शेकडो वर्षांपासून जगावर राज्य करणाऱ्या ‘तथाकथित’ सिक्रेट ग्रुपबद्दल…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लहानपणी रामायण, महाभारत वगैरेच्या गोष्टी मोठ्यांकडून ऐकताना, शाळेत अभ्यास म्हणून शिकताना आपल्या मनावर बिंबवलेला एक मुलभूत विचार म्हणजे या जगात दोन शक्ती नांदतात. साध्या शब्दांत सांगायचे तर चांगल्या नि वाईट शक्ती.
अनादि कालापासून आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी या दोन शक्तीमध्ये युद्ध होत आहे.
सूर-असुर, देव-दानव यांच्यातील युद्धाच्या कथा आपण काल्पनिक कथा म्हणून एन्जॉय केल्या नि करत आहोत. पण कोणी यातील सत्यता पटवण्याचा प्रयत्न करत पुरावे दिले तर?
जगात घडलेल्या भीषण दुर्घटना, त्यात झालेला मानव संहार हे केवळ दुर्दैव नसून वाईट शक्तींनी एकत्र येऊन घडवलेला हा उत्पात होता असे म्हटले तर? विश्वास बसेल?
वर्ल्ड ट्रेड सेंटर वरील हल्ला, बॉम्बस्फोट, तरुणांना भलत्या गेम मध्ये गुंतवून आत्महत्येच्या टोकापर्यंत नेणे, किंवा अचानक पसरत चाललेले आत्महत्येचे लोण…. हे सगळे अचानक घडले नसून यामागे सूत्रबद्ध योजना आहे असे कोणी सांगितले तर?
कोणाचा विश्वास बसेल की नाही माहित नाही, पण असे आहे हे मानणारांचा एक मोठा समूह आहे. या विश्वासणारांत ‘इल्लुमिनाती’ या नावाच्या संघटनेची चर्चा होते, कधी हळू आवाजात, कधी उघड. चला तर पाहू या, काय आहे इल्लुमिनाती.
इल्लुमिनाती या संघटनेची स्थापना १ में १७७६ मध्ये प्रोफेसर अॅडम विश्याप्ट याने केली. त्या वेळी या संघटनेचे उद्देश ‘परिवर्तन’ हाच होता.
सरकारे बिनबोभाट चालायची असतील तर प्रजेने शहाणे होऊन उपयोगाचे नाही, नाहीतर क्रांती होऊन सत्ता उलथवल्या जातील, या भीतीपोटी लोकांना देव धर्माच्या अंधविश्वासात अडकवणे हे सत्ताधाऱ्यांचे धोरण होते. याला शह देण्यासाठी इल्लीमिनाती हि संघटना अस्तित्वात आली.
लोकांना प्रकाशाकडे नेणे या प्रतीकात्मक उद्देशामागे त्यांना अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढणे हे मुख्य उद्दिष्ट होते.
पण आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ पाहतोय हे लक्षात येताच सत्तेत असणारांनी यावर बंदी आणली. बंदी आणल्यानंतर ही संघटना गुप्त रीतीने कामे करू लागली. पण आज कित्येक वर्षानंतर या संघटनेचे उद्दिष्ट अगदी पूर्वी होते त्याच्या विरोधात झाले आहे.
शतकांच्या लांब प्रवासानंतर प्रकाशाचे वचन देणारी इल्लुमिनाती अंधारात कृष्णकृत्ये करणारी संघटना म्हणून कुप्रसिद्ध झाली आहे. प्रचंड पैसा बाळगणाऱ्या लोकांनी हस्तक्षेप केल्यानंतर ही संघटना आता वाईट शक्तीचे प्रतीक झाली आहे.
ल्युसिफर या सैतानाची पूजा हे लोक करतात. यांचा मुख्य उद्देश हिंसा हा आहे.
जास्तीत जास्त जीवितहानी होणाऱ्या दुर्घटना घडवून आणणे हा आहे. यासाठी हे कोणत्याही थराला जातात. अघोरी विद्या, काळी जादू यांचा आधार घेतात. या संघटनेचे सदस्य दिसायला आपल्यासारखे सर्वसामान्य असतात.
आपल्या अवतीभोवती वावरणारे असतात. आपल्याला त्यांच्याकडे बघून शंकाही येत नाही की त्यांचे खरे जग अज्ञात, अंधारे आहे. यांचा सैतानाशी करार झालेला असतो. प्रचंड यश, पैसा, वैभवशाली आयुष्य याच्या बदल्यात सैतानाला आत्मा बहाल करायचा हि प्रथा आहे.
थोडक्यात असे एक जग निर्माण करायचे ज्यावर फक्त अंधाराचे साम्राज्य असेल. जिथे फक्त नकारात्मकता असेल. हिंसा, नैराश्य श्वापदांसारखे जिभल्या चाटत त्यांचे बळी शोधत अंधारात निघतील, थकून भागून निर्धास्त झोपलेल्या जीवांना भक्ष्य बनवतील.
त्रिकोण आणि त्यात एक डोळा हे यांच्या संघटनेचे चिन्ह आहे.
अनेक लोकप्रिय मालिका, चित्रपट निर्माते त्रिकोणात डोळा या चिन्हाला त्यांच्या व्यवसायात स्थान देतात. ‘आमची तुमच्यावर नजर आहे’ असेच जणू हा डोळा सूचित करत असतो.
हे चिन्ह अमेरिकन डॉलर वर देखील छापले आहे. वीस डॉलर्सची नोट त्रिकोणी घडी करून पाहिली असता हल्ला करून उध्वस्त केलले वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारतींचे चित्र दिसते. यावरून या संघटनेच्या अस्तित्वावर जे साशंकतेचे प्रश्नचिन्ह आहे ते योग्य आहे का असे वाटू लागते.
कमी वेळात प्रचंड प्रसिद्धी पावलेले नि अमाप पैसा कमावलेले अनेक बॉलीवूड आणि हॉलीवूड स्टार्स या संघटनेचे सभासद आहेत. जगभरात अत्यंत लोकप्रिय असलेला एक पॉपस्टार यांचा सभासद होता असे मानले जाते.
अत्यंत गुप्तपणे चालणाऱ्या या संघटनेचे नियम पाळले गेले नाहीत की शिक्षा मिळते. गुप्तता राखणे ही मुख्य अट असताना एका व्यक्तीने त्याच्या बोलण्यात इल्लुमिनातीचा उल्लेख केला नि दुसऱ्याच दिवशी त्याचा गूढ मृत्यू झाला, असे म्हटले जाते.
हे सर्व अशक्यप्राय वाटणारे सत्य आहे असे गृहित धरले तर थरकाप उडतो. याला शेवट नाही का? यातून बाहेर काढणारा कोणी कृष्ण, राम, येशूसारखा मसीहा नाही का, असे वाटू लागते. जग ज्वालामुखीच्या टोकावर असल्यासारखे होरपळत आहे.
अस्थिरता, क्रौर्य, हिंसा, मृत्यू, रक्तपात, अशांती, घातपात, अपघात यांनी रोगाच्या साथीप्रमाणे थैमान घातले आहे.
इन्टरनेट सारख्या टेक्नोलॉजीच्या माध्यमातून सूत्रबद्ध योजना आखत माणसाच्या मन, मेंदूचा ताबा घेऊन त्याची विचारशक्ती संपवली जात आहे.
अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणूस त्याच्या पोटापाण्याचे प्रश्न सोडवण्यात व्यग्र आहे आणि याही परिस्थितीत, सगळे वाईट घडत आहे हे टीव्ही नावाचे राक्षसी यंत्र आपल्याला सांगत असताना तेच यंत्र आपल्याला कुठे कुठे काही चांगले घडत असल्याचे देखील सांगते.
कोणी झाडे लावत आहे, कोणी प्राणी वाचवत आहे, कोणी माणसे जागवत आहे आणि मग थकून भागून झोपणारा माणूस देवावर विश्वास असो वा नसो.
ही आशा उराशी बाळगून झोपतो की उद्या सकाळी झोपेतून उठ्ल्यावर अंधारचे साम्राज्य बघायला मिळणार नाही. या अंधाऱ्या साम्राज्याला शह देण्यासाठी आवश्यक असलेला चांगुलपणा अजूनतरी या जगात शिल्लक आहे, हे मात्र नक्की.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.