तीन हातांच्या गौरवला उपचारांची गरज, पण लोकांनी त्याला “देव” बनवलं!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
आपल्याकडे अंधश्रद्धा पसरवायला फार वेळ लागत नाही आणि आपल्याकडे घडलेल्या बऱ्याच प्रकरणांमधून हे स्पष्ट झाले आहे. कुठे बटाट्यामध्ये देव दिसला, कुठे दगडातून पाणी पाझरलं की लोक लगेच त्याला चमत्कार समजतात आणि त्यामागे धावत सुटतात. अंधश्रद्धा माजवण्याचा हा प्रकार फक्त भारतातच आहे असंही नाही, संपूर्ण जगामध्ये काही बाही विचित्र घटना होतात आणि कुणीतरी स्वत:च्या स्वार्थासाठी त्या गोष्टीचं भांडवल करून देवाच्या नावाखाली बोंबा मारत सुटतात. दुर्दैवाने, लोक देखील या फसवेगिरीला बळी पडतात.
जास्त दूर जाण्याची गरज नाही कारण असाच एक प्रकार आपल्या शेजारच्या नेपाळ देशामध्ये घडलाय. तिथे एका मुलाच्या पाठीवर शारीरिक रचनेतील बदलामुळे तिसरा हात उगवला आणि तेथील स्थानिकांनी त्याला सरळ देवाचे रूप देऊन त्याची पूजाअर्चा करण्यास सुरुवात केली.
या मुलाचे नाव आहे गौरव!
जन्मापासूनच गौरवच्या पाठीवर हा हात आहे. पाठीवर झोपतांना आणि कपडे घालतांना त्याला त्याचा खूप त्रास होतो.
आर्थिक स्थिती चांगली नसल्याने सुरुवातीलाच त्याला योग्य उपचार नाही मिळाले. तर काही लोकांकडून तो देवाचं रुप असल्याने त्याच्या पाठीवर हात असल्याचं म्हटलं जात आहे आणि शस्त्रक्रिया न करण्याचे सल्ले देण्यात आले आहे. त्यामुळे गौरवचे कुटुंब अगदीच विवंचनेत आहे. परंतु डॉक्टरांनी मात्र या गोष्टीसाठी शस्त्रक्रियेशिवाय दुसरा इलाज नसल्याचे सांगितले आहे.
डॉक्टर्सचं म्हणणं आहे की,
पाठीवरील हा हात न काढल्यास मनक्याचा त्रास होऊ शकतो. पाठीवरचा हा हात सर्जरीने काढता येणार आहे पण यादरम्यान त्याला पॅरेलिसीस होऊ शकतो.
शस्त्रक्रिया करावी की नाही याबाबत त्याचे पालक अजून संभ्रमात आहे. त्यात भर म्हणून की काय देवाचे रूप देऊन तेथील स्थानिकांनी त्यांना अधिकच बुचकळ्यात टाकले आहे.
गौरवला स्पाइना बिफिडा कंडीशन नावाचा दुर्मिळ आजार आहे. हा आजार १५०० मागे एका मुलामध्ये पाहायला मिळतो. यामध्ये वेगळा हात किंवा पाय असणे ही स्थिती उद्भवते. गौरव गर्भात असताना गर्भावस्थेच्या प्रक्रियेत काही अडचणी आल्यामुळे ही स्थिती गौरवच्या नशिबी आली आहे.
गौरवला देव मानण्यामध्ये जास्त रस घेण्यापेक्षा लोकांनी त्याच्या उपचारासाठी पुढाकार घेतला तर ते देखील देवाच्या दारी एक पुण्याचंच काम असेल!
—
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi