‘फॅन्टा’ माहिती असेल, पण तुम्हाला फॅन्टा आणि हिटलरच्या नाझी सैन्याचं नातं माहितीये काय?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
फॅन्टा माहित नाही असे फार कमी लोक जगात आहेत. रोज लाखो लोक फॅन्टा पिऊन आपली तहान भागवतात. आपल्याला माहिती आहे की हे ऑरेंज फ्लेवरचे सरबत (सोडा) कोका कोला कंपनीचे आहे.
फॅन्टाला आजवर फक्त कोका कोला म्हणजेच कोक आणि पेप्सीने टक्कर दिली आहे. २०१५ सालीच फॅन्टाला ७५ वर्षे पूर्ण झाली. म्हणजेच १९४० साली फॅन्टा सर्वप्रथम बाजारात आले.
तुमचा इतिहास पक्का असेल तर तुमच्या लक्षात येईल की साधारण ह्याच काळात दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती. आपल्यापैकी बहुतेक लोकांना असेच वाटते की फॅन्टा हे अमेरिकन पेय आहे कारण कोका कोला ही अमेरिकन कंपनी आहे.
पण सत्य असे आहे की कोका कोलाने २०१५ पर्यंत ह्याबद्दल मौन बाळगले होते की फॅन्टा हे पेय पहिल्यांदा अमेरिकेत बनवले गेले नव्हते.
२०१५ साली फॅन्टाने यशस्वीपणे ७५ वर्षे पूर्ण केल्यानंतर कंपनीला असे वाटले की आता फॅन्टाविषयी लोकांना खरे सांगायला हरकत नाही. अर्थात कंपनीचा उद्देश वेगळा होता. कंपनीला अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धानंतर मूल्ये कशी जपली हे जगाला सांगायचे होते.
त्यांनी फॅन्टाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एक स्पेशल जाहिरात तयार केली. जाहिरातीच्या सुरुवातीला निवेदक जुन्या चांगल्या दिवसांची (गुड ओल्ड डेजची) आठवण करून देतो आणि कसे फॅन्टा आपल्याला परत त्या दिवसांत घेऊन जाते असे म्हणतो.
ही जाहिरात काहींना आवडली नाही. काहींना तर ती विकृत देखील वाटली. कारण १९४० चे दशक म्हणजे युरोपात नाझींनी हाहाकार माजवला होता.
ज्यूंचे भयानक शिरकाण तेव्हा राजरोसपणे सुरु होते. म्हणूनच ह्या होलोकॉस्टच्या दिवसांना कुणी चांगले कसे म्हणू शकतो असा प्रश्न ही जाहिरात बघून अनेकांना पडला.
तेव्हा कोका कोलाच्या प्रवक्त्याने असे स्पष्ट केले की ह्या जाहिरातीत १९४० च्या दशकाविषयी बोलले गेले नाहीये. त्यांच्या मते त्यांना त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या लहानपणाच्या आठवणींत परत न्यायचे होते.
त्या जाहिरातीत फॅन्टाची जी अन्युलेटेड बाटली दाखवली आहे ती १९६०च्या दशकात आली. पण लोकांचा ह्या स्पष्टीकरणावर फारसा विश्वास बसला नाही. टीकाकारांनी असेही म्हटले की “फॅन्टा” हे नाव “fantastisch” ह्या शब्दावरून आले आहे.
लोकांनी असाही आरोप केला की, अडॉल्फ हिटलरने स्वतः त्याच्या सैन्यासाठी एक ऑरेंज फ्लेवरचे पेय तयार करण्याचे आदेश दिले होते.
ह्यापुढे जाऊन असेही म्हटले गेले की हे पेय बनवण्यासाठी संत्री फ्लोरीडाहून आयात न करता नाझी जर्मनीचा फॅसिस्ट मित्र असलेल्या इटलीतुन आयात करण्यात आली आणि ह्या ऑरेंज पेयाचे ग्राहक अमेरिकेचे सैनिक नसून ऍडॉल्फ हिटलरच्या नाझी सैन्यांतील सैनिक होते.
लोकांनी ह्या जाहिरातीवर टीका केल्यामुळे थोड्याच काळात ही जाहिरात टीव्हीवरून काढून घेण्यात आली. पण तरीही लोक मात्र ही जाहिरात विसरले नाहीत. लोकांचा अंदाज काही प्रमाणात खरा असला तरी ते पूर्ण सत्य नव्हे.
सत्य हे आहे की अडोल्फ हिटलरचा फॅन्टा तयार होण्यात थेट सहभाग नव्हता. पण त्याचा ह्यात अप्रत्यक्षपणे सहभाग होता असे म्हणावे लागेल कारण त्याच्यामुळेच जगावर दुसरे महायुद्ध लादले गेले.
फॅन्टा हे फोक्सवॅगन बीटल प्रमाणे नाझींचे उत्पादन नाही. पण कोका कोलाच्या जर्मनीतील मॅनेजिंग डायरेक्टरने गरज म्हणून फॅन्टाची कल्पना मांडली. दुसऱ्या महायुद्धाच्या आधी जर्मनीत कोका कोला हे सर्वात जास्त लोकप्रिय पेयांपैकी एक होते.
वाढत्या मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी कोका कोलाने आणखी फॅक्टरीज उघडल्या. १९३३ ते १९३९ दरम्यान जर्मनीत दर वर्षी कोकाकोलाचे एक लाख ते ४.५ दशलक्ष क्रेट्स विकले गेले.
१९३६ च्या बर्लिन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेची प्रायोजक कोका कोला कंपनी होती.
त्यानंतर नाझी जर्मन सैन्य म्हणजेच नाझी जॅकबूट्स युरोपमध्ये सगळीकडे संचार करू लागले. आधी ते पोलंडला गेले ,नंतर नेदरलँड्स , बेल्जीयम आणि मग फ्रान्समध्ये गेले. ह्यामुळे अमेरिका व जर्मनी ह्यांच्यातील व्यापारावर परिणाम झाला.
१९४० च्या दशकात जर्मनीचे ऐतिहासिक अध:पतन झालेले जगाने बघितले. अडोल्फ हिटलर आणि त्याच्या नाझी सैन्याने जर्मनीवर राज्य केले. हिटलरच्या अतिमहत्वाकांक्षी धोरणामुळे आणि वंशभेदामुळे थोड्याच काळात जर्मनीचे अनेक शत्रू निर्माण झाले.
त्यामुळे कोका कोला जर्मनीवर ह्याचा गंभीर परिणाम झाला. रिचमार्शल हर्मन गोरिंगच्या कृपेने कोका कोला काँसंट्रेटच्या आयातीवर निर्बंध घातले गेले.
युद्धामुळे जर्मनीची अर्थव्यवस्था ढासळू लागली आणि त्यामुळे कच्चा माल सुद्धा दुर्मिळ झाला.
त्यामुळे Essen शहरातील कोका कोला GmbH ( Gesellschaft mit beschränkter Haftung) चे मॅनेजिंग डायरेक्टर मॅक्स कीथ ह्यांना ही कंपनी सुरु ठेवण्यासाठी तातडीने काहीतरी हालचाल करणे गरजेचे होते.
मॅक्स कीथ ह्यांनी कोका कोलाचे मुख्य जर्मन केमिस्ट Dr. Schetelig ह्यांच्याकडे दुसरा काहीतरी पर्याय शोधण्याची जबाबदारी सोपवली. हे पेय उपलब्ध सामग्रीतून तयार करता यायला हवे हे त्यांच्यापुढे मुख्य आव्हान होते.
त्यांच्यापुढे फार काही पर्याय नव्हते पण त्यांना जी कल्पना सुचली ती आश्चर्यकारक होती. Dr. Schetelig ह्यांनी सफरचंदाचा गर आणि व्हे ह्यांच्यापासून एक पेय तयार केले. ही कल्पना फारच वेगळी आणि उत्तम होती.
जर्मनीत सफरचंद मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात आणि आणि चीज व क्वार्कच्या उत्पादनातून व्हे सुद्धा तयार होते. युद्धाच्या काळात सुद्धा चीजचे उत्पादन थांबलेले नव्हते. त्यामुळे Dr. Schetelig ह्यांच्या प्रयत्नातून एक गोड फ्रुट ड्रिंक तयार झाले.
आता फक्त ह्या पेयाला एखादे आकर्षक नाव द्यायचे बाकी होते. ह्या पेयामागची कल्पना अशी होती की हे चविष्ट पेय मजा म्हणून प्यायचे. हे विचार मनात ठेवून मॅक्स कीथ ह्यांनी ह्या पेयाच्या नावासाठी कंपनीत एक स्पर्धा ठेवली.
शेवटी मॅनेजिंग डायरेक्टर आणि कर्मचाऱ्यांनी ठरवले की हे पेय “इमॅजिनेटिव्ह” आहे आणि ह्याची चव “फँटॅस्टिक” आहे. म्हणून ह्या नव्या पेयाचे नाव “फॅन्टा” असे असावे. वर म्हटल्याप्रमाणे फॅन्टा हे नाव “fantastisch” ह्या जर्मन शब्दावरून घेण्यात आले.
फॅन्टा हे नाव ह्या पेयाला अगदी शोभणारे होते आणि त्यामुळे त्याच्या जाहिराती देखील कल्पक होत्या.
कीथ ह्यांनी म्हटले की ह्या ब्रँडच्या नावातच ह्या पेयाच्या यशाचे गमक दडलेले आहे कारण हे नाव जगातील बहुतांश भाषा बोलणाऱ्या लोकांना समजते. तर अश्या प्रकारे १९४१ साली फॅन्टाची जर्मन ट्रेडमार्क म्हणून नोंद करण्यात आली.
सफरचंदाच्या चवीचे फॅन्टा दुसऱ्या महायुद्धापर्यंत तयार करण्यात आले. महायुद्ध संपल्यानंतर जगात नेहमीप्रमाणे व्यवहार सुरु झाले आणि कच्च्या मालाचा प्रश्न सुटला.
त्यामुळे फॅन्टाच्या रेसिपीमध्ये अनेक प्रयोग करून त्याची चव अधिक चांगली करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. १९४९ साली फॅन्टाची अमेरिकेत सुद्धा ट्रेडमार्क म्हणून नोंद करण्यात आली.
तेव्हापासून फॅन्टाच्या नावाचे सर्व हक्क कोका कोला कंपनीच्या मालकीचे झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात सगळीकडेच सॉफ्ट ड्रिंक्सची लोकप्रियता आणि मागणी वाढली.
१९५५ साली इटलीच्या नेपल्स येथील कोका कोला कंपनीने एक प्रयोग केला. ऑरेंज फ्लेवरचे एक पेय तयार केले. हे संत्र्याच्या चवीचे पेय नंतर जगात फारच लोकप्रिय झाले.
आज फॅन्टा म्हटले की ऍप्पल फ्लेवरचे पेय डोळ्यासमोर न येता ऑरेंज सोडाच डोळ्यापुढे येतो. ह्यामुळे १९५५ साली फॅन्टा नव्या रूपात आणले गेले. फ्रेंच डिझायनर रेमंड लोवेने ब्राऊन फॅन्टा रिंग बॉटलचे डिझाईन तयार केले.
हे डिझाईन अतिशय उत्तम होते. गडद रंगाच्या काचेमुळे आतल्या पेयावर परिणाम होत नव्हता आणि बाटलीची रचना अशी होती की ती अगदी सहजतेने हाताळली जाईल.
फॅन्टा ऑस्ट्रेलियात १९५५ साली तर अमेरिकेत १९५६ साली आले. १९६० च्या दशकात फॅन्टा ३६ देशांत लोकप्रिय झाले होते. ते १९७९ साली सोव्हिएत रशियामध्ये आले आणि चीनमध्ये १९८४ साली आले.
सगळीकडे ऑरेंज फॅन्टाच सर्वात जास्त लोकप्रिय झाले. ऑरेंज फॅन्टा नंतर लेमन फॅन्टा देखील आले. आताचे फॅन्टा हे आधीच्या जर्मन फॅन्टा पेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. त्याची कृती देखील वेगळी आहे आणि डिझाईन तर पूर्णच बदललेले आहे.
ज्यांना पेप्सी, कोकची चव आवडत नाही त्यांच्यासाठी फॅन्टाने चांगलाच पर्याय उपलब्ध करून दिलाय आणि अजूनही ह्या ऑरेंज सोडाची लोकप्रियता कमी झालेली नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.