आसामच्या भयंकर प्रलयात वन्य प्राण्यांसाठी मसीहा ठरलेल्या अवलियाची कथा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
सध्या कुठे ना कुठे पुराच्या बातम्या येत आहेत .टिव्हीवरून पुराची दृश्य बघताना आणि घरांची मालमत्तेची वाताहत झालेली बघताना कोणत्याही माणसाच्या हृदयाला पिळच पडतोय. त्यातही जेव्हा या पुरातून मूक जनावरं वाहून जाताना दिसतात तेंव्हातर फारच वाईट वाटते.
जनावरं तशी पाण्यात पोहू शकतात किंबहुना बऱ्याच मोठ्या प्राण्यांना पाण्यात डुंबायला आवडतं. पण जेव्हा पुराच्या पाण्याचा प्रचंड रेटा अंगावर येतो तेव्हा पट्टीचा पोहणारा माणूस असो वा प्राणी पुराच्या प्रवाहाच्या समोर टिकाव धरू शकत नाहीत.
असंच काहीसं आसाममधील पुराच्या पाण्यातून वहात जाणाऱ्या प्राण्यांच्या बाबतीत घडताना दिसतंय.
आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या पुराने फक्त किनाऱ्यालाच नाही तर जंगलाला देखील वेढा घातला आणि जशी गावागावात घरांची आणि माणसांची वाताहत झाली तशीच प्राण्यांच्या वस्तिस्थानांची पार वाट लागली.
जंगलांमधूनही पाणी घुसले आणि उथळ भागातील कुरणांवरील हरणे व इतर प्राणी जीव वाचवण्यासाठी सैरभैर होऊन धावू लागले. पण धावून धावून धावणार तरी कोठे?
मुळात ब्रह्मपुत्रा नदी एखाद्या समुद्रासारखीच दिसते आणि त्यातून तिला पूर आलेला,अशा वेळेस जेथे जावे तेथे फक्त पाणीच. माणसांना आणि सामान वाचवण्यासाठी सरकारने होड्या किंवा बोटींची सोय केली.पाळीव जनावरे पण बाहेर काढण्यात आली पण बिचारी वन्य जनावरे जाणार कुठे?
याच वेळी अशीही काही निस्वार्थी माणसं या वन्य प्राण्यांच्या मदतीस आली.
वन्यजीव संरक्षक एरवी प्राण्यांवर लक्ष ठेवून असतात पण तेव्हा एकाचवेळी मोठ्या प्रमाणात प्राणी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत नसतात किंवा पाण्यात उतरलेली नसतात तेव्हा कमी संख्येतील वनरक्षक मोठ्या एरियावर लक्ष ठेवून प्राण्यांच्या हालचाली, त्यांचे खाणेपिणे यावर नजर ठेवून असतात.
पण आता मोठ्या संख्येने प्राणी महापुरातून बाहेर पडू लागल्याने जास्त संख्येने वनरक्षकांची जरुरी होती. याच वेळी धावून आली काही मंडळी…
काझीरंगा नॅशनल पार्क मध्ये असलेल्या दुर्मिळ एकशिंगी गेंड्यांना वाचवणे हे सर्वात महत्वाचे काम होतेच. जोडीला जखमी झालेल्या प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी नेऊन त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे होते.
आसामच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक, तसेच वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया (WTI) तसेच सेंटर फॉर वाईल्ड लाईफ रिहॅबिलिटेशन अँड काँझर्वेशन (CWRC) या तिन्ही संस्था मिळून या प्राण्यांना वाचवविण्याचे काम करत होत्या आणि अजूनही करत आहेत.
डॉक्टर रथीन बर्मन हे CWRC या संस्थेचे विभाग प्रमुख .त्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जण या बचावकार्यात गुंतले होते.
टीव्हीवर गेंड्याच्या एका पिल्लाला महापुरातून कसं वाचवलं गेलं हे दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हे पिल्लू वाहून चालले होते त्याच वेळी ही रेस्क्यू टीम तिकडे पोचली.
डॉक्टर बर्मन सांगत होते की त्या पिल्लाला वाचवण्यात यश आलं आणि आम्हाला समाधान मिळालं. ज्या चौघांनी त्या पिल्लाला सुखरूप किनाऱ्याकडे आणलं त्यातील तीनजण वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे मेंबर्स होते आणि एक आसाम वनविभागाचा होता.
प्रत्येक ठिकाणी कोणत्या प्राण्यांना बाहेर काढायचं आहे? किंवा किती प्राण्यांना? या नुसार टीम पाठवली जाते. त्यानुसार लागणारे साहित्य त्यांना दिले जाते, तसेच ते विशिष्ट प्राणी हाताळण्याची सवय असणारे लोकच त्या ठिकाणी पाठवले जातात.
आसामचे काझीरंगा नॅशनल पार्क ओळखले जाते ते एक शिंगी गेंड्याच्यामुळे. तसा हा प्राणी फार ठिकाणी आढळत नाही तसेच त्याच्या शिंगांना मार्केटमध्ये लाखो रुपयांची किंमत मिळते म्हणून त्यांची चोरटी शिकार केली जाते.
या मुळे या गेंड्यांचे अस्तित्वच धोक्यात आलेले आहे. या चोरट्या शिकारीमुळे हळूहळू हे गेंडे नामशेष होत जातील ही भीती वन व प्राणिप्रेमींना आहे.
असे गेंडे महापुराच्या धोक्याने जंगलाबाहेर पडू लागले तसेच त्यांचा नैसर्गिक आहार देखील मिळेनासा झाल्यावर ते स्थलांतर करू लागले पण सर्वत्र पाणीच पाणी असल्याने ते गोंधळात पडले.
अशा अवस्थेत त्यांना शिकारी लोक आयतेच पकडतील ही भीती होतीच. म्हणूनच त्यांना वाचविण्यासाठी हे वन्यप्रेमी प्रयत्न करत होते.
आपण आजारी पडू किंवा त्यांना वाचवण्याच्या नादात आपण बुडून जाऊ अशी कोणतीही भीती न बाळगता ,स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे सर्वजण प्राण्यांना सुरक्षित जागी नेण्याचे काम अहोरात्र करत होते.
केवळ गेंडेच नाहीत तर हरणे व इतर वन्यजीव वाचवण्याचे मोठे कार्य या टीमने केले.
आता बघुया हे कार्य नेमके कसे चालते ते. सर्वात आधी प्राणी पाण्यातच वाहून जात असेल तर त्याला बाहेर काढले जाते.
बहुतेक प्राणी पोहत आपला जीव वाचवून आजूबाजूच्या खेड्यात घुसतात.
अशा वेळेस गावातून वनखात्यास वर्दी दिली जाते. प्राणी कोणता आहे ,एकटा आहे की एकापेक्षा जास्त आहेत जसे की हरणांची टोळी घुसू शकते किंवा वाघ, गेंडा, अस्वल असे एकट्याने गावाचा आश्रय घेणारे प्राणी असतात.
बऱ्याचदा त्यांचे नैसर्गिक खाद्य न मिळाल्याने हरिणांसारखे तृणभक्षी प्राणी गावातील शेतातील पीक खाऊन फस्त करतात. वाघ असेल शिरलेला तर तो गाय बकरी अशी जनावरे मारून खातो किंवा काही खायला नाही मिळाले तर माणसावर हल्ला चढवू शकतो.
प्राणी जखमी झाले असतील तर जखमेतून रक्त वाहून गेल्याने किंवा जंतू संसर्ग झाल्याने किंवा अशा स्थितीत उपासमारीने मृत्युमुखी पडतात.
गावकरी वनविभागास वर्दी देतात मग वन विभाग अशा वेळेस आवश्यकतेनुसार रेस्क्यू टीम पाठवतो.
प्राण्याला किरकोळ जखमा असतील तर उपचार करून जंगलातील उंचवट्यावरील जो भाग पुराने बाधित नाहीय अशा ठिकाणी या प्राण्यांना सोडून देतात.
प्राण्यांची दुखापत गंभीर स्वरूपाची असेल तर त्यांना रेस्क्यू कॅम्प मध्ये पाठवून तिथे त्यांच्यावर उपचार करून ते बरे होईपर्यंत त्यांना ठेवून घेतले जाते व ते पूर्णपणे बरे झाल्यावर त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जाते.
आत्ता पर्यंत रेस्क्यू टीमने १० वन्यजीवांचे प्राण वाचवले आहेत त्यात दोन गेंड्याची पिल्ले आहेत.हे सर्व जण रेस्क्यूकॅम्पवर सुरक्षित आहेत. शेकडो प्राण्यांना परत जंगलात सोडण्यात आले आहे.
ही सर्व माहिती डॉक्टर बर्मन यांनी पत्रकारांना दिली. त्यांच्या मते ब्रह्मपुत्रेचे पाणी जंगलाच्या वरच्या टप्प्यात असलेल्या धरणात वाढले की ते पाणी धरणातून मोठ्या प्रमाणात सोडले जाते.
असे पाणी किनाऱ्यावरील गावात पसरते. जंगल वाढीच्या दृष्टीने तसेच प्राण्यांसाठी असे पूर निसर्गव्यस्थेसाठी चांगले असतात शिवाय प्राण्यांना याची सवय असते पण धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने महापूर येतो.
छोटे पूर आले तर पर्यावरणास धोका नसतो परंतु महापूर आले तर ते मानव आणि प्राणी दोघांसाठी त्रासदायकच असतात. असे अचानक पाणी सोडले जाऊ नये यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे.
डॉक्टर बर्मन एक किस्सा सांगत होते, “आम्ही अलीकडे काही वर्षे गावकऱ्यांची मिटिंग घेऊन त्यांना प्राण्यांविषयी माहिती देत असतो. कोणताही प्राणी गावात घुसला तर त्याला ना मारता किंवा त्याचा पाठलाग न करता आम्हाला कळवा आम्ही त्याला घेऊन जाऊ.
याचा परिणाम असा झाला की एका गावात घराच्या छपरावर या पुरातून वाचलेला वाघ चढून बसला होता आणि घरात माणसे होती. परंतु कोणत्याही प्रकारे त्याला हुसकवण्याचे प्रयत्न न केल्याने रात्री तो वाघ गुपचूप निघून गेला.
बऱ्याचदा हुसकवण्याच्या प्रयत्नात वाघ गावकऱ्यांच्या अंगावर धावून जातो आणि गावकरी गंभीर जखमी होतात.असे प्रकार टाळले तर मानव आणि वाघ दोघेही सुरक्षित राहतात.
बऱ्याचदा रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकेत त्यांचा मृत्यू होतो. सुरक्षित पणे त्यांना रस्ता ओलांडू दिला तर त्यांचे प्राण वाचतात.माणसाप्रमाणे त्यांचा देखील तो अधिकार आहेच. जंगलातून रस्ते न काढता बाहेरून काढले तरच वन्यप्राणी सुरक्षित राहू शकतात.”
डॉक्टर बर्मन यांच्यामते या वर्षी पुराच्या संकटात ६० ते ७० प्राण्यांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे जी मागील काही वर्षांच्या तुलनेत हा आकडा कमी आहे.
एकंदरीत आपली निसर्गव्यवस्था कायम ठेवायची असेल तर, योग्य ती पावले उचलली गेली पाहीजेतच.
डॉक्टर बर्मन आणि त्यांच्या टीमने प्राण्यांसाठी देवदूत बनून निस्वार्थीपणे त्यांच्या बचावाचे जे कार्य अहोरात्रपणे केलेले आहे त्याची सर्वांनीच दखल घेतली पाहिजे.
डॉक्टर बर्मन तुमचे आणि तुमच्या टीमचे शतशः आभार आणि अभिनंदन. तसेच तुमच्या पुढील वाटचालीस आमच्या शुभेच्छा
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.