या जोडप्याने ‘टिंडर’वर डेटिंग केलं आणि ‘तो’ थेट जेलमध्ये पोहोचला!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
ऑनलाईनच्या या जमान्यात रोज नवे नवे अॅप येत आहेत. कधी ऑनलाईन खरेदीचं अॅप तर कधी वजन कमी करण्यासंबंधी सूचना करणारे, कधी व्यायाम शिकवणारे अॅप, शुद्ध लेखनाचं अॅप.
रोज नवीन नवीन अॅप येत असतात आणि आपण त्याचा सर्रास वापर करत असतो.
या अॅपमध्ये नवीनच एक ‘टिंडर अॅप’ नावाचं अॅप ही आहे. मंडळी माहीत आहे का तुम्हाला हे ‘टिंडर अॅप’ कशासाठी वापरतात? टिंडर अॅप हे डेटींग अॅप आहे.
या जगात काय काय होईल हे सांगता येत नाही हेच खरं. तर या अॅपद्वारे दोन अनोळखी माणसं एकमेकांना भेटू शकतात, त्यांचे प्रॉब्लेम शेअर करू शकतात.
एकमेकांशी मैत्री करू शकतात आणि त्या दोघांना एकमेकांशी रिलेशनशीप ठेवायची असेल तर ते ठेवू शकतात. या अॅपमध्ये त्या दोघांचे चेहरे स्क्रीनवर दिसतात.
त्या दोघांनी ठरवायचं असतं की, आपण कॅज्युअल राहायचं की सिरीयसली रिलेशनशीप स्वीकारायची.
जर त्या दोघांना वाटलं की, आपण दोघेही या रिलेशनशीपसाठी तयार आहोत तर त्यांनी राईट स्वाईप करायचं, पण कधी कधी एकाला वाटतं की, आपण या रिलेशनशीपसाठी फारसे तयार नाही आहोत आणि दुसरा मात्र त्यात गुंतलेला असतो.
अशा वेळी दोघांनी जर चुकून ‘राईट स्वाईप’ केले तर प्रॉब्लेम होऊ शकतो. इतका की एखादा तुरुंगातपण जाऊ शकतो. अशीच एक विचित्र घटना बंगलूरमध्ये घडली पाहुया नक्की काय झालं ते.
२९ वर्षांच्या एका पुरुषाने टिंडर नावाच्या लोकप्रिय डेटींग अॅपवरून एका स्त्रीला स्वाईप केले.
महिनाभर त्यांच्यात बोलणे झाले. ती स्त्री त्या रिलेशनशीपबाबत अगदी गंभीर होती. नंतर महिन्यानंतर त्या दोघांनी भेटायचे ठरवले. ते एका रात्री भेटले. त्या स्त्रीला तो पुरुष आपण अगदी सभ्य असल्याचे भासवत होता.
नंतर थोड्या वेळाने त्या पुरुषाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. सुरुवातीला तिने नकार दिला. पण तिला तो पुरुष आवडला असावा, आणि तिला ही रिलेशनशीप वाढवावी असे वाटत होते.
परंतु त्याच्याकडून मात्र तीच मागणी होत होती. शेवटी असे संबंध ठेवल्यावर तरी आपल्यातील संबंध पुढे जातील अशा भावनेनं तिने त्याच्याशी संबंध ठेवायला संमती दिली.
आणि त्याच रात्री दोघांच्यात शरीरसंबंध निर्माण झाले. म्हणजेच त्याने तिला तसे करायला भाग पाडले, थोडक्यात भावनिक जबरदस्ती केली असे ती नंतर म्हणाली.
त्या दिवशीनंतर त्या पुरुषाने नंतर त्या स्त्रीशी फोन किंवा मेसेजनेही तिच्याशी काहीच संपर्क साधला नाही.
तिने फोन केल्यावर त्याने उचलला नाही. शेवटी आठवडाभराने त्या स्त्रीनेच त्याला फोन केला आणि विचारले,
‘‘तू माझा फोन का उचलत नाहीस? तुझं मत असं का बदललं?’’ तेव्हा त्याने सांगितले, ‘‘आता हे प्रकरण बास झाले. तू माझ्याशी आता संपर्क साधू नकोस.’’
आणि त्याने तिला व्हाटस्अॅपवर देखील ब्लॉक करून टाकले. म्हणजे आता ती त्याच्याशी संपर्क साधू शकणार नाही. थोडक्यात, त्याने तिचा गैरफायदा करून मग अक्षरश: दुर्लक्षित केले. त्याने त्याचा फायदा करून घेतला व तो रिकामा झाला.
तीन जून रोजी त्या स्त्रीने याबाबत तक्रार केली. आता त्या पुरुषाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस तपास सुरू आहे. तर सांगायचा मुद्दा हा की एकविसाव्या शतकातील हे डेटींग अॅप्स हे महिलांचा फायदा घेण्यासाठी वापरले जातात.
टिंडर अॅप किंवा अशा प्रकारच्या अॅपवर फेक प्रोफाईल बनवणे खूप सोपे असते. त्यामुळे अशा प्रकारच्या अॅप्सवर कितपत विश्वास ठेवायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे.
अनोळखी व्यक्तींपासून सावध राहाणं हेच सगळ्यात योग्य.
ऑनलाईनमुळे जितका फायदा होत आहे तितकाच तोटा देखील होत आहे. फेसबुक, व्हाटस्अॅप वरून सुद्धा अनेक गैर प्रकार हात असतात. त्यामुळे आपण या अॅपचा कसा वापर करायचा हे ज्याचं त्यानं ठरवायचं.
महिलांनी, मुलींनी किंबहुना सगळ्यांनीच सोशल मिडियावर आपली माहिती किंवा फोटो पाठवताना भान राखलं पाहिजे.
बर्याच वेळा ‘आम्ही इकडे जातोय, तिकडे जातोय’ अशा पोस्टही फेसबुक वर टाकल्या जातात. त्यामुळे लक्ष ठेवून असणार्या चोरट्यांचा फायदा होतो. तेव्हा अशा गोष्टी व्हायरल होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
स्टेटस या प्रकारामुळे तर लोकांना अतिच उत्साह आला आहे. त्यामुळे आपण काय करतो, कुठे जातो याची सगळी माहिती लोकांना होते. त्याचा वापर कमीत कमी आणि योग्य रितीने केल्यास त्यातून आपल्याला आनंदही मिळू शकतो, पण थोडी काळजी घ्यायला हवी.
आता तुम्ही म्हणाल की हे काही वाईट आहे का? तर वाईट अजिबात नाही. सोशल मिडीयामुळे लोकांना आनंद पण तितकाच मिळतो. नवीन नवीन माहिती मिळते, फक्त आपण लिमीट क्रॉस करता कामा नये.
या टिंडर अॅप मधील नियंत्रणाकडे मात्र लक्ष देणं खूप गरजेचं आहे. या अॅपमुळे गैरवर्तन, बलात्कार असे गुन्हे घडत आहेत.
या गुन्ह्यांच्या बाबतीतलं टिंडरचं रेकॉर्ड सध्या तरी खूप खराब आहे. काही किस्से असे ही घडत आहेत की काही वाईट स्त्रियांकडूनसुद्धा अशा प्रवृत्तीला संधी दिली जात आहे. त्यामुळे वाईट प्रवृत्तींचा फायदाच होत आहे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे.
त्या पुरुषाची त्या महिलेने तक्रार तीन जून रोजी केली आहे. आता त्याला न्यायालयात नेले जाईल.
मग त्याच्यावर गुन्हा दाखल होईल का? हा प्रश्न आहेच.
पण खरंच तुम्हाला असं वाटतं का? की संबंधित व्यक्तींनी त्यांच्या संबंधाबद्दल जर आधीच विचार केला असता किंवा आपली मतं चोख मांडली असती, तर अशाप्रकारच्या घटनांना आळा बसला असता.
तेव्हा आधीच ‘सावधान मोड’ मध्ये राहिलेलं चांगलं नाही का? यामुळे स्वत:चा फायदा तर होईलच आणि गुन्हेगारांना पण आपोआपच चपराक बसेल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.