“मला माझ्या आईचा राग आला” : शाळकरी मुलांचं जीवन बदलणारा अभिनव प्रयोग
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक : दादासाहेब नवपुते.
===
ताण- तणाव, अन चिडचिड, चल हट. मुलांच्या मनातील ताण-तणाव चिडचिड कमी करण्यासाठी, मुलांच्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी . त्यांना बोलतं करण्यासाठी. मी मुलांना शालेय परिपाठात व्यक्त होण्याची संधी दिली.
उपक्रमाचे नाव असे होते की “मला माझ्या आईचा राग आला “. होय मला माझ्या आईचा राग आला .
दिवसभरात मुलांना स्वतःच्या आईचा किती वेळेस आणि कोणत्या कारणासाठी राग आला, ते परिपाठात साउंड सिस्टीम मध्ये सर्वांना सांगायचं असं ठरलं.
दुसऱ्या दिवशी पहिली ते सातवी पर्यंत सर्वच मुलांनी त्यांच्या मनातील राग व्यक्त केला.
एक मुलगी तर असं म्हणाली की. “मी टीव्ही बघत होते.आईने येऊन पाठीत धपाटा घातला. टीव्ही बंद केला. तेव्हा मला आईचा असा राग आला, की वाटलं असाच रिमोट फेकून मारावा. पण नाही मारता आला. निमुटपणे पुस्तक वही घेऊन बसले.”
एक दुसरीतला मुलगा म्हणत होता, “मी दुकानात गेलो नाही म्हणून बापाने मला शिव्या घातल्या. बापाचा असा राग आला की, वाटलं मी जर या वेळेस मोठा असतो तर, घेतला असता कोपऱ्यातला लाकूड हातात”.
अशाप्रकारे मुलं व्यक्त होत होती. मनातील खदखद सांगत होती. आठ दिवस हा प्रोग्राम चालला. सगळ्या गावात चर्चा झाली, की मुलं आपल्याविषयी शाळेमध्ये काय बोलतात.
जे काही मुलं बोलत असतील ते ऐकण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी शाळेच्या गेटवर, आजूबाजूला होऊ लागली.
आठ दिवसानंतर मी विषय बदलला. विषय असा घेतला की “मला माझ्या बापाचा राग येतोय”
मुलांनी तेच करायचं, काल दिवसभरात त्यांना त्यांच्या बापाचा राग किती वेळेस आणि कुठल्या कारणासाठी आला, ते परिपाठात सांगायचं. हेही आठ दिवस चाललं. आठ दिवसानंतर एकदम विषय बदलला.
कहानी में ट्विस्ट. मी मुलांना असं सांगितलं की उद्यापासून तुम्हाला, “मला माझ्या गुरुजींचा आणि बाईंचा राग आला” यावर परिपाठातच बोलायचं.
काल दिवसभरात किती वेळ आला आणि कुठल्या कारणासाठी आला ते सांगायचं. मुलांना सांगितलं की बिनधास्तपणे बोलायचं. शाळेतील कुठलेही शिक्षक तुम्हाला काहीही बोलणार नाहीत. आणि त्याविषयी नंतर चर्चा होणार नाही. अशी मुलांना खात्री दिली. सर्वांसमोर. मग मुले व्यक्त होऊ लागली.
शाळेत मुलांना सरांचा आणि बाईंचा किती वेळेस राग येतो. मला असं वाटत होतं की मी मुलांशी खूपच मैत्रीपूर्ण वागतो. त्यामुळे माझं काही नाव येणार नाही.
पण सुरुवात माझ्यापासूनच झाली. मी जेव्हा मोजलं, तेव्हा काल दिवसभरात माझ्या लेकरांना २७ वेळेस वेगळ्या कारणासाठी माझा राग आला होता.
त्यातलं एक कारण तर फारच मनाला लागणारे ठरलं. इयत्ता तिसरीतील एक पिल्लू असं बोलला की, सरांनी (मी), काल मला दुपारच्या जेवणानंतर रांग मोडली म्हणून ओरडले तेव्हा मला सरांचा असा राग आला की वाटलं, हातातील ताट असच फेकून मारावे.”
मित्रांनो मी ही ते ऐकून घेतलं. शिक्षक म्हणून असा विचार केला की, ज्या माणसाचा मला एका दिवसात सत्तावीस वेळेस राग येतो त्या माणसाकडून मी काय डोंबलं शिकणार आहे का?
अशा माणसाचं तोंड तरी बघावं वाटेल का?
आणि मग या दिवसापासून आम्हा शिक्षकांना स्वतः आत्मचिंतन करावं लागलं. आपण खरंच कळत नकळत किती वेळा दिवसातून मुलांचा अपमान करत असतो. मुलांना आपला राग येतच असतो.
मित्रांनो खरं सांगतो या उपक्रमानंतर माझी शाळेतल्या मुलांशी एवढी गट्टी जमली, एवढी कनेक्टिव्हिटी वाढली की, आम्ही एकमेकांची पक्के मित्र झालो.
मुलांना व्यक्त होण्यासाठी एक मोकळं व्यासपीठ मिळालं. त्यातून मुलांची चिडचिड, तिरस्कार, ताणतणाव, राग जवळपास संपलाच.
आता माझी त्या शाळेतून बदली झाली आहे. तरीही ते विद्यार्थी मला विसरले नाही .मी त्यांना विसरलो नाही. अजूनही आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत.
या उपक्रमानांतर पालकात अमुलाग्र बदल झाला. अन आमच्या लेकरांचं आनंदी जीवन सुरू झालं. त्यांचा टीव्ही मात्र संपला. पालकासोबत गप्पा वाढल्या.
१) हा उपक्रम राबवण्याआधी पालकांशी माझा दांडगा संपर्क होता.
२) याआधी राबवलेल्या अनेक उपक्रमातून पालक शाळेला जोडला गेला होता.
३) आईच्या आलेल्या रागा विषयी मुलं बोलत असताना ते आठ दिवस मी पालकांसोबत या ना त्या कारणाने गप्पा मारत होतो.
४) पालकांची मतं जाणून घेत होतो. तुमची मुलं माईकवर बिनधास्त बोलत आहेत हे पालकांना पटवून देत होतो.
५) या उपक्रमात मुले जे काही व्यक्त होतील, त्या त्यांच्या अभिव्यक्तीवर परीपाठांतर आणि परिपाठामध्ये सुद्धा कोणीही, काहीही प्रश्न विचारणार नाही, किंवा त्यावर चर्चा करणार नाही, किंवा त्याला त्याविषयी नंतर विचारणार नाही, हे आधीच ठरवलेलं होतं.
६) पालकांना या गोष्टी समजावून सांगितल्यानंतर शिक्षकांना समजावून सांगण्याची वेळ आली नाही हे महत्त्वाचं.
७) या उपक्रमाच्या आठ दिवसाच्या ब्रेक नंतर माझा पुढचा उपक्रम मी मुलांच्या समोर ठेवणार होतो.
८) “मला माझ्या आईचा /वडिलांचा अभिमान वाटतो “या विषयावरचा.
९) “मला माझ्या आईचा राग आला” आणि ‘मला माझ्या आईचा अभिमान वाटतो’ या दोन उपक्रमांच्या मध्ये जो आठ दिवसाचा मोकळा वेळ होता, या मोकळ्या वेळामध्ये आम्ही “चला आईसोबत भांडी घासू या” हा उपक्रम घेतला.
“मला माझ्या आईचा राग आला” या उपक्रमानंतर आम्ही “चला आईसोबत भांडी घासू या” हा उपक्रम घेतला.
हा उपक्रम राबवण्या आधी माझ्या, जी.प.प्रा.शा. गारखेडा नं १. च्या शाळेत माता- पालक (लेकरांच्या आया )कुठल्याही कार्यक्रमाला यायच्याच नाहीत. का कुणास ठाऊक? मला ही गोष्ट जाम खटकली.
मग माता-पालक शाळेसोबत कसा जोडला जाईल? हाही विचार मनात होताच.
या उपक्रमात रोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतर मुलांनी (मुलींनी नाही) आईला भांडी घासायला मदत करायची होती. कोण मुलगा आपल्या आईला भांडी घासायला मदत करत नाही याची नोंद त्यांच्या बहिणी घेणार होत्या. तसं मुलांनीच सुचवलं होतं.
शाळेतील मुलींनी, संध्याकाळी जेवण झाल्यानंतर झोपायच्या वेळेस आपल्या आईचे किंवा वडिलांचे पाय चेपून द्यायचे होते. (तेही आईवडिलांनी न सांगता) पण ही काम करत असताना, आई-वडील नेमके काय म्हणाले? ते शाळेत येऊन दुसऱ्या दिवशी सादरीकरणाच्या वेळेस सांगायचं होतं.
दुसऱ्या दिवशी सादरीकरणात गंमत आली. समीर आपला अनुभव सांगत होता, “आई म्हणाली आज कोणीकडून दिवस उगवला?”
राधा औटे- “पप्पा म्हणाले आज नेमकं काय झालय?”
“मी तुला पैसे देणार नाही” अशाही काही पालकांच्या प्रतिक्रिया आल्या.
बऱ्याच आयांनी, “हुशार ग माझं लेकरू, पण तू नको भांडे घासू, मी घासते तू अभ्यास कर” असे सांगितले. मग मुलांनी आईनी घासलेली भांडी व्यवस्थित जागेवर नेऊन ठेवायला मदत केली.
काही मुलं तर म्हणाली “सर आई खवळली हो. भांडे घासायला मदत करायला लागलो, तेव्हा आई म्हणाली मेल्या असं जर पाणी सांडलं तर सगळं पाणी भांडे घासायला लागेल, मग आंघोळ कशा करायच्या?”
वेगवेगळ्या मुलांची वेगवेगळे अनुभव मुलं सांगत होती. ऐकत होती. हसत होती.
गावातील काही बायका तर भांडी घासणार्या मुलांना बघून “हा नवपुते सरांनी चांगले कामाला लावले गड्या” असे म्हणून मुलांची थट्टा – मस्करी देखील करत होत्या.
हे गावातील घराघरात आठ दिवस चालू होतं. उपक्रम सुरू होऊन पाच सहा दिवस झाले. आणि परिणाम दिसायला लागले. कुठल्यातरी कारणाचे निमित्त करून आया शाळेत येऊ लागल्या.
आपल्या मुलांच्या अभ्यासाविषयी चौकशी करू लागल्या. मग आम्हीही शाळेत मुलांसाठी काय काय चालतं, ते सांगू, समजावू लागलो. मुलांनी केलेली चांगले कामे त्यांना दाखवू लागलो.
लेकरांच्या आया, लेकरांच्या शाळेशी जोडल्या गेल्या. कार्यक्रमागणिक, दिवसागणिक पालकांचा हा शाळेतील सहभाग वाढतच गेला.
पालकांच्या मानसिकतेत हा झालेला बदल आमचे गारखेडा नंबर एकचे केंद्रप्रमुख श्री. बेदरे साहेब यांनी केंद्रात अनेक ठिकाणी सांगितला.
आणि… आम्ही दुसरा उपक्रम घेतला. तो होता “मला माझ्या आईचा/वडिलांचा अभिमान वाटतो”
कशाविषयी आणि का वाटतो? हे मुलांनी शाळेत व्यक्त व्हायचं. शिक्षक, पालक अन सर्व मुलांसमोर.
मुलांनी, त्यांचे आई-वडील त्यांच्यासाठी – काय काय करतात, किती कष्ट झेलतात, त्यांची किती फरफट होत असेल, या सर्व गोष्टीचे अतिशय बारीक निरीक्षण मनोगतात मांडले.
मुलाच्या मनोगतानंतर अख्खा गाव शाळेचा झाला. शाळा गावाला आपली वाटू लागली .
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.