' तिने सॉफ्टवेअर क्षेत्रातली नोकरी सोडून शेती आणि शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी मोहीम सुरु केलीय.. – InMarathi

तिने सॉफ्टवेअर क्षेत्रातली नोकरी सोडून शेती आणि शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी मोहीम सुरु केलीय..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

भारत हा कृषिप्रधान देश आहे असे आपण लहानपणापासून शाळेत शिकत आलो आहोत. आपल्या देशात बाराही महिने शेतीयोग्य वातावरण असल्याने आपल्या देशात विविध हंगामात विविध पिके होतात. त्यामुळे अनेक प्रकारचे अनेक पिकांचे वाण आपल्याकडे उपलब्ध आहेत.

हरितक्रांती नंतर मात्र देशात संकरित बियाणांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा होऊ लागला आणि त्यातून भरमसाठ उत्पादन होऊ लागल्यामुळे देशातील शेतकऱ्यांनी देशी वाणापेक्षा संकरित वाणाला पसंती दिली.

 

green revolution inmarathi
Livemint

ह्यामुळे पारंपरिक देशी गावरान वाणांचा वापर कमी होऊन त्याच्या वापराकडे आणि जतनाकडे दुर्लक्ष झाले. खरे तर जुनं ते सोनं असे म्हणतात आणि तेच खरे आहे. आपल्या देशी वाणांचे पीक केवळ पावसाच्या पाण्यावर येते.

त्या बियाणाला रासायनिक खत देण्याची गरज पडत नाही आणि जास्तीचे पाणी देखील लागत नाही.

सध्याच्या काळात फक्त भरमसाठ पीक यावे म्हणून रासायनिक खत व कीटनाशकांच्या वापरामुळे शेतमाल मुळातच सदोष तयार होतो आहे आणि संकरित बियाणे हवामान बदलापुढे टिकाव धरू शकत नाही.

तसेच सदोष शेतमालामुळे माणूस असंख्य दुर्धर आजारांच्या विळख्यात सापडतो आहे.

ज्यांनी पूर्वीच्या देशी वाणाच्या भाज्या,फळे व धान्याची चव चाखली आहे ते लोक अगदी छातीठोकपणे सांगू शकतील की आताच्या भाज्या,फळे व अन्नधान्य ह्यांना पूर्वीसारखी ना चव आहे ना त्यात तितके पौष्टिक घटक उरले आहेत.

ह्याचे मुख्य कारण आहे संकरित बियाणांचा अतिवापर! अर्थात संकरित बियाणांचे काही फायदे देखील आहेत हे नाकारून चालणार नाही. पण देशी बियाणांची साठवण आणि जतन होणे तितकेच आवश्यक आहे.

 

farmer_inmarathi

 

सध्या हवामानातील बदलांचा व हवामानाच्या अनियमिततेचा सर्वात जास्त फटका हा गरीब शेतकऱ्याला बसतो आहे.

शेतीसमोर अनेक संकटे उभी आहेत आणि त्यावर शेतकऱ्यानेच उपाय शोधायचा आहे कारण सरकारी यंत्रणांचे प्रयत्न केवळ विविध समित्या नेमल्या की तिथेच संपतात.

बियाणांवरच शेती उभी राहते. आपल्या पारंपरिक शेतीचा अभ्यास केला तर हे लक्षात येते पूर्वी शेतकरीच बियाणे जतन करत असत. ते बियाणांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होते.

पुढे लोकसंख्या भरमसाठ वाढल्यामुळे अन्नधान्याची मागणी वाढली आणि पारंपरिक देशी वाणाची जागा संकरित बियाणांनी घेतली.

ह्यामुळे पारंपरिक बियाणे लोप पावू लागली. आणि संकरित बियाणांच्या बाबतीत शेतकरी परावलंबी झाला. आणि कंपन्या ज्या दराने विकतील त्या दराने बियाणे विकत घेण्यास शेतकऱ्याला भाग पाडले जाऊ लागले.

म्हणूनच शेतकऱ्याला जर बियाणांच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायचे असेल तर देशी वाणाला पर्याय नाही. तसेच ह्यामुळे शेतकऱ्यांचे विविध प्रश्न देखील सुटतील.

पारंपरिक वाणाचे पीक सुगंधी असते, त्यात पोषणमूल्ये असतात आणि आपली काही देशी वाणे तर अत्यल्प पाण्यात देखील वाढतात.बदलत्या हवामानात तग धरू शकतात.

 

rice variety inmarathi
herworld.com

म्हणजेच मान्सून कमी अधिक झाला, तरी अल्प पाण्यात तग धरू शकणाऱ्या, बदलत्या हवामानाला तोंड देऊ शकणाऱ्या देशी वाणांची शेती हाच उपाय आहे.

ह्यामुळे शेतकरी स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभा राहील आणि पर्यावरणपूरक विकास होऊ शकेल आणि रासायनिक शेतीला आळा बसेल.

म्हणूनच देशी वाणांचे जतन करणे आवश्यक आहे पण अजूनही ह्याविषयी लोकांच्या मनात जागरूकता नाही.

तरीही नंदुरबार देशातील काही आदिवासी लोक ,काही शेतकरी , कृषी वैज्ञानिक व सीड मदर राहीबाई पोपरे ह्यांच्यासारख्या काही माणसांनी देशी वाण जतन करण्याच्या उद्देशाने बियाणांची बँक तयार केली आहे.

ह्यांच्याप्रमाणेच २००१ सालापासून संगीता शर्मा ह्यांनी “अन्नदान” ची सुरुवात केली. अन्नदान ही एक बियाणे बँक आहे ह्यात त्यांनी सुरुवातीला त्यांच्या बंगळुरू येथील पाच एकर शेतात २० प्रकारच्या देशी वाणांचे जतन करणे सुरु केले.

आज अठरा वर्षानंतर संगीता शर्मा ह्यांच्या बियाणे बँकेत आठशे प्रकारच्या देशी वाणांचे जतन करण्यात आले आहे. हे देशी वाण संकरित वाणापेक्षा स्वस्त आहे आणि त्यात पौष्टिक घटक देखील तुलनेने जास्त आहेत.

भारतात शेती करणे साधारणपणे दहा हजार वर्षांपूर्वी सुरु झाले. शतकानुशतके निसर्गात अशीच पिके टिकून राहिली जी भारतीय उपखंडातील वातावरणात तग धरतील. ही पिके कायमच रासायनिक खते व कीटनाशकांशिवाय तग धरून राहिली आहेत.

 

pesticides inmarathi
Billions in Change

ही पिके म्हणजेच आपले देशी बियाणे. ओडिसातील डॉक्टर देबल देब जे वनस्पतीशास्त्रज्ञ व rice conservationist आहेत ते म्हणतात की भारतात १९७० पर्यंत तांदुळाच्या १,१०,००० इतक्या प्रजाती होत्या. त्यापैकी आज फक्त सहा हजार प्रजाती टिकून राहिल्या आहेत.

आज संगीता शर्मा ह्यांच्यासारखे लोक देशभरातील देशी बियाणांचे जतन करून भारतातील अन्न-विविधता टिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

माजी जनसंवाद प्राध्यापिका असलेल्या व आता पूर्णवेळ शेतकरी असलेल्या संगीता शर्मा म्हणतात की ,”मला एकूणच जेवण आवडते.आणि ते कुठून येते हे जाणून घेण्यात मला अतिशय रस आहे.”

तसेच बंगळुरू जवळ डॉक्टर प्रभाकर राव ह्यांचे शेत आहे. ह्यांच्या शेतात जाऊन आपल्याला भरपूर देशी भाज्या बघायला मिळतात.

लाल भेंडी, लाल मका, जांभळ्या मिरच्या आणि निळा व पिवळा असे कमीत कमी चार रंगांचे टोमॅटो आपल्याला ह्या शेतात बघायला मिळतात. असल्या रंगेबेरंगी भाज्या बाजारात आपल्याला कधीच दिसत नाहीत पण ह्या भाज्या संकरित नसून देशी वाणाच्या आहेत.

ह्या शेताचे मालक डॉक्टर राव म्हणतात की भारतात भाज्यांचे पूर्वी असलेले जैववैविध्य आता मात्र ९० टक्के नष्ट झालेले आहे. डॉक्टर राव हे कृषिवैज्ञानिक आहेत.

त्यांनी सात वर्षांपूर्वी देशी वाण जमवणे सुरु केले आणि आज त्यांच्या हरियाली ह्या बियाणांच्या बँकेत ५४० देशी वाणांचा संग्रह आहे.

 

prabhakr rao inmarathi
YouTube

पिकांच्या ह्या प्रजाती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राव त्यांच्या शेतात शेती कार्यशाळा घेतात आणि त्यांच्या ह्या शालनांना कार्यशाळांना शहरातील शेतकरी, टेरेस गार्डन करणारी माणसे, शास्त्रज्ञ व विद्यार्थी ह्यांची गर्दी असते.

“बहुतांश लोकांना ही अत्यंत महत्वाची गोष्ट माहितीच नाही की देशी बियाणे हे रासायनिक उत्पादने वापरून उगवता येत नाही.

मी जर गव्हाच्या देशी वाणाला युरियाचे खत घातले तर गव्हाचे झाड उंच तर होईल पण वाऱ्याच्या झोतापुढे ते टिकणारच नाही. तसेच संकरित बियाणे रासायनिक कीटनाशक व खतांशिवाय टिकाव धरू शकत नाही.

तसेच संकरित बियाणे असेच बनवले आहे की ते पुनरुत्पादन करू शकत नाही. ह्यामुळे प्रत्येक वेळेला पेरणी करायची म्हटले की शेतकऱ्याला बियाणे विकत घ्यावे लागते.” राव ह्यांनी त्यांच्या करियरच्या सुरुवातीला हरितक्रांतीमध्ये योगदान दिले.

पण नंतर त्यांच्या लक्षात आले की दीर्घकालीन रासायनिक शेती ही घातक आहे आणि त्यांनी तो मार्ग सोडून पारंपरिक शेतीवर लक्ष केंद्रित केले.

बबिता भट ह्या सॉफ्टवेअर अभियंता आधी गुरुग्राममध्ये काम करत होत्या. पण त्यांनी त्यांची ती नोकरी सोडून त्या त्यांच्या पती आलोकसह पारंपरिक बियाणे जतन करण्यासाठी डेहराडूनला स्थायिक झाल्या.

 

babita bhatt inmarathi
ResearchGate

त्यांनी हे बियाणे आणि स्थानिक डाळी ,तेले व पीठे विक्री करण्यासाठी हिमालयाटूहोम नावाचे इ स्टोअर सुद्धा सुरु केले.

संपूर्ण उत्तराखंड मधून देशी बियाणे संकलित करून ते विक्रीस ठेवणाऱ्या बबिता भट म्हणतात की ,”आपल्या जेवणात कीटनाशकांचे प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे.

आपल्या अन्नसाखळीत जे बदल घडत आहेत त्याचा परिणाम अर्थातच आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर होतोय.”

बबिता ह्यांनी डेहरादूनच्या शेतकऱ्यांना इंफाळ खोऱ्यातील देशी वाणाच्या काळ्या तांदळाची ओळख करून दिली. त्या म्हणतात ,”माझ्या असे लक्षात आले की इंफाळ व डेहराडूनच्या वातावरणात फारसा फरक नाही आणि मी प्रयोग करायचे ठरवले.

हे तांदूळ सध्या डेहराडूनमध्ये आवडीने खाल्ले जात आहेत. डेहराडूनच टाईप ३ बासमती राईस पूर्वी त्याच्या लांब दाण्यासाठी व सुगंधासाठी खूप प्रसिद्ध होता. इथे तांदळाचे पीक डोंगरावरून वाहत येणाऱ्या झऱ्याच्या पाण्यावर घेतले जात असे.

आता मात्र त्या झऱ्यांतच पाणी उरलेले नाही आणि जे आहे ते प्रदूषित आहे. त्यामुळे हे देशी वाण आज अस्तित्वात असले तरी ह्या बदलांमुळे त्याचा सुगंधच नष्ट झाला आहे.”

बबिता भट त्यांच्या इ स्टोअरमार्फत राजम्याच्या १५ प्रजाती विक्रीसाठी ठेवतात. ह्या प्रजाती आजूबाजूच्या हेनवल, भागीरथी, जोहर, अलकनंदा आणि डून इथल्या दऱ्याखोऱ्यांतून मिळवल्या जातात.

भट ह्यांना बियाणे पुरवणारे ६७ वर्षीय विजय जरधारी हे हेनवल मधील जरधार गावात राहतात. त्यांनी उत्तराखंडातील पारंपरिक देशी बियाणे जतन करण्यासाठी बीज बचाओ आंदोलन सुरु केले. जरधारी ह्यांनी चिपको आंदोलनात सुद्धा सक्रिय सहभाग घेतला होता.

 

vijay zhardari inmarathi
Earth Journalism Network

त्यांनी १९८५-८६ सालापासून बियाणे संकलित करणे सुरु केले. आज त्यांच्याकडे तांदळाच्या १५० प्रजाती आहेत आणि राजम्याच्या २०० प्रजाती आहेत. तसेच देशी भाज्यांच्या सुद्धा अनेक प्रजाती आहेत.

जरधारी म्हणतात की, “ह्या देशी प्रजाती एखाद्या लसीचे काम करतात. हंगामात तुम्ही देशी प्रजातीचे पीक घेतले तर तुमचे वर्षभराचे काम होते.” जरधारी ह्यांना आजवर देश विदेशातील अनेक कृषी अधिवेशनांसाठी आमंत्रणे मिळाली आहेत.

अशी ही ध्येयाने झपाटलेली माणसे आहेत जी पर्यावरणपूरक शेतीसाठी आणि देशी बियाणांच्या जतनासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना सरकारी मदतीची जोड मिळाली तर देशात खरंच पर्यावरणपूरक कृषिक्रांती होण्यास वेळ लागणार नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?