केतकी चितळे प्रकरणाची ही दुसरी बाजू आपण सर्वांनीच लक्षात घेण्यासारखी आहे…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
लेखक : चंदन तहसिलदार
===
या लिखाणाचा उद्देश, कुणालाही पाठीशी घालणे असा नसून दुसरी बाजू सुद्धा लोकांना कळायला हवी असा आहे.
या सर्वांची सुरवात एक वर्षांपूर्वी झाली. केतकी चितळे यांनी फेसबूकवर एक पोस्ट टाकली होती ज्यात मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला होता. याबद्दल अनेकांनी त्यांना अत्यंत सभ्य आणि नम्र शब्दांत विनंती केली होती.
परंतु त्यांनी या सर्वांना शिवराळ भाषेत आणि उर्मटपणे उत्तरे दिली. (हे प्रकरण अंगावर शेकेल म्हणून आता त्यांनी ती पोस्ट डिलीट केली असली तरी त्यांच्या उत्तरांचे स्क्रीनशॉट उपलब्ध आहेत.)
यांनातर आताच्या प्रकरणात त्यांनी फेसबुकवर हिंदी व्हिडिओ बनवला. त्यांनी त्यांच्या खात्यावरून कोणत्या भाषेत व्हिडिओ बनवावा हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्याचवेळी “मराठीचे झेंडे फडफडवू नका.” “हिंदी राष्ट्रीय भाषा आहे. ती येणे अपेक्षित आहे.
मराठीची मागणी म्हणजे नॉनसेन्स आहे : असाही त्यांच्या एका वाक्याचा अर्थ आहे…!
साहजिकच या भाषेची अनेक मराठी प्रेमींना चीड आली (कदाचित तसं घडून हे प्रकरण अधिक तापलं जावं असाच तर हेतू नाही ना??) आणि केतकी चितळेला शेकडो लोकांनी चांगल्या वाईट भाषेत ऐकवलं.
ज्यांनी ज्यांनी तिला शिवीगाळ केली, धमक्या दिल्या ते १००% चूक आहे आणि ते अजिबात व्हायला नको. परंतु केतकी चितळे यांना अनेकांनी नम्र आणि योग्य भाषेत सुद्धा विनंती केली. परंतु त्यांनी या सर्व चांगल्या टिपण्या उडवून लावल्या आणि फक्त शिव्या असलेल्या तेवढया ठेवल्या.
यानंतर त्यांनी आणखी एक व्हिडिओ बनवला यात खरंतर “मराठी लोकांची मने दुखावण्याचा उद्देश नव्हता.” “देशाला कोणतीही राष्ट्रीय भाषा नाही” असं उत्तर अपेक्षित होते पण त्यांनी फक्त शिव्या देणाऱ्या लोकांचा उल्लेख करून स्वतः बद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
याहीवेळी तिने मराठीचा आग्रह धारणाऱ्यांना शिवरायांचे मावळे असं म्हणून उगीच मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न केलाच.
पण खुद्द केतकी चितळे यांनीच मागे एका गडावर शिवरायांच्या तोफांवर बसून प्रणय दृश्ये रंगवली होती तेव्हा शिवरायांबद्दलचा अभिमान कुठे होता?
अनेक प्रयत्नांनी “बॉम्बे” चं मुंबई करून घेतलंय तरीही हेकेखोर पणे तेच जुनं नाव वापरण्याचा अट्टाहास का?
केतकी चितळे यांना निर्भीडपणे व्यक्त होण्यासाठी पाठींबा देणाऱ्या सर्व राजकीय अराजकीय लोकांनी या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा.
१) नम्र भाषेतील टिपणीवर शिवराळ उत्तर देण्याचा हक्क “फक्त स्त्री आहे म्हणून” केतकी चितळे यांना आहे का?
२) गड किल्यांवर जाऊन तोफांवर प्रणय दृश्ये साकारणे हे कायद्याला धरून आहे का?
३) चांगल्या भाषेतील टिपण्या दुर्लक्षित करून त्या डिलीट करून फक्त शिव्या असलेल्या टिपण्या दाखवून “माझ्यावर स्त्री आहे म्हणून अन्याय होतोय.” असा कांगावा करणे योग्य आहे का?
४) ज्यांनी अत्यंत सभ्य शब्दांत उत्तरे दिली त्यांची नावे खोट्या तक्रारीत अडकवून त्यांना त्रास देणे योग्य आहे का??
जर या प्रश्नांची उत्तरे “नाही” असं असेल तर केतकी चितळे सुद्धा बऱ्याच अंशी दोषी आहे आणि या प्रकरणात तिची सुद्धा चूक आहे.
आणि जर तरीही या प्रकरणाकडे एकांगी बाजूने पाहिलं गेलं तर यातून दोन शक्यता निर्माण होतात.
१) कुणीही मराठी भाषेबद्दल काहीही बोललं तरी ते चालतं असा प्रघात पडेल.
२) त्याबद्दल तुम्ही जाब विचारलात तर तुमच्याबद्दलच तक्रार केली जाईल असा शिरस्ता पडेल. म्हणजे तुमच्या डोळ्यादेखत जरी तुमच्या मातृभाषेचा अपमान होत असेल तरी तुम्ही त्याबद्दल व्यक्त सुद्धा व्हायचं नाही आणि दाद तर मागायचीच नाही.
या सर्वांतून केतकी चितळेला काय साधायचं आहे तर प्रसिद्धी.
तिला मालिका, जाहिराती यांत काम हवं असतं आणि त्यासाठी बातम्यांत रहाणं तिची गरज आहे पण या जाहिरातींची आणि प्रसिद्धीची किंमत काय असावी याचा विचार आपण करायचा आहे.
पुन्हा एकदा, तिच्यावर अश्लील शेरेबाजी करणे चूकच आहे, त्याला पाठीशी घालणे हा या लेखाचा मुद्दा नाहीच पण हा सगळा बनाव फक्त त्याचसाठी तर नाही ना केला गेला इतपत शंका यायला वाव आहे हे ही खोटं नाही.
त्यामुळे स्त्री असल्याने माझ्यावर हा अन्याय झाल्याची कारणे देणाऱ्या केतकी चितळे सारख्या वृत्तीचा आपण निषेध करणार आहोत की नाही?? – हा सर्वात मोठा प्रश्न मला मांडायचा आहे.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.