चाकोरीबद्ध जीवन सोडून ‘ती’ आदिवासींसाठी जीवाचं रान करते आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
सध्या समाजात एकीकडे “फेमिनिजमच्या” नावाखाली वाट्टेल तो स्वैराचार आणि अतिरेकी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढत चालली आहे. आणि दुसरीकडे मात्र अनेक स्त्रिया आजही त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी झगडत आहेत.
घरगुती हिंसाचार, शारीरिक, मानसिक, आर्थिक दडपशाही, अश्या समस्यांना महिलांना सामोरे जावे लागते.
खेडेगावांत तर दारूमुळे अनेक घरे उध्वस्त झाली आहेत. घरातील कर्ते पुरुष दारूच्या संपूर्ण आहारी गेल्यामुळे महिलांना त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांतून मार्ग काढत रोजचा दिवस कसाबसा ढकलत घर चालवावे लागते.
लोकांना भेडसावणाऱ्या समस्या, समाजात घडणारे गुन्हे आणि निर्दोषांवर होणारे अत्याचार हे सगळे सोनल रोचानी ह्या माजी क्राईम रिपोर्टरसाठी काही नवे नव्हते.
तिच्या रोजच्या नोकरीत हे सगळे तिने जवळून बघितले होते आणि ह्या समस्या सोडवण्यासाठी यंत्रणा अपुरी पडतेय ह्याचा सुद्धा तिने चांगलाच अनुभव घेतला होता.
सुरतमध्ये वास्तव्याला असणाऱ्या सोनलला पत्रकारितेच्याही पलीकडे जाऊन गरजू आणि वंचित लोकांसाठी काहीतरी ठोस काम करण्याची इच्छा होती.
आपल्यापैकी अनेकांना समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असते पण नुसती सहानुभूती दाखवण्यापलीकडे बहुतांश लोक काहीही करत नाहीत. तसेच थोड्याफार प्रमाणात सोनलच्या बाबतीतही झाले.पण २००५ साली घडलेल्या एका घटनेने तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले.
द बेटर इंडियाशी बोलताना तिने ह्या घटनेबद्दल अधिक माहिती दिली. तिने सांगितले की ,”माझ्या कामाचा एक भाग म्हणून मी बातम्यांसाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर थांबत असे.
एक दिवस एक गरोदर स्त्री माझ्या जवळ आली आणि तिने मला तिची मदत करण्याची विनंती केली. ती स्त्री पूर्णपणे रॉकेलने भिजली होती. कारण काय?
तर तिच्या सासरच्या मंडळींनी अवैधरित्या बाळाची लिंगतपासणी केली होती आणि बाळासकट तिलाही संपवण्यासाठी त्यांना तिच्यावर रॉकेल ओतून तिला जाळून मारून टाकायचे होते.
आम्ही तिला शक्य तितकी मदत केली पण ह्या घटनेने मी संपूर्णपणे मनातून हादरले. अनेक दिवस ह्या घटनेचा मला मानसिक त्रास होत होता.
तेव्हा मी ग्रामीण भागातील महिलांच्या परिस्थितीबद्दल माहिती मिळवण्यास सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आले की ग्रामीण भागातील महिलांना फारच कमी सुविधा उपलब्ध आहेत.”
सोनलला जेव्हा ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या कळल्या तिथेच तिच्या समाजकार्याला सुरुवात झाली आणि प्रयत्न करत करत अखेर पाच वर्षांनी तिने तिची पूर्णवेळची, उत्तमी पगाराची नोकरी सोडली.
स्वतःला संपूर्णपणे ग्रामीण आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी झोकून दिले. काही काळासाठी तिने जागतिक बँकेचे साहाय्य घेतले.
जागतिक बँक सरकारी योजनेसाठी काही निधी देत असते. त्यातून तिने काही काळ तिचे काम सुरु केले.
ह्या क्षेत्रात इतके काम केल्यानंतर तिने हा निष्कर्ष काढलाय की सरकारी योजनांबद्दल आणि त्यांच्या लाभांबद्दल वंचित आणि गरजू लोकांमध्ये काही जागरूकताच नसल्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काचे लाभ मिळत नाहीत.
म्हणूनच ग्रामीण भागातील महिला आणि बालकांना विविध सरकारी योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी सोनलने ऑगस्ट २०११ मध्ये “शक्ती फाउंडेशन” ह्या एनजीओची स्थापना केली.
सोनलने संपूर्ण गुजरातमध्ये फिरून सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेतले आणि नंतर सुरत व तापीमध्ये राहणाऱ्या हलपती आणि कोटद्वारा ह्या आदिवासी जमातीच्या लोकांसाठी काम करण्याचे ठरवले.
तिथल्या आदिवासी लोकांच्या समस्यांविषयी बोलताना सोनल म्हणते की, “ह्या हलपती समाजातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते पण सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे दारूचे व्यसन”!
ह्या दारूच्या व्यसनामुळे ह्या समाजातील पुरुषांचे आयुर्मानच कमी झाले आहे. दारूच्या आहारी गेलेले इथले पुरुष जास्तीतजास्त चाळीशी गाठतात. ह्यामुळे ह्या समाजातील अनेक स्त्रिया फार कमी वयातच विधवा होतात, एकट्या पडतात.
त्यामुळे त्यांचे घर परत उभे करण्यासाठी कित्येक लहान मुलांना शिक्षण सोडून देऊन पोटापाण्यासाठी कामाला जुंपून घ्यावे लागते.
कोटद्वारा समाजातील लोकांच्या उत्पन्नाचे साधन म्हणजे बांबूपासून हस्तकलेच्या वस्तू बनवून त्या विकणे हेच आहे पण झाडेच कमी झाल्याने ह्या लोकांच्या उत्पन्नावरच गदा आली आहे.
आज ह्या समाजातील अनेक लोकांना पोट भरण्यासाठी त्यांचा पारंपरिक व्यवसाय सोडून मजुरी करावी लागते आहे. ह्याचाच परिणाम म्हणून ह्या दोन्ही समाजातील लोकांना अत्यंत खडतर जीवन जगावे लागत आहे.”
आज सोनलचे काम सुरूं होऊन जवळजवळ आठ वर्षे झाली आहेत आणि तिच्या शक्ती फाउंडेशने पाच हजार पेक्षाही जास्त आदिवासी महिलांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे केले आहे.
५५ गावांतील ह्या महिला आज स्वतःचा व्यवसाय करीत आहेत. इतकेच नव्हे सोनल व तिच्या टीममधील स्वयंसेवक शिक्षण, स्वच्छता आणि आरोग्य ह्यांच्याशी निगडित समस्या देखील हाताळत आहेत. कसे? ते बघूया..
१. सरकारी योजना
ह्या एनजीओचे पहिले उद्दिष्ट हेच होते की ह्या समाजातील लोकांना मतदारपत्र, आधार कार्ड आणि रेशन कार्ड मिळवून देणे. शक्ती फाउंडेशनने ग्रामीण भागात अनेक शिबिरे घेतली.
ह्या शिबिरांतून लोकांमध्ये बँक अकाउंट उघडण्याविषयी तसेच त्यांचे आयुष्य सुकर व्हावे म्हणून राबवण्यात आलेल्या सरकारी योजनांचा लाभ घेण्याविषयी जनजागृती करण्यात आली.
अजूनही अनेक लोकांना ह्याविषयी माहितीच नाहीये आणि ज्यांना ह्या योजना माहिती आहेत त्यांना त्यांचा लाभ कसा घ्यावा हे माहिती नाहीये. अनेकांना सरकारी कचेरीतील कामकाज कसे चालते हे माहिती असल्याने ते त्या वाटेलाच जाण्याचे टाळतात.
तर अनेकांना सरकारी कचेरीत जाण्यासाठी एकही दिवस कामावर न जाऊन चालत नाही कारण त्यांचे रोजंदारीवर काम असते.
शक्ती फाउंडेशनने अंगणवाडी कार्यकर्ते आणि सेल्फ हेल्प ग्रुप ह्यांची मदत घेऊन गुजरात सरकारने राबवलेल्या विधवा पेन्शन योजना, निवृत्ती पेन्शन योजना आणि आरोग्य निगडित योजना ह्यांच्याबद्दल गावातील लोकांना माहिती दिली.
त्यांच्या ह्या प्रयत्नांमुळे पाच हजार गरजू कुटुंबांनी सरकारी योजनांचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे.
२. आरोग्य
२०१८ च्या लॅन्सेट ग्लोबल हेल्थ रिपोर्ट अनुसार माता व बालकांच्या कुपोषणात गुजरात पहिल्या दहा राज्यांमध्ये आहे. युनिसेफच्या एका अहवालानुसार १०.१ टक्के बालकांचे वजन सामान्यपेक्षा अत्यंत कमी आहे आणि ४१.६ टक्के बालकांची नीट वाढच झालेली नाही.
बालकांशी निगडित ह्या समस्या ह्या दोन्ही जमातींमध्ये आढळतात. ह्या जमातीतील स्त्रिया व बालके दोघेही कुपोषणाने ग्रस्त आहेत. काही काही घरांत तर परिस्थिती इतकी वाईट असते की त्यांना रोजचे एका वेळचे जेवण सुद्धा मिळणे दुरापास्त आहे.
मुलींचे लहानपणीच लग्न लावून दिले जाते आणि त्या तिशीत पोहोचण्याआधीच त्यांची तीन चार बाळंतपणे झालेली असतात. मुली स्वतःच कुपोषित असल्यामुळे त्यांची अपत्ये सुद्धा कमी वजनाची असतात.
ही समस्या सोडवण्यासाठी सोनलने तिच्या कुटुंबातील आणि मित्र परिवारातील डॉक्टरांना ह्या ५५ गावांत आरोग्य तपासणी करण्याची विनंती केली. आणि आता ह्या गावांत नियमितपणे आरोग्य तपासणी केली जाते.
तसेच एनजीओद्वारे गावातील मुलांना व स्त्रियांना आठवड्यातून दोन वेळेला शिरा आणि सुखडी (तूप,कणिक व गूळ ह्यांचा पौष्टिक पदार्थ) वाटले जाते.( गुजराती घरांमध्ये गरोदर स्त्रियांना व स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना अशक्तपणा येऊ नये म्हणून हे पौष्टिक पदार्थ दिले जातात.)
एनजीओच्या मदतीने ह्या समाजातील लोकांनी आयुष्मान भारत आयुर्विमा योजनेसाठी अर्ज केला असून त्यापैकी ५०० लोकांना ह्या योजनेचा लाभ मिळाला आहे.
३. मासिकपाळी विषयी जागृती
अरुणाचलम मुरुगानंथम (ग्रामीण भागात कमी खर्चात सॅनिटरी पॅड तयार करून क्रांतीची सुरुवात करणारे पॅड मॅन) ह्यांच्याकडून प्रेरणा घेऊन सोनलने सुरतमधील इच्छापोर गावातील सेल्फ हेल्पग्रुपसाठी पॅड तयार करण्याचे एक मशीन मिळवले.
ह्या SHG ने पॅड बनवण्यासाठी आठ महिलांची नियुक्ती करून त्यांना रोजगार मिळवून दिला. ह्या महिला आज दरमहा पाच हजार रुपये इतका पगार मिळवून स्वतःच्या पायांवर उभ्या आहेत.
“ह्या महिलांमध्ये आता मासिक पाळी दरम्यान पाळाव्या लागणाऱ्या स्वच्छतेविषयी जागृती झाली आहे.
लोकांकडून मिळणाऱ्या देणगीतून कच्चा माल विकत घेण्यात येतो आणि ह्या महिलांना पगार देण्यात येतो. कापूस व लाकडाच्या पल्पपासून २५ हजार पॅड्स दरमहा तयार करण्यात येतात आणि जवळजवळ सात हजार महिलांना दरमहा दहा पॅड देण्यात येतात” ,असे सोनल सांगतात.
४. शिक्षण
शक्ती फाउंडेशनकडून ह्या भागात शिक्षणासाठी देखील खूप प्रयत्न करण्यात येत आहे. बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शक्ती फाउंडेशनद्वारे शाळेनंतर अतिरिक्त शिकवणी वर्ग घेण्यात येतात.
तसेच शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, पेन देण्यात येतात. तसेच गणित, विज्ञान आणि इंग्रजी सारख्या कठीण विषयांचे मार्गदर्शन देखील केले जाते. शक्ती फाउंडेशनचे हे प्रयत्न फळाला येत आहेत.
इथल्या शाळांमधील मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढले आहे आणि काही काही शाळांत तर हे प्रमाण १०० टक्के इतके झाले आहे. एनजीओ तर्फे कॉलेजमध्ये जाऊन उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना करियरसाठी सुद्धा मार्गदर्शन केले जाते.
५. आदिवासी महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे
गरिबी हटवण्यासाठी व ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी गुजरात सरकारने मिशन मंगलम ही योजना राबवली आहे. ह्या एनजीओतर्फे अनेक महिलांना स्किल डेव्हलपमेंटसाठी प्रशिक्षण दिले जाते.
तसेच व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांना बँकेकडून आर्थिक साहाय्य मिळवून देण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातात.
शक्ती फाउंडेशनच्या प्रयत्नांतून आज गुजरातमधील ह्या भागात ५०० सेल्फ हेल्प ग्रुप्स तयार झाले आहेत. आणि त्यातील काहींनी तर व्यवसाय सुरु करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवले आहे.
बँकांनी देखील ह्या लघुउद्योगांना पाच लाखांपर्यंत आर्थिक साहाय्य केले आहे, असे सोनल सांगतात.
पापड, खाकरा, उदबत्या विकण्यापासून तर हस्तकलेच्या वस्तू तयार करणे तसेच ब्युटी पार्लर्स सुरु करणे असे लहानमोठे व्यवसाय ह्या आदिवासी महिला करीत आहेत.
त्यांचे पारंपरिक ज्ञान आणि कौशल्य वापरून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत आणि चांगले आयुष्य जगत आहेत. ह्या ठिकाणच्या एका सेल्फ हेल्प ग्रुपने तर स्वतःचा मसाल्यांचा ब्रँड देखील सुरु केला आहे.
आठ वर्षांत शक्ती फाउंडेशनने इतके मोलाचे कार्य केले. पण सोनलसाठी हे सोपे नव्हते. इथल्या महिलांचा विश्वास जिंकणे खूप कठीण होते. अनेक वेळा सोनलला ह्या समाजातील लोकांच्या खास करून पुरुषांच्या रागाचा देखील सामना करावा लागला.
कधी कधी तर त्यांना धमक्या सुद्धा मिळाल्या पण सोनलच्या शक्ती फाउंडेशनने न थांबता त्यांचे कार्य सुरूच ठेवले. सध्या सोनल व त्यांची टीम मुलींसाठी एक कॉमिक बुक तयार करण्याच्या कामात आहे. ह्या पुस्तकातून मुलींना गुड टच आणि बॅड टच विषयी माहिती देण्यात येईल.
सोनल व शक्ती फाऊण्डेशन ग्रामीण भागात अतिशय स्तुत्य उपक्रम राबवित आहेत. पण त्यांना त्यांच्या कामासाठी अधिक निधीची गरज आहे. शक्ती फाऊंडेशनला तुम्ही देणगी देऊ इच्छित असाल तर पुढील बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकता.
Bank Details:
Dena Bank- Palsana Branch
A/C No : 015411031018
RTGS/IFSC Code: BKDN0230154
PAN No : AALTS2868K
हेच खरे स्त्री सक्षमीकरण आहे! सोनल व शक्ती फाउंडेशनच्या ह्या अद्वितीय कार्याला सलाम व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.