे किती खर्च झाला आणि कुठे चुकले याची नीट नोंद ठेवा. यावरून यावर्षीचे प्लॅनिंग करताना मागच्या चुका टाळल्या जातील.
१. बजेट निश्चित करा.
महिन्याचे बजेट आखणे ही अगदी महत्वाचे आणि प्राथमिक गोष्ट आहे. आपण किती कमवतो आणि आपण किती खर्च केले पाहिजेत याचा ताळमेळ लागणे महत्वाचे आहे. यामुळे आपली आर्थिक स्थिती काय आहे याचा अंदाज लवकर येतो.
कधी कधी सिनेमा, हॉटेलिंग अशा गोष्टींवर आपला अतिरिक्त पैसा खर्च होतो आणि या जाणारा पैसा दिसून देखील येत नाही. त्यामुळे खर्चाचा तपशील ठेवल्याचे दोन फायदे होतात.
पहिली म्हणजे, आपला अतिरिक्त खर्च नेमका कोणत्या गोष्टींवर होतो याचा तुम्हाला अंदाज येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे, तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या खर्चाच्या सवयींचे मूल्यमापन देखील करता येईल.
महिन्याचे बजेट ठरवून घेतल्यास प्रत्येकाच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल. तसेच तुमचा खर्च प्रमाणाबाहेर होत असेल तर, यामुळे त्याला आळा बसेल.
अत्यावश्यक गोष्टी कोणत्या आणि अनावश्यक गोष्टी कोणत्या याची यादी बनवल्यास हे बजेट फॉलो करणे सोपे जाईल.
२. आधी बचत करा.
यासाठी, पगार – बचत = खर्च हे समीकरण पक्के लक्षात ठेवा. याचा अर्थ, तुमचा महिन्याचा पगार किंवा मासिक उत्पन्न जितके असेल त्यातील काही रक्कम सुरुवातीला बचत म्हणून बाजूला काढून ठेवा आणि मग तुमच्या नेहमीच्या आवश्यक गोष्टींच्या खरेदीला लागा.
यामुळे तुमची बचतही होईल आणि अनावश्यक खर्च देखील वाचेल. यामुळे आयुष्यात तुम्ही जे काही ध्येय ठरवले आहे त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींची पूर्तता देखील सुरु होईल.
नियोजनबद्ध गुंतवणूक आराखडा तयार केल्यास या गोष्टी सोप्या होऊन जातील. महिन्याच्या पगारातील ठराविक रक्कम बाजूला काढून ठेवण्यासाठी एक स्वंतत्र बचत खाते उघडल्यास फायद्याचे ठरू शकेल.
यामुळे तुमच्या बचतीमध्ये कधीही खंड पडणार नाही ज्यामुळे तुमच्या पुढील स्वप्नांची पायाभूत तयारी सुरु होईल.
३. गंभीर प्रसंगा उद्भवल्यास काही रक्कम शिल्लक ठेवा –
तुम्ही अचानक आजारी पडलात किंवा अचानक तुमची नोकरी गेली तर तुमची आर्थिक परिस्थिती डळमळीत होऊ शकते. अशा अडचणीच्या वेळी तुमच्याकडे पुरेशी शिल्लक नसेल तर, तुम्ही बचत करून जी रक्कम बाजूला काढून ठेवले त्यातील पैसे वापरावे लागतील.
अनेकदा आपल्याला छोटीमोठी कर्जे देखील द्यावयाची असतात अशात जर आर्थिक गणित कोलमडलं तर, सगळीच गणिते बिघडतात. म्हणून अशा अडचणीच्या वेळी वापरता यावेत यासाठी काही रक्कम बाजूला काढून ठेवण्याची सवय लावून घ्यावी.
अशा अडचणीच्या वेळी किमान तुमच्याजवळ पाच-सहा महिन्यांचा पगार तरी शिल्लक असायला हवा, यादृष्टीने तुम्ही आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे.
४. कर्जावर नियंत्रण ठेवा-
बऱ्याचदा जेंव्हा नोकरी स्थिरस्थावर होईपर्यंत आपल्यावरील कर्जाचा बोजा वाढलेला असतो. सध्याच्या काळात अगदी चुटकीसरशी कर्ज मिळवणे सोपे झाल्याने आपल्याला महागड्या वस्तू आणि अरामादायी जीवन जगण्याची सवय झाली आहे.
परंतु, कर्ज घेण्याच्या या सवयीवर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास आपण यात पुरते बुडू शकतो. पुढे आपला पगार वाढेल किंवा काही काळाने आपण हे कर्ज फेडू अशा भ्रमात राहिल्यास परिस्थिती आणखीन हाताबाहेर जाऊ शकते.
आपण येणाऱ्या पगारावर किंवा उत्पन्नावर इतके अवलंबून राहतो की, आपल्या अतिरिक्त खर्चाच्या सवयीवर नियंत्रण राहत नाही.
यामुळे आपले जे पुढचे मोठे ध्येय आपण ठरवलेले असते त्याच्यावर परिणाम होतो. त्यामुळे विनाकारण कर्ज घेण्याच्या मोहात पडू नका.
५. आवश्यक ती काळजी घ्या-
आयुष्य हे अनेक अकल्पित गोष्टींनी भरलेले आहे. तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी वेळीच योग्य नियोजन न केल्यास ऐनवेळी पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते.
तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक बाबी काय आहेत त्या ओळखा आणि खात्रीशीर ठिकाणी त्यासाठी गुंतवणूक करा. तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत? त्या कोणत्या विमा पॉलिसीमधून मिळतील याच्या अंदाज घ्या.
तुमच्या कुटुंबाच्या संपूर्ण सुरक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करा. घर, आरोग्य आणि अपघात यासारख्या प्राथमिक गोष्टींचा सर्वात आधी विचार करा.
६. ध्येय निश्चित करा –
आपल्या सर्वाचे आयुष्यात काही ना काही ध्येय असतेच. मग, ते नोकरीत प्रमोशन मिळणे असेल किंवा नवीन गाडी /घर घेणे असेल किंवा मुलांना चांगले शिक्षण देणे असेल. ही सगळीच स्वप्ने आयुष्यात फार महत्वाची असतात.
यापैकी काही गोष्टींचा आपल्यावर अतिशय ताण येतो. यामुळे आपल्या आर्थिक नियोजनावर परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे आपले मोठ्यातमोठे ध्येय गाठणे अशक्यप्राय होऊन बसते. त्यामुळे तुम्ही जी ध्येये निश्चित केली आहेत, ती साध्य करण्यासाठी तुमच्या उपलब्ध रकमेचा कसा वापर करता येईल याचा विचार करा.
७. तुमच्या गरजा ओळखा –
आपल्या पैकी अनेकजणांचे ध्येय अस्पष्ट असते जसे की, लवकर निवृत्त होणे किंवा निवृत्त झाल्यानंतर परदेशवारीला जाणे. पण, असे प्लॅनिंग करताना आपल्याला पुढे कोणत्या अनिश्चिततेला सामोरे जायचे आहे याची कल्पना नसते.
कारण, आपली आर्थिक परिस्थिती नेहमीच स्थिर राहत नाही, ती सतत बदलत असते. त्यामुळे भविष्यात सगळ्या गोष्टी आहेत तशा सुरळीत राहतीलच असे नाही.
त्यामुळे भविष्यातील आपल्या गरजा काय असणार आहेत याची पुरेशी स्पष्ट कल्पना आपल्याला असणे गरजेचे आहे.
त्यामुळे तुमच्या गरजा काय आहेत आणि त्यासाठी आपल्याला किती रकेमची तरतूद करून ठेवावी लागणार आहे ते आत्ताच ठरवून ठेवा. त्यामुळे आपल्याला कोणकोणत्या माध्यमातून पैसा उभा करता येऊ शकतो याचा तुम्हाला अंदाज येईल.
८. निश्चित ध्येय ठरवून ते मिळवण्यासाठी गुंतवणूक करा.
भविष्यात आर्थिक स्थैर्य हवे असेल तर, इक्विटी, जमीन किंवा सोने अशा कोणत्या ना कोणत्या माध्यमात पैसे गुंतवणे महत्वाचे आहे.
बऱ्याचदा आपण गुंतवणूक आणि परतावा यांची गल्लत करतो किंवा आपल्या आवाक्या बाहेरची झेप घेतो ज्यामुळे धोका संभवू शकतो. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवताना तुमच्या क्षमतेचा जाणीव पूर्वक विचार करा.
९. स्वतःच्या सवयी जाणून घ्या –
बहुतेक वेळा आपले आर्थिक निर्णय हे आपल्या सवयींवर अवलंबून असतात. त्यामुळे आपल्या गरजांचे आर्थिक नियोजन करण्यावर याचा परिणाम होतो.
घरासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू किंवा तुमच्या स्वप्नातील एखादी मोठी वस्तू जसे कार किंवा घर घ्यायचे आहे तर तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे यावरून या इच्छा पूर्ण होणार की नाही हे ठरेल.
घरगुती सामान जर तुम्ही सुपरमार्केट मध्ये खरेदी केले तर त्यावर तुम्हाला सवलत मिळते. कर खरेदी करताना देखील मेंटेनन्स आणि फ्युएल इफ़िसिअन्सि यांचा विचार करून खरेदी करा.
कारण अशा वस्तू एकदाच खरेदी करायच्या असल्या तरी त्यावर वारंवार पैसे खर्च करावे लागतात. तुम्हाला सतत खरेदी करायची सवय असेल तर, तुमच्या सवयीत बदल करून तुम्ही मोठी रक्कम वाचवू शकत.
१०. आर्थिक साक्षर बना –
सध्याच्या युगात माहितीची अजिबातच उणीव नाही. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही अनेक वेबसाईट वरील माहिती वाचून त्याप्रमाणे आपले निर्णय ठरवू शकता.
आर्थिक नियोजन कसे करावे याबद्दल माहिती देणारे अनेक ब्लॉग आहेत, वर्तमानपत्र, ऑनलाईन फोरम आहेत. त्यामुळे स्वतःला आर्थिक साक्षर बनवा आणि गुंतवणुकी संदर्भात सगळी माहिती जाणून घ्या.
एखादी माहिती तुम्हाला समजली नसेल किंवा त्याबाबत काही शंका असतील तर आर्थिक सल्लागारांची मदत घ्या.
११. आर्थिक दस्तऐवजांचे रेकॉर्ड लावून ठेवा –
तुम्ही कुठे गुंतवणूक केली आहे, पॉलिसी घेतली आहे, विमा हप्ते भरले आहेत, तर या सगळ्यांची कागदोपत्री केलेली नोंद व्यवस्थित जपून ठेवा. यामुळे तुमच्या नंतर देखील वारसदारांमध्ये वाद होणार नाहीत.
तुमच्या आर्थिक गुंतवणुकीची कागदोपत्री नोंद ठेवली असेल तर त्याबद्दल आपल्या जोडीदाराला योग्य ती सगळी माहिती देऊन ठेवा.
या नोंदी ठेवण्यासाठी एक्सेल सारख्या ऑनलाईन साधनांचा वापर करू शकता. त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळणे सोपे जाईल. तुमच्या नंतर तुमची संपत्ती किंवा पैसा तुमच्या मुलांना हस्तांतरित होणे आवश्यक आहे.
काही काही कुटुंबात वारसा वरून कोर्टात जाण्याची वेळ येते. तुमच्या मुलांवर ही वेळ येऊ नये म्हणून म्हणून तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्यानुसार तुमचे इच्छापत्र बनवून घ्या. यामुळे अनेक वाद टळतील आणि घरात कटू प्रसंग उद्भवणार नाहीत.
१२ आरोग्याची / तब्येतीची काळजी घ्या
आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पौष्टिक आहार घ्या. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि निरोगी रहा.
तुमचे आजारपण किंवा तब्येतीच्या तक्रारींमुळे तुमच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होऊ शकतो. अति ताणताणाव टाळून संतुलित आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. यातच सुखी आयुष्याचे रहस्य दडले आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.