' भारतीय सैनिकांच्या या शौर्यासाठी पात्र ठरण्याची जबाबदारी आपल्यावर आहे – InMarathi

भारतीय सैनिकांच्या या शौर्यासाठी पात्र ठरण्याची जबाबदारी आपल्यावर आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : सर्वेश फडणवीस 

===

२६ जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. २० वर्षांपूर्वी याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते.

 

kargil war InMarathi

 

या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. तसेच या पूर्वीच्या भारत पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती.

उलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता.

 

Kargil.-war 1 Inmarathi

 

पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले. इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठिकाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले.

 

Kargil.-war 2 Inmarathi

 

कारगिल व द्रास परिसरातील अति उंच दुर्गम जागी हे ठिकाण आहे. अनेक महिन्यांच्या प्रयत्‍नांनंतर भारताला ते परत मिळवण्यात यश मिळाले.

हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे अत्युत्‍कृष्ट उदाहरण आहे. यात युद्धाला लागणारी सामग्री व मनुष्यबळ ने-आण करण्याचा चांगलाच अनुभव भारतीय सैन्याला मिळाला.

हे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते त्यामुळे सगळ्या जगाचे लक्ष हे युद्ध कसेकसे पुढे चालले आहे याकडे होते. परंतु भारताने हे युद्ध कारगीलपुरतेच मर्यादित ठेवले. त्यामुळे दाखवलेल्या संयमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले.

 

Kargil.-war 3 Inmarathi

 

काल त्याची परिणीती म्हणून २६ जुलै कारगिल विजय दिवस म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला गेला.

या युद्धात भारतीय सैनिक जो देशकार्य आणि देशभक्तीचा ऊर्जा स्रोत मानला जातो तो कार्यतत्पर होता.

कुठल्या ही लढाईसाठी स्वतःच्या प्राण अर्पण करण्यासाठी तत्पर असणारा आमचा सैनिक हा प्रत्येक भारतीयाचा रोल मॉडेल आहे आणि राहील यात तिळमात्र शंका नाहीच.

 

Kargil.-war 4 Inmarathi

 

कसा आहे आमचा भारतीय सैनिक? भारतीय सैनिक म्हणजे शौर्य, निर्धार,अन निष्ठा यांचं मूर्तिमंत प्रतीक आहे. असीम आकाशापासून अथांग सागरापर्यंत आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवणारा भारतीय सैनिक आहे.

देशाच्या सीमेवर डोळ्यांत तेल घालून त्याचा सदैव जागता पहारा असतो असा आमचा भारतीय सैनिक आहे म्हणून आम्ही आपल्या घरात सुखाची झोप घेऊ शकतो.

भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणारा कर्तव्यकठोर, निश्चयातही माणूसपणाची कोवळीक जपणारा असा आमचा भारतीय सैनिक आहे.

 

Kargil.-war 5 Inmarathi

 

भारतीय सैनिकाकडे दुर्दम्य आशावाद, प्रखर राष्ट्रनिष्ठा, असामान्य कर्तृत्व, उच्च मनोबल, अदम्य साहस हे गुण उपजतच आहेत. आपल्या उद्यासाठी आज देणारा हाच आमचा भारतीय सैनिक आहे.

खरंतर सैनिक ही एक वृत्ती आहे. त्यामागे शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्यागाचं अधिष्ठान आहे. म्हणूनच बर्फातील ४० डिग्री तापमान असो किंवा वाळवंटातील ५० डिग्री आमचा भारतीय सैनिक हा कार्यतत्परच आहे.

दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर असो, शत्रूच्या समोर जाणं असो अथवा निसर्गाच्या तांडवात सर्वसामान्य जनतेचा देवदूत बनून मदतीला धावून जाणं असो आमचा सैनिक देशाच्या प्रत्येक संकटाला धाडसाने समोर जातो.

प्रसिद्धी आणि पैसा या प्रलोभनापासून दुर राहून सैनिक आपलं काम निस्पृह, निरपेक्षतेन, एकदिलाने आणि एकसुराने करत असतो.

 

Kargil.-war 6 Inmarathi

 

सैनिकाला मृत्यू प्रत्यक्ष दिसत असतानाही पुढे पाउल टाकणं यासारखं धैर्य नाही आणि या धैर्याला तो हसतमुखाने समोर जातो. ही त्यागाची परिसीमा गाठण्याचे प्रशिक्षण त्याला इथं येण्याआधीच मिळत असते.

सैनिक हा आपल्याच समाजातून सैन्यदलात प्रवेश करतो आणि या सैनिकांचे आपण देणं लागतो की नाही हा प्रश्न स्वतःला विचारण्याची आज नितांत आवश्यकता आहे.

सर्व सीमांवर वादळवाऱ्यात, बर्फात, पावसात, सैनिक चोवीस तास कडक पहारा देत असतो. तुम्ही निश्चित रहा, मी जागा आहे असे तो छातीठोकपणे सांगतो.

 

Kargil.-war 7 Inmarathi

 

सीमेपासून दूर असलेल्या शहरातील माणसं – आपल्या ठिकाणी आपलं घर, आपली गाडी, मुलं हाच भारत आणि हेच जग मानणारी माणसं आज बघायला मिळत आहेत.

आज आपण कुणाच्या जीवावर स्वातंत्र्य उपभोगतो आहे ह्याचा विचार प्रत्येकाने करायचा आहे. आणि हीच वेळ आहे आपण आपल्या येणाऱ्या पिढीला सैनिक हाच राष्ट्राचा आत्मा आहे हे सांगताना अभिमानच वाटला पाहिजे.

आजचा तरुण हा देशभक्तीने ओतप्रोत भरलेला आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दिवस बाजूला ठेवले तर बाकी दिवसांना आपलं देशप्रेम हे खरंच जागृत असतं का. हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

 

Kargil.-war 8 Inmarathi

 

आज प्रत्येक जाणकार, सद्सद्विवेकबुद्धी शाबूत असलेल्या बुद्धिप्रामाण्यवादी तरुणाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशेने न जाता त्या वाऱ्याचा रोख बदलवून नव्या दिशेला जाणं अत्यंत जरुरी आहे.

आज वेळ आली आहे आपल्याला अंतर्मुख होण्याची ज्यांनी ज्यांनी ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्याच्या झालेल्या युद्धात शत्रूचा निःपात करण्यासाठी स्वतःच्याच नव्हे तर आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या सुखांना तिलांजली दिली ; त्यांच्या त्यागाला आपण खरंच लायक आहोत का ?

सैन्यदलाबद्दल नितांत आदर, अभिमान, श्रद्धा, विश्वास हा प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात उजागर व्हायला हवा, ही ज्योत सतत पेटती राहायला हवी. ही सैन्यदलांची गरज नाही, आपलं कर्तव्य आहे.

 

women-in-army InMarathi

 

आणि या कर्तव्याप्रति प्रत्येकाने अधिक सजग आणि जागरूक होऊन देशभक्तीची ज्योत प्रत्येकाच्या मनात जागवण्यासाठी मी तत्पर राहील हाच संकल्प घेण्याची आवश्यकता आहे.

मातृभूमीचा ऋण फेडणारा सैनिक हाच खरा आयकॉन व्हावा हीच काळाची गरज आहे. सैनिकांचा सन्मान करणे, त्याच्या कर्तृत्वाचा गौरव करणे आणि आम्ही सदैव तुमच्याबरोबर आहे हा विश्वास त्यांच्याप्रति पोहोचविण्यासाठी आम्ही तत्पर आहे ही आपली जबाबदारी आहे.

२६ जुलै च्या अतुलनीय कामगिरीसाठी त्यात प्राणार्पण झालेल्या आणि आजवर देशसेवेसाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक सैनिकाला वंदन करूया.

 

Kargil.-war 9 Inmarathi

 

शौर्य दक्षम युध्दाय । बलिदान परम् धर्म: ।। या न्यायाने आमचा सैनिक कार्य करतो आहे.

नागालँडमधील कोहिमा येथील भव्य युद्धस्मारकामध्ये एका योध्याच्या स्मारकावर कोरलेले शब्द प्रत्येकाने आज आपल्या हृदयातही कोरून ठेवायला हवेत.

माघारी जेव्हा जाल परतून, ओळख द्या आमची त्यांना ..
आणि सांगा, तुमच्या उद्या साठी आम्ही आमचा आज दिला.

जयहिंद !!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?