पंढरीचा विठूराया आणि आषाढी वारीबद्दल १० अफलातून गोष्टी..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आज देवशयनी एकादशी, म्हणजेच आषाढी एकादशी! आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्वाचा असतो कारण आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठोबा-रखुमाईची आजच्या दिवशी पंढरपुरात महापूजा बांधली जाते. उपासना केली जाते.
महाराष्ट्रात जी संतांची परंपरा आहे त्या संतांचे दैवत विठोबा हेच होते आणि त्यांनी त्यांचे सर्व आयुष्य विठोबा-रखुमाईच्या चरणी वाहिले आणि जनसामान्यांना भक्तीचे महत्व पटवून दिले.
त्यांचीच परंपरा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने जपली आहे.
१. वारी म्हणजे काय?
गेली शेकडो वर्षे दर वर्षी वारकरी भक्त आषाढी-कार्तिकीला त्यांच्या विठोबामाऊलीचे दर्शन घ्यायला पंढरपूरपर्यंत पदयात्रा करतात. ह्यालाच आपण वारी असे म्हणतो. ह्या वारीत कुणी श्रीमंत नाही, कुणी गरीब नाही, कुणी जातपात, रंगरूपाचा भेद मनात ठेवत नाहीत.
आपण सगळे फक्त विठोबाचे भक्त आणि त्याला भेटायला पंढरपूरला जायचे हाच पवित्र भाव मनात ठेवून वारीला जातात.
ऊनपाऊस, काटे, खाचखळगे, तहान भूक सगळं मागे ठेवून मनात फक्त विठुरायाला डोळे भरून बघण्याची तीव्र इच्छा घेऊन हजारो वारकरी दर वर्षी पंढरपूरला येतात.
वारी म्हणजे आनंदाचा,भक्तीचा सोहळा असतो.ही महाराष्ट्राची एक आगळीवेगळी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे जिला शेकडो वर्षांचा इतिहास आहे.
२. वारीची सुरवात
आळंदीहुन ज्ञानोबा माऊलींची पालखी आणि देहू येथून तुकोबा माऊलींची पालखी निघते. पालखीमध्ये माउलींच्या पादुका असतात आणि ही पालखी रथातून पंढरपूरला मार्गस्थ होते.
एकादशी सारख्या पवित्र दिवशी नित्यनियमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय आणि जो ही वारी करतो तो वारकरी असतो.
आणि ह्या वारकऱ्यांचा धर्म म्हणजेच भागवत धर्म होय. वारकरी श्वासात श्वास आणि जीवात जीव असेपर्यंत सहसा वारी चुकवत नाहीत. कारण पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान आणिक दर्शन विठोबाचे” ही वारकऱ्यांची तीव्र इच्छा असते.
एरवी सुद्धा विठोबाचे सतत स्मरण व्हावे म्हणून हे वारकरी गळ्यात तुळशीची माळ धारण करतात आणि भाळी गोपीचंदनाचा टिळा लावतात, नित्यनियमाने हरिपाठ म्हणतात.
३. वारीचा इतिहास
वारीला इसवी सन तेराव्या शतकाच्या आधीपासूनचा इतिहास आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज ह्यांनी सर्व जातीपातींच्या विठूभक्त्तांना एकत्र घेऊन ही वारीची परंपरा सुरु ठेवली आणि तिला व्यापक स्वरूप दिले.
संत साहित्याच्या अभ्यासकांच्या मते विठोबाचा भक्त पुंडलिकापासून वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली. तोच ह्या संप्रदायाचा आद्य प्रवर्तक आहे.
४. ज्ञानोबा माऊली व तुकोबांच्या पालखीची सुरुवात
सातारा जिल्ह्यातील आरफळ गावाच्या हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी व सोहळाकरून थाटामाटात ती पालखी पंढरपूरला नेण्याची सुरुवात केली आणि आज संगणकयुगात सुद्धा ही परंपरा अव्याहतपणे सुरु आहे.
तसेच तुकोबारायांचे पूर्वज विश्वम्भर बाबा हे ज्ञानेश्वर महाराज व नामदेव महाराज ह्यांच्या समकालीन होते. त्यांच्या घराण्यातच पंढरीची वारी करण्याची परंपरा होती.
संत तुकाराम महाराज स्वतः नेहमी चौदाशे टाळकरी घेऊन प्रत्येक शुद्ध एकादशीला पंढरपूरला जात असत. तुकोबारायांच्या वैकुंठगमनानंतर त्यांचे पुत्र नारायण महाराज ह्यांनी ह्या वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले.
एकोणिसाव्या शतकापासून संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानदेव महाराज, संत मुक्ताई, संत एकनाथ महाराज, संत जनार्दन स्वामी, संत सावतामाळी आणि रामदास स्वामी ह्यांच्याही पालख्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात.
महाराष्ट्रातील विविध गावांतून पालख्या पंढरपूरला येतात आणि पंढरपुरात वारीच्या वेळेला भक्तांचा महापूर लोटतो.
आषाढी एकादशीच्या पहाटे विठोबा रखुमाईची शासकीय महापूजा होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सपत्नीक ही पूजा करतात ह्याशिवाय दर वर्षी वारकरी संप्रदायातील एका दाम्पत्याला विठोबाच्या पूजेचे भाग्य लाभते.
५. पंढरपूरच्या देवळाचा प्राचीन इतिहास
इसवी सन ५९६ च्या वेळचे काही ताम्रपट सापडले त्यात पंढरपूर आणि आसपासच्या गावांचा उल्लेख सापडतो . त्यानंतरच्या काही शिलालेखांत सुद्धा पंढरपूरच्या विठोबा मंदिराचा उल्लेख आहे.
त्यावरून हे देऊळ अतिशय पुरातन काळापासून अस्तित्वात आहे ह्याचे पुरावे मिळतात. त्यापैकी बाराव्या शतकात जो शिलालेख मिळाला तो आजही पंढरपूरच्या देवळात उत्तरदिशेच्या भिंतीवर असलेला आपल्याला दिसतो.
काळाच्या ओघात तो फिकट झालाय म्हणून त्याभोवती तारेचे कुंपण घालण्यात आले आहे.
ह्या पुरातन देवळाचा सोळाव्या किंवा सतराव्या शतकात जीर्णोद्धार करण्यात आला. परंतु बाराव्या शतकातील मूळ मंदिराचे अवशेष आजही ह्या ठिकाणी आपल्याला दिसतात.
६. विष्णूच्या दशावतारांपैकी एक असलेला विठ्ठलावतार
विठोबाचे भक्त हे वैष्णव संप्रदायातील आहेत. ह्या देवतेचे पूजन महाराष्ट्र व कर्नाटकात केले जाते.
विठ्ठल हा श्रीविष्णूचा द्वापारयुगातील दुसरा अवतार म्हणून ओळखला जातो तसेच श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी विठोबा हा नववा अवतार आहे असे मानतात. पण शास्त्र व पुराणांत विठोबाला बोधराज किंवा बौध्य असेही म्हटले आहे.
गरुड पुराणात बौध्य ह्या अवताराचे जे वर्णन केले आहे ते विठोबाशी तंतोतंत जुळते. तेजस्वी नेत्र असलेला, कटीवर कर ठेवून उभा असलेला, मौन असलेला बौध्य म्हणजेच विठोबा असल्याची भक्तांची धारणा आहे.
विठोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते.
७. विठ्ठलावताराची कथा आणि गयासुराचा वध
द्वापार युगात गयासूर नावाच्या राक्षसाचा नाश करण्यासाठी श्रीहरीने विठोबाचा अवतार घेतला. गयासुराने सत्यश्रेष्ठ धर्माचा नाश करण्यासाठी गो-ब्राह्मण हत्या व देव गणांना भुलवणे हे प्रकार सुरु केले.
त्यावेळी श्रीविष्णूने बौध्य नावाचा अवतार घेतला आणि गयासुराला अग्निकुंडात भस्म करून त्याला नष्ट केले.
आणि नंतर त्याचा परमभक्त पुंडलिक ह्याची भेट घेऊन त्याला दर्शन दिले होते आणि मातापित्यांची अखंड व मनोभावे सेवा केल्याचे फळ म्हणून त्याला मोक्ष दिला.
त्याच पुंडलिकाची वाट बघत गेली अठ्ठावीस युगे विठोबा कटीवर हात ठेवून पंढरपुरास उभा आहे आणि भक्तांना दर्शन देतो आहे अशी भक्तांची धारणा आहे.
८. बाबा पाध्येंनी केली पंढरपूरच्या पूजा व उपासनेची व्यवस्था
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात उपासना आणि पूजाअर्चा ह्यांची साग्रसंगीत व्यवस्था संस्कृत पंडित असलेले बाबा पाध्ये यांनी केली.
पंढरपुरातील बडवे ह्यांनी विठोबाची पूजा करायची आणि उत्पात ह्यांनी रखुमाईच्या पूजेची जबाबदारी घ्यावी असा त्यांनीच दंडक घालून दिला.
विठ्ठलाची नित्य सेवा, काकडआरती, महापूजा, नैवेद्य, संध्याकाळची आरती आणि शेजारती ह्या सर्वांची जबाबदारी बडवे आणि उत्पात ह्यांच्याकडे देण्यात आली. त्यात त्यांना सात सेवेकरी मदत करतील असे ठरवण्यात आले.
९. पंढरपूच्या देवळात होणारी पूजाअर्चा
रोज पहाटे चार वाजता पंढरपुरातील पुजारी प्रार्थना करून देवाला जागे करतात आणि सव्वाचारला “अनुपम्य नगर पंढरपूर” ही काकडआरती सुरु होते. नंतर देवाला लोणी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला जातो.
त्यानंतर नित्यपूजा केली जाते आणि पुरुषसूक्ताचे पठण केले जाते आणि सकाळी ११ वाजता महानैवेद्य दाखवला जातो. संध्याकाळी चार वाजता देवाला नवीन अलंकार व पोशाख घातले जातात.
संध्याकाळी सात वाजता धुपारती होते आणि दहीभाताचा नैवेद्य दाखवला जातो. आणि रात्री साडेअकरा ते पावणेबाराच्या सुमारास शेजारती केली जाते आणि देवाला धोतर नेसवून अंगावर उपरणे घातले जाते.
देवाचा पोशाख बदलत असताना देवाच्या आसनापासून ते शेजघरापर्यंत पायघड्या घातल्या जातात.
१०. विठोबाच्या मूर्तीबद्दल उद्भवलेला वाद
पंढरपुरातील विठ्ठलमूर्ती खरी की पंढरपूरजवळच्या माढा गावातील मूर्ती अस्सल असा वाद काही वर्षांपूर्वी वाद उद्भवला होता. पण भक्तासाठी विठोबाची मूर्ती महत्वाची नाही, त्या मूर्तीतील देवत्व महत्वाचे आहे.
रा. चिं. ढेरे ह्यांनी संशोधन करून असे नमुद केले होते की पंढरपुरातील मूर्ती ही यादवकालीन नाही. संत सावतामाळी ह्यांच्या अभंगात वर्णन केल्याप्रमाणे तसेच स्कंदपुराणातील पांडुरंगमाहात्म्य ह्यात वर्णन असल्याप्रमाणे विठोबाच्या हृदयस्थानावर कूटमंत्र कोरलेला आहे.
तशी मूर्ती पंढरपुरात नसून माढा येथे असल्याचे सांगण्यात येते. ह्यावर खूप मोठा वाद उद्भवला होता.
अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. पण सच्च्या भक्ताला ह्यामुळे काही फरक पडला नाही. त्याच्यासाठी त्याची विठूमाऊली त्याच्या हृदयात आहे आणि पंढरपूरला मूर्तिस्वरूपात त्याच्या भक्तांसाठी कटीवर हात ठेवून उभी आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.