समुद्रातून हजारो टन प्लास्टिकचा कचरा बाहेर काढणारा असामान्य कोळी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
समुद्रांत होणारे प्लास्टिकचे प्रदूषण ही आता वैश्विक समस्या झाली आहे. शास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी तर ह्या समस्येला “ग्लोबल ट्रॅजेडी” असे म्हणतात कारण ह्या प्रदूषणाचे आपल्या समुद्रांवर व समुद्रातील परिसंस्थेवर (इकोसिस्टिम) वर भयंकर परिणाम होत आहेत.
हे परिणाम जोवर आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला जाणवत नाहीत तोवर आपल्याला त्याचे गांभीर्य कळणार नाही.
आणि जेव्हा ह्याचे परिणाम आपल्याला जाणवू लागतील तोवर खूप उशीर झालेला असेल आणि पर्यावरणाचे भरून न येण्याजोगे नुकसान झालेले असेल. पृथ्वीवर सध्या अब्जावधी टन कचरा समुद्रांमध्ये गोळा झालेला आहे.
कित्येक समुद्रकिनारे प्लॅस्टिकच्या विळख्यात सापडून तिथल्या जीवनावर अतिशय गंभीर परिणाम झाले आहे. शास्त्रज्ञांना तर अशी भीती वाटते आहे की जर असाच हलगर्जीपणा सुरु राहिला तर २०५० सालापर्यंत समुद्रात माश्यांपेक्षा प्लॅस्टिकच जास्त असेल.
प्लास्टिक प्रदूषणाचे समुद्री जीवनावर अतिशय गंभीर परिणाम होत आहेत.
हजारो सागरी पक्षी, समुद्री कासवे, सील आणि इतर समुद्री सस्तन प्राण्यांचा ह्या प्लास्टिकमुळे हकनाक जीव जातो आहे. हे प्राणी,मासे, पक्षी त्यांच्या पोटात प्लास्टिक गेल्यामुळे किंवा प्लॅस्टिकमध्ये अडकून पडल्यामुळे मरत आहेत.
सिंगल युझ प्लास्टिक, कपड्यातून निघणारे मायक्रोप्लास्टिक फायबर आणि हजारो टन प्लास्टिक समुद्रात ओतले जात आहे आणि ह्यामुळे पृथ्वीवर आर्क्टिक पासून अंटार्टिकापर्यंत अशी एक इंच सुद्धा अशी जागा उरलेली नाही जिथे प्लास्टिकचे प्रदूषण नाहीये.
म्हणजे ह्या प्रश्नाने किती उग्र स्वरूप धारण केले आहे हे समजणे काही रॉकेट सायन्स नाही.
जेव्हा केरळच्या ह्या मच्छीमाराने फेसबुकवर ह्या गंभीर समस्येबद्दल वाचले तेव्हा तो अतिशय अस्वस्थ झाला.
के व्ही प्रियेश हा मासेमारी करणारा तरुण केरळच्या कोझिकोडे जिल्ह्यातील चोम्बाला बंदराजवळ राहतो. द बेटर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणतो,
“हा समुद्र म्हणजे माझे घर आहे. तुमच्या घरात असा सगळ्यांनी कचरा टाकला आणि सगळीकडे कचऱ्याचे साम्राज्य पसरल्यामुळे तुम्हाला श्वास सुद्धा घेत नाहीये तर तुम्हाला असे वाटेल? बहुतेक असेच सध्या समुद्रातील त्या जीवांना वाटत असेल ज्यांच्या घरात सगळं जग कचरा टाकतंय.”
बहुतेक लोकांना असं वाटतं की फक्त समुद्रकिनाऱ्यावरच भरपूर प्रमाणात कचरा आहे. पण दुर्दैवाने खोल समुद्रात सुद्धा असाच प्लास्टिकचा कचरा सापडतोय.
म्हणजे लक्षात घ्या ही समस्येने किती भयानक स्वरूप धारण केले आहे! आणि ह्यासाठी आपण पर्यटक किंवा फेरी बोटीतून प्रवास करणाऱ्यांना दोषी धरतो.
ते तर दोषी आहेतच पण अनेक मच्छीमार सुद्धा त्यांच्याकडचे पाणी संपले की समुद्राच्या पाण्यात प्लॅस्टिकच्या बाटल्या टाकून देतात.”
प्रियेशचे काही फार जास्त शिक्षण झाले नाही. घरच्या गरीब परिस्थितीमुळे त्याला दहावीनंतरच शिक्षण सोडावे लागले.
जरी त्याचे शिक्षण अर्धवट सुटले असले तरीही त्याला कायमच प्लॅस्टिकच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या नुकसानाबद्दल चिन्ता वाटत आली आहे.
पण जेव्हा मासेमारी करताना त्याला खोल समुद्रात सुद्धा प्लॅस्टिक सापडू लागले तेव्हा त्याच्या चिंतेत आणखीनच भर पडली आणि त्याला कळले की मानवाने पर्यावरणाचे किती अपरिमित नुकसान केले आहे.
काही दिवसांनी त्याने ह्या विषयाशी निगडित फेसबुकवर एक पोस्ट वाचली.त्यानंतर त्याने ठरवले की मासेमारी करताना जो काही कचरा सापडेल तो समुद्रातून बाहेर काढून गोळा करायचे त्याने ठरवले.
त्याने जसे ठरवले होते तसे त्याने समुद्रात सापडलेला कचरा बाहेर काढणे सुरु केले. त्याला असे करताना बघून लोकांनी त्याची चेष्टा केली. अगदी त्याला वेडा सुद्धा म्हटले.
कधी कधी त्याला लोकांच्या ह्या टोमण्यांचा त्रास होतो. पण प्रियेशने त्याचे काम थांबवलेले नाही. त्याने जे डोळ्यापुढे ध्येय ठेवले आहे त्यासाठी त्याचे काम अविरत सुरु आहे.
त्याला अशी आशा आहे की त्याचे काम बघून एकाने जरी प्रेरणा घेऊन समुद्रातला कचरा बाहेर काढण्याचे काम सुरु केले तर अनेक लोक त्याचे अनुकरण करतील आणि काळाच्या ओघात त्याचा चांगलाच परिणाम दिसून येईल.
प्रियेशने हे काम महिनाभर केल्यावर त्याच्या लक्षात आले की हा प्लास्टिकचा कचरा इतका जास्त आहे की तो फक्त एका माणसाच्याने स्वच्छ होणे अशक्य आहे.
त्यामुळे त्याने अझियूर ग्रामपंचायतीकडे मदत मागितली. त्यांनी प्रियेशच्या कामाचे आणि त्याच्या निर्णयाचे कौतुक केले. आणि वॉर्डात अँटी प्लास्टिक मिशन सुरु केले. तसेच ते ह्या संदर्भातील मोठ्या निर्णयांमध्ये प्रियेशचा सल्ला घेऊ लागले.
सुरुवातीला प्रियेश दिवसातून एक तास ह्या कामासाठी द्यायचा. आता मात्र प्रियेशच्या गावात व्यवस्थित नियोजन करून एक टीम तयार करून दिवसातले तीन चार तास हे काम करण्यात येते.
हे काम सुरु करण्याआधी प्लास्टिकच्या प्रदूषणामुळे पर्यावरणावर किती भयानक परिणाम होतात ह्याविषयी गावात जनजागृती करण्यात आली. घराघरांत जाऊन कचऱ्याचे वर्गीकरण करण्याविषयी तसेच प्लास्टिक न जाळण्याबद्दल लोकांना शिक्षित करण्यात आले.
प्रियेश सांगतो की,
“आम्ही लोकांना सांगितले की जो कोणी प्लास्टिक जाळेल किंवा कचऱ्याचे वर्गीकरण न करता कचरा फेकून देईल त्याला मोठा दंड होईल. आता आमच्या पंचायतीने एक प्लास्टिक श्रेडींग मशीन घेतले आहे आणि एक हरित कर्म सेना तयार केली आहे.
ही सेने घरोघरी जाऊन प्लास्टिकचा कचरा गोळा करते. आता माझ्याकडे समुद्रात मिळालेला जो प्लास्टिकचा कचरा साठतो तो ही मी त्यांच्याकडेच पाठवतो.”
पंचायत सचिव टी शाहूल हमीद ह्यांनी ह्या मिशनबद्दल अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले की ह्या मिशनचे उदघाटन सरपंच रीना रायरॉथ ह्यांनी केले.
प्रियेशच्या नेतृत्वाखाली पंचायत सदस्य, स्थानिक आरोग्य अधिकारी, युथ कॉर्डीनेटर,हरित कर्म सेनेचे सदस्य आणि आशा वर्कर्स ह्यांनी ह्या मिशनमध्ये काम केले.
सर्वात महत्वाचे म्हणजे रशिया, रोमानिया, ऑस्ट्रेलिया आणि नेदर्लंड्सहुन आयुर्वेदिक उपचारांसाठी आलेल्या लोकांनी सुद्धा ह्या मिशनमध्ये काम केले.
पाच किमी लांबीचा समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला आणि प्रियेशने समुद्रात २ किमी पर्यंत आत जाऊन समुद्रातील कचरा बाहेर उपसून काढला.
आजवर ह्यांच्या टीमने जवळजवळ साडेतेरा टन प्लास्टिकचा कचरा स्वच्छ केला आहे आणि किनाऱ्यावरून व समुद्रातून दारूच्या असंख्य बाटल्या बाहेर काढल्या आहेत.
हमीद ह्यांनी सांगितले की ,”सद्यस्थितीत समुद्रात इतके जास्त प्रमाणात प्लास्टिक जमा झाले आहे की एकावेळी जाळीत ५० किलो मासे येत असतील तर त्यात १३ किलो प्लास्टिकचा कचरा निघतो.”
सध्या मात्र मान्सूनच्या आगमनामुळे समुद्र खवळलेला असल्याने प्रियेश आणि त्याच्या टीमला समुद्रात जाता येत नसल्याने त्यांचे काम थांबलेले आहे.
प्लास्टिकमुक्त समुद्र करण्याच्या प्रयत्नाबरोबरच तीस वर्षीय प्रियेशने इतरही समाजोपयोगी कामे केली आहेत. २०१७ साली जे चक्रीवादळ आले होते तेव्हा प्रियेशने त्यातील बाधितांसाठी कार्य केले.
मागच्या वर्षी केरळात जो भयानक पूर आला होता तेव्हाही त्याने खूप लोकांना मदत केली.
जेव्हा कोस्ट गार्डकडून प्रियेशला अस्मानी संकटामुळे झालेल्या नुकसानाबद्दल कळले तेव्हा त्याने लगेच त्याची बोट काढून समुद्रकिनाऱ्यावर तरंगणारे अनेक शव बाहेर काढण्यास मदत केली.
जेव्हा इतर लोक त्या शवांची ओळख पटवण्यास देखील जाण्यास तयार नव्हते किंवा त्या शवांना पाण्याबाहेर काढण्यास मदत करायला तयार नव्हते तेव्हा प्रियेशने ह्या कामात मोठा हातभार लावला.
मागच्या वर्षी जो भयानक पूर आला तेव्हा त्याने अडकून पडलेल्या अनेक लोकांना त्याच्या बोटीतून नेले आणि त्यांचा जीव वाचवला.
आता सध्या प्रियेश समुद्र पूर्ववत होण्याची वाट बघतो आहे जेणे करून त्याला त्याचे प्लास्टिकमुक्त समुद्राचे काम परत सुरु करता येईल. त्याला हे काम करण्यासाठी मदत करणाऱ्या अझियूर पंचायतीचे तो मनापासून आभार मानतो.
तो म्हणतो की त्याला त्याच्या गावच्या पंचायतीचा अभिमान वाटतो कारण त्यांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काम करण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्याच्यासारख्या सामान्य तरुणाला त्यासाठी मदतीचा हात दिला.
घरच्या परिस्थितीमुळे प्रियेशचे शिक्षण जरी अर्धवट राहिले असले तरीही त्याला पुढे शिकण्याची खूप इच्छा आहे. पुढे शिकून त्याला पर्यावरण संवर्धनासाठी काम करण्याची इच्छा आहे.
के व्ही प्रियेश आणि त्याच्यासारखे अनेक लोक पडद्यामागे राहून कसलीही अपेक्षा न करता त्यांचे काम करीत आहेत. समाजाप्रती आणि पर्यावरणाप्रती असलेले त्यांचे कर्तव्य निभावत आहेत.
आणि आपण मात्र बेजाबदारपणे पर्यावरणाचे नुकसान करत आहोत. आपण सुद्धा थोडे भान ठेवून वागलो तरच प्रियेशच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश मिळू शकेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.